Thursday, March 31, 2022

EditorsView published in Online Lokmat on March 31, 2022

अनीतीतुन आलेली अश्लाघ्यता दुर्दैवी! किरण अग्रवाल / व्यवसायही करावा नीतीने, असे नेहमी म्हटले जाते; कारण त्याशिवाय त्याला यश लाभणे कठीण असते. प्रामाणिकता, सचोटी, सच्छिलता, मृदुता, सेवेचा भाव यासारख्या बाबीतुनच व्यवसाय भरभराटीस जातो. व्यवसाय कोणताही असो, हल्ली तर स्पर्धाच इतकी वाढली आहे की कमी नफ्यात अधिक सेवा पुरविण्याच्या नव्या नीतीवर व्यवसाय केले जाऊ लागले आहेत. अनीतीने मात्र काहीच हशील होत नाही. कधी क्षणिक लाभ झालाही, तरी तो टिकून राहात नाही किंवा समाधान देणारा ठरत नाही. अशात झटपट मोठे होण्याच्या नादात व्यवसायातही अनीतीचा मार्ग स्वीकारला जाऊन कोणाच्या मजबुरीचा गैरफायदा उचलण्याचे प्रयत्न केले जाताना दिसतात तेव्हा त्यातून समाजातील अधःपतन पुढे आल्याखेरीज राहत नाही. कर्ज प्रकरणातील व्याजाच्या बदल्यात सावकाराकडून एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली गेल्याचा जो प्रकार धुळ्यात घडून आला आहे, तो देखील तशातलाच म्हणता यावा.
गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या जगण्याचे गणित बदलवून ठेवले. हाताचा कामधंदा गेल्याने हातावर पोट असणाऱ्यांची यात मोठीच अडचण झाली. नेमका याचाच लाभ जागो जागच्या सावकारांकडून घेतला गेल्याची प्रकरणे आता एकामागोमाग एक पुढे येऊ लागली आहेत. तसेही अवैध सावकारीतुन अव्वाच्या सव्वा व्याजदराने घडून येणारी अति सामान्यांची पिळवणूक आपल्याकडे नवीन राहिलेली नाही. घरे दारे व जमिनीचा तुकडा सावकाराकडे गहाण ठेवून घेतल्या गेलेल्या कर्ज प्रकरणात अखेर संबंधितांना बेघर व्हावे लागल्याची अनेक उदाहरणे देता येणारी आहेत. अवैध सावकारीच्या विरोधात सरकारने कडक धोरण स्वीकारल्याने या पिळवणुकीला काहीसा लगाम बसला आहे देखील खरे, परंतु अजूनही विशेषतः ग्रामीण भागातील अवैध सावकारी संपलेली नाही. दुर्दैव असे की, या अवैध सावकारीच्या पाशात गुरफटलेल्यांना आर्थिक हानीला तर सामोरे जावे लागतेच; पण काही प्रकरणात सावकाराच्या अमानवी, अनैतिक अपेक्षांचाही सामना करण्याची वेळ येते. धुळ्यातील प्रकरणात तेच घडून आलेले दिसत आहे. -------------------- धुळ्यातील एका तरुणाने सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे व्याजासह परत मिळवण्यासाठी संबंधित तरुणाला वेळोवेळी शिवीगाळ व धमकी दिली जात होती, पण इतक्यावरच सावकार थांबले नाहीत तर त्याच्या पत्नीशी फोनवरून शारीरिक सुखाची मागणी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली म्हणून तेथील पश्‍चिम देवपूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला गेला आहे. यात अवैध सावकारी तर आहेच आहे, परंतु अनीतीचाही कडेलोट झाला आहे. अनीतीतुन आलेली अश्लाघ्यता यात आहे. अशी अश्लाघ्य अपेक्षा ठेवण्याची संबंधितांची मजल जातेच कशी हा यातील प्रश्न आहे. व्यवहार व वर्तनातील बेशरमतेचा कळस गाठणारे असे प्रकार माणुसकीला शरमेने मान खाली घालावयास भाग पाडतात, म्हणून अशांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. मागे दोनेक महिन्यांपूर्वी साताऱ्यातही असाच एक प्रकार घडला होता. तेथे अभिषेक कुचेकर या तरुणाने खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज वर्षभरात चौपट व्याजाने भरून दिले असतानाही अधिक व्याजाच्या अपेक्षेने त्याच्या अवघ्या दीड महिन्यांच्या मुलीला तिच्या आईच्या कुशीतून ओढून नेल्याचा प्रकार घडला होता. साताऱ्यातील हा प्रकार असो, की धुळ्यातील घटना; सावकारांची वाढती बेमुर्वतखोरी यातून लक्षात यावी. ------------------- अनीती, अनैतिक मार्गाने केल्या जाणाऱ्या व्यवसायातील वाढती गुंडगिरी मोडून काढणे हा खरे तर कायद्यापुढीलच नव्हे, सरकार व समाजापुढीलही आव्हानाचा विषय आहे. यात कायदा आपले काम करेल व सरकार आपली भूमिका बजावेलच, पण गैरमार्गाने कमाई करून समाजात प्रतिष्ठा प्राप्त करू पाहणाऱ्यांना डोक्यावर घेण्याची भूमिकाही सोडावी लागेल. लोकांना कमाई दिसते व त्या कमाईतून होणारा दानधर्म दिसतो, पण त्या कमाईचा स्त्रोत पाहण्याची गरज कुणास भासत नाही. अनिती, अनाचार, अनैतिकता; व हे सर्व ज्यातून प्रसवते तो अविवेक हा केवळ घातक अगर नुकसानदायीच नसतो तर समाजाच्या ऱ्हासालाही कारणीभूत ठरत असतो. प्रसंगी माणुसकीचीही कसोटी त्यातून लागते. तेव्हा ऱ्हास टाळायचा तर माणसाशी माणसासारखे वागायला हवे, वर्तनात ते दिसायला हवे तसे व्यवहारातही राहायला हवे. अनीतीने कमावलेल्या पैशातून कुणाचेही काहीही भले होऊ शकत नाही हे जाणायला हवे. ते जेव्हा जाणले जाईल तेव्हा कर्जाच्या वसुलीसाठी लहान लेकराला तिच्या मातेच्या कुशीतून ओढून नेण्यासारखे किंवा कुण्या भगिनीकडून शरीर सुखाची मागणी करण्यासारखे अश्लाघ्य प्रकार घडून येणार नाहीत. https://www.lokmat.com/editorial/the-ugliness-that-comes-from-injustice-is-unfortunate-a310/?fbclid=IwAR28XrAZiTol-sDLyoVTGLUECcB_YCi2imQM1EkRkzyGx9jhl-iACguzXmY

लोकमत सखी सदस्यांकरीता लावणी...

March 29, 2022 लोकमत सखी सदस्यांकरीता लावणी...
लोकमत सखी मंचचा कोणताही कार्यक्रम म्हटला, की तो उत्साहाची, चैतन्याची अनुभूती देणाराच असतो. यातही शब्द, संगीत व अभिनयातून लावण्य प्रदर्शित करणाऱ्या लावणीचा खास कार्यक्रम म्हटल्यावर तर विचारायलाच नको. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या सुमारे दोन वर्षांपासून विशेष कार्यक्रम घेता आले नव्हते, आता हे निर्बंध हटल्यावर प्रथमच लोकमत सखी मंच तर्फे 'ढोलकीच्या तालावर' हा सखी सदस्यांकरीता लावणीचा कार्यक्रम आयोजिला तर त्यासाठी अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह भरभरून वाहिले. भगिनींची चिक्कार गर्दी झाली. टाळ्या आणि शिट्ट्या वाजवित माता भगिनींनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगीचे हे क्षण ... #LokmatAkola #LokmatSakhiManch #KiranAgrawal

Sunday, March 27, 2022

Saraunsh published in Akola Lokmat on March 27, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220327_2_1&fbclid=IwAR3_XPjDfWVk4BV0DwbNCmK57qH4DYlmOHgY1sF4sBFlmkVoeg-rslEXrjA
https://www.lokmat.com/editorial/how-can-a-young-board-be-so-healthy-a310/?fbclid=IwAR0nIFq0twOT2t6BpqQ09ujG-KVb_OHdQuBZLLvS9QBpqzfzn9d_o2-qQMU

Thursday, March 24, 2022

EditorsView published in Online Lokmat on March 24, 2022

'त्यांना'ही आहे जगण्याचा अधिकार! किरण अग्रवाल / समोर येणाऱ्या किंवा उघड होणाऱ्या दुःखापेक्षा दबून असलेल्या दुःखाची तीव्रता कितीतरी अधिक असते, जे सहनही होत नाही व सांगताही येत नाही. जे दुःख व्यक्त होते तिथे किमान डोळे पुसले जातात, पण अव्यक्त राहणाऱ्या वेदनेचे काय? या वेदना मनात भळभळत राहतात, पण कुटुंब व समाज व्यवस्थेतील मर्यादांचे पाश त्यांना आडवे येतात; आणि त्यातून उपेक्षा, अडचणींना सामोरे जाण्याचा संबंधितांचा प्रवास सुरू होऊन जातो. अशात हिमतीचे बळ एकवटून व पारंपरिक जोखडे झटकून जे उभे राहतात त्यांच्या जगण्याची वाट निश्चितच काहीशी सुकर होते. सासू कडून पोटगी मिळविणाऱ्या विधवा सुनेचे सोलापूरमधील प्रकरण असेच म्हणता यावे.
विधवा भगिनींच्या समस्या हा विषय अनादी अनंत काळापासून चालत आलेला आहे, पण अजूनही त्यांचा पूर्णांशाने निपटारा झालेला नाही. इतिहासातील थोर समाजसुधारकांनी यासाठी आपले आयुष्य वेचले, त्यामुळे यातील भयावहता नक्कीच कमी झाली; परंतु अपवादात्मक का होईना काही घटना समोर येऊन जातात तेव्हा मन पिळवटून निघाल्या खेरीज राहत नाही. समाजातील सर्वच घटकांना सन्मानाने जगण्याचा हक्क असला तरी विधवा भगिनींच्या नशिबी सन्मानाचे जिणे फारसे नसते, किंबहुना काही भगिनींच्या आयुष्याची फरपट घडून येताना दिसते. म्हणायला त्यांच्यासाठी विधवा पेंशन योजना वगैरे सरकारी योजना आहेत खऱ्या, पण त्याने आयुष्य सुरळीत चालावे अशी स्थिती नाही. अशात एखादीच्या नशिबी आर्थिक विपन्नावस्था येते व सासरची मंडळीही त्या अवस्थेत तिला एकटे सोडताना दिसते तेव्हा त्यासंबंधीच्या वेदनांनी तिचे जगणेच मुश्किल झाल्याखेरीज राहत नाही. सोलापूर मधील मोनिका पानगंटी यांच्या नशिबी तेच दुर्दैव आले, पण हिमतीने तिने हक्काचा लढा लढल्याने तिला न्याय मिळाला. मुलाच्या मृत्यूनंतर सामायिक प्रॉपर्टी मधील कसलाच हिस्सा न देता अवघ्या नऊ व दहा वर्षे वयाच्या दोन नातींसह आपल्या विधवा सुनेला घराबाहेर काढणाऱ्या राजमणी लक्ष्मण पानगंटी नामक 70 वर्षीय सासूला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी थकीत पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. ---------------- सदर निकालाने मोनिकास न्याय मिळाला, शिवाय तिच्यासारख्या अडचणीत सापडलेल्या भगिनींना सनदशीर न्यायाचा मार्ग गवसल्याचे म्हणता यावे; पण कौटुंबिक व सामाजिक मर्यादांच्या पाशात गुरफटलेल्या अन्य भगिनींनीकडून हा मार्ग अनुसरला जाईल का हाच खरा प्रश्न आहे. सहनशीलतेच्या संस्कारात दबलेल्या व मान-मरातबाच्या खुळचट विचारात अडकलेल्या अनेक विधवा भगिनींच्या नशिबी मोनिकासारखे जिणे आले असणार पण त्या ना सरकार दरबारी कसल्या योजनेसाठी याचकाच्या भूमिकेत पोहोचल्या असणार, ना न्यायालयाच्या दारी. त्यामुळे अशा भगिनींचे दुःख कसे हलके व्हावे आणि समस्या कशा सुटाव्यात? विशेषता पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती असायची तेव्हा त्यात अशा कुण्या भगिनींचे आयुष्य सहज निघून जात असे, पण आता सासर मधून पाय निघालेल्या व माहेरातही ठावठीकाणा नसलेल्या विधवा भगिनींच्या नशिबी आलेल्या यातनेची कल्पनाच करता येऊ नये. ------------------ सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मागे असलेली विधवा भगिनी परिस्थितीशी झगडत असतानाच आता कोरोनामुळे पती गमावलेल्या भगिनींची त्यात भर पडली आहे. गेल्या दोन-तीन वर्षात कोरोनामुळे जे तरुण मृत्युमुखी पडले त्यांच्या विधवांची संख्या मोठी आहे. अगोदरच परिस्थितीने नाडलेले असताना घरातील कर्ता पुरुषही गमावला म्हटल्यावर अनेकींची बिकट अवस्थेतून वाटचाल सुरू आहे. सरकार आपल्या परीने मदतीचा प्रयत्न करीत आहे, पण ते किती पुरणार? महिलांच्या सक्षमीकरणाचे व मानवी हक्कांचे धोरण आखताना विशेषता विधवा महिलांना केंद्रस्थानी ठेवून ते आखावे, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणणे आहे, पण ते पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही म्हणून की काय, मथुरा वृंदावनच्या रस्त्यावर आजही हजारो विधवा मरणप्राय जीवन जगताना दिसतात. आपल्याकडेही राज्यात एकल महिला धोरणाचा मसुदा मागेच सादर केला गेला आहे, त्यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. महत्त्वाचे म्हणजे सरकारी कायद्यांनीच यासंबंधीचे प्रश्न सुटणारे नाहीत, तर इतिहासात समाजसुधारकांनी जशी सुधारणेची चळवळ चालविली तशी आजच्या नव्या संदर्भाने, गरजेने समाज जागरण घडून येणे आवश्यक आहे. समाज धुरिणांनीही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, इतकेच या निमित्ताने. https://www.lokmat.com/editorial/they-have-the-right-to-life-a310/?fbclid=IwAR2sZ3jq7ZcNqGjgAwiPKXG1hZlB23wd4sfGkXr5NugvG5N9NjJbWwlbo5g

Tuesday, March 22, 2022

दोघांचा फोटो क्लिक...

March 22, 2022 दोघांचा फोटो क्लिक...
आठवणी जाग्या ठेवण्याचे काम घडून येते ते छायाचित्रांमधून. सार्वजनिक कार्यक्रमांमधील उपस्थितीही छायाचित्रांद्वारेच नमूद होते. अकोला लोकमतच्या वर्धापन दिन, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षातील पदार्पण कार्यक्रमास उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती टिपली ते आमचे छायाचित्रकार माऊली तथा विनय टोले व प्रवीणकुमार ठाकरे यांनी. हजार पंधराशेपेक्षा अधिक अभ्यागतांच्या गर्दीत प्रत्येकाला आपल्या कॅमेऱ्यात टिपणे हे तसे अवघड काम, पण या दोघा साथीदारांनी ते लीलया पार पाडले. म्हणून त्या दोघांचा फोटो क्लिक करण्याचा मोह मला आवरता आला नाही, आणि नेमका तोच क्षण माधवने कॅमेराबद्ध केला... Thanks to Madhav Tole...
#LokmatAkola #LokmatAkolaAnniversary2022 #KiranAgrawal

Sunday, March 20, 2022

Saraunsh published in Akola Lokmat on March 20, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220320_2_2&fbclid=IwAR39XyRZFtw6Lh-eAyhhghLL-t-_NrxfBKD9pvXtCucMf9N7Lk7cKRr7PwE
https://www.lokmat.com/manthan/palas-blossomed-let-humanity-flourish-too-a310/?fbclid=IwAR1SrutVxXMjkmuXU3UYPskJbjv14BMw0bOB6ax4HeJDpiS_pVHigmK-sf4

... या स्नेहापुढे धन्यवाद शब्द तोकडा !

March 19, 2022 ... या स्नेहापुढे धन्यवाद शब्द तोकडा !
अकोला लोकमतने 24 वर्षे पूर्ण करून रौप्यमहोत्सवी वर्षात पाऊल ठेवल्याच्या निमित्ताने आयोजित स्नेह मिलनास अकोल्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. औद्योगिक वसाहतीमधील लोकमतच्या प्रशस्त हिरवळीवर रंगलेल्या या सोहळ्यास माजी मंत्री अजहर हुसेन, गुलाबराव गावंडे, जि. प. अध्यक्ष सौ. प्रतिभा भोजने, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, गोपीकिशन बाजोरिया, तुकाराम बिडकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, प्रभात किड्सचे डॉ. गजानन नारे यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहात शुभेच्छांचा वर्षाव केला. हे प्रेम, लोकमतशी असलेला ऋणानुबंध व विश्वास हेच तर आमचे बळ व तीच आमची शक्ती!
लोकमतचे संस्थापक संपादक तथा स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल जी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी 'पत्रकारिता परमो धर्म' जपण्याचा जो संस्कार रुजवला त्यानुसार वाचकसेवेसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यानिमित्ताने करीत आहोत. लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन आदरणीय श्री विजय बाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ आदरणीय श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटेवर तरुण नेतृत्व श्री देवेंद्र बाबूजी, श्री रिषी बाबूजी व संपादकीय संचालक श्री करण बाबुजी दर्डा यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या आमच्या या वाटचालीस यापुढेही वाचकांचे असेच बळ लाभेल याचा विश्वास आहे ... याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे...
#LokmatAkola #LokmatAkolaAnniversary2022 #KiranAgrawal

EditorsView published in Online Lokmat on March 17, 2022

कुठे फेडाल हे सारे? किरण अग्रवाल / उद्दिष्ट कोणतेही असो, ते साध्य करायचे तर त्यासाठी परिश्रम गरजेचे असतात; ते करण्याची तयारी असेल तर यशाचे प्रमाण भलेही कमी-अधिक राहू शकेल परंतु त्या दिशेने प्रवास नक्कीच घडून येतो. सरकारी पातळीवरील उद्दिष्ट पूर्तीच्या बाबतीत तर भावनाही प्रामाणिक असणे गरजेची असते, अन्यथा कागद काळे होण्याखेरीज प्रत्यक्षात हाती काही लागत नाही. विशेषता सरकारी उद्दिष्टंकडे केवळ नोकरीची अपरिहार्यता म्हणून जेव्हा पाहिले जाते, तेव्हा त्यात गोंधळ गडबड होण्याचीच शक्यता अधिक असते. कुपोषणमुक्ती सारख्या गंभीर व संवेदनांशी जुळलेल्या विषयाबाबतही तसेच काहीसे होताना दिसत आहे. आपली उद्दिष्टपूर्ती दाखविण्यासाठी मृत बालिकेला एका अधिकाऱ्याने दत्तक घेतलेले दाखविल्याचा जो प्रकार नंदुरबार जिल्ह्यात पुढे आला आहे त्यातून तर यासंदर्भातील अनागोंदी अधिकच स्पष्ट व्हावी.
कुपोषणाची समस्या अनादि अनंत काळापासून चालत आलेली आहे, पण अजून त्यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. खास करून आदिवासी दुर्गम परिसरात घडून येणारे कूपोषण व भूकबळीचे प्रकार काही केल्या कमी होतांना दिसत नाहीत. केंद्रातील असो की राज्य सरकार, यासाठी विविध योजना आखतात व त्यावर कोट्यवधी रुपये खर्चीही पडतात, पण उघड्या नागड्या अवस्थेतील आदिवासी बालकांचे खपाटीला लागलेले पोट काही सुधारलेले दिसत नाही. त्यामुळेच मग प्रश्न असा निर्माण होतो की यासाठीचा निधी जातो कुठे अगर कोणाच्या खिशात? अक्कलकुवा तालुक्यातील उचवाडी येथील अक्षिता जोल्या वसावे या मृत बालिकेला तेथील एका अधिकाऱ्याने दत्तक घेतलेले दाखविण्याची बाब चव्हाट्यावर येते तेव्हा या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते. अर्थात असे झाले म्हणून व्यवस्था सुधारते असेही अभावानेच होते, हे यातील दुर्दैव. ------------------ मागे मेळघाटमधील वाढत्या कुपोषण व बालमृत्यूच्या प्रकारावरून खासदार नवनीत राणा व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात रंगलेले आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण बघावयास मिळाले. लोक प्रतिनिधींकडूनही समस्येच्या सोडवणुकीसाठीपेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व दिले जाते हे यातील दुसरे दुर्दैव म्हणता यावे. याचाच लाभ यंत्रणेतील संधीसाधुंकडून उठविला जातो. करायचे म्हणून करायचे, अशी मानसिकता असते तेव्हा कागदे रंगविली जातात, निधी खर्ची पडतो व उद्दिष्ट आहे तसेच राहते. सरकारी उद्दिष्टपूर्तीसाठी परिश्रमासोबत प्रामाणिक भावनाही गरजेची असते ते यासंदर्भाने लक्षात यावे. अक्कलकुवातील प्रकरणात तेच अधोरेखित होऊन गेले आहे. त्यामुळे अशी सरकारच्या डोळ्यातही धूळफेक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून संबंधितांना जरब बसविणे गरजेचे बनले आहे. एकीकडे अन्नावाचून लहान लहान जीव जात असताना दुसरीकडे त्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे निपजत असतील तर अशांची गय करता कामा नये. ------------------- कुपोषण हे पुरेशा व सकस अन्नाअभावी तसेच आरोग्य सुविधांच्या अभावातून घडून येते. गरिबी, शिक्षणाचा अभाव आदि कारणे यामागे आहेत, पण त्यासाठी कोट्यवधी रुपये योजनांवर खर्च होऊनही फारसा लाभ होताना दिसत नाही हे आश्चर्याचे आहे. आपल्याकडे म्हणजे भारतात गेल्या कोरोनाच्या संकटकाळातही अती श्रीमंतांच्या यादीत भर पडल्याच्या वार्ता असताना दुसरीकडे दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेला वर्ग कमी नाही. जागतिक भूक निर्देशांक 2021 च्या अहवालानुसार जगातील 116 विकसनशील देशांच्या यादीत भारताचा नंबर तळाशी म्हणजे 101व्या स्थानी आहे. उपासमारीचे गंभीर संकट असलेल्या 31 देशांमध्येही भारत शेवटच्या 15 देशांमध्ये आहे. यावरूनही आपल्याकडील उपासमारीची समस्या किती गंभीर आहे हे लक्षात यावे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारतात सुमारे 35 ते 40 टक्के अन्नाची नासाडी होत असताना दुसरीकडे मात्र अनेकांना उपाशी झोपावे लागते हे वास्तव आहे. अशा स्थितीत सरकार गरजूंसाठी भरपूर काही करू पहात असताना झारीतील शुक्राचार्य त्यातही हात मारू पाहतात तेव्हा कुठे फेडाल रे हे सारे, असा संतापवजा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहत नाही. https://www.lokmat.com/editorial/where-will-spare-this-sin-a310/?fbclid=IwAR0gdoK1uZWCpi7jih3UAbeGU2U6b2xtg8d6PPdUozSJrnwat12-EIJuxNg

लोकमत वर्धापन दिन ...

March 16, 2022 लोकमत वर्धापन दिन ...
लोकमत अकोला आवृत्तीच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त औद्योगिक वसाहतीमधील कार्यालयावर करण्यात आलेली रोषणाई ... #LokmatAkola #LokmatAkolaAnniversary2022

राज राजेश्वराचरणी प्रार्थना...

March 16, 2022 राज राजेश्वराचरणी प्रार्थना...
लोकमतच्या अकोला आवृत्तीने 24 वर्षांची वाटचाल पूर्ण करून आज 25 व्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. हा रौप्यमहोत्सवी अंक श्री राज राजेश्वराच्या चरणी अर्पण केला. यावेळी युनिट हेड श्री आलोक कुमार जी शर्मा, समाचार प्रभारी अरुणकुमार जी सिन्हा, वितरण विभाग प्रमुख प्रकाश वानखेडे, जाहिरात विभाग प्रमुख राजेश पांडे, इव्हेंट विभाग प्रमुख योगेश चौधरी, हॅलो हेड राजेश शेगोकार, लेखा विभागाचे विनायक जोशी आदींसमवेतचे आनंद चित्र...
#LokmatAkola #LokmatAkolaAnniversary2022 #KiranAgrawal

Sunday, March 13, 2022

Saraunsh published in Akola Lokmat on March 13, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220313_2_5&fbclid=IwAR1HA7ZoIyHIX8INY7nS_a8ut-G9TX3oFlOFO7tuTcs9pQ-paunYudDhHHQ
https://www.lokmat.com/manthan/who-benefits-from-the-protracted-election-a310/?fbclid=IwAR2SSwYHpZ7M0p4IKGphBpcBHVgAfv2VBPcHiOTphnUN-icCHoLDgXwKR4Y

Thursday, March 10, 2022

EditorsView published in Online Lokmat on March 10, 2022

तयारी! जीव देण्यासाठी का? किरण अग्रवाल / देशातील श्रीमंतांची संख्या वाढल्याच्या वार्ता अलीकडेच वाचावयास मिळाल्या असल्या तरी, जगण्यासाठी धडपड वा झगडा करावा लागत असलेल्यांची संख्या काही कमी झालेली नाही. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने असंख्य कुटुंबांचे अर्थकारण बिघडवून ठेवले असताना आता रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धामुळे पुन्हा त्यात भर पडू पहात आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकाही संपल्या आहेत, तेथील निकाल आज घोषित झाले, की महागाईचा भडका उडेल; त्यासाठी तयार राहा असेही सांगितले जात आहे. थोडक्यात, महागाईची मार टळणार नसल्याने सामान्यजनांच्या हलाखीत भरच पडण्याची शक्यता आहे.
युद्ध रशिया व युक्रेनमध्ये सुरू असले तरी त्याचा फटका संपूर्ण जगाला बसणे स्वाभाविक ठरून गेले आहे, कारण रशिया हा खनिज तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असून युद्धामुळे खनिज तेलाचे दर वाढले आहेत. युद्धखोर रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेसह जगभरातील काही देशांनी तेथून होणारी तेल आयात थांबवण्याची भाषा चालविली आहे, तसे झाले तर अधिकच पंचाईत होईल. इंधन महागले की पर्यायाने वाहतूक खर्च वाढून सर्वच बाबतीत महागाईचे संकट ओढवेल. युद्धाच्या परिणामी डॉलरही वधारला आहे. शेअर बाजारातही रोज आपटबार फुटत आहेत. एकूणच चहू बाजूने आर्थिक कोंडी होत असून त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणे स्वाभाविक ठरले आहे. त्यामुळेच आगामी काळात इंधन दरवाढीसह इतर महागाईसाठी तयार राहा असे सांगितले जात आहे. ---------------- खरे तर महागाईसाठी तयार काय राहायचे, कारण ती स्वीकारण्याखेरीज पर्याय तरी कोणता आहे सर्वसामान्यांकडे? कोरोनाचे संकट ओसरत असले तरी या काळात पहिल्या दोन वर्षात संपूर्ण जगात सुमारे 99 टक्के सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात घट झाली असून तब्बल 16 कोटीपेक्षा अधिक लोक गरिबीच्या श्रेणीत ढकलले गेले आहेत. अलीकडेच झालेल्या दावोस अजेंडा शिखर परिषदेत ऑक्सफेमने यासंबंधीचा अहवाल सादर केला आहे. कोरोनानंतर उद्योगधंदे पूर्ववत सुरू होत असून अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे सांगितले जात असले तरी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली व टिकून असल्याचे नाकारता येणारे नाही. सामान्यांचे एकूणच बजेट कोलमडून गेले आहे, त्यातून आलेली निराशेची सय अजून सरलेली नसतांना आता युद्धामुळे महागाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे सांगितले जात आहे. ----------------- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागले की महागाईचा भडका उडेल. त्यादृष्टीने अगोदरच साठेबाजी होत असल्याचे दिसून येत आहे. तसेही निकाला अगोदरच काही बाबतीत दरवाढ झालीच आहे. तेल उत्पादक कंपन्यांनीही इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे, त्यामुळे इंधन दरवाढ होणे निश्चित आहे. प्रश्न एवढाच की, ही महागाई स्वीकारून सामान्याने जगायचे कसे? कोरोनामुळे अगोदरच अडचणीत आलेली आर्थिक स्थिती पुन्हा बिकट होऊ घातल्याने अनेकांच्या जगण्या-मरण्याचाच प्रश्न निर्माण होणार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या पुन्हा वाढू लागल्याचे आकडे बोलत आहेत. महागाईने कर्जबाजारीपणा वाढीस लागून त्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतील. महागाई स्वीकारण्यासाठी, म्हणजे जीव देण्यासाठी तयार राहायचे का असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होणारा आहे https://www.lokmat.com/editorial/preparation-for-give-life-a310/?fbclid=IwAR3AuJnJrAt9uq8pkSj8frQteYaPvjcvgckVrJD-BYWOi2QeJZVqjXs-brE

काटेंगे तो उम्र है, जिएँगे तो ज़िंदगी…!

काटेंगे तो उम्र है, जिएँगे तो ज़िंदगी…! नाशकात असतांना द्राक्ष व डाळिंबाच्या बागांमध्ये रमलो होतो, कधी रावेरला जातो तेव्हा केळीच्या बागांमध्ये तो आनंद, ते जगणे शोधतो. आता वऱ्हाडात आलोय तर संत्रा बागेत... अकोल्याहून कार्यालयीन कामानिमित्त तेल्हारामार्गे अकोटकडे जात असताना भर दुपारच्या रखरखत्या उन्हात स्प्रिंकलरचे तुषार उडत असलेली एक संत्रा बाग नजरेस पडली अन गाडी थांबवली. म्हटले जरा जगुया जिंदगी...!
भल्यामोठ्या आंब्याच्या झाडाखाली गवताने आच्छादित मचान, सोनेरी उन्हात पिवळ्या धमक संत्र्यानी लगडलेली बाग, हरभऱ्यावर सुरू असलेले स्प्रिंकलर्स... कामाच्या धबडग्यात मलूल होऊ पाहणाऱ्या मनावर उत्साह, उर्जेचे शिंपण करणारेच हे तुषार.. सभोवतालच्या कोरड्या शुष्क वातावरणात नजरेला व पर्यायाने मनाला गारवा देणारा अतिशय आल्हाददायक ठरला हा विसावा. हेच तर आयुष्य, तीच जिंदगी... तीच जगण्याच्या प्रयत्नांत सुरू आहे भटकंती. वाट सरणारी नाही. चालत रहायचे आहे, रस्ता भलेही खाच-खळगे, आव्हानांनी भरलेला असेल; पण मधेच लाभणाऱ्या अशा एखाद्या आनंद देणाऱ्या बेटावर काहीसे विसावायचे आणि नवा उत्साह घेऊन पुन्हा पुढे चालायचे... इसी का नाम है जिंदगी..! चरैवेति.. चरैवेति..!! #KiranAgrawal #KirananandNashik

Saraunsh published in Akola Lokmat on March 06, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220306_2_5&fbclid=IwAR1jhx5XgMC_LTzRlA3_wLEGv0qVAJli3qbGB25HSdiCtF9uJPmA5IDzmUI
https://www.lokmat.com/editorial/school-bunkers-teachers-should-be-punnished-a310/?fbclid=IwAR1r2lsmI5wjBLe2ZonLHxAXcSffMAywFl_LVY-DrRDnaZKXpBgd6YyDlyw

Saturday, March 5, 2022

आता ऐसे कोणी होणे नाही...

March 04, 2022 आता ऐसे कोणी होणे नाही...
समाजमनाला भागवत धर्माने शिकविलेल्या भक्तीतत्वाचा व उपासनेचा वसा आणि वारसा मोठ्या श्रद्धा आणि निष्ठेने ज्यांनी जपला, जोपासला व थेट सातासमुद्रापारही पोहोचविला ते ज्ञानयोगी, सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांच्या अकोटमधील श्री क्षेत्र श्रद्धासागरला भेट देऊन दर्शन घेण्याचा काल योग आला. विशेष म्हणजे गुरुमाऊलींचा जन्मोत्सव सोहळा सुरू असताना हा अमृतयोग घडून आला.
श्री संत वासुदेव महाराजांनी ज्ञान, नि:संगत्व व वैराग्याचा आदर्श घालून देत भक्ती महात्‍म्‍याचे अधिष्ठान मुमुक्षूंना सहज भावाने प्राप्त करून दिले, तसेच विविध संत व महापुरुषांची संशोधनपूर्वक प्रमाणबद्ध व ओवीबद्ध चरित्रे लिहित 37 दिव्य ग्रंथ जनतेला अर्पण केले. वैज्ञानिक दृष्टिकोनातून भयमुक्त समाज निर्मितीसाठी आयुष्य वाचणारे व आम जनतेला श्रमनिष्ठा, स्वावलंबन तसेच संस्कारयुक्त शिक्षण आणि श्रद्धेचा खरा भक्तिमार्ग दाखविणारे असे संत आता होणे नाही, म्हणूनच श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या श्री क्षेत्र श्रद्धासागरला भेट देऊन त्यांचा आशीर्वादरूपी बुक्का कपाळी लावताना 'भाग्य आम्ही तुका देखीयेला...' असेच भाव मनात येऊन गेले.
संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले, सचिव रवींद्र वानखडे, विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर आदींनी यावेळी संस्थानच्या कार्याची माहिती देऊन सन्मान केला. लोकमतचे युनिट हेड आलोक कुमार जी शर्मा, मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह संदीप दिवेकर यावेळी समवेत होते. आमचे अकोट तालुका प्रतिनिधी विजय शिंदे यांच्यामुळे हा योग घडून आला... Thanks Vijay Shinde...
#SantVasudevMaharaj #ShradhhasagarAakot #KiranAgrawal

EditorsView published in Online Lokmat on March 03, 2022

कुठून येते ही टोकाची क्रूरता? किरण अग्रवाल / म्हातारपणात आधाराची काठी शोधण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा सहचरिणी इतकी हक्काची व विश्वासाची दुसरी मजबूत काठी आढळत नाही. आयुष्यातील सुखदुःखाची अनेकविध स्थित्यंतरे जिच्या सोबतीने अनुभवलेली असतात, प्रत्येक वेळी सावलीसारखी जी साथ-संगत करीत आलेली असते; ती सहचरिणीच वार्धक्याच्या टप्प्यावर मैत्रिणीची भूमिका निभावते, असे हे अतूट, अभिन्न असे नाते आहे. नाती कोणतीही असो, ती जपल्यानेच घट्ट होतात हे देखील खरे; परंतु पती-पत्नीमधील नाते आपसूकच जपले जाते कारण अनेक वादळ वाऱ्यात त्याची परीक्षा देऊन झालेली असते. काळ लोटतो तसा एक वेगळाच दृढतेचा भावबंद या नात्यात आकारास येतो. परस्परांची काळजी, अलवार जपणूक यात असते, तशी त्यासाठी स्वतःच्या अपत्यांशीही लढून जाण्याची ताकद आलेलीही बघावयास मिळते. त्यामुळे या टप्प्यातच जेव्हा उभयतांमधील मतभेदाच्या भिंती जाडजूड झालेल्या व प्रसंगी काही घटना हिंसाचारापर्यंत पोहोचलेल्या दिसतात तेव्हा नेमके कुठे चुकते आहे असा प्रश्न संवेदनशील मनाला कुरतडल्याशिवाय राहत नाही.
मनुष्याचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करणे हे तसे अवघड काम आहे, कारण व्यक्ती तितके विचार व भिन्नता त्यात असते. संस्कारांच्या सोबतीने परिस्थितीसापेक्षतेचा मुद्दाही यात दुर्लक्षिता येणारा नसतो. शेवटी ज्या वातावरणात मनुष्य घडतो, त्याचा परिणाम टाळता येत नसतोच. पण काहीही असले तरी घरातील, कुटुंबातील पती-पत्नीमधील परस्परांबद्दलचा आदर व या नात्यातील जपणूकीत अपवाद वगळता कसली बाधा येत नसते. आयुष्यातील मोठा टप्पा ओलांडून झाल्यावर उत्तरार्धात तर हे नाते अधिक गहिरे झालेलेच आढळून येते, परंतु यात जो अपवाद असतो तो टोकाची क्रूरता गाठतो तेव्हा एकूणच समाज जीवनावर त्याचा परिणाम होऊन जाणे स्वाभाविक ठरते. समाजशास्त्रीय व मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याकडे बघितले जाणे व त्यावर मंथन होणे म्हणूनच गरजेचे ठरते. साधा स्वयंपाक उशिरा केला म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सवना येथे 80 वर्षाच्या कुंडलिक शिवराम नायक नामक ज्येष्ठ नागरिकाने आपल्या 78 वर्षीय वयोवृद्ध पत्नीचे हात-पाय बांधून तिला रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या प्रकाराकडे याचसंदर्भाने बघता यावे. --------------------- तरुण रक्त गरम डोक्याचे असते असे नेहमी म्हटले जाते, त्याचप्रमाणे वय वाढते तशी अक्कल वाढते व समजूतदारपणा वाढीस लागतो असेही म्हटले जाते; मनुष्य अनुभवाने शहाणा होतो तसा ज्येष्ठत्वाने समजूतदारही होतो म्हणतात, पण प्रत्येक बाबीत अपवाद असतो तसे याही बाबतीत असणे स्वाभाविक आहे. वाढलेल्या वयात मतभिन्नता नसते असे नाही, पण ती टोकाची असेल व संतापाची पातळीही क्रूरता गाठत असेल तर ज्येष्ठत्वातील समजूतदारी व सहनशीलतेचा प्रश्न उपस्थित व्हावा. कौटुंबिक तक्रारींच्या निवारणासाठी पोलीस स्टेशन अंतर्गत स्थापित भरोसा सेलकडे तरुण जोडप्यांसोबतच ज्येष्ठ दांपत्यांमधील कुरबुरिंच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे पाहता हा प्रश्न अधोरेखित होणारा ठरला आहे. यातही एखादवेळी प्रारंभापासूनच मतभेद असू शकतात, पण अख्खे आयुष्य निघून गेल्यावर शेवटच्या चरणात ते असहनिय होऊन सहचराचा जीव घेण्यापर्यंत मजल गाठली जात असेल तर त्यातून समाज मनावर ओरखडा ओढला जाणे टाळता येऊ नये. ---------------------- महत्त्वाचे म्हणजे, प्रारंभी म्हटल्याप्रमाणे कितीही सुसंपन्नता व सधनता असली तरी वार्धक्यातील काठी म्हणून सहचराकडेच आशेने पाहिले जाते. आपल्याकडचे सोडा, पण चीन मध्येही वृद्धांच्या वाढत्या संख्येने व त्यांच्या एकटेपणामुळे तेथील सरकार चिंताग्रस्त आहे. एकटेपणाला सामोरे जात असलेल्या ज्येष्ठांसाठी तेथे टीव्हीवर त्यांच्या डेटिंगसाठीचे खास शो चालवले जातात व त्यातून त्यांना प्रेम व पुनर्विवाहाची संधी मिळते, आधार लाभतो. अर्थात इकडे असो की तिकडे, एकटेपण वाट्यास आलेल्यासच त्याचे दुःख ठाऊक असते. त्या एकटेपणाच्या वेदनांवर अन्य कुणी कितीही फुंकर मारली तरी त्याला सहचराची सर नसते. म्हणूनच अशा सार्‍या पार्श्वभूमीवर एखादा 80 वर्षाचा ज्येष्ठ जेव्हा त्याच्या सहचराला साध्या, क्षुल्लक कारणातून जाळून संपवतो, तेव्हा एवढी क्रूरता येते कुठून असा प्रश्न निर्माण झाल्याखेरीज राहात नाही. https://www.lokmat.com/editorial/where-does-this-extreme-cruelty-come-from-a310/?fbclid=IwAR1Pk4X52dcap9_maaVZaIvT8ZxYkP2ilFq1nVczvMHYgHi0AfDuqxYQRsY

Tuesday, March 1, 2022

आमदार बसंतबाबू खंडेलवाल सदिच्छा भेट..

Feb 28, 2022 आमदार बसंतबाबू खंडेलवाल सदिच्छा भेट...
राजकीय व्यक्ती म्हटली की त्याबाबत समज-गैरसमजच अधिक असतात. प्रत्यक्ष भेट होते तेव्हा चर्चेतून व्यक्ती, तिचे विचार, तिची धडपड उलगडते. विधानपरिषदेच्या अकोला, बुलढाणा, वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बसंत बाबू खंडेलवाल हे आमदार म्हणून निवडून आले तेव्हा अनेकांचा समज असा होता की सराफी पेढीवरचे बसंत बाबू हे केवळ शोभेचे आमदार राहतील म्हणून, पण शपथ घेतल्या घेतल्या ते जोमाने कामाला लागलेले दिसत आहेत. लोकमतला दिलेल्या पहिल्याच सदिच्छा भेटीत बोलतानाही बसंत बाबू यांची स्वयंप्रज्ञ धडपड लक्षात आली. 'अभ्यासोनी प्रकटावे' या उक्तीनुसार अकोल्यातील विविध प्रश्न व समस्यांबद्दल त्यांचा अभ्यास पक्का आहे. प्रश्न अकोल्याच्या प्रलंबित विमानतळाचा असो, की उड्डाणपूले, पार्किंग, सीसीटीव्ही वा अन्य; तो कसा सोडविता येईल याची नेमकी माहिती त्यांच्याकडे आहे. कोणते विषय मार्गी लावायचे याची यादीही तयार आहे. सुदैवाने संघ व जनसंघापासूनच्या सेवेचा वारसा असल्याने सरकारमधील मान्यवरांशी निकटचे संबंध आहेत, याचा प्रश्न सोडवून घेण्यासाठी निश्चित लाभ होईल. अल्पावधीत त्याची चुणूक दिसून येऊ लागली आहे. राजकारणातील बारकावे ज्ञात असलेले माजी महापौर व भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासारखे खंदे सहकारी त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे त्यांची वाटचाल दमदार ठरेल अशी खात्री आहे. त्यांच्या रूपाने वऱ्हाडवासीयांना व भाजपालाही एक दमदार नवे नेतृत्व लाभले आहे हे नक्की. लोकमत भेटीत त्यांच्या स्वागतप्रसंगी समवेत युनिट हेड आलोक कुमार शर्मा, विजय अग्रवाल व उप वृत्तसंपादक राजेश शेगोकार. #LokmatAkola #MLCBasantKhandelwal #KiranAgrawal

माधुरी दाते सन्मान ...

Feb 28, 2022 माधुरी दाते सन्मान
लोकमत सखी मंचच्या प्रतिनिधी माधुरी दाते यांनी 200 व 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत श्रीलंकेतील कोलंबो येथे 2 कांस्यपदक घेऊन अकोल्याला व मास्टर्स अँथलेटीक्स असोसिएशन अकोल्याला गौरव प्राप्त करून दिला, याबद्दल लोकमत कार्यालयात सखीमंचच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रख्यात समाजसेवी डॉ. एन. के. माहेश्वरी, युनिट हेड अलोक कुमार जी शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिंन्हा तसेच सखीमंचच्या विभागीय प्रतिनिधी मनीषा भुसारी, वंदना सराग, पुष्पा वानखडे, पुष्पलता पांडे #LokmatAkola #LokmatSakhiManch #KiranAgrawal