Thursday, March 10, 2022

काटेंगे तो उम्र है, जिएँगे तो ज़िंदगी…!

काटेंगे तो उम्र है, जिएँगे तो ज़िंदगी…! नाशकात असतांना द्राक्ष व डाळिंबाच्या बागांमध्ये रमलो होतो, कधी रावेरला जातो तेव्हा केळीच्या बागांमध्ये तो आनंद, ते जगणे शोधतो. आता वऱ्हाडात आलोय तर संत्रा बागेत... अकोल्याहून कार्यालयीन कामानिमित्त तेल्हारामार्गे अकोटकडे जात असताना भर दुपारच्या रखरखत्या उन्हात स्प्रिंकलरचे तुषार उडत असलेली एक संत्रा बाग नजरेस पडली अन गाडी थांबवली. म्हटले जरा जगुया जिंदगी...!
भल्यामोठ्या आंब्याच्या झाडाखाली गवताने आच्छादित मचान, सोनेरी उन्हात पिवळ्या धमक संत्र्यानी लगडलेली बाग, हरभऱ्यावर सुरू असलेले स्प्रिंकलर्स... कामाच्या धबडग्यात मलूल होऊ पाहणाऱ्या मनावर उत्साह, उर्जेचे शिंपण करणारेच हे तुषार.. सभोवतालच्या कोरड्या शुष्क वातावरणात नजरेला व पर्यायाने मनाला गारवा देणारा अतिशय आल्हाददायक ठरला हा विसावा. हेच तर आयुष्य, तीच जिंदगी... तीच जगण्याच्या प्रयत्नांत सुरू आहे भटकंती. वाट सरणारी नाही. चालत रहायचे आहे, रस्ता भलेही खाच-खळगे, आव्हानांनी भरलेला असेल; पण मधेच लाभणाऱ्या अशा एखाद्या आनंद देणाऱ्या बेटावर काहीसे विसावायचे आणि नवा उत्साह घेऊन पुन्हा पुढे चालायचे... इसी का नाम है जिंदगी..! चरैवेति.. चरैवेति..!! #KiranAgrawal #KirananandNashik

No comments:

Post a Comment