Tuesday, November 23, 2021

लोकमत आरंभ दिवाळी अंक 2021

Nov 19, 2021 लोकमत आरंभ दिवाळी अंक 2021
लोकमत अकोला आवृत्तीचा उत्सव / आरंभ दिवाळी अंक 2021 हा कोरोनाकाळात माणुसकी धर्म निभावलेल्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याची प्रातिनिधीक दखल घेणारा विशेषांक आहे. या अंकाच्या वितरणानिमित्त लोकमत कार्यालयात आयोजित परिचर्चेत निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन श्रीमती मिनाक्षी गजभिये यांच्यासह विविध क्षेत्रीय मान्यवर उपस्थित होते.
कोरोना सेवार्थीचे संदर्भमूल्य असलेले डॉक्युमेंटेशन यानिमित्ताने होऊन गेल्याची भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली, ही पावती लोकमत साठी अतिशय महत्त्वाची आहे. वाशिम कार्यालयातही विविध सेवार्थीना या अंकाचे सन्मानपूर्वक वितरण करून गौरविण्यात आले
#LokmatAkola #AarambhDiwali2021 #KiranAgrawalLokmat

वाचन चळवळ वाढविणारे प्रदर्शन...

Nov 19, 2021 वाचन चळवळ वाढविणारे प्रदर्शन...
श्री सनातन धर्मसभा पुस्तकालय हे अकोल्यातील शतकोत्तर वाटचालीची परंपरा लाभलेले प्रख्यात वाचनालय. सुमारे तीस हजारांपेक्षा अधिक ग्रंथसंपदा असलेल्या या वाचनालयातर्फे 65 पेक्षा अधिक दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, त्याचे उद्घाटन करण्याचा योग मला लाभला. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने नवीन पिढी पुस्तक वाचनापासून दूर जात असली तरी दिवाळी अंकांमुळे त्यांची वाचनाची गोडी वाढणार आहे.
दिवाळीमध्ये फराळ व फटाक्यांसोबतच बौद्धिक मेजवानी देणाऱ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. त्या परंपरेला बळ देण्याचे काम सनातन पुस्तकालय करीत आहे हे आनंददायी आहे. पुस्तकालयाचे अध्यक्ष निकेश गुप्ता व त्यांचे सहकारी रमाकांत खंडेलवाल, रोहित केडीया, ऍड. सुरेश गुरुजी अग्रवाल, विनोद खेतान, हंसराज अग्रवाल आदींनी यासाठी चालविलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत #SriSanatanDharmsabhaPustkalay #KiranAgrawal #SanatanPustkalayAkola #DiwaliAnkPradarshan

Sunday, November 21, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on Nov 21, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211121_9_1
https://www.lokmat.com/manthan/why-did-you-end-your-life-brother-a310/

Friday, November 19, 2021

सामान्यातील असामान्य 'ना.चं.' ...

Nov. 20, 2021 सामान्यातील असामान्य 'ना.चं.' ...
हो, छायाचित्रात दिसत असलेले साधारण घर हे 'पद्मश्री' प्राप्त नामदेव चंद्रभान तथा 'ना.चं.' कांबळे यांचेच आहे व आजही ते तेथेच राहतात. विश्वास बसत नसला तरी खरे आहे ते, म्हणूनच सामान्यातील असामान्य व्यक्तित्व म्हणून त्यांच्याकडे पाहता यावे. महामहीम राष्ट्रपती श्री रामनाथ जी कोविंद यांच्या हस्ते नुकतेच 'पद्मश्री'ने गौरविले गेलेल्या 'ना.चं.' कांबळे यांची वाशीमला जाऊन भेट घेत लोकमततर्फे आनंद व्यक्त केला.
ज्या शाळेत सुरक्षारक्षकाचे काम केले व ते करताना शिक्षण घेतले, त्याच शाळेत शिक्षक होण्याचा आदर्श घडविलेल्या 'ना.चं.' यांच्या 'राघववेळ' या कादंबरीला पंचवीस वर्षांपूर्वी साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आणि आज थेट 'पद्मश्री'ने त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव घडून आला, ही समस्त वऱ्हाडासाठी अभिमानाचीच बाब ठरली. गावकुसाबाहेरच्या वस्तीतील वेदनेला शब्दरूप देणारे नामदेव कांबळे बालभारतीचे अध्यक्ष व नॅशनल बुक ट्रस्टचे सदस्यही राहिले आहेत व आता पद्मश्री लाभली तरी त्यांच्या साध्या राहणीत फरक पडलेला नाही. विचारांची श्रीमंती असली की भौतिक साधनांच्या सधनतेला मुळी अर्थ उरत नाही, ते 'ना.चं.' यांच्याकडे पाहून उमगते. विविध साहित्य प्रवाह, त्यातून लाभणारी जीवनदृष्टी, सामाजिक चळवळी व राजकारण अशा विविध विषयांवर अतिशय दिलखुलास गप्पा या भेटीत झाल्या. Proud of you Kamble sir...
वाशिम मधील आमचे सहकारी नंदकिशोर नारे व शिखरचंद बागरेचा यांनी टिपलेली यावेळची ही आनंदचित्रे .. #NamdeoKamble #KiranAgrawal #LokmatAkola

EditorsView published in Online Lokmat on Nov 18, 2021

वाढते ध्वनिप्रदूषण हानिकारक... किरण अग्रवाल / वायू प्रदूषणाप्रमाणेच ध्वनी प्रदूषणाची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नोकरी, शिक्षण वा उद्योगानिमित्त ग्रामीण भागातील लोंढे शहरात येत असून वाढत्या शहरीकरणातून विविध समस्या निर्माण होत आहेतच; परंतु यामुळे वाहतूकीवर ताण पडून वाहनांच्या कर्णकर्कश्य हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणातही भर पडून जात आहे, ज्याकडे अभावानेच लक्ष दिले जाते. ध्वनी प्रदूषणाला कारक ठरणाऱ्या अन्य बाबींमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, ती आरोग्यास अपायकारकही ठरू पाहत असल्यामुळे याबाबत कठोर भूमिका व निर्णयांची गरज आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या निरीक्षणानुसार राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये दिवसाच नव्हे तर रात्रीच्या निरव वातावरणातही ध्वनी मर्यादा ओलांडली गेल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. मुंबई, सोलापूर, नाशिक व अमरावती या चारही शहरांमध्ये दिवसा आणि रात्रीही ध्वनि प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या निरीक्षणात आढळून आले. कोल्हापूर, मुंबई, वसई विरार, पुणे, कल्याण, सांगली आदी ठिकाणी दिवसा, तर ठाणे, भिवंडी, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, मालेगाव आदी ठिकाणी रात्रीचे ध्वनिप्रदूषण अधिक असल्याचे या निरीक्षणात नोंदविले गेले. या निरीक्षणाकडे गंभीरपणे बघायला हवे, कारण सदरचे प्रदूषण अनारोग्याला निमंत्रण देणारे आहे. प्रदूषणातील जल व वायू प्रदूषणाबाबत जशी जागरूकता येताना दिसत आहे, तशी ध्वनीबाबत आढळत नाही; त्यामुळे गरज नसतानाही वाहन हाकताना हॉर्न वाजवत प्रवास केला जातो. अलीकडेच दिवाळी सरली, या दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले, त्यातून वायू व ध्वनी प्रदूषणही घडून आले. राजधानी दिल्लीत तर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी असतानाही बार उडाले, तेथील अन्यही काही कारणांमुळे दिल्लीतील शाळा व कार्यालये बंद ठेवण्याची वेळ ओढवली आहे. आपला क्षणिक आनंद हा वेगळ्या संकटाला निमंत्रण देऊन जातो याबाबतचे भानच बाळगले जात नाही, हा यातील चिंतनाचा व चिंतेचाही मुद्दा आहे. ------------- दोन व्यक्तींच्या बोलण्यातील असो, की वाहनांच्या हॉर्नची अगर फटाक्यांची; ध्वनीची कमाल अगर सुरक्षित प्रमाण मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ध्वनिप्रदूषण होत असते. आपले कान 30 ते 40 डेसिबल आवाज सहन करू शकतात, मात्र वाहनांचे हॉर्न असोत की फटाक्यांचे; शंभर ते दीडशे डेसीबल पर्यंत ध्वनितरंग उठतात. कानातील नाजूक पडदे फाटून बहिरेपण येण्याची व मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता यातून बळावते. यात सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाला रस्त्यावर वाढलेली वाहनांची गर्दी व होणारे हॉर्नचे आवाज कारणीभूत ठरत असल्याचेही आढळून येते. सिग्नल मिळाला असताना एखादे वाहन नादुरुस्त असल्यामुळे रस्त्यातच अडकून पडल्यावर मागील वाहनांकडून ज्यापद्धतीने हॉर्न वाजविले जातात किंवा महामार्गावर ट्राफिक खोळंबल्यावर एकामागोमाग एक वाहनांचे जे हॉर्न वाजू लागतात ते ध्वनी प्रदूषणाला निमंत्रण देतात, पण याबाबत कोणीच काळजी घेताना दिसत नाही. असले प्रकार टाळण्यासाठीच लोकमत माध्यम समूहाने मागे 'हॉर्न बजाने की बिमारी' ( HBKB ) नावाने एक मोहीम हाती घेतली होती, त्याचा जनमानसावर चांगला प्रभावही दिसून आला होता. अन्य सामाजिक संस्थाही यासाठी पुढे आल्या व याबाबत काळजी घेतली गेली तर अनावश्यक गोंगाट टळून ध्वनी प्रदूषणाला आळा घालता येऊ शकेल. -------------- महत्वाचे म्हणजे असल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही मानके निश्चित केली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूदही आहे, परंतु संबंधित यंत्रणांकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. प्रत्येकच शहरात घाबरवून सोडणारे हॉर्न वाजतात, परंतु अशांवर गुन्हे नोंदविले गेल्याचे अपवादानेच आढळते. शाळा व रुग्णालयांच्या परिसरात आवाज बंदीचे फलक लटकलेले असतात, परंतु तेथेही बेधडकपणे हॉर्न वाजतात. लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्याचा त्रास होऊनही कुणी तक्रार करीत नाही म्हणून यंत्रणा स्वतःहून काही करत नाही. खासगी व्यक्तिगत कार्यक्रमानिमित्तही गल्लीत डीजेचा दणदणाट केला जातो. याबाबतही कोणी कसले भान बाळगताना दिसत नाही. आवाजाच्या या कमाल मर्यादा गाठण्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळून जात असल्याचे पाहता, वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्याबाबत लक्ष दिले जाणे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या नोंदीने त्यासंबंधीची निकड अधोरेखित होऊन गेली आहे. https://www.lokmat.com/editorial/increasing-noise-pollution-harmful-a310/

'हमारी' मुलाकात 'हमसे' ...

Nov. 16, 2021
बहुत ज़रूरी है.... जिंदगी में थोड़ा खालीपन, क्योंकि यही वो समय है जहाँ 'हमारी' मुलाकात 'हमसे' होती है !! **** बुलडाणा दौऱ्यावरून परततांना ज्ञानगंगा अभयारण्याच्या खाली नांद्री ग्रामपंचायत हद्दीतील पाटबंधारे प्रकल्पावर थांबलो असताना आमचे युनिट हेड श्री आलोक कुमार शर्मा जी यांनी केलेली कॅमेराबंदी ... #KiranAgrawal

Sunday, November 14, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on Nov 14, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211114_7_1
https://www.lokmat.com/manthan/role-awareness-should-be-more-obstruction-a310/

Thursday, November 11, 2021

Vajti thandi sosvena.. Photo n Poem

EditorsView published in Online Lokmat on Nov 11, 2021

corona vaccination : कवचकुंडल ! लसीकरणाचा वेग आणखी वाढणे गरजेचे ... किरण अग्रवाल / आरोग्याच्या काळजीबाबत सक्ती करावी लागणे योग्य ठरू नये, तो उपायही नाही; परंतु आपल्याकडे कसलीही बाब ऐच्छिक म्हटली की त्याबाबत गांभीर्य बाळगले जात नाही. स्वतःच्या मर्जीला संधी दिली गेली की त्यातून दुर्लक्ष घडून येते. कोरोना प्रतिबंधक लसी बाबतही तेच होताना दिसत आहे. कोरोनापासून बचावण्याचा लसीकरणाखेरीज दुसरा मार्ग अद्याप समोर आलेला नाही, शिवाय कोरोना संपलेला नाही व लवकर संपण्याची चिन्हेही नाहीत; असे असताना लसीकरणाबाबत नागरिकांकडून फारसे गांभीर्य दाखविले जाऊ नये हे म्हणूनच आत्मघातकी म्हणता यावे.
म्हणता म्हणता दिवाळी आली आणि गेलीही. दिवाळीपूर्वी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात होती, परंतु एकुणात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने ही लाट थोपविणे शक्य झाले; याचा अर्थ ती लाट आता येणारच नाही असे नाही. यासंदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबत जी अनिर्बंधता दाखविली गेली त्यातून या लाटेला निमंत्रणच दिले गेल्यासारखी स्थिती पाहता निर्धास्त राहून चालणारे नाही. अलीकडे बहुतेक ठिकाणचा कोरोनाचा ग्राफ खाली आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी आहे. मात्र दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारात जी झुंबड उडाली व ती उडताना ना मास्क वापरले गेलेत, ना डिस्टन्सिंगविषयक निर्बंध पाळले गेलेत; त्यामुळे आता भीती दाटून येणे स्वाभाविक ठरले आहे. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने निर्बंध शिथिल केले खरे परंतु आता संकट सरले असे गृहीत धरून वागले जात आहे त्यामुळे खरी भीती वाढून गेली आहे. --------------- केंद्र सरकार अतिशय वेगाने लसीकरण मोहिम राबवित असून भारताने गेल्याच महिन्यात कोरोनाविरोधी लढ्यातील महत्त्वाचा टप्पा पार करीत शंभर कोटी लसीकरणाचा आकडा गाठला आहे. राज्यातही 10 कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठण्यात राज्याच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. ही संख्या अगर वेग समाधानकारक आहेच, पण तेवढ्याने भागणारे नाही कारण राज्याचा विचार केला तर लसीच्या पहिल्या मात्रेच्या तुलनेत दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे सुमारे 50 टक्के आहे. पहिल्यांदा लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे व गर्दी केल्याचे दिसून आले, मात्र दुसर्‍या लसीसाठी तेवढी उत्सुकता दाखविली गेली नाही ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी लसींचा पुरवठा होत नव्हता तर गर्दी ऊसळे, आता लस उपलब्ध असूनही लोक त्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत कारण लोकांची भीती संपून गेली आहे व हीच बाब धोक्याची ठरु शकते. --------------- कोरोना हा संपणारा नाही व त्यावर लसीखेरीज दुसरा उपायही अजून हाती आलेला नाही, त्यादृष्टीने लस हेच त्यासंदर्भातले सुरक्षिततेचे कवच कुंडल आहे. शासनाने मिशन कवचकुंडल मोहीम हाती घेतली ती त्याचमुळे. केंद्र असो की राज्य शासन, ते आपल्यापरीने लसीकरणासाठी परिश्रम घेत आहे त्याला नागरिकांची उत्स्फूर्त साथ लाभणे गरजेचे आहे, परंतु तसे होत नसल्यानेच काही ठिकाणी सक्तीची वेळ आली आहे. एकही लस घेतली नसेल तर औरंगाबादेत पर्यटन व प्रवासास बंदी घालण्यात आली आहे, तर ठाणे येथे ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकही डोस घेतला नसेल त्यांना वेतन न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अकोल्यातील लसीकरणाचे प्रमाणही राज्यात सर्वात कमी असल्याने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनीही ठाणे पालिकेचा कित्ता गिरवला आहे. स्वेच्छेने होत नाही म्हणून ही सक्तीची वेळ आली आहे. ती योग्य की अयोग्य, हा वादविषय होऊ शकेल; परंतु आपल्या आरोग्याच्या काळजीपोटी दुसऱ्याला सक्ती करावी लागणे हेच मुळी गैर ठरावे. तेव्हा संभाव्य तिसऱ्या लाटेला अंगणातच रोखायचे तर लसीकरणाचा वेग आणखी वाढणे गरजेचे आहे. तेच कोरोनापासून बचावाचे कवचकुंडल आहे हे विसरता येऊ नये. https://www.lokmat.com/editorial/corona-vaccination-need-speed-vaccination-a309/

Monday, November 8, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on Nov 07, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211107_8_1
https://www.lokmat.com/manthan/diwali-over-now-political-firecrackers-a310/

Diwali 2021

Diwali 2021
विद्यापीठात शिकत असताना दिवाळीच्या सुट्टीत गावी जाण्याची ओढ असे, त्यानंतर नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतांना दिवाळीला गावी जात असे. गेल्या सुमारे तीस वर्षांपासून नाशकातच स्थायीत्व लाभल्याने दिवाळीसाठी बाहेरून येण्याचा अगर जाण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. दोन वर्षांपूर्वी थोरली कन्या श्रुती नोकरीनिमित्त पुण्यात अडकल्याने दिवाळीला घरी येऊ शकली नव्हती, तेव्हा मनाची खुप घालमेल अनुभवली. गेल्यावर्षापासून वर्क फ्रॉम होममुळे ती घरीच आहे; पण यंदा मी अकोल्यातून सुटी घेऊन घरी आल्याने जरा जास्तीचा आनंद अनुभवतोय. दिवाळीत घरी जाण्याची ओढ काय असते, ते फार वर्षानंतर यानिमित्ताने अनुभवायला मिळाले... सर्व मित्रांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा... #KiranAgrawal #ShrutiKruti #KirananandNashik

Deeplakshmi Namostute.. Article in Diwali suppli. Nov 04, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HAKL_20211104_5_1
https://www.lokmat.com/editorial/deep-lakshmi-namostute-a310/

EditorsView published in Online Lokmat on Nov 04, 2021

दीपलक्ष्मी नमोस्तुते..! किरण अग्रवाल / दिवाळीच्या दीपोत्सवाने सारा आसमंत उजळून निघाला आहे. कोरोनाच्या निराशेतून बाहेर पडून आरंभलेल्या नवीन आयुष्याला तेजोमय करणारा हा प्रकाश आहे. जनमानसात दिसून येत असलेला उत्साह, खरेदीसाठीची गर्दी व भेटीगाठीचा वाढलेला सिलसिला हा या आरंभाचा प्रारंभ म्हणता यावा. नवीन आव्हानांना सामोरे जात व बदललेल्या जीवनशैलीला स्वीकारत हा शुभारंभ झाला आहे. भीतीचे सावट झुगारून देत दिवाळीत जो उत्साह दिसून येत आहे तो त्याचाच सूचक आहे. घाबरवून सोडणाऱ्या संकटाच्या वाटेत माणुसकीच्या पणत्या व आत्मविश्वासाचे आकाशकंदील लागताना दिसून येणे, ही समाजाच्या सकारात्मकतेची पावतीच आहे. ही सकारात्मकता, ऊर्जा व उत्साह यापुढील काळातही टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
यंदाची दिवाळी ही कोरोनामुळे ओढवलेले निराशेचे मळभ झटकून टाकणारी आहे. गेल्या वर्षीही दिवाळी कोरोनाच्या सावटात साजरी करावी लागली होती. लॉकडॉउन व तत्सम निर्बंधाना सामोरे जाण्याची ती पहिलीच वेळ होती त्यामुळे समाज मनावर हबकलेपण होते. त्या दडपणात ती दिवाळी गेली, परंतु यंदा याच संकटावर मात करून उभे राहील्याचा आनंद जनमानसात दिसतो आहे. शासनाने वेगाने व सक्षमतेने राबविलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे यासंबंधीचे धाडस एकवटलेले आहे. अर्थात कोरोना अजून गेलेला नाहीच, त्यामुळे त्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे; मात्र त्यामुळे घरात अडकून न बसता लोक खरेदीसाठी बाहेर पडलेले बघावयास मिळत आहेत ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे बाजार ओसंडून वाहत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. ---------------- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखली गेल्याने अर्थव्यवस्थेने उभारी घेतली असून गुंतवणूकदार खरेदीसाठी सक्रिय झाल्याने शेअर बाजारही तेजीत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल 1 लाख 30 हजार कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून दुसऱ्यांदा असे सर्वोच्च मासिक कर संकलन झाले. गेले सलग चार महिने जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांहून अधिक होत आहे, यावरून अर्थव्यवस्थेने उभारी घेतल्याचे स्पष्ट व्हावे. कोरोनाचा फटका उद्योग व्यवसायांना बसला असला तरी विविध आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना बोनस दिले असून, शासनानेही कर्मचारी भविष्य निधीवर या आर्थिक वर्षात 8.5 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेऊन नोकरदारांना दिलासा दिला आहे. राज्य सहकारी बँकेला सप्टेंबर अखेरच्या सहा महिन्यात तब्बल 402 कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला असून अन्य वित्तीय आस्थापनांचीही 'चांगभले' झाल्याची आकडेवारी समोर येते आहे.अतिवृष्टीने बरेच नुकसान झाले हे खरे, पण जे अन्नधान्य हाती आले त्याला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने बळीराजाही काहीसा सुखावला आहे. तात्पर्य, आर्थिक अडचणीतून मार्ग काढून व बाहेर पडून दिवाळी खरेदी जोमात सुरू आहे. दिवाळीत पुजल्या जाणाऱ्या लक्ष्मी देवतेच्या प्रसन्नतेची ही चिन्हे ठरावीत. ----------------- दिवाळीचे लक्ष्मीपूजन करताना सर्वत्र दिपोत्सव साजरा होत आहे. अंगणा अंगणातील पणत्यांचा प्रकाश हा केवळ परिसरातील अंधारच नव्हे, तर कोरोनामुळे मनामनात ओढवलेली निराशाही दूर करणारा ठरला आहे. तिमिरातून तेजाकडे नेणारा हा उत्सव आहे. या उत्सवाचा आनंद आपल्या पुरता सीमित न ठेवता तो इतरांसोबत वाटून घेणार्‍यांचे प्रमाणही यंदा वाढलेले दिसत आहे. कोणी रद्दी विकून तर कोणी एक करंजी मोलाची उपक्रम राबवून वाड्या वस्त्यांवरील वंचितांसाठी दिवाळीचा फराळ वाटप चालविले आहे. उघड्या नागड्यांचे अंग झाकण्यासाठी सधनांचे हात पुढे आले आहेत. पिड पराई जाणून घेत तमाच्या तळाशी दिवे लावण्याचे हे प्रयत्न माणुसकीचा जागर घडविणारेच आहेत. सारेच काही संपलेले अगर सरलेले नाही. असंख्य पणत्या मिणमिणत आहेत, चांगुलपणाचा प्रकाश पेरण्यासाठी. या पणत्या लावणाऱ्यांसोबत सामाजिक बळ उभे करूया, कारण संकटांशी लढण्याचा व आव्हाने पेलण्याचा दुर्दम्य आशावाद तसेच माणुसकीचा गहिवर यामागे असून, तोच उद्यासाठीही दिशादर्शक ठरला आहे. तेव्हा, दिपलक्ष्मी नमोस्तुते म्हणत दिपज्योतींच्या प्रकाशाने चहूदिशा उजळूया... https://www.lokmat.com/editorial/deep-lakshmi-namostute-a310/ http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HAKL_20211104_5_1

Monday, November 1, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on Oct 31, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211031_10_1
https://www.lokmat.com/manthan/akola-jilha-parishad-prahar-and-bjp-give-setback-vanchit-bahujan-aaghadi-a310/