At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, June 2, 2022
EditorsView published in Online Lokmat on June 02, 2022
'प्री वेडिंग शूट'ची अनैतिकता!
किरण अग्रवाल /
परंपरेने चालत आलेल्या, परंतु काळाच्या कसोटीवर व्यवहार्य व उचित न ठरणाऱ्या सामाजिक कुप्रथा एकीकडे बंद केल्या जात असताना, दुसरीकडे पुढारलेपणाच्या व संपन्नतेच्या प्रदर्शनासाठी नव्या आणि नैतिकतेला ध्वस्त करणाऱ्या प्रथा सुरू होऊ पाहतात तेव्हा त्यातून समाजाची अधोगतीच घडून आल्याखेरीज रहात नाही. नात्याच्या पवित्रतेवर ओरखडा उमटवू पाहणाऱ्या व मर्यादांची सीमा ओलांडण्याची संधी देणाऱ्या 'प्री- वेडिंग शूट'च्या वाढत्या प्रकारांकडेही त्याचदृष्टीने बघता यावे, कारण यातून घडून येणाऱ्या अप्रिय घटनांमुळे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर विवाह व्यवस्था आणि त्यातील मान्यतांनाही आता हादरे बसू लागले आहेत. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या धुरिणांनी व ज्ञाती संस्थांनीही याबाबत वेळीच सावध होऊन भूमिका घेणे म्हणूनच गरजेचे बनले आहे.
मध्यंतरीचा एक काळ असा होता जेव्हा हुंडाबळीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत, शिवाय लग्नकार्यात मान पानावरून होणारे राजी नाराजीचे प्रकार चर्चित ठरत; पण काळ बदलला तसा यातही आता खूप फरक पडला आहे. मानपान व हूंडा राहिला बाजूला, आता साखरपुड्यातच लग्न आटोपली जाऊ लागली आहेत. सर्वच समाजातील मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा कमी असल्याने व करिअरच्या नादातील मुलामुलींची लग्ने उशिरा होऊ लागल्याने पालकांचा जीव टांगणीला लागलेला दिसून येतो. यातूनच आता मुलीच्या दाराशी मांडव पडण्याऐवजी मुलाकडेच जाऊन त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न लावण्याची प्रथाही सुरू झाली आहे, त्यामुळे अव्यस्थेतून होणारे नाराजीचे प्रसंग टळत आहेत. रात्रीच्या ऐवजी दिवसाची लग्ने होत आहेत व पूर्वी चार-चार दिवस चालणारे सोहळे आता एकेका दिवसात आटोपू लागले आहेत. स्वाभाविकच काळाच्या कसोटीवर न उतरणार्या प्रथा परंपरांना फाटा देऊन हा बदल स्वीकारला गेला आहे व त्याला समाज मान्यताही लाभलेली दिसत आहे. केवळ लग्नसमारंभातील कुप्रथाच नव्हे, तर वैधव्यप्राप्त भगिनींना सन्मानाने वागविण्याचे व मुलीच्या जन्माच्या स्वागताचे ठरावही विविध ग्रामपंचायतींमध्ये होत आहेत. मृत्यूपश्चातच्या सामाजिक जेवणावळीही अनेक समाजामध्ये बंद होऊ लागल्या आहेत. काळानुरूप हे सारे घडत असताना बंद होणाऱ्या काही प्रथांबरोबरच नव्याने काही प्रकार सुरू झाले आहेत, जे चिंता व चिंतनाचा विषय बनले आहेत.
-------------------
लग्नसमारंभात प्री वेडिंग शूट दाखविण्याचा प्रकार अलीकडे वाढीस लागला आहे. ऐश्वर्याचे व संपन्नतेचे प्रदर्शन मांडू पाहणाऱ्या घटकांकडून हे फॅड पुढे आणले गेले आहे, पण आपणही ते केले नाही तर समाजात आपली गणना मागास म्हणून होईल असा समज करून घेतलेला वर्गही नाईलाजाने हे फॅड स्वीकारताना दिसतो. यातुन संस्कृती- संस्कारांना व नैतिकता- मर्यादांनाही गालबोट लागु पहात असल्याने समाज धुरिणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होऊन बसले आहे. यासंदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात अलीकडेच घडून आलेला व समाज माध्यमात चर्चित ठरलेला प्रकार सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. या तालुक्यातील विवाह निश्चिती झालेले एक जोडपे प्री वेडिंग शूटसाठी गोव्यात गेले होते. तेथे वधू-वराने हॉटेलात एक रात्र सोबत घालवली व सकाळी उठताच वराने 'तू पाहिजे तशी नाहीस' असे म्हणत लग्न मोडण्याची घोषणा केली. यातून सर्व संबंधितांना झालेल्या मनस्तापाची कल्पना करता, कशासाठी हवे हे प्री वेडिंग शूट असा प्रश्न निर्माण झाल्याखेरीज राहू नये.
--------------------
पुढारलेपणाच्या प्रदर्शनातून आपण नैतिकतेला कसे धाब्यावर बसवतो आहोत हेच यातून उघड व्हावे. सर्वांच्याच बाबतीत असेच होते असेही म्हणता येणार नाही, मात्र व्यक्तिगत वधू-वर किंवा त्यांच्या कुटुंबीयांची आवड, हौस बाजूस ठेऊन विचार करता या नव्या प्रथेची समाजाला म्हणून खरेच काही गरज आहे का, असा यातील सवाल आहे. यातील संभाव्य धोके व नैतिकतेचा ऱ्हास लक्षात घेता गेल्यावर्षी पुण्यात स्थानकवासी जैन संघटनेच्या 36 संघांनी मिळून प्री वेडिंग शूट न करण्याचा जाहीर निर्णय घेतला ही अभिनंदनीय बाब म्हणायला हवी. तेव्हा अन्यही ज्ञाती संस्थांनी या निर्णयाच्या आदर्शाचा कित्ता गिरवायला हरकत नसावी.
----------------------
महत्त्वाचे म्हणजे चिखलीतील वधू वराबाबत घडलेल्या प्रकारातून नैतिकता व मर्यादेचे विषय जसे अधोरेखित झालेत, तसेच अलीकडीलच काही अन्य प्रकारांमुळे संस्काराचे विषयही पुढे येऊन गेले आहेत. शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने पालकांपासून दूर राहणाऱ्या उपवर मुला-मुलींबाबत हवी तेवढी काळजी घेतली जाताना दिसत नाही. त्यांच्या अल्लडपणातून पाय घसरतात तेव्हा पालकांच्या पायाखालची जमीन सरकते पण वेळ निघून गेलेली असते. यासंदर्भातही अलीकडेच घडून गेलेल्या साताऱ्यातील एका प्रकारातुन डोळे उघडायला हवेत. साताऱ्यातील एका तरुणीची पंढरपूरमधील तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली. या मैत्रीने पुढे हद्द ओलांडली व मित्राच्या दबावाला बळी पडत संबंधित तरुणीने स्वतःचे अश्लील फोटोही त्यास पाठविले आणि त्यातून ब्लॅकमेलिंग सुरू झाले. सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीतून इतकी घसरण होणार असेल, तर यात संस्कार कमी पडले की काय असाच प्रश्न उपस्थित व्हावा. रोजीरोटीसाठी कराव्या लागणाऱ्या झगड्यात व व्यापात संस्काराची शिदोरी राहून जाणार असेल तर होणारे अधःपतन रोखता येऊ नये. नव्या, परंतु अनिष्ठ प्रथा परंपरांचे स्तोम माजण्यापूर्वी संस्कारांचे वासे घट्ट करणे म्हणूनच गरजेचे बनले आहे.
https://www.lokmat.com/editorial/immorality-of-pre-wedding-shoot-a310/?fbclid=IwAR0Fj7EUtm3qFuRqPv4fb_pKvZgcQSADKjonIdVXWv-AZIfbtreUjVwqBHA
Labels:
EditorView
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment