Sunday, April 24, 2022

समर्पित सहकाऱ्याची सेवानिवृत्ती...

April 22, 2022 समर्पित सहकाऱ्याची सेवानिवृत्ती...
काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या सेवा, निष्ठा व समर्पणासाठी ओळखल्या जातात. माझे ज्येष्ठ सहकारी, छायाचित्रकार विनय टोले तथा माऊली, हे त्यातीलच एक. विनुभाऊ हे अकोला लोकमत परिवारातील सर्वात ज्येष्ठ. ब्लॅक एन्ड व्हाईट ते कलर फोटो व रील कॅमेरा ते डिजिटल कॅमेरा असा मोठा प्रवास अनुभवलेले. टोले व लोकमत म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असे समीकरण अकोल्यात बनून गेले आहे. गेल्या सुमारे 30 वर्षांची एकनिष्ठ सेवा त्यामागे आहे. नावाप्रमाणे अतिशय विनयशील असलेले टोले, कुणाच्याही कसल्याही मदतीला धावून जाण्यासाठी तत्पर राहणारे व्यक्तिमत्त्व. शहराची, येथल्या व्यक्ती- संस्थांची खडानखडा माहिती असलेले. मितभाषी अन सर्वांशीच मैत्र असलेले, म्हणूनच ते माऊली म्हणूनही ओळखले जातात.
छायाचित्रकार म्हणून त्यांनी येथले अनेक प्रसंग टिपले. कितीतरी घटना घडामोडींचे ते साक्षीदार ठरले. राजीव गांधी, सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी अशा मान्यवर राजकीय नेत्यांचे दौरे असोत, की शेगाव येथील संत गजानन महाराज संजीवन समाधी शताब्दी सोहळ्यासारखे ऐतिहासिक उपक्रम; अकोल्यातील गत काळातील दंगली असोत, की धार्मिक सलोखा वाढीस लावणारे कावड उत्सव आदी सणवार, विनय टोले यांच्या कॅमेऱ्याने हजारो वाचकांना 'याची देही, याची डोळा'चा अनुभव दिला. विशेष म्हणजे, रिटायर होणारी व्यक्ती आपल्या शिल्लक रजा संपविण्यामागे लागते, विनूभाऊ सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत कामात होते. लोकमतच्या सेवेतून ते आज सेवानिवृत्त झालेत, पण लोकमतशी असलेला त्यांचा ऋणानुबंध कधीही दृष्टीआड होणारा नाही. विनुभाऊ, यापुढील निरामय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #VinayTole #LokmatAkola

No comments:

Post a Comment