Friday, June 24, 2022

EditorsView published in Online Lokmat on June 16, 2022

होऊद्या हरिनामाचा गजर... किरण अग्रवाल / महाराष्ट्रातील राजकीय परिघावर एकीकडे सध्या आरोप-प्रत्यारोपांचे व परस्परांबद्दलच्या शंका कुशंकांचे धुमशान सुरू असताना, दुसरीकडे विठू माऊलीच्या भेटीची आस मनी घेऊन हजारो वारकऱ्यांसमवेत राज्यभरातील विविध संतांच्या पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. राजकीय कोलाहलात विटलेल्या जीवांना आस्था व श्रद्धेने भक्तिरसात डुंबून जाण्यासाठी या पालखी सोहळ्यांतुन जागोजागी घडुन येत असलेला हरी नामाचा गजर कामी येणार आहे.
आमदारांच्या मताद्वारे निवडून द्यावयाच्या राज्यसभा सदस्यांची निवडणूक नुकतीच झाली असून, यातील जय पराजयावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. सत्ताधारी महाआघाडीच्या एका उमेदवारास यात पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांना जणू आभाळ ठेंगणे झाले आहे. त्यामुळेच महागाई, बेरोजगारीचे व तत्सम सारे प्रश्न निकाली निघाल्याचे आणि विकासाचे मजले चढवुन झाल्याचे समजून केवळ राजकीय शह-काटशहचीच चर्चा होत आहे. राज्यसभेचे झाले, आता पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या विधानपरिषद सदस्यांच्या निवडीत काय चमत्कार होतो ते बघा; असे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. बरे, यासंबंधीची चर्चा इतक्या उच्चरवाने होत आहे की त्यापुढे 'कॉमन मॅन'चा आवाज क्षीण ठरावा, पण असे असले तरी दुसरीकडे राज्यात टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष सुरू झाल्याने या राजकीय कोलाहलापासुन काहीशी सुटका व्हावी.
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज, देहू येथून संत तुकोबाराय, त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज तर शेगाव येथून संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. राज्यातील इतरही ठिकाणच्या पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत, त्यामुळे सर्वत्र भक्तीचा जागर घडून येत आहे. वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेला तो सद्गुणांचा संस्कार आहे. विठू माऊलीच्या नामस्मरणात साऱ्यांचे मन एकचित्त होते, आणि ते तसे होताना जातीभेदाच्या अमंगल कल्पनांना जिथे थारा उरत नाही अशी एकतेची परंपरा या वारीत सामावली आहे. 'चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू...' असे म्हणत व 'पंढरीची वारी जयाचिये कुळी, त्याची पायधुळी लागो मज। नामा म्हणे धन्य झाले ते संसारी, न सांडिती वारी पंढरीची।।' असा सश्रद्ध भाव मनी घेऊन माऊलींच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरीस निघतात व आषाढी एकादशीच्या एक दोन दिवस आधी चंद्रभागेच्या तिरी जाऊन विसावतात. सारे वातावरण चैतन्याने भारून टाकणारा हा श्रद्धेचा अनुपम प्रवास असतो. विविध दिंडयांचा हा प्रवास सुरू झाला आहे.
राजकीय नेते व कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पक्षाची व भूमिकांची पालखी वाहण्यात धन्यता मानत असले तरी, अवघा महाराष्ट्र मात्र विठू माऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या विविध संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्यासाठी आतुर व सज्ज आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या मर्यादा यंदा दूर झाल्याने दर्शन आणि दिंडीच्या स्वागताची आतुरता व उत्सुकता शिगेला आहे. येथल्या भक्ती परंपरेची हीच खासियत आहे. राज्यात मान्सूनची वर्दीही मिळून गेली असून बळीराजा खरिप हंगामाच्या तयारीला लागला आहे. श्रम व श्रद्धेचा उत्कट असा साक्षात्कार अनुभवण्याचा हा काळ आहे. त्यामुळे राजकारण्यांचे राजकीय भोंगे कितीही वाजूद्या अगर कर्कश्य होऊद्या, हरिनामाच्या गजरापुढे ते क्षीणच ठरतील याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. तेव्हा राजकीय वाद प्रवादांचे पाट वाहत राहतील, आपण श्रद्धेच्या पाटात डुंबून माऊलींचा गजर करूया. बोला, 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल... ।'
https://www.lokmat.com/editorial/houdya-harinamas-alarm-a310/?fbclid=IwAR3gu3xL_900pH51VfDNZg7e69MFlyU9ZwB_IDO01XJv351A5f4vhtDBrSo

No comments:

Post a Comment