Tuesday, March 30, 2021

Anita Pagare... अनिता, अजून खूप लढायचं होतं...

28 मार्च 2021 रोजी 6.53 PM वाजता · अनिता, अजून खूप लढायचं होतं...
काही नाती ही रक्ताच्या नात्यापलीकडची असतात, तसल्याच नात्यातील माझी बहिण होती अनिता पगारे. सामान्यांप्रतीची कळकळ ही तिची जात, तर कमालीची धडपड हा स्थायी स्वभाव. कोणतेही काम अंगावर घेतलं की अशी काही झोकून द्यायची की तिला तिच्या तब्येतीचीही पर्वा नसे, मग जरा कणकण व्हायला लागली की कल्याणीचा मला फोन येई; काका तिला समजाव म्हणून. आठवडाही झाला नसेल, असाच कल्याणीचा फोन आला होता. म्हटलं थांब घरीच येतो आणि बघतो तिच्याकडे आणि मनोहरकडेही. पण तिने यंदा ती संधीच दिली नाही. ---------- सुमारे तीसेक वर्षापूर्वी असेल कॉलेजची काहीतरी बातमी घेऊन ती लोकमतला आली होती आणि तिला समोर बसवून मी ती बातमी पुन्हा व्यवस्थित लिहून घेतली होती. त्यामुळे ती नेहमी म्हणायची की, तिला पत्रकारिता मी शिकवली म्हणून. ज्या व्यवस्थेतून ती आली ती व्यवस्था बंडखोरीतून बदलून काढण्यासाठीच्या तिच्या धडपडीचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. अग्रवाल सभेशी मनोहर जोडला गेलेला होता म्हणून अनिता सोबतचे माझे संबंध अधिक गहिरे झाले. माझ्या पाठच्या बहिणीचे नाव अनिता आणि हीदेखील अनिताच, त्यामुळे नेहमी बहिणीच्या मायेने व हक्काने ती माझ्यासोबत वागे, बोले व रागावेदेखील. पंचवटीतील कैलास मठासमोरील वाल्मीकनगरात ड्रेनेजच्या ढाप्यावर खाट टाकून तिच्या हातची खिचडी खाल्ल्यापासूनचा माझा पगारे-अहिरे कुटुंबीयांशी संबंध राहिला आहे. ती अनिता पगारे म्हणून ओळखली जाई, पण आमच्याकडे बऱ्याचदा अनिता अहिरे छापून येई तेव्हा ती लटक्या रागाने म्हणे; की तू एकाचवेळी मला व मनोहरलाही सांभाळून कौटुंबिक बॅलन्स साधतोस. ---------- ती उपजत आंदोलनजीवी होती. मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, गणेश देवी यासारख्या समाजकार्यातील अग्रणी धुरिणांसोबत ती परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय होती. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर म्हणतात तसं मध्यंतरी तिची खूपच फिरफिर झाली. नाशिक, मुंबई, जव्हार, संगमनेर, पुन्हा नाशिक असं बरंच तिने पालथं घातलं. तब्येतीला झेपवायचं नाही, पण स्वभाव स्वस्थ बसू देईना. आताशा कुठे थोडे स्थैर्य लाभू पाहात होते, पण काळाला हे मान्य नसावे. खरं तर अजून खूप लढाया लढायच्या होत्या आणि ती सक्षमपणे त्या आघाडीवर होती. खूप उंचीवर तिला बघायचे होते. मात्र नियतीपुढे हात टेकावे लागले... .. हो अनिताच्या रूपाने मी माझी बहीण गमावली आहे.. #AnitaPagareNashik

No comments:

Post a Comment