Thursday, March 31, 2022

EditorsView published in Online Lokmat on March 31, 2022

अनीतीतुन आलेली अश्लाघ्यता दुर्दैवी! किरण अग्रवाल / व्यवसायही करावा नीतीने, असे नेहमी म्हटले जाते; कारण त्याशिवाय त्याला यश लाभणे कठीण असते. प्रामाणिकता, सचोटी, सच्छिलता, मृदुता, सेवेचा भाव यासारख्या बाबीतुनच व्यवसाय भरभराटीस जातो. व्यवसाय कोणताही असो, हल्ली तर स्पर्धाच इतकी वाढली आहे की कमी नफ्यात अधिक सेवा पुरविण्याच्या नव्या नीतीवर व्यवसाय केले जाऊ लागले आहेत. अनीतीने मात्र काहीच हशील होत नाही. कधी क्षणिक लाभ झालाही, तरी तो टिकून राहात नाही किंवा समाधान देणारा ठरत नाही. अशात झटपट मोठे होण्याच्या नादात व्यवसायातही अनीतीचा मार्ग स्वीकारला जाऊन कोणाच्या मजबुरीचा गैरफायदा उचलण्याचे प्रयत्न केले जाताना दिसतात तेव्हा त्यातून समाजातील अधःपतन पुढे आल्याखेरीज राहत नाही. कर्ज प्रकरणातील व्याजाच्या बदल्यात सावकाराकडून एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली गेल्याचा जो प्रकार धुळ्यात घडून आला आहे, तो देखील तशातलाच म्हणता यावा.
गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या जगण्याचे गणित बदलवून ठेवले. हाताचा कामधंदा गेल्याने हातावर पोट असणाऱ्यांची यात मोठीच अडचण झाली. नेमका याचाच लाभ जागो जागच्या सावकारांकडून घेतला गेल्याची प्रकरणे आता एकामागोमाग एक पुढे येऊ लागली आहेत. तसेही अवैध सावकारीतुन अव्वाच्या सव्वा व्याजदराने घडून येणारी अति सामान्यांची पिळवणूक आपल्याकडे नवीन राहिलेली नाही. घरे दारे व जमिनीचा तुकडा सावकाराकडे गहाण ठेवून घेतल्या गेलेल्या कर्ज प्रकरणात अखेर संबंधितांना बेघर व्हावे लागल्याची अनेक उदाहरणे देता येणारी आहेत. अवैध सावकारीच्या विरोधात सरकारने कडक धोरण स्वीकारल्याने या पिळवणुकीला काहीसा लगाम बसला आहे देखील खरे, परंतु अजूनही विशेषतः ग्रामीण भागातील अवैध सावकारी संपलेली नाही. दुर्दैव असे की, या अवैध सावकारीच्या पाशात गुरफटलेल्यांना आर्थिक हानीला तर सामोरे जावे लागतेच; पण काही प्रकरणात सावकाराच्या अमानवी, अनैतिक अपेक्षांचाही सामना करण्याची वेळ येते. धुळ्यातील प्रकरणात तेच घडून आलेले दिसत आहे. -------------------- धुळ्यातील एका तरुणाने सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे व्याजासह परत मिळवण्यासाठी संबंधित तरुणाला वेळोवेळी शिवीगाळ व धमकी दिली जात होती, पण इतक्यावरच सावकार थांबले नाहीत तर त्याच्या पत्नीशी फोनवरून शारीरिक सुखाची मागणी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली म्हणून तेथील पश्‍चिम देवपूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला गेला आहे. यात अवैध सावकारी तर आहेच आहे, परंतु अनीतीचाही कडेलोट झाला आहे. अनीतीतुन आलेली अश्लाघ्यता यात आहे. अशी अश्लाघ्य अपेक्षा ठेवण्याची संबंधितांची मजल जातेच कशी हा यातील प्रश्न आहे. व्यवहार व वर्तनातील बेशरमतेचा कळस गाठणारे असे प्रकार माणुसकीला शरमेने मान खाली घालावयास भाग पाडतात, म्हणून अशांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. मागे दोनेक महिन्यांपूर्वी साताऱ्यातही असाच एक प्रकार घडला होता. तेथे अभिषेक कुचेकर या तरुणाने खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज वर्षभरात चौपट व्याजाने भरून दिले असतानाही अधिक व्याजाच्या अपेक्षेने त्याच्या अवघ्या दीड महिन्यांच्या मुलीला तिच्या आईच्या कुशीतून ओढून नेल्याचा प्रकार घडला होता. साताऱ्यातील हा प्रकार असो, की धुळ्यातील घटना; सावकारांची वाढती बेमुर्वतखोरी यातून लक्षात यावी. ------------------- अनीती, अनैतिक मार्गाने केल्या जाणाऱ्या व्यवसायातील वाढती गुंडगिरी मोडून काढणे हा खरे तर कायद्यापुढीलच नव्हे, सरकार व समाजापुढीलही आव्हानाचा विषय आहे. यात कायदा आपले काम करेल व सरकार आपली भूमिका बजावेलच, पण गैरमार्गाने कमाई करून समाजात प्रतिष्ठा प्राप्त करू पाहणाऱ्यांना डोक्यावर घेण्याची भूमिकाही सोडावी लागेल. लोकांना कमाई दिसते व त्या कमाईतून होणारा दानधर्म दिसतो, पण त्या कमाईचा स्त्रोत पाहण्याची गरज कुणास भासत नाही. अनिती, अनाचार, अनैतिकता; व हे सर्व ज्यातून प्रसवते तो अविवेक हा केवळ घातक अगर नुकसानदायीच नसतो तर समाजाच्या ऱ्हासालाही कारणीभूत ठरत असतो. प्रसंगी माणुसकीचीही कसोटी त्यातून लागते. तेव्हा ऱ्हास टाळायचा तर माणसाशी माणसासारखे वागायला हवे, वर्तनात ते दिसायला हवे तसे व्यवहारातही राहायला हवे. अनीतीने कमावलेल्या पैशातून कुणाचेही काहीही भले होऊ शकत नाही हे जाणायला हवे. ते जेव्हा जाणले जाईल तेव्हा कर्जाच्या वसुलीसाठी लहान लेकराला तिच्या मातेच्या कुशीतून ओढून नेण्यासारखे किंवा कुण्या भगिनीकडून शरीर सुखाची मागणी करण्यासारखे अश्लाघ्य प्रकार घडून येणार नाहीत. https://www.lokmat.com/editorial/the-ugliness-that-comes-from-injustice-is-unfortunate-a310/?fbclid=IwAR28XrAZiTol-sDLyoVTGLUECcB_YCi2imQM1EkRkzyGx9jhl-iACguzXmY

No comments:

Post a Comment