Friday, November 19, 2021

EditorsView published in Online Lokmat on Nov 18, 2021

वाढते ध्वनिप्रदूषण हानिकारक... किरण अग्रवाल / वायू प्रदूषणाप्रमाणेच ध्वनी प्रदूषणाची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नोकरी, शिक्षण वा उद्योगानिमित्त ग्रामीण भागातील लोंढे शहरात येत असून वाढत्या शहरीकरणातून विविध समस्या निर्माण होत आहेतच; परंतु यामुळे वाहतूकीवर ताण पडून वाहनांच्या कर्णकर्कश्य हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणातही भर पडून जात आहे, ज्याकडे अभावानेच लक्ष दिले जाते. ध्वनी प्रदूषणाला कारक ठरणाऱ्या अन्य बाबींमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, ती आरोग्यास अपायकारकही ठरू पाहत असल्यामुळे याबाबत कठोर भूमिका व निर्णयांची गरज आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या निरीक्षणानुसार राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये दिवसाच नव्हे तर रात्रीच्या निरव वातावरणातही ध्वनी मर्यादा ओलांडली गेल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. मुंबई, सोलापूर, नाशिक व अमरावती या चारही शहरांमध्ये दिवसा आणि रात्रीही ध्वनि प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या निरीक्षणात आढळून आले. कोल्हापूर, मुंबई, वसई विरार, पुणे, कल्याण, सांगली आदी ठिकाणी दिवसा, तर ठाणे, भिवंडी, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, मालेगाव आदी ठिकाणी रात्रीचे ध्वनिप्रदूषण अधिक असल्याचे या निरीक्षणात नोंदविले गेले. या निरीक्षणाकडे गंभीरपणे बघायला हवे, कारण सदरचे प्रदूषण अनारोग्याला निमंत्रण देणारे आहे. प्रदूषणातील जल व वायू प्रदूषणाबाबत जशी जागरूकता येताना दिसत आहे, तशी ध्वनीबाबत आढळत नाही; त्यामुळे गरज नसतानाही वाहन हाकताना हॉर्न वाजवत प्रवास केला जातो. अलीकडेच दिवाळी सरली, या दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले, त्यातून वायू व ध्वनी प्रदूषणही घडून आले. राजधानी दिल्लीत तर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी असतानाही बार उडाले, तेथील अन्यही काही कारणांमुळे दिल्लीतील शाळा व कार्यालये बंद ठेवण्याची वेळ ओढवली आहे. आपला क्षणिक आनंद हा वेगळ्या संकटाला निमंत्रण देऊन जातो याबाबतचे भानच बाळगले जात नाही, हा यातील चिंतनाचा व चिंतेचाही मुद्दा आहे. ------------- दोन व्यक्तींच्या बोलण्यातील असो, की वाहनांच्या हॉर्नची अगर फटाक्यांची; ध्वनीची कमाल अगर सुरक्षित प्रमाण मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ध्वनिप्रदूषण होत असते. आपले कान 30 ते 40 डेसिबल आवाज सहन करू शकतात, मात्र वाहनांचे हॉर्न असोत की फटाक्यांचे; शंभर ते दीडशे डेसीबल पर्यंत ध्वनितरंग उठतात. कानातील नाजूक पडदे फाटून बहिरेपण येण्याची व मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता यातून बळावते. यात सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाला रस्त्यावर वाढलेली वाहनांची गर्दी व होणारे हॉर्नचे आवाज कारणीभूत ठरत असल्याचेही आढळून येते. सिग्नल मिळाला असताना एखादे वाहन नादुरुस्त असल्यामुळे रस्त्यातच अडकून पडल्यावर मागील वाहनांकडून ज्यापद्धतीने हॉर्न वाजविले जातात किंवा महामार्गावर ट्राफिक खोळंबल्यावर एकामागोमाग एक वाहनांचे जे हॉर्न वाजू लागतात ते ध्वनी प्रदूषणाला निमंत्रण देतात, पण याबाबत कोणीच काळजी घेताना दिसत नाही. असले प्रकार टाळण्यासाठीच लोकमत माध्यम समूहाने मागे 'हॉर्न बजाने की बिमारी' ( HBKB ) नावाने एक मोहीम हाती घेतली होती, त्याचा जनमानसावर चांगला प्रभावही दिसून आला होता. अन्य सामाजिक संस्थाही यासाठी पुढे आल्या व याबाबत काळजी घेतली गेली तर अनावश्यक गोंगाट टळून ध्वनी प्रदूषणाला आळा घालता येऊ शकेल. -------------- महत्वाचे म्हणजे असल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही मानके निश्चित केली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूदही आहे, परंतु संबंधित यंत्रणांकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. प्रत्येकच शहरात घाबरवून सोडणारे हॉर्न वाजतात, परंतु अशांवर गुन्हे नोंदविले गेल्याचे अपवादानेच आढळते. शाळा व रुग्णालयांच्या परिसरात आवाज बंदीचे फलक लटकलेले असतात, परंतु तेथेही बेधडकपणे हॉर्न वाजतात. लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्याचा त्रास होऊनही कुणी तक्रार करीत नाही म्हणून यंत्रणा स्वतःहून काही करत नाही. खासगी व्यक्तिगत कार्यक्रमानिमित्तही गल्लीत डीजेचा दणदणाट केला जातो. याबाबतही कोणी कसले भान बाळगताना दिसत नाही. आवाजाच्या या कमाल मर्यादा गाठण्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळून जात असल्याचे पाहता, वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्याबाबत लक्ष दिले जाणे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या नोंदीने त्यासंबंधीची निकड अधोरेखित होऊन गेली आहे. https://www.lokmat.com/editorial/increasing-noise-pollution-harmful-a310/

No comments:

Post a Comment