Thursday, March 11, 2021

EditorsView published in Online Lokmat on March 11, 2021

विवाहकर्त्यांचे हाल बेहाल.. किरण अग्रवाल / कोरोनाची महामारी पुन्हा एकदा डोके वर काढू पाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी व्यवहार व चलनवलनावरील निर्बंध कडक करण्याची वेळ आली आहे. आरोग्यविषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने ते गरजेचेही आहे, कारण या संदर्भात स्वयंस्फूर्तीने नागरिकांकडून जी काळजी अगर खबरदारी घेणे अपेक्षित आहे ती घेतली जाताना दिसून येत नाही. यंत्रणांना सक्ती करण्याची वेळ आली आहे ती त्यामुळेच; परंतु हे होत असताना या निर्बंधांमुळे सर्वाधिक पंचाईत झाली आहे ती विवाहकर्त्यांची. केवळ वर-वधू पक्षच नव्हे तर विवाह सोहळ्याशी संबंधित सर्वच संबंधित व्यावसायिक घटकांचीही यात मोठीच अडचण होणे स्वाभाविक ठरले आहे.
नाही नाही म्हणता कोरोना पुन्हा पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. या संबंधीच्या पहिल्या लाटेत खूप काही सोसून, भोगून व अनुभवून झाले असताना आता पुन्हा हे संकट घोंगावत आहे. हिला दुसरी लाट म्हणता येऊ नये, कारण पूर्वी इतका बाधितांचा व बळी पडणाऱ्यांचाही आलेख उंचावलेला नाही; शिवाय हा विषाणू पूर्वीइतका घातकही राहिला नसल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे; परंतु म्हणून या संकटाकडे दुर्लक्ष करावे असे अजिबात नाही. राज्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचे प्रयत्न होत आहेत व शासकीय दवाखान्याखेरीज खासगी रुग्णालयांमध्येही आता त्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे; परंतु काही ठिकाणचा फैलाव चिंतेचे कारण बनू लागला आहे. सुरुवातीला अकोला, यवतमाळ आदी ठिकाणी दिसून आलेली यासंबंधीची परिस्थिती हळूहळू बहुतेक ठिकाणी दिसून येऊ पाहते आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचे आकडे वाढू लागल्याने भीतीत भर पडणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे. सरकारी यंत्रणांना पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर येऊन नियम निकष कठोर करण्याची वेळ आली आहे ती त्यामुळेच. अर्थात हे निर्बंध काहीसे अडचणीचे वाटत असले तरी ते सर्वांच्या हितासाठी असल्याने प्रत्येकानेच थोडी कळ काढणे अपेक्षित आहे, ती अन्य घटकांकडून सोसलीही जात आहे; परंतु विवाहेच्छुक व संबंधित घटकांच्या बाबतीत ती अधिकची असह्य ठरल्याने प्रश्न उपस्थित केला जात आहे. ----------- बाजारातील दुकानांवरही निर्बंध आले असले तरी काही मर्यादित काळासाठी ती उघडी ठेवण्याची परवानगी आहे. ग्राहकसंख्येचे वा क्षमतेचे काही निकष पाळून हॉटेल्स व बारदेखील सुरू राहणार आहेत. अन्य आस्थापना व कार्यालयांनाही अशीच उपस्थितीची मर्यादा असली तरी ती बंद राहणार नाहीत. मात्र लग्नसोहळ्यांमधील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे निरीक्षण केंद्राच्या समितीने नोंदविल्यामुळे लग्नसोहळ्यांवरील निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. मर्यादित जागेच्या मंगल कार्यालय वा हॉल्ससाठी जसे निर्बंध आहेत तसेच मोकळ्या लॉन्ससाठीही असल्याने अडचणीत वाढ होऊन गेल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषत: लग्नासाठी गर्दी जमवायची नसल्याने व धूमधडाका करायचा नसल्याने वाजंत्री, घोड्यावरील मिरवणूक, साज सजावट-डेकोरेशन व अन्य वैवाहिक इव्हेंट्स रद्द करण्याकडेच बहुतेकांचा कल असल्याने सदर व्यावसायिक पूर्णतः कोलमडल्याची स्थिती आहे. म्हणजे आयुष्यात एकदाच येणारा सुंदर क्षण साजरा करताना तो आनंद वाटून घेण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे लग्नघरातील मंडळी चिंतित आहे तशीच त्याच्याशी संबंधित व्यवसायकर्तेही अडचणीत आहेत, यामुळे विवाहकर्त्यांचे हाल बेहाल झाले आहेत. इतर ठिकाणच्या उघडेपणातून कोरोना होत नाही, तो लग्नसमारंभातूनच होतो काय, असा प्रश्न त्यामुळेच केला जात आहे. ------------- अर्थात, कोरोनामुळे विवाह समारंभांवरही निर्बंध आल्यामुळे यातील खर्चात खूप मोठी कपात झाली असून, त्याबद्दल समाधानाचा सुस्कारा सोडणारा वर्गही मोठा आहे. एकेका लग्नात शे-पाचशे फेटे हल्ली बांधावे लागत असल्याचे व इतके करूनही मुद्द्याचाच माणूस सुटून गेला तर होणारा बखेडा, हे चित्र यासंदर्भात बोलके ठरावे. लग्नाच्या निमित्ताने सामाजिक प्रतिष्ठेचा भाग म्हणून उठणाऱ्या गाव जेवणावळींना आळा बसला आहे. ग्रामीण भागात घरातील लग्नकार्यासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण मोठे आढळून येते, या कर्जदारांची संख्याही गेल्या वर्षभरात घटल्याचे दिसून यावे. विवाह समारंभातील प्रदर्शनावर खर्च करण्यापेक्षा वधू-वरांच्या भविष्याची काळजी म्हणून त्यांच्या नावे खर्चाची रक्कम गुंतवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे, हीदेखील सामान्यांसाठी समाधानाची बाब म्हणता यावी. एकूणच कोरोनाने जीवनशैलीच बदलून ठेवली असून, पारंपरिक प्रथा प्रघातांनाही बदलण्यास भाग पाडल्याचेच यातून दिसून येत आहे. कोरोना काहींसाठी इष्टापत्ती ठरत असला तरी बहुतेकांसाठी मात्र आपत्तीच ठरत आहे, हाच सारांश यातून लक्षात घ्यायचा. https://www.lokmat.com/nashik/condition-upcoming-marriages-not-good-because-corona-a607/

No comments:

Post a Comment