Tuesday, April 20, 2021

ाशिक लोकमतची रौप्य वर्षपूर्ती ...

20 April, 2021 नाशिक लोकमतची रौप्य वर्षपूर्ती ...
काळ कसा भरभर निघून जातो आणि आठवणी ठेवून जातो बघा, 20 एप्रिल 1996 रोजी नाशिकमधून लोकमतचा प्रारंभ झाला त्याला आज पंचवीस वर्षे पूर्ण झालीत. काय घेऊन आलो होतो या गोदातटी, साधी दोन ड्रेस घालून एक सुटकेस. संस्थेनेच आमचा डेरा हॉटेल कुबेराच्या एका रूममध्ये निश्चित करून दिला होता. नागपूरचे दिलीप तिखीले, मशीन विभागाचे काही सहकारी व मी, असे आम्ही प्रारंभीचे रुममेट्स होतो. सर्व सेट होईपर्यंत सुमारे दीड ते दोन महिने आम्ही त्या हॉटेलमध्ये काढले, त्यानंतर बाहेरून आलेले सारे आपापल्या गावी परतले व मी अशोक स्तंभावरील शर्मा क्वार्टर्समध्ये कॉट बेसिसवर निवारा शोधला. ****
लोकमतच्या प्रारंभाचे ते दिवस म्हणजे रोज नव्या आव्हानाचे, नाविन्याचे, सृजनतेच्या समाधानाचे व त्यासाठीच्या प्रचंड मेहनतीचे होते. आदरणीय निर्मल बाबूजी दर्डा नाशकात तळ ठोकून होते. ते हॉटेल अनुषावर मुक्कामी असायचे. भल्या पहाटे ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर वृत्तपत्र वितरक बांधवांच्या भेटीस व नियोजनासाठी निघायचे, आम्ही हॉटेलवरून शालिमार चौकातील लोकमतच्या शहर कार्यालयात जमायचो. तेथे प्रारंभीच्या काळात या आवृत्तीची धुरा सांभाळणारे मा. विजय बाविस्कर साहेब यांच्या उपस्थितीत नियोजनाच्या बैठका व्हायच्या. त्यांनी आधीपासूनच संपूर्ण जिल्हा पिंजून व अभ्यास करून ठेवलेला असल्याने खूप बारकाईने तुलनात्मक विचार करून ते सर्वांना विषय वाटून देत. तेथून निघून जिल्हा परिषद कार्यालयाच्या शेजारील वैद्य वहिणींच्या मेसवर दुपारचे जेवण घेतले की हॉटेल मार्गे तिखीले सर व मी अंबडला निघायचो. त्यावेळी आजच्या इतकी साधन सामुग्री नव्हती त्यामुळे बऱ्याचदा रात्री 12 नंतर आम्ही अंबडमधून पायी चालत सीबीएसवर यायचो, तेथे रात्री एक दीडच्या सुमारास एसटी कँटीनचा वडापाव खायचो; हेच आमचे रात्रीचे जेवण व पुन्हा हॉटेल कुबेराला येऊन झोपी जायचो... सर्रकन तो सारा काळ आज नजरेसमोरून सरकतो आहे. अनेक सहकारी लाभले, त्यांच्या जीवापाड कष्टाच्या बळावर ही आवृत्ती उभी राहिली. या साऱ्या क्षणांचा मी साक्षीदार, त्यामुळे असंख्य प्रसंग व आठवणींनी आज मन भरून आले आहे. ( जसा वेळ मिळेल तसे सवडीने ते मी यापुढील काळात सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहेच ) ****
मंतरलेला व भारलेला हा काळ होता, प्रारंभ होता. आमचे श्रद्धास्थान बाबूजी आदरणीय जवाहरलाल जी दर्डा स्वतः आमची व युनिटची खबरबात घेत असत. 20 एप्रिलच्या एक दिवस आधीच ते स्वतः नाशिक मध्ये आलेले होते. अंबडच्या कार्यालयात आलेल्या विविध मान्यवरांच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारल्या. आमचे कौतुक करून मार्गदर्शन करतानाच व्यावसायिक स्पर्धेचा तिळमात्रही विचार न करता त्यांची व आदरणीय पत्रमहर्षी दादासाहेब पोतनीस या दोघा मान्यवरांची जमलेली गप्पांची मैफल तर अविस्मरणीय अशीच होती. लोकोत्तर महापुरुषांचे मोठेपण त्यांच्या विचारांत, साधेपणात व निखळ - निकोप आपलेपणात कसे सामावलेले असते ते या भेटीच्या निमित्ताने आम्ही अनुभवत होतो. आदरणीय विजय बाबूजी, राजेंद्र बाबूजी यांचे सातत्यपूर्वक मार्गदर्शन पाठीशी होते. परिवारातील मुलांसारखी आमची काळजी घेत अक्षरशः बोट धरून शिकवल्यासारखे ते आम्हाला प्रत्येक गोष्टी सांगून आमच्या पाठीवर प्रेरणेची थाप देत होते. निर्मल बाबूजींबरोबरच नागपूर लोकमतचे तत्कालीन कार्य. संपादक मधुकर भावे साहेब, नागपुरचेच अशोक जैन साहेब, निवृत्त विंग कमांडर रमेश बोरा अंकल आदी मान्यवरही त्या-त्या आघाडीवर आमचा मार्ग सुकर करून आम्हाला लढण्याचे बळ देत होते. ****
आवृत्ती सुरू झाली, अल्पावधीत खपाचे विक्रम गाठतीही झाली. वर्षभराच्या आतच म्हणजे 19 फेब्रु 1997 रोजी एक लाख प्रतींचा विक्रम गाठला, ती लाखावी प्रत आम्ही वंदनीय कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांना त्यांच्या घरी जाऊन अर्पण केली, तर लाखोत्तरावी प्रत प्रख्यात नाटककार प्रा. वसंत कानेटकर सर यांना भेट केली. या ग्रेट भेटींचे व वंदनीय व्यक्तींबरोबर झालेल्या संवादाच्या आनंदाला व्यक्त करण्यासाठी शब्द कुठून आणावेत? नंतरही अनेकदा त्यांच्यासोबत भेटीगाठी व चर्चा करण्याचे भाग्य लाभले, पण ही पहिली भेट म्हणजे अविस्मरणीयच! तरुण नेतृत्व श्री देवेंद्र बाबूजी दर्डा, रिशी बाबूजी व करण बाबूजी यांनीही काळाशी सुसंगत बदल घडवीत सातत्याने नवनवीन कल्पना अमलात आणून पुढील काळात यशाची कमान अधिकाधिक उंचावत नेली. त्यामुळेच ही रौप्यमहोत्सवी वाटचाल अतिशय संपन्न झाली. ****
मा. बाविस्कर साहेबांनी मोठ्या कष्टाने जमीन नांगरून रोपटे लावून दिले, त्यानंतर मा. दत्ता सराफ सरांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून ते चांगलेच रुजविले; तर त्यानंतर मा. हेमंत कुलकर्णी साहेबांनी परखड सिंचनातून छान पैकी फुलविले. जोडीला श्री. बी. बी. चांडक यांचे व्यवस्थापन कौशल्य व लोक सहभागासाठीची प्रयोगशीलता लाभली, त्यामुळे लोकमतने उत्तरोत्तर प्रगतीचे पाऊल पुढेच टाकले. या वाटचालीत वाचक, वितरक, स्नेही, मित्र, पाठीराखे अशा विविध भूमिकांतून लाभलेली आपली साथ अतिशय मोलाची आहे; आमचे बळ व उत्साह वाढवणारी तीच खरी प्रेरणा. त्याबद्दल धन्यवाद हा औपचारिक शब्द वापरण्याला मन धजावत नाहीये, आपल्या कृतज्ञतेत राहू इच्छितो. आजवर जे प्रेम, स्नेह सदिच्छा लाभल्या त्या यापुढील काळातही कायम असू द्या हीच विनंती ....
#LokmatNashik25 #KiranAgrawalLokmat #NashikLokmatSilverJubilee

No comments:

Post a Comment