Thursday, January 10, 2019

Editors view published in Online Lokmat on 10 Jan, 2019

सुरक्षा नको, विलंब टाळा !

किरण अग्रवाल

डोक्याला जखम झाली असताना गुडघ्यावर उपचार करण्याचे प्रकार आपल्याकडे पूर्वापार चालत आले आहेत. यातही उपचाराच्या निमित्ताने ‘होऊ द्या खर्च’ची भूमिका असेल तर विचारूच नका. काही काही सरकारी योजनांच्या बाबतीत असेच होताना दिसते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेस्थानकांवर आता विमानतळांच्या धर्तीवर हायटेक सुरक््षा यंत्रणा उभारण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याकडेही याचसंदर्भाने बघता यावे.

कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी प्रवाशांची सुरक्षितता हा प्राथमिक प्राधान्याचा विषय असतो. याचदृष्टीने रेल्वे प्रवासी व सोबतच रेल्वेस्थानकांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने एक आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार विमानतळाप्रमाणे देशातील २०२ रेल्वेस्थानकांवर हायटेक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्याकरिता प्रवाशाला त्याच्या रेल्वेच्या वेळेपेक्षा सुमारे वीस मिनिटे अगोदर येऊन सुरक्षा यंत्रणेच्या तपासणीतून रेल्वे फलाटावर प्रवेश करावा लागणार आहे. निश्चित वेळेनंतर ही प्रवेश व्यवस्था बंद केली जाणार आहे. त्यामुळे धावत पळत रेल्वे पकडण्याची सोय राहणार नाही. सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद व कर्नाटकातील हुबळी रेल्वेस्थानकांवर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याकरिता ३८५ कोटी रुपये खर्च गृहीत धरला आहे. यात वर वर प्रवासी सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा वाटणारा असला तरी, विमानतळासारखी चारही दिशांनी बंद अगर संरक्षित नसलेली रेल्वेस्थानके व त्यावरील प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण पाहता ही योजना कितपत लाभदायी ठरावी याबद्दल शंका बाळगता येणारी आहे.



मुळात, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा उभारली जात असली तरी केवळ प्रवेशद्वारांवर त्यासंबंधी काळजी घेऊन अन्य मार्गाने होऊ शकणारा धोका कसा टाळला जाईल, हा खरा प्रश्न आहे. रेल्वेस्थानके, त्यावरील फलाट व रेल्वे मार्ग अप आणि डाउन या दोन्ही बाजूंनी कशी बंद करणार हा तर मुद्दा आहेच; पण अशी यंत्रणा कार्यान्वित असलेल्या रेल्वेस्थानकाशेजारील तुलनेने लहान असलेले अन्य स्थानक की जेथे सदररची व्यवस्था नसेल, तेथून प्रवेश मिळवून व प्रवासी म्हणून येऊन मोठ्या शहराच्या फलाटावर उतरणाऱ्या व्यक्तीकडून होऊ शकणारा धोका कसा नियंत्रित केला जाईल, हे समजणे आकलनापलीकडचे आहे. विमानतळावरील प्रवाशांची संख्या मर्यादित असते. तिथे अशी हायटेक सुरक्षा शक्य असते. रेल्वेस्थानकांवरील प्रवासी संख्येशी तिची तुलनाच करता येऊ नये. प्रत्येक विमानतळ अशा सुरक्षेने जसे कडेकोट आहे, तसे प्रत्येक रेल्वे स्टेशनबाबत करणे अशक्यच आहे. शिवाय, मुंबईसारख्या ठिकाणी नोकरदार प्रवाशांचा मिनिटा-मिनिटांसाठी चालणारा आटापिटा लक्षात घेता तिथे लोकलच्या वीस मिनिटे आधी येण्याची अपेक्षा केली गेली तर ते स्वीकारले जाणे अवघड ठरेल. म्हणजे, सुरक्षा निश्चित होणे तर दूर, विलंब होण्याची आफत त्यातून ओढवण्याचीच मोठी शक्यता आहे. जखम डोक्याला व मलम गुडघ्याला, असे याबाबत म्हणता यावे ते त्यामुळेच.

दुसरे असे की, रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमध्ये प्रवाशांना देण्यात येणाºया चादरी, उशा (तक्के), रुमाल्स चोरीस जातात म्हणून प्रवाशाला उतरायचे ठिकाण येण्याच्या अर्ध्या तास अगोदरच या वस्तू काढून घेण्यात येणार आहेत. म्हणजे, अमृतसरपासून पुढे काश्मीरकडे प्रवास करणाºयांना अर्धा तास थंडीत कुडकुडणे भाग पडेल. हा प्रकारही चोरी रोखण्यासाठी प्रामाणिक प्रवाशांना दिली जाणारी शिक्षा ठरावा. रेल्वे मंत्रालयाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार २०१७-१८ मध्ये सुमारे १४ कोटींचे असे साहित्य चोरीस गेले. यातील चोरी खरी असेलही; पण ते प्रवाशीच करतात असे समजून अर्धा तास अगोदर सदर वस्तू काढून घेतल्या जाणे योग्य कसे ठरावे? रेल्वे यंत्रणेतील शुक्राचार्य यात गोलमाल करीत नसतील कशावरून? पण, रेल्वे प्रशासन प्रवाशांना अर्धा तास या सुविधेपासून वंचित करायला निघाले आहे. तेव्हा प्रवासी सुररक्षेच्या नावाखाली विमानतळाप्रमाणे रेल्वेस्थानकांवर सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा विषय असो, की वातानुकूलित डब्यांमधून प्रवासादरम्यान दिल्या जाणाºया सामानाची चोरी रोखण्यासाठी ते साहित्य प्रवासी उतरण्याच्या अर्धा तास अगोदरच जमा करून घेण्याची बाब; यासंदर्भात संबंधितांनी फेरविचार करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment