Sunday, January 20, 2019

Editors view published in Online Lokmat on 17 Jan, 2019

बुद्धीवर चढलेला गंज घातक !

किरण अग्रवाल

प्रयत्न करून व परिश्रम घेऊनही यश लाभत नाही तेव्हा निराशेची काजळी दाटणे स्वाभाविक असते. अशा स्थितीत कोणत्याही व्यक्तीचे अंधश्रद्धीय उपायांकडे झुकणे घडीभर समजूनही घेता यावे, पण विशेषत: तरु ण पिढी प्रयत्नच करण्याचे आणि संधीची कवाडे उघडण्याचे सोडून तसे करताना दिसते तेव्हा आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहत नाही. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात दिसणारे त्याचसंदर्भातले चित्र विषण्ण करणारे आहे.

कुठल्याही व कुणाच्याही निमंत्रणाशिवाय लाखो, करोडो भाविक एकत्र येणे हीच खरी तर कुंभमेळ्याची आजच्या युगातही टिकून असलेली खासियत म्हणता यावी. श्रद्धा आणि आस्थेचे पर्व असलेल्या कुंभमेळ्याची ख्याती त्यामुळे विदेशातही पोहोचली आहे. साधू संतांची राहणी, भक्ती पंथाचा जागर यामुळे तर कुंभमेळा आकर्षणाचे केंद्र बनतोच पण नागा संन्याशींचे अचाट प्रयोगही अनेकांना खुणावत असतात. ठिकठिकाणच्या कुंभ व सिंहस्थ पर्वात त्याचे प्रत्यंतरही येत असते. प्रयागराजमध्येही शेकडो विदेशी पर्यटकच काय देशातील भाविकही त्या उत्सुकतेतून आलेले दिसत आहेत.



कुंभग्राममध्ये एकीकडे आखाडे व साधू संतांच्या शिबिरात प्रवचने, कथा व भजनादी धार्मिक कार्यक्र म होत असताना दुसरीकडे छोट्या-छोट्या राहुट्या उभारून बसलेल्या नागा संन्याशींकडे आपल्या समस्या व अडचणींचे कुंभ रिते करताना भाबडे भाविक दिसत आहेत. समोरच्या यज्ञकुंडातील विभूती कपाळाला लावत अशांना त्यांच्या दान दक्षिणेच्या प्रमाणात समस्यामुक्तीचे अंधश्रद्धीय मार्ग सांगितले जातात व त्याने नवा आशावाद घेऊन सदर भाबडे भक्त चेहऱ्यावर समाधान दर्शविताना आढळून येतात. त्यांना भाबडे यासाठी म्हणायचे की, समस्यामुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे सोडून ते नशिबावर विसंबून व कुणाच्या तरी आशीर्वादाच्या भरवशावर तरून जाण्यात विश्वास बाळगतात. हा भाबडेपणा आशिक्षिततेतून येतो तसा सारे पर्याय चाचपून थकल्यावरही येतो हा भाग वेगळा; पण तो भाबडा आशावाद असतो हेच खरे, अन्यथा सा-या शंकांचे समाधान असेच कुणाच्या चरणी शोधता आले असते, तर प्रयत्नांची गरजच उरली नसती.

यातील विशेष अगर क्लेशदायी बाब अशी की, थिजलेल्या विचारांच्या व प्रयत्नांती हरलेल्या लोकांच्या अशा धडपडी एकवेळ समजूनही घेता याव्यात; पण तरु ण मुलंदेखील मोठ्या संख्येने यात विश्वास दाखविताना दिसून आलेत. नोकरीचा प्रश्न असेल, मनाजोग्या सहचारिणीचा शोध असेल किंवा व्यवसायाशी संबंधित विषय, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या संन्याशींकडून मिळविले जाते. घरी शेती करावी की शहरात जावे याबाबतचा सल्लाही मोठ्या अधिकारवाणीने ते देताना दिसतात. असा सल्ला देणा-यांना स्वत:च्या अंगाला राख फासण्याची वेळ का आली असावी याचा विचार मात्र तरु ण मुलं करत नाहीत. खरे तर तरु णाई म्हणजे लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची क्षमता असलेली पिढी, आव्हानाचे आकाश कवेत घेत स्वत:साठी स्वत:चे नवीन रस्ते बनविणारी व स्वप्नांना पंख लावून ती सत्यात उतरविण्याची धमक ठेवणारी पिढी; पण तरु णपणातच ती आत्मविश्वास गमावून कुण्या साधूच्या पुढ्यात समस्यामुक्तीचा मार्ग शोधताना दिसून येते म्हटल्यावर कपाळावर हात मारण्याची वेळ येते. कशातून घडून येते हे, तर अज्ञानातून व भाबड्या समजातून. विचारांची प्रक्रि या खुंटली व बुद्धीला गंज चढला की यापेक्षा दुसरे काही होणे नसते. त्यातून कपाळमोक्षच ओढवण्याची शक्यता असते. प्रयत्न, परिश्रम सोडून अशी कपाळमोक्ष करून घेऊ पाहणाºयांची मोठी संख्या प्रयागराजच्या रस्त्यावरील साधूंसमोर बसलेली आढळून येते हे म्हणूनच आश्चर्यकारी आहे.

No comments:

Post a Comment