Monday, December 5, 2022

दुबईतील 'दिल का आलम'...

Nov. 24, 2022 दुबईतील 'दिल का आलम'...
बाहेर पडल्याखेरीज किंवा जग पालथे घातल्याशिवाय आपण नेमके कुठे आहोत हे कळत नाही, हेच खरे. लोकमत व्यवस्थापनाने, विशेषतः संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीमुळे युनायटेड अरब अमिरातीमधील (UAE) दुबई, आबूधाबी, ओमान दौरा करायला मिळाला. या दौऱ्यातूनही बरेच काही शिकायला मिळाले.
आपल्या पुढारलेपणाच्या संकल्पना गळून पडाव्यात इतका हा प्रदेश पुढे गेलेला आहे, त्याने प्रगती साधली आहे; म्हणूनच की काय सोने काहीसे स्वस्त असले तरी, आपल्या साधारण 23 रुपयात तेथला अवघा 1 दिरम हाती पडतो. कमालीची स्वच्छता, शिस्तशीर व वक्तशीरपणा नजरेत भरणारा आणि विशेष म्हणजे रस्त्यावर रोकटोक करणारा पोलीस दिसत नसताना हे सारे आढळते. इंधन व खजुरखेरीज स्वतःचे काही उत्पादन नाही, तरी पर्यटनाची अशी काही घडी बसवली की मूळच्या नागरिकांपेक्षा पर्यटकांची व परिणामी घरांपेक्षा हॉटेलांचीच तेथे संख्या अधिक दिसते. येथल्या शासकांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा भारी सोस. जे करायचे ते अत्युच्च व अप्रतिम असावे अशी मानसिकता, त्यामुळे बुर्ज खलिफाच्या उंचीचे रेकॉर्ड दुसऱ्या देशाकडून मोडले जाणार हे कळताच त्यापेक्षाही उंच इमारतीची पायाभरणी लगेच सुरू झाली... आमचा गाईड मोठ्या अभिमानाने सांगत होता. या गाईडचे नावही मोठे भारी होते, 'दिल का आलम'!
काय बघावे आणि किती बघावे असा प्रश्न पडावा, इतके काही तेथे आहे; त्यामुळे जे राहून जाते ते बघण्यासाठी पुन्हा एकदा दुबईला यायला हवे असेच प्रत्येकाला तेथून परततांना वाटते. आपल्या देशाबद्दल पर्यटकांमध्ये एवढे चुंबकीय आकर्षण निर्माण करण्यात तेथले शासक यशस्वी ठरावे, यातच सारे काही आले. अर्थात, असे असले तरी डोळे दिपवणाऱ्या त्या भव्य दिव्य इमारतींच्या जंगलात वावरतांना व क्षणभर हरवून जातांना आपलेपणाचे, सौहार्दाचे, घडीभरच्या निवांततेचे, आत्मिक सुख समाधानाचे काजवे जेव्हा मनात चमकतात तेव्हा आतला आवाज प्रखर होतो आणि आपण म्हणतो, गड्या आपला गाव व आपला देशच बरा! तोच खरा आपल्या दिल का आलम! या दौऱ्यात काही नवे मित्र मिळाले, जुन्यांच्या स्नेहाच्या गाठी अधिक घट्ट झाल्या... हीच सोन्यासारखी माणसं व मैत्री महत्वाची!
#kiranAgrawal #TourDiary #DubaiTourDiary

No comments:

Post a Comment