At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, March 4, 2021
EditorsView published in Online Lokmat on March 04, 2021
अर्थचक्र गतिमान होण्याचेच संकेत...
किरण अग्रवाल /
देशातील कोरोनाच्या संसर्गाची वर्षपूर्ती होत असताना व त्यामुळे गेल्या वर्षातील अर्थकारणाला मोठा ब्रेक बसल्याचे अनुभवून झाले असताना पुन्हा तेच संकट नव्याने धडका देऊ पाहतेय म्हटल्यावर काळजी वाटणे स्वाभाविक आहे खरे; परंतु त्याचबरोबर दुसरीकडे याच काळात देशातील अब्जाधीशांच्या संख्येत भर पडल्यासारख्या वार्ताही पुढे आल्याने व उद्योग जगतातील उलाढालही वाढल्याने निराशेवर दिलासा तसेच आशादायी फुंकर मारली गेली आहे जणू. कोरोनावरील लसीकरणाने ढासळलेल्या मानसिकतेला उन्नत होण्याचे बळ लाभत असून, त्यातूनच अर्थचक्र गतिमान होऊ पाहत आहे, ही समाधानाचीच बाब म्हणता यावी.
कोरोनाच्या महामारीमुळे गेले वर्षभर राहिलेले बाजारातील मंदीचे वातावरण हळूहळू दूर होत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे दिवाळीत याचा प्रारंभ झाला, तो पुढे टिकून राहिला. आताही कोरोना फिरून पुन्हा येऊ पहात असल्याचे दिसत असले तरी, लसीकरण सुरू झाल्याने व त्याचा जनतेच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत असल्याने बाजारातील तेजी टिकून आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या त्यांच्या मासिक बुलेटिनमध्येदेखील या तेजीची नोंद घेण्यात आली असून, सर्वंकष मागणीशी संबंधित सर्व आर्थिक इंजिने आता सुरू झाल्याने देशातील सर्व आर्थिक घडामोडी वेगवान झाल्या असल्याचे या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. इतकेच नव्हे तर नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील चारचाकी वाहनांच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाल्याची नोंद पुढे आली आहे. या महिन्यात मारुतीच्या प्रवासी वाहनांची विक्री आठ टक्क्यांनी वाढली असून, टाटा मोटर्सच्या वाहनांच्या विक्रीत तर तब्बल ११९ टक्के वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या वाहन विक्रीतही १.४५ टक्का वाढ झाली आहे. वाहनांची चाके ही गतीची प्रतीके मानली जातात, तेव्हा वाहन विक्रीत झालेली वृद्धी पाहता अर्थचक्र गतिमान होण्याचेच संकेत यातून मिळावेत.
..............
महत्त्वाचे म्हणजे खासगी क्षेत्राबरोबरच सरकारी पातळीवरही काही लाभदायी घटना घडामोडी घडल्या आहेत. पाच वर्षांनी झालेल्या स्पेक्ट्रमच्या लिलावात केंद्र सरकारला ७७ हजार ८१४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. यात सर्वाधिक स्पेक्ट्रम रिलायन्स जिओने खरेदी केले असून, आगामी काळात फाइव्ह जी सेवेसाठी त्याचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे. तसेच अन्य कंपन्यांनी खरेदी केलेल्या स्पेक्ट्रममुळे फोर जीचे कव्हरेज सुधारण्यासाठीही मदत होणार आहे. तांत्रिक पातळीवर व संवादातील संधी वाढविण्याच्या दृष्टीने देशाला अधिक सक्षम करण्याच्या उपयोगीतेतून या घटनेकडे बघता यावे. उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोनाने एकूणच जगाची अर्थव्यवस्था अडचणीत आणली असताना हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०२१मध्ये जगात ४१२ अब्जाधीशांची वाढ झाली असून, यात भारतातील ४० नव्या अब्जाधीशांचा समावेश आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. या यादीनुसार त्यांची संपत्ती गेल्या वर्षभरात २४ टक्क्यांनी वाढली आहे. याच वर्षात प्रख्यात उद्योगपती विनोद अदानी यांची संपत्ती १२८ टक्क्यांनी, तर जय चौधरी यांची संपत्ती सर्वाधिक वेगाने म्हणजे २७१ टक्क्यांनी वाढली आहे. भारतातील १७७ अब्जाधीशांचा या यादीत समावेश आहे. प्रचंड परिश्रम व काळाच्या बरोबरीने टाकलेली पाऊले, यामुळेच हे शक्य झाले असल्याने त्याबद्दल असूया वाटण्याचे कारण नाही; उलट कुणाचा का असेना उद्योग वाढला तर त्यातून अनेकांच्या रोजगाराची व्यवस्था होते, उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटतात व आपसूकच देशाची अर्थव्यवस्थाही गतिमान होते. घसरलेली अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्याच्या दृष्टीने या बाबी शुभ शकुनाच्याच म्हणायला हव्यात.
..............
महत्त्वाचे म्हणजे, कोरोना संसर्गाच्या आपल्याकडील एन्ट्रीची वर्षपूर्ती या महिन्यात होत आहे. २०२०च्या फेब्रुवारी महिन्यात केरळमध्ये सर्वप्रथम तीन कोरोनाबाधित आढळून आले होते, तर महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल ३ मार्च रोजी जाहीर केला गेला होता. ही वर्षपूर्ती होत असताना पुन्हा नव्याने कोरोनाचे संकट दारावर धडका देताना दिसत आहे. काही ठिकाणी रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, यवतमाळ, अकोला, अमरावतीसारख्या ठिकाणी कडक निर्बंध लावावे लागले आहेत. अन्यही काही शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली गेली आहे. कोरोनाची ही पुन्हा होत असलेली वाढ लक्षात घेता लसीकरणाचा वेगही वाढवण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे त्यानुसार आतापर्यंत केवळ सरकारी रुग्णालयात दिली जाणारी कोरोनाची लस आता खासगी रुग्णालयातही उपलब्ध करून देण्यात येणार असून, २४ तास दिवसरात्र डोस देण्याची व्यवस्था उभारण्याची मुभा देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग जसजसा वाढेल तसतसे कोरोनाचे संकट दूर ठेवणे शक्य होणार आहे. या लसीकरणाने जनमानसाला मोठा मानसिक आधार मिळाला असून, काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असली तरी बाजारातील तेजी टिकून राहणे शक्य झाले आहे. ही तेजीच अर्थचक्राची गती टिकवून ठेवणार असून, ती वाढवणारीही ठरो याच अपेक्षा.
https://www.lokmat.com/editorial/signs-economic-cycle-accelerating-a642/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment