Wednesday, April 27, 2022

#SrilankaDiary02 ...

#SrilankaDiary02 ...
श्रीलंकेत भगवान बुद्धांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे चौकाचौकातील गौतम बुद्धांच्या मोठमोठ्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. गौतम बुद्धांचा दात जपून ठेवलेल्या कँडीतील ट्रथ टेम्पल, कोलंबोतील गंगारमय्या मंदिर, मातलेच्या अलुविहार येथील पर्वतावर विराजमान महाकाय बुद्ध मूर्ती व डंबूलाच्या गोल्डन टेम्पलमधील भाव भक्तीने प्रसन्नतेचा व अध्यात्माचा एक वेगळाच अनुबंध अनुभवयास मिळतो. विशेष म्हणजे, आम्ही ज्या दिवशी कोलंबोतील गंगा रमय्या मंदिरात गेलो त्यादिवशी सिंहली नववर्षाच्या प्रारंभाचा दिवस होता. त्यामुळे भन्तेजींकडून विशेष आशीर्वाद व डॉलरच्या रुपातील प्रसाद लाभला. या मंदिराच्या म्युझियममध्ये देश-विदेशातील असंख्य कलाकुसरीच्या वस्तू, बुद्ध मूर्ती, हस्तिदंताच्या विविध मूर्ती, घड्याळे, व्हीन्टेज कार्ससह नामवंत ब्रँड्सची चारचाकी वाहने असे भरपूर काही बघावयास मिळाले, जे बघून थक्क व्हायला होते. डंबोलाच्या मंदिर परिसरात हाती ब्रुम (झाडू) घेऊन स्वयंस्फूर्तीने सफाईची सेवाही दिली. या सर्वच मंदिर परिसरातील स्वच्छता, तेथील नीट नेटकेपणा व ठरलेल्या जागीच अगरबत्ती लावण्याची व फुले अर्पण करण्याची भाविकांची शिस्त ही खरेच अनुसरण्यासारखी आहे.
#srilankaTour #KiranAgrawal

Monday, April 25, 2022

#SrilankaDiary01 ...

April 11 tp 15, 2022 #SrilankaDiary01 ...
श्रीलंका.. देश तसा इवलासा, मात्र संकटावर मात करून पुन्हा उभे राहण्याची जिद्द असलेला. नुकताच या देशाचा दौरा करून आलो. महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्या देशात सुरू असलेली आंदोलने पाहता तेथे जाऊ नये असेच सर्वांनी सल्ले दिले होते, पण पत्रकारितेच्या दृष्टीने हीच वेळ आव्हानात्मक समजून गेलो. आंदोलने सुरूच आहेत, महागाईही प्रचंड आहे; पण पर्यटक म्हणून कुठेही कसलाही त्रास झाला नाही हे विशेष. महागाईपुढे हतबल न होता तेथील जनता रोजीरोटीचा झगडा झगडत आहे. पण यातून बाहेर पडू असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात. कोलंबोतुन गाले फोर्ट येथे जाताना वाटेत गतकाळात येऊन गेलेल्या सुनामीने उध्वस्त झालेला परिसर बघितला. त्या जीवघेण्या संकटातुन सावरत तेथे नवनिर्माण होताना दिसत आहे. कोलंबो जवळच एक बसस्थानक सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे, हे बस स्थानक म्हणजे जणू एअरपोर्ट वाटावे असे आहे.
कोलंबोतील टाऊन हॉल, लोटस टेम्पल असो, की नॅशनल म्युझियम व इंडिपेंडन्स स्क्वेअर; ते बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. तेथे महागाईचा संबंध येत नाही. येथल्या अनेकविध इमारती व स्थळे इंग्रजांच्या पाऊलखुणा जपून आहेत... #SrilankaTour #KiranAgrawal

Sunday, April 24, 2022

Saraunsh published in Akola Lokmat on April 24, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220424_2_1&fbclid=IwAR1OEM7SsUmh_recc8kjVRV9j7gDcvLDnpDvGoKHfDyRo880hkhLXBFyVWU
https://www.lokmat.com/editorial/did-the-money-for-water-go-to-the-water-a310/?fbclid=IwAR2ua4Uwn2Gb-mxrgSTmz5HiZsgT-XlE4mjMsjceUAJxHKdq_HWPAE-1BNc

समर्पित सहकाऱ्याची सेवानिवृत्ती...

April 22, 2022 समर्पित सहकाऱ्याची सेवानिवृत्ती...
काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या सेवा, निष्ठा व समर्पणासाठी ओळखल्या जातात. माझे ज्येष्ठ सहकारी, छायाचित्रकार विनय टोले तथा माऊली, हे त्यातीलच एक. विनुभाऊ हे अकोला लोकमत परिवारातील सर्वात ज्येष्ठ. ब्लॅक एन्ड व्हाईट ते कलर फोटो व रील कॅमेरा ते डिजिटल कॅमेरा असा मोठा प्रवास अनुभवलेले. टोले व लोकमत म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असे समीकरण अकोल्यात बनून गेले आहे. गेल्या सुमारे 30 वर्षांची एकनिष्ठ सेवा त्यामागे आहे. नावाप्रमाणे अतिशय विनयशील असलेले टोले, कुणाच्याही कसल्याही मदतीला धावून जाण्यासाठी तत्पर राहणारे व्यक्तिमत्त्व. शहराची, येथल्या व्यक्ती- संस्थांची खडानखडा माहिती असलेले. मितभाषी अन सर्वांशीच मैत्र असलेले, म्हणूनच ते माऊली म्हणूनही ओळखले जातात.
छायाचित्रकार म्हणून त्यांनी येथले अनेक प्रसंग टिपले. कितीतरी घटना घडामोडींचे ते साक्षीदार ठरले. राजीव गांधी, सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी अशा मान्यवर राजकीय नेत्यांचे दौरे असोत, की शेगाव येथील संत गजानन महाराज संजीवन समाधी शताब्दी सोहळ्यासारखे ऐतिहासिक उपक्रम; अकोल्यातील गत काळातील दंगली असोत, की धार्मिक सलोखा वाढीस लावणारे कावड उत्सव आदी सणवार, विनय टोले यांच्या कॅमेऱ्याने हजारो वाचकांना 'याची देही, याची डोळा'चा अनुभव दिला. विशेष म्हणजे, रिटायर होणारी व्यक्ती आपल्या शिल्लक रजा संपविण्यामागे लागते, विनूभाऊ सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत कामात होते. लोकमतच्या सेवेतून ते आज सेवानिवृत्त झालेत, पण लोकमतशी असलेला त्यांचा ऋणानुबंध कधीही दृष्टीआड होणारा नाही. विनुभाऊ, यापुढील निरामय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #VinayTole #LokmatAkola

Thursday, April 21, 2022

Editors view published in Online Lokmat on April 21, 2022

सोन्याची नव्हे, महागाईची लंका ... किरण अग्रवाल / श्रीलंकेत अचानक वाढलेल्या महागाईने तेथील सामान्यांचे कंबरडे मोडले आहे, हातावर पोट असणाऱ्याचे तर खूपच हाल होत आहेत, त्यामुळे या महागाईला व तेथील भ्रष्टाचाराला कारणीभूत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी घरी जावे म्हणून आंदोलने सुरू आहेत; पण पर्यटनावर भिस्त असणाऱ्या या देशातील आंदोलनांचा पर्यटनावर कसलाही परिणाम होत नसून, उलट अशा स्थितीत पर्यटनामुळेच तेथील आर्थिक चलनवलन सुरू असल्याची जाणीव बाळगत बाहेर देशातून येणाऱ्या पर्यटकांना अधिक सन्मानाची वागणूक मिळत आहे. अर्थात, भारतीय माणूस ऐतिहासिक व पौराणिक संदर्भातून श्रीलंकेकडे सोन्याची लंका म्हणून बघत असला तरी आता तेथे महागाईचा धूर निघत असल्याने भारतीयांना हळहळ वाटणे स्वाभाविक आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील स्थिती बिघडली आहे. भगवान गौतम बुद्धांचे मोठ्याप्रमाणात अनुयायी असणाऱ्या या देशात महागाईने कळस गाठला असून आंदोलने सुरू झाली असली तरी अजूनही ती अहिंसकपणे म्हणजे शांततेच्या मार्गानेच सुरू आहेत. त्याचा पर्यटकांना कसलाही त्रास होताना दिसत नाही. यासंदर्भात टीव्हीवर बघावयास मिळणाऱ्यां बातम्यांनी तेथे जाऊ पाहणाऱ्या पर्यटकांना भीती वाटणे स्वाभाविक आहे, मात्र प्रत्यक्षात तेथे गेलेल्या पर्यटकांना या आंदोलनांचा कसलाही त्रास होताना दिसत नाही. कोलंबोतील प्रख्यात 'इंडिपेंडन्स स्क्वेअर' या पर्यटन स्थळावर देखील काही आंदोलक हातात बॅनर घेऊन 'गोटा गो'च्या घोषणा देत आहेत, पण पर्यटकांना त्यांचा कसलाही त्रास नाही. उलट पर्यटकांना त्यांचे फोटो काढून देण्यासाठी ते मदतीला येतात. कॅंडी मधील प्रख्यात 'कॅंडी लेक'च्या किनारीही आंदोलन सुरू आहे, पण त्यामुळे रहदारी खोळंबत नाही. महागाईचे म्हटले तर, स्थानिकांना त्याचा फटका जरूर बसतो आहे. गॅस सिलेंडर दोन हजार वरून चार हजारचे झाले आहे, पण श्रीलंकेतील चलन हे भारतीय चलनापेक्षा जवळपास अडीच ते तीन पटीने स्वस्त असल्याने भारतीय पर्यटकांसाठी तोही मुद्दा तितकासा परिणामकारक ठरत नाही. आगाऊ बुकिंग करून गेलेल्या पर्यटकांना तर त्यांच्या पूर्व नियोजनानुसार पूर्वीच्या दरानेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विजेची टंचाई आहे खरी, पण ती स्थानिक नागरिकांना अधिक भेडसावते. पर्यटक ज्या हॉटेल्समध्ये उतरतात तेथे जनरेटरची व्यवस्था असल्याने तीदेखील अडचण जाणवत नाही.
श्रीलंकेतील या गडबडीच्या पार्श्वभूमीवरच आमचा कोलंबो, कॅंडी, सीगरिया, गाले फोर्ट, बेंटोटा आदी परिसरात दौरा झाला. 'यु आर फ्रॉम इंडिया? युआर अवर बिग ब्रदर, वेलकम...' असे म्हणत भारतीय पर्यटकांचे स्वागत केले जात आहे. चायनाच्या नादी लागून आम्ही महागाई ओढवून घेतली, पण भारत आमच्या मदतीला आला; अशी भावना या दौर्‍यात अनेकांनी बोलून दाखविली. रासायनिक खतांचा वापर थांबवून तेथील राज्यकर्त्यांनी सेंद्रिय शेतीचे धोरण स्वीकारले. त्यामुळे उत्पादन घटून महागाई वाढली. भ्रष्टाचार बोकाळल्याने अनेक सरकारी उद्योग धोक्यात आले, विजेची टंचाईही निर्माण झाली. यापूर्वी रात्रीच्या विमानाने श्रीलंकेत गेल्यावर कोलंबोत उतरतांना विद्युत रोषणाईने झगमगणारी कोलंबो नगरी डोळ्यांचे पारणे फेडी, पण आता इतका झगमगाट दिसत नाही. श्रीलंकेत आता पाऊस पडतो आहे, या पावसाने तेथील सर्वात मोठी नदी महाव्हॅली भरून वाहू लागली की पावर जनरेशन चे टरबाइन सुरू होतील व विजेची टंचाई दूर होईल असे जाणकार सांगतात.
विशेष म्हणजे महागाई वाढली असली तरी कुठेही लूटमार दिसत नाही. उदरनिर्वाह जिकिरीचा झालेली एक 80 वर्षाची वृद्ध महिला एका पर्यटन स्थळावर भेटली, चोरी करण्याऐवजी व भीक्षा मागण्याऐवजी मी खेळणी विकते, कृपया ही खेळणी घेऊन मला मदत करा अशी विनवणी तिने केली आणि सर्व पर्यटक तिच्या या प्रामाणिकपणाला दाद देत तिच्याकडून खेळणी विकत घेताना दिसले. एकीकडे महागाई वाढली आहे, पण पर्यटक घटल्याने आहेत त्यांचेकडून अधिक न घेता, नेहमीपेक्षा कमी दरात तेथील गाईड पर्यटकांना माहितीची सेवा पुरवीत आहेत. बॅनटोटा येथे त्यामुळेच कमी दरात मोटार बोटने समुद्र सफर घडविली जाताना दिसते. आश्चर्य म्हणजे, कोलंबोतील 'मुव्ह एन पीक' सारख्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये कमी पॅकेजची रूम बुकिंग असताना आम्हाला त्याच दरात अधिक दराच्या रिकाम्या पडून असलेल्या डीलक्स रूम उपलब्ध करून सुखद धक्का दिला गेला. भारतीय पर्यटकांची अशी खातरदारी पाहता तेथील स्थानिक राजकीय आंदोलनांची भीती अजिबात उरत नाही. सोन्याच्या लंकेत आता महागाईचा धूर उठला आहे खरा, परंतु त्यात अजून तरी परदेशी पर्यटकांची दमछाक होताना दिसत नाही हे नक्की. https://www.lokmat.com/editorial/not-gold-inflation-high-in-sri-lanka-a310/?fbclid=IwAR3o7a4wacJRRIqynypG4vwZ3XBfZ_c7iy3d3Jr5EswNSQlpxTwzNloAwtI

Monday, April 18, 2022

Saraunsh published in Akola Lokmat on April 17, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220417_8_2&fbclid=IwAR1pHYO5441x0EUL-fPj39Swv6G_TSi_nWSU6GGM-ou_WDs9oYimRMpcK00
https://www.lokmat.com/editorial/why-are-ambedkars-proposals-not-accepted-a310/?fbclid=IwAR3N0rLewjuZ_VtnRPNGvyJUGg1zNjdIFl16GALydrlKpqoS0A1YjmBK8sI

Thet Srilanketun.. On the Spot

April 14, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220414_8_17&fbclid=IwAR3N0rLewjuZ_VtnRPNGvyJUGg1zNjdIFl16GALydrlKpqoS0A1YjmBK8sI

Thet Srilanketun.. On the Spot

April 13, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220413_8_2&fbclid=IwAR12dQIwz13xIS3xfdwkDTcjlU_im_LsMi9bs2ODjw4DckMg-EGzu8gu9M0

Thet Srilanketun.. On the spot

April 12, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220412_3_18&fbclid=IwAR3C9OuU0m1BitK1uczctgst2m9koPb4muhB3q7IVeucndGm77NwI6wsZnI

कार्य गौरवार्थी, चॅम्पियन टीम...

April 09, 2022 कार्य गौरवार्थी, चॅम्पियन टीम...
केवळ नेतृत्व हुशार अगर सक्षम असून चालत नाही, तर त्याचे सहकारीही तेवढेच सक्षम आणि ऊर्जावान असावे लागतात तेव्हाच यश लाभते. आमच्या अकोला लोकमतमध्ये मला तशी टीम लाभली आहे. कोणतीही नवी कल्पना मांडली की स्वतःहून पुढाकार घेऊन ती पूर्णत्वास नेण्यासाठी तत्पर राहणारी ही मंडळी. विविध आव्हानांचा सामना करीत आपल्या कार्यकुशलतेची मोहोर उमटविणाऱ्या वार्ताहर व वितरक बांधवांचा लोकमततर्फे कार्य गौरव पुरस्कार व चॅम्पियन्स ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. वाशिमचे धनंजय कपाले चॅम्पियन्स ऑफ अकोला आवृत्ती ठरले, तर सुधीर चेके पाटील, विजय शिंदे, प्रशांत विखे, प्रफुल बाणगावकर व गजानन राऊत हे सहकारी क्रमशः चॅम्पियन ऑफ बुलडाणा, अकोला, वाशिम, खामगाव ठरले. अन्य सहकारी यांना कार्य गौरव पुरस्कार2022 लाभला. सर्वच सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन... #LokmatAkola #KiranAgrawal

Saraunsh published in Akola Lokmat on April 10, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220410_4_5&fbclid=IwAR38XxMZvcl4U_oIqSkjF_pGEAzONBFcc76bs_Qh-Y3r7OJxw0l1UAfPFts
https://www.lokmat.com/editorial/why-is-the-congress-in-akola-lagging-behind-a310/?fbclid=IwAR2jfq3Kix-kng_CCG2CLD7H3RviOiBaf5hFZgjNCCWLfmEfa5Mcmy-aByU

... ही तर अनुभवाची वनराई!

April 08, 2022 ... ही तर अनुभवाची वनराई!
लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षात शहरातील विविध क्षेत्रातील 25 संस्थांच्या पदाधिकारिंशी संवाद साधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. याची सुरुवात ज्येष्ठ नागरिकांपासून केली. आज अनेक घरातील ज्येष्ठांमध्ये ते अडगळीत पडल्याची भावना घर करून आहे. मुले सुना कामाधंद्यात व्यस्त आहेत तर नातवंडे शाळेत. अशात ज्येष्ठांकडे काहीसे दुर्लक्षच होते. सर्वांच्याच वाट्यास हाच अनुभव येतो असे नाही, मात्र अनेकांच्या बाबतीत तसे होते हे खरे. तेव्हा त्यांची काळजी घ्यायची असेल तर औषध उपचारापेक्षा त्यांना सन्मान मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनात येऊ पाहणारे एकटेपण दूर होणे अपेक्षित आहे. कामा धंद्यावरून अगर नोकरीवरून घरी परतल्यावर मुलांनी काही वेळ त्यांच्यासोबत घालवला व दिवसभरातील हालहवाल त्यांच्या कानी घातले तर त्यातून त्यांना मिळणारे समाधान कितीतरी अधिक असेल. शारीरिकदृष्ट्या भलेही ते ज्येष्ठ, सेवानिवृत्त झाले असतील; पण मनाने ते तरुण आहेत. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहून गाठीशी बांधलेल्या अनुभवाचे संचित त्यांच्यापाशी आहे. त्या अनुभवांच्या वनराईत नव्या पिढीला जो गारवा अनुभवयास मिळेल तो कुठल्याही सल्ला केंद्रावर पैसे मोजूनही मिळणार नाही. कुटुंबाला, समाजाला अशी छाया देणारी ही वनराई जपुया, त्यांचा सन्मान राखूया... ज्येष्ठांप्रतीच्या या सन्मानाच्या व कृतज्ञतेच्या भावनेतूनच या प्रकल्पाचा प्रारंभ त्यांच्यापासून केला गेला. यावेळी खूप गप्पा झाल्या, नारायणराव अंधारे यांनी त्यांचे कैवल्याचे लेणे हे पुस्तकही भेट दिले. ज्येष्ठांचा हा आशीर्वाद आम्हास ऊर्जा देऊन गेला ... #LokmatAkola #KiranAgrawal #AkolaSeniorCitizen #LokmatSamwadAkola

Laa Goa 2022.. Pics

LAA Goa 2022

LAA Goa - 2022

April 02/03, 2022 #LAA... Lokmat Achiever's Awards 2022
लोकमत वृत्तपत्र समूहातील विविध विभागातील सहकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा कौटुंबिक सोहळा म्हणजे LAA. समूहाचे चेअरमन तथा माजी खासदार श्री विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ तथा राज्याचे माजी शिक्षण व उद्योगमंत्री श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक श्री देवेंद्रबाबूजी, सह व्यवस्थापकीय संचालक श्री रिषीबाबूजी, संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांच्यासह व्यवस्थापनातील सर्व मान्यवरांच्या सहवासाने पुलकित होऊन नव्या संकल्पनांनी, उमेदीने पत्रकारिता परमो धर्म निभावण्यास पुन्हा सिद्ध होण्याची ऊर्जा देणारा हा सोहळा.
यंदा या संकल्पनेचे हे दहावे वर्ष. यापूर्वी पुणे व नाशिक येथे हे सोहळे झाले. गेली दोन वर्षे मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे हा सोहळा होऊ शकला नव्हता, त्यामुळे यंदा छान गोव्यामध्ये आयोजन केले गेले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी या सोहळ्यास उपस्थित होते. समूहातील लोकमत, लोकमत समाचार, लोकमत टाइम्स या तीनही भाषेतील वृत्तपत्रांचे तसेच डिजिटल लोकमत, ऑनलाइन लोकमत, लोकमत चॅनेल अशा सर्व प्लॅटफॉर्मवरील देशभरातील सुमारे 400पेक्षा अधिक मान्यवरांचा गोतावळा यानिमित्त गोव्यात जमला होता. समूहातील सर्व सहकाऱ्यांच्या भेटी व धमाल मनोरंजन झाले. पुन्हा नवी ऊर्जा घेऊन सारे तेथून परतले... याप्रसंगीची ही काही आठवण चित्रे...
#LAA2022 #LAAGoa #KiranAgrawalLokmat

Monday, April 4, 2022

Saraunsh published in Akola Lokmat on April 03, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220403_2_3&fbclid=IwAR11TCZnoBs3uc8TN8jwjXZKurvxtqGEmSGzHZvYd_IqN0Wrof_W4MK6P3w
https://www.lokmat.com/editorial/the-way-of-administration-is-also-through-politicians-a310/?fbclid=IwAR2kGQvo7ICPWpVkQd24MCtRzxxmXvlSKpM4HATYM_OP7983SnOwoDP_mkE