Tuesday, March 30, 2021

Anita Pagare... अनिता, अजून खूप लढायचं होतं...

28 मार्च 2021 रोजी 6.53 PM वाजता · अनिता, अजून खूप लढायचं होतं...
काही नाती ही रक्ताच्या नात्यापलीकडची असतात, तसल्याच नात्यातील माझी बहिण होती अनिता पगारे. सामान्यांप्रतीची कळकळ ही तिची जात, तर कमालीची धडपड हा स्थायी स्वभाव. कोणतेही काम अंगावर घेतलं की अशी काही झोकून द्यायची की तिला तिच्या तब्येतीचीही पर्वा नसे, मग जरा कणकण व्हायला लागली की कल्याणीचा मला फोन येई; काका तिला समजाव म्हणून. आठवडाही झाला नसेल, असाच कल्याणीचा फोन आला होता. म्हटलं थांब घरीच येतो आणि बघतो तिच्याकडे आणि मनोहरकडेही. पण तिने यंदा ती संधीच दिली नाही. ---------- सुमारे तीसेक वर्षापूर्वी असेल कॉलेजची काहीतरी बातमी घेऊन ती लोकमतला आली होती आणि तिला समोर बसवून मी ती बातमी पुन्हा व्यवस्थित लिहून घेतली होती. त्यामुळे ती नेहमी म्हणायची की, तिला पत्रकारिता मी शिकवली म्हणून. ज्या व्यवस्थेतून ती आली ती व्यवस्था बंडखोरीतून बदलून काढण्यासाठीच्या तिच्या धडपडीचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. अग्रवाल सभेशी मनोहर जोडला गेलेला होता म्हणून अनिता सोबतचे माझे संबंध अधिक गहिरे झाले. माझ्या पाठच्या बहिणीचे नाव अनिता आणि हीदेखील अनिताच, त्यामुळे नेहमी बहिणीच्या मायेने व हक्काने ती माझ्यासोबत वागे, बोले व रागावेदेखील. पंचवटीतील कैलास मठासमोरील वाल्मीकनगरात ड्रेनेजच्या ढाप्यावर खाट टाकून तिच्या हातची खिचडी खाल्ल्यापासूनचा माझा पगारे-अहिरे कुटुंबीयांशी संबंध राहिला आहे. ती अनिता पगारे म्हणून ओळखली जाई, पण आमच्याकडे बऱ्याचदा अनिता अहिरे छापून येई तेव्हा ती लटक्या रागाने म्हणे; की तू एकाचवेळी मला व मनोहरलाही सांभाळून कौटुंबिक बॅलन्स साधतोस. ---------- ती उपजत आंदोलनजीवी होती. मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, गणेश देवी यासारख्या समाजकार्यातील अग्रणी धुरिणांसोबत ती परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय होती. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर म्हणतात तसं मध्यंतरी तिची खूपच फिरफिर झाली. नाशिक, मुंबई, जव्हार, संगमनेर, पुन्हा नाशिक असं बरंच तिने पालथं घातलं. तब्येतीला झेपवायचं नाही, पण स्वभाव स्वस्थ बसू देईना. आताशा कुठे थोडे स्थैर्य लाभू पाहात होते, पण काळाला हे मान्य नसावे. खरं तर अजून खूप लढाया लढायच्या होत्या आणि ती सक्षमपणे त्या आघाडीवर होती. खूप उंचीवर तिला बघायचे होते. मात्र नियतीपुढे हात टेकावे लागले... .. हो अनिताच्या रूपाने मी माझी बहीण गमावली आहे.. #AnitaPagareNashik

Saraunsh published in Lokmat on March 28, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210328_2_17
https://www.lokmat.com/nashik/gave-ultimatum-why-let-time-come-a360/

Thursday, March 25, 2021

EditorView published in Online Lokmat on March 25, 2021

कोरोनाशी मुकाबला करता करता वर्ष सरले, अस्वस्थता कायम ! किरण अग्रवाल / कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी देशात सर्वप्रथम लॉकडाऊन पुकारला गेला त्याला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी, या महामारीशी सुरू असलेला लढा अजून संपलेला नाही; किंबहुना नव्याने त्याच्याशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. अनेकांना रस्त्यावर आणलेल्या व होत्याचे नव्हते करून ठेवलेल्या या संकटाने मनुष्याच्या जगण्याची परिमाणेच बदलून ठेवली असून, गेल्या वर्षभरातील ही ठेच पाहता अशी वेळ पुन्हा ओढवू द्यायची नसेल तर शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांना जनतेचाही स्वयंस्फूर्त प्रतिसाद लाभणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
गेल्यावर्षी म्हणजे 2020 मध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस देशात कोरोनाचा प्रादुर्भाव समोर येऊन गेला होता. राज्यातील पहिल्या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल 3 मार्च 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता, तर 23 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली होती, जी 7 जूनपर्यंत होती; त्यानंतर अंशतः स्वरूपात व्यवहार सुरळीत करण्यात आले. नंतर हळूहळू सारे पूर्वपदावर येत गेले; परंतु मनातील धास्ती कायम राहिली, कारण याकाळाने खूप काही सोसायला, भोगायला लावल्याच्या जखमा कायमसाठी मनावर कोरल्या गेल्या. इतिहासातले सर्वात मोठे स्थलांतर या कोरोनामुळे घडून आले व रोजीरोटीसाठी शहराकडे गेलेले लोंढे जिवाच्या धास्तीने आपापल्या गावाकडे परतले. अनेकांचा रोजगार गेला, हाताला काम न राहिल्याने खायचे वांधे झाले. उपलब्ध माहितीनुसार लॉकडाऊन लागल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच एक कोटी 89 लाख लोकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले. नंतर नंतर ही संख्या वाढत गेली तशी वर्षाच्या अखेरच्या चरणात त्यात सुधारणाही झाली; पण ती अगदी अल्पशी ठरली. भारतीय दिवाळखोरी व नादारी मंडळाच्या (आयबीबीआय) माहितीनुसार एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत देशातील 189 कंपन्यांना दिवाळखोरी ठरावाद्वारे टाळे लागले, यातील सर्वाधिक 37 कंपन्या महाराष्ट्रातील असून, त्याखालोखाल गुजरातच्या 36 कंपन्यांचा यात समावेश आहे. अतिशय सुन्न करणारे हे बेरोजगारीचे विदारक चित्र राहिले. ----------------- एकीकडे लाखोंचा रोजगार बुडाल्याचे चित्र असताना दुसरीकडे बहुतेक उद्योगही संकटात सापडले. लॉकडाऊनमुळे उत्पादन बंद राहिले व ग्राहकही मिळेनासे झाले, त्यामुळे अनेकांना कर्जाचे हप्ते फेडणे मुश्कील झाले. बाजारपेठांमधील व्यावसायिकांचीही अवस्था बिकट बनली. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसून गेला. जीवित व वित्तहानी बरोबरच जनतेच्या मानसिक आरोग्याचे जे नुकसान झाले ते तर भरून न येणारे म्हणता यावे. पण अशाही स्थितीत म्हणजे कोरोनाचे संकट व त्याच्या जोडीला आलेल्या चक्रीवादळ, अवकाळी पावसासारख्या काही आपत्तींवर मात करून वर्षाच्या अखेरीस पुन्हा सारे सुरळीत झाले असताना 2021च्या प्रारंभात कोरोनाने पुन्हा दार ठोठावले आणि काही ठिकाणी तर आता कालची स्थिती बरी होती असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कोरोनाशी मुकाबला करता करता वर्ष संपले व ते संपता-संपता जरा कुठे हायसे वातावरण निर्माण होऊ पाहात असताना व नव्या वर्षात लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा यासंबंधीचे भय दाटून आले आहे. ------------------ दुसऱ्या आवर्तनात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर 504 दिवसांवरून 202 दिवसांवर आला आहे. देशात महाराष्ट्र व पंजाबचा नंबर अग्रभागी असून, टॉप टेन प्रभावित शहरांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल नऊ शहरे असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे, यावरून यातील गंभीरता लक्षात यावी. अर्थात शासन प्रशासन स्तरावर यासंबंधात जी पावले उचलावयाची व निर्बंध लागू करायचे ते केले गेले आहेतच; पण त्याची तितक्याशा सक्षमतेने अंमलबजावणी होताना दिसत नाही. अजूनही कसल्या ना कसल्या निमित्ताने गर्दी होताना व त्यात फिजिकल डिस्टन्स पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. बाधित आढळल्याबरोबर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हावयास हवे व त्यांच्या चाचण्या केल्या जावयास हव्या, पण सर्वच ठिकाणी आनंदीआनंदच आहे. लसीकरण हा खूप मोठा मानसिक आधार ठरला असला तरी तेदेखील अपेक्षेप्रमाणे गतीने होताना दिसत नाही. काही ठिकाणी लसींच्या पुरवठ्याचा प्रश्न आहे, तर काही ठिकाणी लसीकरणात गतिमानता नाही. म्हणजे दोहो बाजूंनी अनास्था वा चालढकल आहे. नागरिक हवी तशी काळजी घेत नाहीत व यंत्रणा त्यासाठी आग्रही नाही. सुजाणांची अस्वस्थता वाढून गेली आहे ती त्यामुळेच. https://www.lokmat.com/editorial/article-one-year-completed-coronavirus-discomfort-persists-a629/

Monday, March 22, 2021

Saraunsh published in Lokmat on March 21, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210321_2_7
https://www.lokmat.com/nashik/where-and-how-much-will-patch-be-attached-torn-quilt-a321/

Thursday, March 18, 2021

EditorsView published in Online Lokmat on March 18, 2021

रुग्ण वाढीचा आलेख पाहता कोरोना स्प्रेडर्सना रोखणे प्राधान्याचे.. किरण अग्रवाल / ज्यांना स्वतःच्या जिवाची पर्वा नसते, ते इतरांची चिंता करण्याची शक्यताच नसते. त्यामुळे प्रसंगी अशांवर कारवाईचा बडगा उगारण्याखेरीज पर्याय नसतो. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तशीच वेळ आली आहे. गृहविलगीकरणात असलेले कोरोनाबाधित ज्या पद्धतीने मुक्तपणे जागोजागी वावरत आहेत व कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत, अशांना हुडकून त्यांना शिस्त लावणे अगर त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे बनले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील याच बाबीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले असून, ही बाब यंत्रणांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख पाहता भीतीत भर पडावी अशी स्थिती आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा बहुतेक शहरांतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दी होऊ नये व त्यातून संसर्गाला संधी मिळू नये म्हणून विविध प्रकारचे निर्बंध त्या त्या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत. राज्यात या महिनाअखेर म्हणजे ३१ मार्चपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदीही घालण्यात आलेली असली तरी त्याबाबतची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही, त्यामुळे महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाटेवर असल्याचा इशारा देणारे पत्र केंद्र सरकारने राज्य शासनाला पाठविले आहे. नियम व निर्बंध याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे ताशेरे तर यात आहेतच, शिवाय लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचनाही आरोग्य सचिवांनी केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्बंधांच्या कडक अंमलबजावणीची सूचना केल्यावर आता जागोजागी प्रशासन कामाला लागलेले दिसत आहे; पण आजवरची यासंदर्भातील दिरंगाईच संकटाला निमंत्रण देऊन गेली आहे हे वास्तव नाकारता येऊ नये. ------------------ कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्णालय अगर कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यापेक्षा गृहविलगीकरणात राहणे अधिकतर रुग्णांनी पसंत केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा विषाणूही आता कमजोर झालेला असल्यामुळे फार भीती बाळगण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नसल्‍याने गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला जात आहे; परंतु अशांची नोंद ठेवण्याची पुरेशी व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडे दिसत नाही. परिणामी चार-सहा दिवसांच्या घरगुती उपचारानंतर हेच बाधित परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरून संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत असताना दिसून येतात. अशांना सक्तीने घरातच बसविणे गरजेचे आहे, कारण तसे फिरणे त्यांच्याचसाठी नव्हे तर इतरांच्याही जिवासाठी घातक आहे. त्याकरिता त्यांच्या ट्रेसिंगची व्यवस्था सक्षमपणे उभारली जाणे अपेक्षित आहे. ------------------ शासन प्रशासनाने जे निर्बंध घातले आहेत ते नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने पाळले जावेत, अशी अपेक्षा यंत्रणांकडून केली जाणे गैर नाही; परंतु नागरिकांकडून जर ते पाळले जाणार नसतील तर अशांवर कारवाईचा बडगा उगारला जाणे गरजेचे आहे. मात्र ते तितक्याशा सक्षमतेने होताना दिसत नाही यावर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने बोट ठेवले आहे. बाधितांचा शोध घेणे, चाचण्या होणे व त्यांना निर्धारित कालावधीसाठी विलगीकरणातच राहू देणे याकडे लक्ष दिले जावयास हवे. तसे न झाल्यास संबंधित बाधित हेच स्प्रेडर्स ठरून संसर्गास कारणीभूत बनतात, हा आजवरचा अनुभव आहे. विशेषतः ज्यांचा अधिकाधिक लोकांशी कामानिमित्ताने संपर्क येतो, अशा वर्गातील बाधितांना शोधणे व त्यांना क्वाॅरण्टाइन करणे तसेच त्यांची ओळख पटेल अशा पद्धतीने त्यांच्या हातावर शिक्के मारणे वगैरे उपाय योजले जाणे गरजेचे आहे. कोरोनाचा फैलावत असलेला संसर्ग रोखण्यासाठी तेच प्राथमिकतेचे आहे. https://www.lokmat.com/editorial/preventing-corona-spreaders-maharashra-lokmat-editorial-a601/

Monday, March 15, 2021

Saraunsh published in Lokmat on March 14, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210314_2_19
https://www.lokmat.com/nashik/strict-enforcement-needs-be-enforced-a321/

Friday, March 12, 2021

Haridwar Kumbh 2021 News

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210312_8_16
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOKSAM_AULS_20210312_11_1

Thursday, March 11, 2021

व्रतस्थ मी, तटस्थ मी...

11 Jan, 2021 व्रतस्थ मी, तटस्थ मी...
मी आस्तिक नाही, परंतु नास्तिकही नाही. बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर साऱ्याच बाबी तपासून घेतो, विवेकवाद जपतो, अंधश्रद्धेवर तर तुटून पडतो, पण श्रद्धेला धक्का अजिबात लावत नाही. आमचे कुटुंब तर प्रचंड देवभक्त. घरातील अनेकांची व्रतवैकल्ये बारमाही सुरूच असतात. त्यातून मीही आषाढी व महाशिवरात्रीचा उपवास करू लागलो. आजही उपवास धरलाय, मात्र देऊळ बंद असल्याने भोले बाबांचे दर्शन टळले. अर्थात कोरोनाचे भय लक्षात घेता मंदिरापुढील रांगेत उभे राहण्यापेक्षा मनातील श्रद्धेने बम बम भोले म्हणूया. तसेही व्रतस्थ असलो तरी मला विरक्ती साधलेली नाही ... म्हणूनच सौ. नेहमी म्हणत असते, दाढी वाढवली इथपर्यंत ठीक, राख फासली नाही हे नशीब! #KirananandNashik #KiranAgrawalNashik

EditorsView published in Online Lokmat on March 11, 2021

विवाहकर्त्यांचे हाल बेहाल.. किरण अग्रवाल / कोरोनाची महामारी पुन्हा एकदा डोके वर काढू पाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी व्यवहार व चलनवलनावरील निर्बंध कडक करण्याची वेळ आली आहे. आरोग्यविषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने ते गरजेचेही आहे, कारण या संदर्भात स्वयंस्फूर्तीने नागरिकांकडून जी काळजी अगर खबरदारी घेणे अपेक्षित आहे ती घेतली जाताना दिसून येत नाही. यंत्रणांना सक्ती करण्याची वेळ आली आहे ती त्यामुळेच; परंतु हे होत असताना या निर्बंधांमुळे सर्वाधिक पंचाईत झाली आहे ती विवाहकर्त्यांची. केवळ वर-वधू पक्षच नव्हे तर विवाह सोहळ्याशी संबंधित सर्वच संबंधित व्यावसायिक घटकांचीही यात मोठीच अडचण होणे स्वाभाविक ठरले आहे.
नाही नाही म्हणता कोरोना पुन्हा पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. या संबंधीच्या पहिल्या लाटेत खूप काही सोसून, भोगून व अनुभवून झाले असताना आता पुन्हा हे संकट घोंगावत आहे. हिला दुसरी लाट म्हणता येऊ नये, कारण पूर्वी इतका बाधितांचा व बळी पडणाऱ्यांचाही आलेख उंचावलेला नाही; शिवाय हा विषाणू पूर्वीइतका घातकही राहिला नसल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे; परंतु म्हणून या संकटाकडे दुर्लक्ष करावे असे अजिबात नाही. राज्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचे प्रयत्न होत आहेत व शासकीय दवाखान्याखेरीज खासगी रुग्णालयांमध्येही आता त्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे; परंतु काही ठिकाणचा फैलाव चिंतेचे कारण बनू लागला आहे. सुरुवातीला अकोला, यवतमाळ आदी ठिकाणी दिसून आलेली यासंबंधीची परिस्थिती हळूहळू बहुतेक ठिकाणी दिसून येऊ पाहते आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचे आकडे वाढू लागल्याने भीतीत भर पडणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे. सरकारी यंत्रणांना पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर येऊन नियम निकष कठोर करण्याची वेळ आली आहे ती त्यामुळेच. अर्थात हे निर्बंध काहीसे अडचणीचे वाटत असले तरी ते सर्वांच्या हितासाठी असल्याने प्रत्येकानेच थोडी कळ काढणे अपेक्षित आहे, ती अन्य घटकांकडून सोसलीही जात आहे; परंतु विवाहेच्छुक व संबंधित घटकांच्या बाबतीत ती अधिकची असह्य ठरल्याने प्रश्न उपस्थित केला जात आहे. ----------- बाजारातील दुकानांवरही निर्बंध आले असले तरी काही मर्यादित काळासाठी ती उघडी ठेवण्याची परवानगी आहे. ग्राहकसंख्येचे वा क्षमतेचे काही निकष पाळून हॉटेल्स व बारदेखील सुरू राहणार आहेत. अन्य आस्थापना व कार्यालयांनाही अशीच उपस्थितीची मर्यादा असली तरी ती बंद राहणार नाहीत. मात्र लग्नसोहळ्यांमधील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे निरीक्षण केंद्राच्या समितीने नोंदविल्यामुळे लग्नसोहळ्यांवरील निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. मर्यादित जागेच्या मंगल कार्यालय वा हॉल्ससाठी जसे निर्बंध आहेत तसेच मोकळ्या लॉन्ससाठीही असल्याने अडचणीत वाढ होऊन गेल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषत: लग्नासाठी गर्दी जमवायची नसल्याने व धूमधडाका करायचा नसल्याने वाजंत्री, घोड्यावरील मिरवणूक, साज सजावट-डेकोरेशन व अन्य वैवाहिक इव्हेंट्स रद्द करण्याकडेच बहुतेकांचा कल असल्याने सदर व्यावसायिक पूर्णतः कोलमडल्याची स्थिती आहे. म्हणजे आयुष्यात एकदाच येणारा सुंदर क्षण साजरा करताना तो आनंद वाटून घेण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे लग्नघरातील मंडळी चिंतित आहे तशीच त्याच्याशी संबंधित व्यवसायकर्तेही अडचणीत आहेत, यामुळे विवाहकर्त्यांचे हाल बेहाल झाले आहेत. इतर ठिकाणच्या उघडेपणातून कोरोना होत नाही, तो लग्नसमारंभातूनच होतो काय, असा प्रश्न त्यामुळेच केला जात आहे. ------------- अर्थात, कोरोनामुळे विवाह समारंभांवरही निर्बंध आल्यामुळे यातील खर्चात खूप मोठी कपात झाली असून, त्याबद्दल समाधानाचा सुस्कारा सोडणारा वर्गही मोठा आहे. एकेका लग्नात शे-पाचशे फेटे हल्ली बांधावे लागत असल्याचे व इतके करूनही मुद्द्याचाच माणूस सुटून गेला तर होणारा बखेडा, हे चित्र यासंदर्भात बोलके ठरावे. लग्नाच्या निमित्ताने सामाजिक प्रतिष्ठेचा भाग म्हणून उठणाऱ्या गाव जेवणावळींना आळा बसला आहे. ग्रामीण भागात घरातील लग्नकार्यासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण मोठे आढळून येते, या कर्जदारांची संख्याही गेल्या वर्षभरात घटल्याचे दिसून यावे. विवाह समारंभातील प्रदर्शनावर खर्च करण्यापेक्षा वधू-वरांच्या भविष्याची काळजी म्हणून त्यांच्या नावे खर्चाची रक्कम गुंतवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे, हीदेखील सामान्यांसाठी समाधानाची बाब म्हणता यावी. एकूणच कोरोनाने जीवनशैलीच बदलून ठेवली असून, पारंपरिक प्रथा प्रघातांनाही बदलण्यास भाग पाडल्याचेच यातून दिसून येत आहे. कोरोना काहींसाठी इष्टापत्ती ठरत असला तरी बहुतेकांसाठी मात्र आपत्तीच ठरत आहे, हाच सारांश यातून लक्षात घ्यायचा. https://www.lokmat.com/nashik/condition-upcoming-marriages-not-good-because-corona-a607/

Monday, March 8, 2021

Saraunsh published in Lokmat on March 07, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210307_4_15
https://www.lokmat.com/nashik/applause-wedding-came-discussion-political-applause-took-place-a321/

Thursday, March 4, 2021

EditorsView published in Online Lokmat on March 04, 2021

अर्थचक्र गतिमान होण्याचेच संकेत... किरण अग्रवाल / देशातील कोरोनाच्या संसर्गाची वर्षपूर्ती होत असताना व त्यामुळे गेल्या वर्षातील अर्थकारणाला मोठा ब्रेक बसल्याचे अनुभवून झाले असताना पुन्हा तेच संकट नव्याने धडका देऊ पाहतेय म्हटल्यावर काळजी वाटणे स्वाभाविक आहे खरे; परंतु त्याचबरोबर दुसरीकडे याच काळात देशातील अब्जाधीशांच्या संख्येत भर पडल्यासारख्या वार्ताही पुढे आल्याने व उद्योग जगतातील उलाढालही वाढल्याने निराशेवर दिलासा तसेच आशादायी फुंकर मारली गेली आहे जणू. कोरोनावरील लसीकरणाने ढासळलेल्या मानसिकतेला उन्नत होण्याचे बळ लाभत असून, त्यातूनच अर्थचक्र गतिमान होऊ पाहत आहे, ही समाधानाचीच बाब म्हणता यावी.
कोरोनाच्या महामारीमुळे गेले वर्षभर राहिलेले बाजारातील मंदीचे वातावरण हळूहळू दूर होत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे दिवाळीत याचा प्रारंभ झाला, तो पुढे टिकून राहिला. आताही कोरोना फिरून पुन्हा येऊ पहात असल्याचे दिसत असले तरी, लसीकरण सुरू झाल्याने व त्याचा जनतेच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत असल्याने बाजारातील तेजी टिकून आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या त्यांच्या मासिक बुलेटिनमध्येदेखील या तेजीची नोंद घेण्यात आली असून, सर्वंकष मागणीशी संबंधित सर्व आर्थिक इंजिने आता सुरू झाल्याने देशातील सर्व आर्थिक घडामोडी वेगवान झाल्या असल्याचे या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. इतकेच नव्हे तर नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील चारचाकी वाहनांच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाल्याची नोंद पुढे आली आहे. या महिन्यात मारुतीच्या प्रवासी वाहनांची विक्री आठ टक्क्यांनी वाढली असून, टाटा मोटर्सच्या वाहनांच्या विक्रीत तर तब्बल ११९ टक्के वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या वाहन विक्रीतही १.४५ टक्का वाढ झाली आहे. वाहनांची चाके ही गतीची प्रतीके मानली जातात, तेव्हा वाहन विक्रीत झालेली वृद्धी पाहता अर्थचक्र गतिमान होण्याचेच संकेत यातून मिळावेत. .............. महत्त्वाचे म्हणजे खासगी क्षेत्राबरोबरच सरकारी पातळीवरही काही लाभदायी घटना घडामोडी घडल्या आहेत. पाच वर्षांनी झालेल्या स्पेक्ट्रमच्या लिलावात केंद्र सरकारला ७७ हजार ८१४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. यात सर्वाधिक स्पेक्ट्रम रिलायन्स जिओने खरेदी केले असून, आगामी काळात फाइव्ह जी सेवेसाठी त्याचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे. तसेच अन्य कंपन्यांनी खरेदी केलेल्या स्पेक्‍ट्रममुळे फोर जीचे कव्हरेज सुधारण्यासाठीही मदत होणार आहे. तांत्रिक पातळीवर व संवादातील संधी वाढविण्याच्या दृष्टीने देशाला अधिक सक्षम करण्याच्या उपयोगीतेतून या घटनेकडे बघता यावे. उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोनाने एकूणच जगाची अर्थव्यवस्था अडचणीत आणली असताना हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०२१मध्ये जगात ४१२ अब्जाधीशांची वाढ झाली असून, यात भारतातील ४० नव्या अब्जाधीशांचा समावेश आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. या यादीनुसार त्यांची संपत्ती गेल्या वर्षभरात २४ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. याच वर्षात प्रख्यात उद्योगपती विनोद अदानी यांची संपत्ती १२८ टक्क्यांनी, तर जय चौधरी यांची संपत्ती सर्वाधिक वेगाने म्हणजे २७१ टक्क्यांनी वाढली आहे. भारतातील १७७ अब्जाधीशांचा या यादीत समावेश आहे. प्रचंड परिश्रम व काळाच्या बरोबरीने टाकलेली पाऊले, यामुळेच हे शक्य झाले असल्याने त्याबद्दल असूया वाटण्याचे कारण नाही; उलट कुणाचा का असेना उद्योग वाढला तर त्यातून अनेकांच्या रोजगाराची व्यवस्था होते, उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटतात व आपसूकच देशाची अर्थव्यवस्थाही गतिमान होते. घसरलेली अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्याच्या दृष्टीने या बाबी शुभ शकुनाच्याच म्हणायला हव्यात. .............. महत्त्वाचे म्हणजे, कोरोना संसर्गाच्या आपल्याकडील एन्ट्रीची वर्षपूर्ती या महिन्यात होत आहे. २०२०च्या फेब्रुवारी महिन्यात केरळमध्ये सर्वप्रथम तीन कोरोनाबाधित आढळून आले होते, तर महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल ३ मार्च रोजी जाहीर केला गेला होता. ही वर्षपूर्ती होत असताना पुन्हा नव्याने कोरोनाचे संकट दारावर धडका देताना दिसत आहे. काही ठिकाणी रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, यवतमाळ, अकोला, अमरावतीसारख्या ठिकाणी कडक निर्बंध लावावे लागले आहेत. अन्यही काही शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली गेली आहे. कोरोनाची ही पुन्हा होत असलेली वाढ लक्षात घेता लसीकरणाचा वेगही वाढवण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे त्यानुसार आतापर्यंत केवळ सरकारी रुग्णालयात दिली जाणारी कोरोनाची लस आता खासगी रुग्णालयातही उपलब्ध करून देण्यात येणार असून, २४ तास दिवसरात्र डोस देण्याची व्यवस्था उभारण्याची मुभा देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग जसजसा वाढेल तसतसे कोरोनाचे संकट दूर ठेवणे शक्य होणार आहे. या लसीकरणाने जनमानसाला मोठा मानसिक आधार मिळाला असून, काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असली तरी बाजारातील तेजी टिकून राहणे शक्य झाले आहे. ही तेजीच अर्थचक्राची गती टिकवून ठेवणार असून, ती वाढवणारीही ठरो याच अपेक्षा. https://www.lokmat.com/editorial/signs-economic-cycle-accelerating-a642/

Tuesday, March 2, 2021

Saraunsh published in Lokmat on Feb 28, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210228_2_12
https://www.lokmat.com/nashik/restrictions-must-be-complied-recognizing-i-am-responsible-a321/