Monday, January 7, 2019

Blog / Editors view published in Online Lokmat on 05 Jan, 2019

सायबर सुरक्षेची जाण गरजेची !

किरण अग्रवाल

काळाप्रमाणे तंत्र बदलते अगर विकसित होते याकडे चांगल्या संदर्भाने जसे पाहता येते, तसे वाईट अगर चुकीच्या बाबींबद्दलही गांभीर्याने बघणे क्रमप्राप्त होऊन बसते. चोरी, लुटमारीचे वा फसवणुकीचे तंत्र असेच बदलले आहे. त्यामुळे नवीन वर्षातील वाटचालीचा प्रारंभ करताना राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशातच वाढलेल्या सायबर गुन्हेगारीचे आव्हान चिंतेचे ठरले आहे.

घरात अथवा दुकानात शिरून किंवा खिशात हात घालून चीजवस्तू, पैसा अडका लांबवण्याचा काळ आता राहिला नाही. याचा अर्थ ‘असे’ होत नाही अशातला भाग नाही, मात्र आता चोऱ्या करण्याचे वा पैसा लांबवण्याचे चोरांचे तंत्र बदलले आहे. कालमानानुसार ‘अपडेट’ होत ते घरी बसल्या कुणाच्याही खिशात हात घालू लागले आहेत. विशेषत: आॅनलाइन व्यवहार करणारे किंवा कमी कालमर्यादेत अधिक परतावा देण्याचे आमिष दाखविणाºया गुंतवणुकीच्या योजनांना बळी पडणारे तसेच बुद्धी गहाण टाकून कसल्या तरी बक्षिसाच्या संदेशाला भुलणारे लोक या सायबर क्राइमचे बळी ठरतात. अर्थात, याहीखेरीज संगणकीय फेरफार करून एकाचवेळी अनेकांच्या बँक खात्यावर दरोडडा घालण्याचे प्रकारही होऊ लागले आहेत. कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरला हॅक करून विविध खात्यांमधून सुमारे तब्बल ९४ कोटी रुपये काढून घेण्याचा अलीकडील प्रकार त्यातलाच. त्यामुळे या वाढत्या सायबर क्राइमकडे गांभीर्याने लक्ष पुरवून आधुनिक पद्धतीने व्यवहार करू पाहणाºया ग्राहकांना सुरक्षितता प्रदान करणे हे संबंधित सर्वच यंत्रणांसाठी कसोटीचे ठरले आहे.



आकडेच द्यायचे तर, उपलब्ध माहितीनुसार २०१६ पेक्षा २०१७ मध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले होते. २०१६ मध्ये राज्यात २,३८० सायबर क्राइमच्या घटना नोंदविल्या गेल्या होत्या, २०१७ मध्ये हा आकडा ४०३५वर गेला, तर २०१८ मध्ये सप्टेंबरपर्यंतच तो तीन हजाराच्या आसपास पोहोचलेला होता. त्यामुळे राज्यात खास ४७ सायबर पोलीस ठाणी उघडण्यात आलीत. बरे, सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी, अशा गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण मात्र घटले आहे. विधिमंडळात देण्यात आलेल्या माहितीनुसार २०१६मध्ये २३.५३ टक्के असलेले हे प्रमाण २०१७मध्ये १६.६७ टक्क्यांवर आले. यातून दिवसेंदिवस जटिल होत असलेल्या व तंत्रात तरबेज ठरलेल्या चोरांचे पोलीस यंत्रणेपुढील आव्हान अधोरेखित व्हावे. विशेष म्हणजे, देशात सायबर गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. यावरूनही आपल्याकडील चिंताजनक स्थिती लक्षात यावी.

कशातून होते हे, याचा मागोवा घेता; अधिकतर प्रकरणांत नागरिकांच्या बेसावधपणामुळे या तक्रारी ओढवल्याचे आढळून येते. बँकांच्या एटीएम कार्डचे नंबर आदी तसेच आपल्यया खात्याबद्दलची माहिती कुणालाही सांगू नये, अगदी बँकेतून बोलतो आहे असे सांगून विचारले गेले तरी ती देऊ नये; याबाबत वारंवार जागृती केली जात असतानाही काहीजण अशी माहिती देऊन बसतात व नंतर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते. अधिक लाभाच्या लोभापायी काहीजण आॅनलाइन योजनांमध्ये पैसे गुंतवून पायावर धोंडा पाडून घेतात, तर बक्षीस लाभल्याच्या संदेशाला बळी पडून मूर्खात निघणारेही कपाळमोक्ष करून घेतात. तेव्हा सावधगिरी हाच यावरील उपाय ठरतो. स्वत: ग्राहकांनी तर ती बाळगायला हवीच; परंतु आॅनलाइन सेवा पुरविणाºयांनीही त्याबाबतच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी. कालमानाप्रमाणे चोरही चतुर झाल्याचे पाहता आॅनलाइन व्यवहारांत वाढ जशी होते आहे तशी यासंदर्भातील जनजागरणाची मोहीमही तीव्र व प्रभावी होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment