Friday, May 31, 2024

बुद्ध भेटतात पावलोपावली... नमो बुद्धाय!

May 23, 2024 बुद्ध भेटतात पावलोपावली... नमो बुद्धाय!
गेल्या पौर्णिमेला मी श्रीलंकेच्या दौऱ्यातील बुद्ध मुर्तींसमवेतचे फोटो शेअर केले होते, यंदा व्हिएतनामच्या दौऱ्यातील काही फोटो. ----कारण, जेथे गेलो तेथे मला बुद्ध भेटले. खरे तर बुद्ध चराचरात व्यापून आहेत. माझ्यात आहे, तुमच्यात आहे; सर्वातच आहेत. स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघणाऱ्या प्रत्येकात बुद्ध आढळतात. आपण नेमके हेच करत नाही. शांती, समाधानासाठी इतरांकडे हात पसरतो. याच्या त्याच्याकडे चकरा मारतो, बुवा बाबांच्या नादी लागतो. --- पण स्वतःच्या आत डोकावत नाही. स्वतःला शरण जात नाही... भगवान बुद्धांनी हेच तर सांगितले आहे, स्वतःला शरण जा! बुद्धम् सरणम् गच्छामि! हे तेच सांगणे आहे..
इतकं साधं, सोपं, सरळ व आपल्या जवळच असलेलं ज्ञान; जे आपल्याला अन्य कोणीही समजावून सांगितलेलं नाही, ते बुद्धांनी समजावलं आहे. --- स्वतःलाच समजून घेतलं, विवेक व चिकित्सेच्या पातळीवर त्या समजून घेतलेल्या ज्ञानाचा दीप उजळला की अवघ्या संसार सागराला तरुन जाण्याचे बळ लाभल्याखेरीज राहत नाही. --- स्वतःच्या ज्ञानाचा हा दीप पेटवणे व त्यात आसमंत उजळून काढणे हेच तर आहे बुद्धांचे तत्त्वज्ञान... अत्त दीप भव !
त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा मंत्र आपल्या जीवनाच्या वाटेचा साथीदार आहे खरा, पण आपण तो डोक्यात घेतला नाही. बुद्धांनी आपल्याला त्रिशरण पंचशील दिले... नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ! यातून जगण्याचा सोपा मार्ग दाखविला, पण आपणच निर्बुद्ध; की भलत्या मार्गाचा शोध घेऊन स्वतःला अशांत करून घेतले आहे. --- अजूनही वेळ गेलेली नाही. आज युद्धाची नव्हे, बुद्धाचीच गरज आहे! तोच आहे शांती, सद्भाव व सम्यकतेचा खरा मार्ग. चला, स्वतःला शरण जाऊया... महाकारूणिक तथागत बुद्धांना त्रिवार शरण, वंदन !!!
#बुद्ध_पौर्णिमा2024 #KiranAgrawal #vietnamTourDiary

No comments:

Post a Comment