Tuesday, August 31, 2021

Akola Lokmat Ideal Women Achievers Award 2021 ...

August 28, 2021 Lokmat Ideal Women Achievers Award 2021 ...
स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात यशाची नाममुद्रा उमटविणाऱ्या भगिनींचा लोकमत आयडियल वूमन आचिव्हर्स अवॉर्ड्स 2021ने अकोल्यात गौरव करण्यात आला. अकोला, बुलढाणा व वाशिम मधील 35 कर्तृत्ववान भगिनींचा यात समावेश होता.
चित्रपट अभिनेत्री आदिती सारंगधर, पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी निमा अरोरा, महापौर अर्चना मसने यांच्या हस्ते हा सन्मान झाला व कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे ..
#LokmatWomenAchieversAwards2021 #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #BachhuKadu

Monday, August 30, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on August 29, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210829_8_1
https://www.lokmat.com/manthan/will-change-heart-congress-be-beneficial-a310/

Thursday, August 26, 2021

EditorsView published in Online Lokmat on August 26, 2021

नोकरदार भगिनींची असुरक्षितता चिंताजनक... किरण अग्रवाल / पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना काही बाबतीत तर त्यांच्याही पुढे जाऊन महिलांनी आपल्या कार्यकुशलतेची व सक्षमतेची मोहोर उमटविली आहे खरी, पण तसे असले तरी नोकरी उद्योगाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा त्याचे उत्तर समाधानकारकपणे देता येत नाही हे दुर्दैव. व्यवस्थांकडून सामान्यांप्रतीचे दायित्व नीट निभावले जात नसल्याची ओरड कायम असतेच, पण त्याचसोबत व्यवस्थांमधील महिला भगिनींच्या होणाऱ्या छळाच्याही तक्रारी कमी होतांना दिसत नसल्याने याबाबतची मानसिकता बदलणे हेच आव्हानात्मक ठरले आहे.
स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चा कितीही उच्चरवाने केल्या जात असल्या तरी तशी समानता प्रत्यक्षात आकारास येऊ शकलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये तब्बल तीन सुवर्णपदके पटकावणाऱ्या अँन सॅन या साउथ कोरियामधील खेळाडूने पुरुषा सारखे छोटे केस काय ठेवले तर तेथे सध्या सुरू असलेला गजहब पाहता, ही असमानता युनिव्हर्सल असल्याचे लक्षात यावे. अर्थात परदेशातले जाऊद्या, आपल्याकडे तर ती नक्कीच टिकून असल्याचे दिसून येते. भारतात घटनेनुसार लिंगावर आधारित मतभेद करता येत नाहीत, तसेच समानतेला छेद देणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी अनेक कायदेही केले गेले आहेत, पण तरी स्त्रियांना योग्य ते अधिकार व सन्मान दिला जात नाही याची अनेक उदाहरणे समाजात बघावयास मिळतात. पुरुषी वर्चस्वाच्या पितृसत्ताक पद्धती सोबतच सामाजिक व आर्थिक विषमता, दारिद्र्य, पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा वा समज आदी अनेक कारणे यामागे आहेत, पण बुरसटलेल्या विचारांची जळमटे काहींच्या डोक्यातून दूर होत नाहीत त्यामुळे कुटुंबात असो की कामाच्या ठिकाणी; महिलांवरील अन्याय अत्याचाराची प्रकरणे घडून येतात. यातही कामाच्या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने कामाचा गाडा ओढणाऱ्या महिला भगिनींची जी कुचंबना होते ती सहनही होत नाही व सांगताही येत नाही, अशाच स्वरूपाची असते. त्यामुळे विशेषतः या संदर्भाने जाणीव जागृती होणे व संबंधित भगिनींना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. ------------- नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात नियम डावलून बदली केल्याची दाद मागणार्‍या महिला तलाठ्याकडे तेथील प्रांत अधिकाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार नुकताच पुढे आला, तर वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सेवारत असलेल्या महिला कर्मचाऱ्यास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अश्लील मेसेज पाठविल्याचा प्रकारही चर्चेत आला आहे. अलीकडील या दोन घटना प्रातिनिधिक म्हणता याव्यात, अधिकृत तक्रारीमुळे त्या चव्हाट्यावर आल्या; पण अशा छळाला अनेकींना सामोरे जावे लागते हे विदर्भातील वन खात्यातील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून ढळढळीतपणे उघड होऊन गेले आहे. शिकून स्वतःला सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या वाट्यास येणारे अनुभव हे त्यांचे मानसिक खच्चीकरण करणारेच ठरतात. दुर्दैव असे की, अशा घटना घडल्यावर त्याची चर्चा मोठी होते, चौकशांचे सोपस्कार पार पडतात पण संबंधित मानसिकतेच्या लोकांवर दहशत बसेल अशी कारवाई अपवादानेच होताना दिसते. -------------- महत्त्वाचे म्हणजे, केवळ लैंगिक छळापुरती ही बाब मर्यादित नाही. कामाच्या ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक मिळणे, पुरुष सहकाऱ्यांकडून लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीच्या टोमण्यांचा वापर होणे, त्यांच्या दिसण्यावरून किंवा पोषाखावरून भाष्य केले जाणे अगर महिलांचे मानसिक स्वास्थ ढासळेल अशी कोणतीही कृती करणे आदी अनेक बाबी छळाच्या व्याख्येत मोडतात. कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना वाईट, विकृत व विखारी नजरेने पाहिले जाण्याचा अनुभव तर बहुतांश भगिनींना येतो. त्यातून त्यांची जी मानसिक घुसमट होते ती असह्य असते. या सर्वच प्रकाराची तक्रार केली जात नसली तरी अनेक भगिनींना अशा समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाबद्दल किंवा येणाऱ्या अनुभवाबद्दल विशाखा गाइडलाइन्सनुसार महिला तक्रार निवारण समित्या असणे बंधनकारक केले गेले आहे, अशा समित्या सक्षम करण्यावर भर दिला गेल्यास संकोच दूर सारून महिला तक्रारीसाठी पुढे येतील; शिवाय यासंदर्भात मुळात मानसिक परिवर्तन घडवून आणले जाणेही गरजेचे बनले आहे. सुरक्षितता, समानता व सन्मान अशा तिहेरी भूमिकेतून त्यासाठी जागृती घडून आली तर महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन निकोप व भातृभावाचा बनू शकेल. दिपाली चव्हाणच्या आत्महत्येनंतर येवला व आष्टीतील घटना पाहता यासंदर्भातील प्रयत्नांची गरज अधोरेखित होऊन गेली आहे. https://www.lokmat.com/editorial/insecurity-working-womens-worrying-a310/

Sunday, August 22, 2021

Saraunsh Published in Akola Lokmat on August 22, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210822_6_1
https://www.lokmat.com/manthan/whose-paternity-waiting-road-a310/

Thursday, August 19, 2021

EditorsView published in Online Lokmat on August 19, 2021

अंधार वाढत चालला, पणत्या जपूया। किरण अग्रवाल / अलीकडे समाजजीवनाचे व जगण्याचेही संदर्भच बदलले असल्याने प्रत्येकजण मी व माझ्यात गुंतत चालला आहे, त्यामुळे स्वार्थांधांच्या मतलबी गोतावळ्यात माणुसकीचा शोध घेणे जिकिरीचे झाले आहे हे खरेच; पण इतरांचे जाऊ द्या, जेव्हा आपलेही आपल्याला होत नसल्याचे दिसून येते तेव्हा मनाचे व्याकूळ होणे गहिरे होऊन गेल्याखेरीज राहत नाही. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त मातेवर उपचार करण्याचे सोडाच, परंतु तिच्या अंत्यसंस्काराकडेही पोटच्या पोरांनी पाठ केल्याचा जो प्रकार नागपुरात पुढे आला आहे तोदेखील अशा व्याकुळतेत भर घालणाराच असून, संवेदनशीलता व माणुसकीच्या व्याख्या नव्याने तपासून पाहण्याची गरज अधोरेखित करणारा म्हणता यावा.
काही घटना या अपवादात्मक असतात, पण पांढऱ्या कॅनव्हासवर काळा डाग उठून दिसावा तशा असतात. समाजमनाची अस्वस्थता वाढीस लावणाऱ्या या घटनांमुळे वेदना व व्याकुळतेच्या जाणिवा घट्ट होतातच, परंतु नात्यांचे बंध किती सैल होत चालले आहेत हेदेखील त्यातून लक्षात येते. नागपुरातील घटना तशीच आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील किसनराव बोरकर हे ज्येष्ठ गृहस्थ आपल्या कॅन्सरग्रस्त पत्नीस नागपुरात उपचारासाठी घेऊन आले होते. दवाखान्यात असताना तर तिच्या मुला मुलींनी तिच्याकडे ढुंकून पाहिले नाहीच, परंतु आईच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही कोणी आले नाही; अखेर मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाच्या लोकांनी या अभागी मातेवर अंत्यसंस्कार केले. परिस्थिती कितीही हलाखीची वा कशीही असो, पण पोटची मुले असताना एखाद्या मातेवर अशी वेळ यावी हेच हृदय पिळवटून काढणारे आहे. यात ज्यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला त्या अपरिचितांकडून माणुसकीचा प्रत्यय येत असताना, हक्काच्या म्हणवणार्‍या मुलांकडून, आप्तांकडून आलेला संवेदनाहीनतेचा अनुभव वयोवृद्ध पित्याला किती वेदना देऊन गेला असेल याची कल्पनाच करता येऊ नये. ------------------------ सदरची घटना ही प्रातिनिधिक म्हणता यावी, कारण समाजात अनेक ज्येष्ठांच्या वाट्याला असे दुःख आले आहे. म्हातारपणाची काठी म्हणवणार्‍या मुलांकडे आश्रितासारखे राहणाऱ्या ज्येष्ठांच्या व्यथा या अशा असतात, ज्या सहन होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखे असते ते, पण समाजात मुलांची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपला सन्मान खुंटीवर टांगून ते वाट्याला येणारे एकटेपणाचे जीवन जगत असतात. खरेतर आई वडिलांचा नीट सांभाळ न करणाऱ्या मुलांना घराबाहेर काढून देता येईल, असा एक निकाल मागे उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्येष्ठांचा योग्य सांभाळ व सन्मानासाठी कायदाही अस्तित्वात आहे, आपल्या चरितार्थासाठी ते मुलांकडून अधिकृतपणे पोटगीही मागू शकतात; पण अनेकांना हा कायदा माहित नाही व ज्यांना माहित आहे ते त्याचा वापर करण्यास धजावत नाहीत. अर्थात प्रश्न कायद्याचाही नाहीच, तो आहे संवेदनेचा व माणुसकीचा. दुर्दैवाने या बाबी क्षीण होत चालल्या आहेत. ---–---------------------- अर्थात सारेच काही संपलेले अगर बिघडलेले नाही. तुफानातही काही दिवे तेवत असतात. नागपुरात संबंधित नलिनी बोरकर या मातेवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले तसे इतरही ठिकाणच्या घटना अधून मधून समोर येतात. परभणी जिल्ह्यातील सेलू येथेही पार्वतीबाई जैस्वाल या वयोवृद्ध महिलेवर तेथील मुस्लिम तरुणांनी रीतसर अंत्यसंस्कार केल्याची घटना अलीकडेच घडली आहे, तर जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील जावूबाई भिल्ल या रस्त्यात बेवारस आढळलेल्या वृद्ध महिलेस काही तरुणांनी रूग्णालयात दाखल करून माणुसकीचा परिचय घडविला. अशा घटनांची यादी आणखीही लांबू शकेल, तेव्हा मथितार्थ इतकाच की; संवेदनाहीनतेचा अंधार वाढत असला तरी त्याला भेदु पाहणाऱ्या पणत्या आपल्या क्षमतेनुसार मिणमिणत आहेतच. या पणत्यांभोवती कौतुकाचा व सहकार्याचा हात धरूया इतकेच यानिमित्ताने. https://www.lokmat.com/editorial/darkness-was-growing-lets-be-careful-a309/

Monday, August 16, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on August 15, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210815_6_1
https://www.lokmat.com/editorial/spacial-editorial-all-confusion-policy-implementation-education-department-a720/

15 August, 2021...

15 August, 2021
स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना सॅल्यूट... भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, जय हिंद! लोकमत अकोला कार्यालयात जाहिरात मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री राजेश पांडे जी यांच्या हस्ते ध्वजारोहण ... #AkolaLokmat

EditorsView published in Online Lokmat on August 12, 2021

आदिवासी विकासाबाबतचे अपयश व असहायताही... किरण अग्रवाल / समस्या अगर अडचणीबाबतची वस्तुस्थिती ज्ञात असूनही तिच्यात बदल वा सुधारणा घडवून आणता येत नाहीत तेव्हा मनाचे खंतावणे स्वाभाविक असते. स्वतःकडे त्यासंबंधीची अधिकारीक जबाबदारी असेल, आणि आपणच धोरण किंवा निर्णयकर्ते असूनही ते करता येत नसेल तर मग ही खंत अधिकच बोचते तसेच वेदनादायी ठरते; कारण त्यातून असहायता उघड झाल्याखेरीज राहत नाही. आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी यांनी व्यक्त केलेली खंत अशीच शासनाची असफलता व त्यांची स्वतःची असहायता प्रदर्शित करणारीच म्हणता यावी.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नुकताच राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासी गौरव दिनाचा ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. यात राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी नंदुरबारमधून सहभागी होत, 'देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना आदिवासी बांधवांना आजही खावटी मागावी लागत असेल तर ती खूप मोठी शोकांतिका आहे' अशा शब्दात खंत व्यक्त केली. ही खंत त्यांच्या मनाच्या प्रामाणिकतेची परिचायक तर ठरावीच, पण त्यातून त्यांची असहायताही उघड व्हावी. पाडवी हे केवळ राजकीय नेते, मंत्री नसून समाज जीवनात समरस असलेले ज्येष्ठ व्यक्तित्व आहेत. त्यामुळे समाजाच्या समस्या, व्यथा - वेदनांशी ते सर्वपरिचित आहेत. परंतु समस्या सोडवण्याची जबाबदारी असणाऱ्या व्यवस्थेचा जबाबदार घटक असूनही त्या सुटणार नसतील तर ती शोकांतिकाच ठरावी, जी पाडवी यांनी परखडपणे बोलून दाखविली. खरे तर केंद्र असो, की राज्य सरकारे; आदिवासींच्या विकासासाठी आजवर कोट्यवधी नव्हे अब्जावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सर्वच सरकारांचे या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्य राहिले आहे आणि त्यादृष्टीने विविध योजनाही आखल्या जात असतात, तरी आदिवासींची प्रगती साधली गेलेली नाही. ----------------- विशेष म्हणजे, आदिवासी विकास विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी अधिकतर आदिवासी समाजाच्या नेत्याकडे राहून देखील हे साधता आलेले नाही; ही यातील खरी शोकांतिका म्हणायला हवी. आरोग्य सुविधांपासून कोसो दूर असलेल्या आदिवासी वाड्या पाड्यांवरील बालकांचे कुपोषण अजूनही दूर झालेले नाही. उदरनिर्वाहासाठी गरजेची ठरलेली मोलमजुरी, त्यातून आरोग्याची होणारी हेळसांड व वैद्यकीय सुविधांचा अभाव यासारखी अनेक कारणे यामागे आहेत. पण याचसोबत काही सामाजिक रूढी परंपरा सोडाव्या लागतील, असे अचूक निरीक्षणही मंत्री पाडवी यांनी यावेळी नोंदविले आणि कुपोषणाच्या योजनेत लवकरच नवे बदल केले जातील असे सांगितले. शिक्षणाच्या धोरणातही बदल करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अर्थात या खात्याचे मंत्री म्हणून सदरचे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार पाडवी यांच्याकडेच असल्याने आगामी काळात हे घडून येईल अशी अपेक्षा आहे, अन्यथा केवळ खंत व्यक्त करून उपयोगाचे नाही. निर्णयकर्ते म्हणून पाडवी यांनाच भूमिका बजवावी लागेल. ----------------- राज्यातील पेठ, डहाणू, नांदेड, अमरावती, गडचिरोली आदि आदिवासी भागात आजही अत्यवस्थ रुग्णाला झोळी करून शेकडो मैलांची पायपीट करीत रुग्णालयात न्यावे लागते ही वस्तुस्थिती आहे. आदिवासी आश्रमशाळा आहेत, पण तेथे मुले केवळ दोन वेळ जेवायला भेटते म्हणून जातात; तेथील शिक्षणाची स्थिती काय याबाबत न बोललेलेच बरे. या जेवणाच्याही निकृष्टतेच्या तक्रारी इतक्या, की अनेकदा मुलांना शाळेवरून आदिवासी आयुक्तालयापर्यंत पायी मोर्चे घेऊन यावे लागते. आदिवासींना वनजमिनीचे पट्टे उपलब्ध करून देण्याचा विषयही अनेक ठिकाणी मार्गी लागलेला नाही. योजना अनेक आहेत, निधीही मोठा आहे; पण लाभार्थ्यापेक्षा मध्यस्थांची चांदी मोठ्या प्रमाणात होते हा आजवरचा अनुभव आहे. खावटीचा विषयही का पुन्हा पुन्हा पुढे येतो, कारण व्यवस्थांकडून होणाऱ्या वितरणाचा दोष यात मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा आदिवासी मंत्र्यांनी तातडीने करता येणाऱ्या या प्राथमिक सुधारणांकडे प्राधान्याने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. शोकांतिका आहे हे खरे, पण या शोकाला सुधारणेत परावर्तित करण्याचे अधिकार या खात्याचे मंत्री म्हणून आपल्याकडेच आहेत हे पाडवी यांनी कोणी दुसऱ्याने सांगण्याची गरज नसावी. https://www.lokmat.com/editorial/failure-and-helplessness-regarding-tribal-development-a310/

Editorial Board Akola 1st Meet ...

09 August, 2021 वाचकांच्या अपेक्षांकडे लक्ष वेधणारे सल्लागार...
सर्वच समाज घटकांची स्पंदने वृत्तपत्रात टिपली जावीत, अशी साऱ्यांची अपेक्षा असते; शिवाय राजकारण आणि गुन्हेगारीखेरीजही अनेक क्षेत्र आहेत, ज्यातील माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असते. त्याचदृष्टीने लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन तथा माजी खासदार श्री विजयबाबूजी दर्डा यांच्या संकल्पनेतून आवृत्ती स्तरावर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेले लोकमत संपादकीय सल्लागार मंडळ नेमण्यात आले आहे. अकोल्यातील या मंडळाची बैठक आज कार्यालयात पार पडली.
लोकमतची वाटचाल व त्यात काळानुरूप होणारे बदल तसेच अपेक्षा यावर खूप चांगली चर्चा झाली. यातील सूचनांचा अवलंब करून लोकमत अधिकाधिक वाचकाभिमुख होईल याचा विश्वास आहे. यात सर्वश्री डाॅ. संजय खडक्कार (विदर्भ वैधानिक मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य), वसंत बाछुका (प्रख्यात उद्याेजक, सदस्य रेल्वे बाेर्ड), ललीत बहाळे (कार्याध्यक्ष शेतकरी संघटना), पुरूषाेत्तम शिंदे (सामाजीक कार्यकर्ते), डाॅ.सुभाष टाले (जलतज्ज्ञ), शरद काेकाटे (क्रीडा, पर्यावरण अभ्यासक, मुर्तीकार), उदय वझे (पर्यावरण अभ्यासक) यांनी सहभाग घेतला. #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat

Sunday, August 8, 2021

Saraunsh published in Akola Lo0kmat on August 08, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210808_6_1
https://www.lokmat.com/manthan/akola-zp-enough-correspondence-tell-me-what-help-a310/

Thursday, August 5, 2021

EditorsView published in Online Lokmat on August 05, 2021

शिवशंकरभाऊ: माणुसकी धर्माची पूजा बांधणारा दीप निमाला... किरण अग्रवाल / आज माणसातली माणुसकी हरवत चालल्याचेच अनुभव सर्वत्र येत असतात, कुणी कुणाला विचारत नाही की, पर दुःखाबद्दल हळहळत नाही; दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे तर दूरच. अश्यात माणुसकी धर्माची पताका उंचावत आपल्या सेवाकार्याने माणसातील देव म्हणविल्या गेलेल्या शिवशंकरभाऊंच्या जाण्याने अखंड सेवेचा नंदादीप निमाला आहे. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या अध्यात्मिक, शैक्षणिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रातील सेवा कार्याच्या लौकीकामागे या कर्मयोगी व्यक्तीचीच खरी धडपड राहिली आहे, जी या क्षेत्रातील सर्व संबंधितांसाठी आदर्शवत अशीच आहे.
वितभर करून हातभर दाखविणार्‍या आणि कौतुकासह पुरस्कारांची अभिलाषा बाळगणार्‍या समाजसेवकांच्या आजच्या चलतीच्या काळात खऱ्या अर्थाने आपल्या निष्काम सेवा, समर्पणाने आदर्श दिपस्तंभ ठरलेले जे कर्मयोगी आहेत त्यात संत श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. आभाळाएवढे काम उभे करून व राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी व्यक्तिगत स्नेह लाभूनही या व्यक्तीने कधी कोणत्या पदांचा अगर सन्मानाचा मोह बाळगला नाही, किंबहुना त्यासाठी विनम्रपणे नकारच दिला; कारण मी जे करतो ते माझे नाही तर महाराजच करवून घेतात अशी त्यांची प्रामाणिक भावना राहिली. मजेचिस्तव जाहले, परी म्या नाही केले। हे जेणे जाणिले, तो सुटला गा ।। ही संत ज्ञानोबा रायांची ओवी तंतोतंत लागू पडावी असे शिवशंकर भाऊंचे सेवाकार्य राहिले आहे. ----------------- भाऊंच्या सेवा कार्यला शिस्तप्रियतेची जोड होती हे विशेष. स्वच्छतेवर त्यांचा अधिक भर असे, त्यामुळे संस्थानच्या कुठल्याही मंदिर परिसरात नारळाच्या शेंड्या, निर्माल्य वगैरे विखुरलेले कुठेही आढळत नाही. शेगाव येथून पंढरपूर येथे प्रतिवर्षी जाणारा पालखी सोहळा म्हणजे भाऊंनी घालून दिलेल्या शिस्तीचा अनोखा अविष्कारच असतो. भजनी मंडळ, विणेकरी, दिंडीकरी, मुले, पुरुष-महिला असा सर्वांचा क्रम निश्चित असतो व त्यानुसारच पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण संपूर्ण महाराष्ट्रातून होत असते. श्री गजानन महाराज संस्थानच्या सर्व शैक्षणिक संस्था असोत, की जागोजागचे विविध उपक्रम; या प्रत्येक ठिकाणी सेवेला शिस्तीची जोड लाभलेली दिसून येते ती भाउंमुळेच. त्यांच्या शिस्तशीरपणाच्या अनुभवाचे साक्षीदार मलाही होता आले. 1991 मध्ये देशाच्या आठ राज्यांमधून महाराजा श्री अग्रसेन मैत्री, सद्भाव, समाजवाद, एकता मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन प्रारंभ झालेल्या या रॅलीची सुरुवात करताना भाऊंनी स्वतः या रॅलीतील मोटरसायकलस्वारांना रांगेत उभे केले होते व संपूर्ण रॅलीत तीच शिस्त पाळण्याची कटाक्षाने सूचना केली होती. उच्चस्थनी असूनही प्रत्येक आयोजन नियोजनात बारकाईने लक्ष देणारे असे व्यक्तिमत्व विरळच.
मंदिरे, मंदिरांचे व्यवस्थापन व तिथले अर्थकारण हा तसा नेहमी वादाचा विषय राहिला आहे, परंतु श्री गजानन महाराज संस्थान त्याबाबत कायम अपवाद राहिले ते भाऊंच्या सेवावृत्तीने व पारदर्शक कामकाजामुळे. मंदिरातील दानपेटीत चिल्लरचे प्रमाण अधिक असल्याचे पाहता, आपला भक्त तळागाळातील व सर्वसामान्य असल्याचे जाणून भाऊंनी या वर्गासाठी डोंगराएवढे काम उभे केले. सुमारे 42 विविध प्रकल्प त्यांच्या नेतृत्वात संस्थानतर्फे राबविले जातात, ज्यात वैद्यकीय सेवेची सुरुवात अवघ्या दोन रुपये प्रति रुग्णावर करण्यात आली आहे. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी वाड्या पाड्यांवर जाऊन तेथील आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्याचे कार्य भाऊंच्या प्रेरणेने सुरू आहे. बुलडाण्याच्या तळाशी असलेल्या खामखेड या एका छोट्या गावात आगीने सारे भस्मसात केल्यावर कळवळलेल्या शिवशंकर भाऊंनी आठ दिवस या संपूर्ण गावाच्या भोजनाची व्यवस्था संस्थानमार्फत केली. किल्लारीतील भूकंप असो, की कोल्हापुरातील महापूर, प्रत्येक ठिकाणी संस्थानचे सेवेकरी धावून गेले. अगदी अलीकडच्या कोरोना संकट काळातही बुलडाणा जिल्ह्यातील असंख्य रुग्णांना प्रसाद पोहोचविला गेला व तदनंतर तर संस्थानतर्फेच कोविड सेंटर सुरू केले गेले. संवेदनशीलतेतून जी कळकळ व हळहळ आकारास येते ती शिवशंकर भाऊंच्या ठायी पदोपदी जाणवत असे आणि म्हणूनच तो सेवेचा धागा संस्थानच्या प्रत्येक कार्यात आढळून येतो, जो या संस्थानच्या सेवाकार्याचे वेगळेपण अधोरेखित करतो. सेवेने देव आकळतो, या वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला आकंठ जगणारे, जोपासणारे व त्याचा वारसा पुढील पिढीला सोपविणारे शिवशंकरभाऊ पाटील यांनी संत श्री गजानन महाराज यांना अभिप्रेत माणुसकी धर्माचीच पूजा सदैव बांधली, त्यामुळे त्यांचे देहावसान या क्षेत्रात कार्य करणाऱ्या समस्तजनांना पोरके करून गेले आहे. https://www.lokmat.com/editorial/editorial-view-over-shri-gajanan-maharaj-sansthan-shivshankarbhau-patil-a597/

मल्टीआर्टिंग ...

03 August, 2021 मल्टीआर्टिंग ...
हल्ली मल्टिटास्किंग हा परवलीचा शब्द बनला आहे. त्या अनुषंगाने नोकरीच्या क्षेत्रात सर्वांना सर्व कामे आली पाहिजेत असा आग्रह धरला जातो व तो योग्यही आहे, तद्वतच कलेच्या प्रांतात एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा अनेक कला अवगत असल्याचे जेव्हा आढळून येते तेव्हा त्याकडे मल्टीआर्टिंग म्हणून पाहता यावे.
आमच्या लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड श्री अलोक कुमार शर्मा यांच्या सौभाग्यवती दीपा शर्मा या तशाच एक कलाकार. अलीकडेच त्यांच्याकडे जाणे झाले तेव्हा सौ. शर्मा यांची बहुविध कलात्मकता पाहून अचंबितच झालो. चित्रकला, शिल्पकला, कशिदा क्रोशीया, मिनाकारी, थ्रेड वर्क, बॉटल पेंटिंग, ड्रेस डिझायनींग आदी एकापेक्षा अधिक कला प्रकारात त्या निपूण आहेत.
नोएडा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र अशा विविध राज्यांमध्ये पतीच्या नोकरीनिमित्त राहावे लागलेल्या व पर्यटना निमित्त देश-विदेशातील विविध ठिकाणी फिरलेल्या सौ शर्मा भाभींनी त्या त्या ठिकाणची कलाकुसर आत्मसात केली. महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवरायांचे कॉफी पेंटिंग साकारण्याबरोबरच स्वराज्य प्रेरिका आई जिजाऊ साहेबांच्या सिंदखेड राजा येथे जाऊन त्या पुण्य भूमीतून आणलेल्या लहान शिलांनाही कलात्मकतेने सजवून ठेवण्याची त्यांची कल्पकता कोणालाही भारावून टाकल्याखेरीज राहत नाही. मधुबनी, वारली, म्युरल, लिपन - एपन, गोधना- गौन्ड, पॅरा, रेशम, कॉफी, मंडाला, सौरा, पॉप आर्ट आदी 24 प्रकारच्या चित्रकला त्यांना अवगत आहे. MARVARK Creation म्हणून स्वान्त सुखाय त्यांची ही कलोपासना सुरू असून त्यांनी साकारलेल्या विविध पेंटिंग्जस व हस्त शिल्पांमुळे त्यांचे घर जणू आर्ट गॅलरीच बनून गेले आहे. मिरर रायटिंगमध्ये पाच भाषांमध्ये त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
नोकरदार पतीच्या कार्यालयीन व्यस्ततेबद्दल सर्वच गृहिणींची ओरड व नाराजी असते, पण आनंदी जीवनासाठी अडचणींबद्दल कुरकुर न करता आनंदाच्या वाटा स्वतःलाच शोधायच्या असतात, त्यादृष्टीने 'श्रीं'च्या व्यस्त काळात 'सौं'ना आपल्यातील कलेच्या सृजनतेतुन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येऊ शकते याचा शर्मा भाभींनी घालून दिलेला आदर्श अन्य गृहिणींनाही घेता येणारा आहे. Proud of you Sharma Bhabhi ji ... #MultiArting #MarvarkCreation #DeepaSharma

वृक्षमैत्रीचा अनोखा आदर्श ...

1 August, 2021 वृक्षमैत्रीचा अनोखा आदर्श ...
फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री दिनानिमित्त आज सर्वांनीच आपापल्या मैत्रीला उजाळा दिला, पण अकोल्यात एक अनोखाच मैत्री सोहळा पार पडला. 2017 ला आलेल्या वादळात उन्मळून पडलेल्या वटवृक्षाचे अजय गावंडे व त्यांच्या मित्रांनी गोरक्षण रोड परिसरातील आदर्श पार्कमध्ये पुनर्रोपण केले, त्याला आज पाच वर्षे झालीत म्हणून केक कापून तसेच पार्कमध्ये बकुळीचे रोप लावून वृक्षमैत्रीचा अनोखा संदेश देण्यात आला. यावेळी अकोल्याचे निवासी जिल्हाधिकारी श्री संजय खडसे, अजय गावंडे, चंद्रकांत झटाले, कवी तुलसीदास खिरोडकर, पत्रकार राजू चिमणकर, हेमलता वरोकार, भाग्यश्री झटाले आदींसमवेत ...

Sunday, August 1, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on August 01, 2021

https://www.lokmat.com/manthan/there-any-guardian-farmers-or-not-a310/
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210801_8_3