Sunday, July 31, 2022

EditorsView published in Online Lokmat on July 28, 2022

शिक्षितांची अप्रागतिकता अधिक चिंतनीय! किरण अग्रवाल / विचारांच्या ग्रहणाला आचरणाची जोड लाभल्याखेरीज प्रागतिकतेचा डंका पीटण्याला अर्थ नसतो, अन्यथा 'वरून कीर्तन, आतून तमाशा'सारखी गत होते. आपण विज्ञान अंगीकारतो, चंद्रावर व मंगळावर जाण्याच्या बाता मारतो; मात्र त्या ज्ञान - विज्ञानातील सत्य स्वीकारायचे तर अडखळतो. यातही पुन्हा समाजाला शिक्षित करण्याची जबाबदारी असणाऱ्या घटकाकडूनही असेच होते तेव्हा तर कपाळावर हात मारून घेण्याखेरीज गत्यंतर उरत नाही. मासिक पाळी आली म्हणून विद्यार्थिनीस वृक्षारोपण करण्यापासून एका शिक्षकाने रोखल्याच्या अलीकडील घटनेतूनही अशीच अप्रागतिक, अवैज्ञानिक व बुरसटलेली मानसिकता टिकून असल्याचा प्रत्यय येऊन गेला आहे.
परिवर्तन किंवा बदल, हा जगाचा नियम आहे; तो केवळ इमारती, रस्ते आदि भौतिक बाबींतूनच होत नसतो तर वैचारिक, मानसिकदृष्ट्या समज गैरसमज वा भूमिकांच्या पातळीवरही होणे अपेक्षित आहे. काळाच्या ओघात असे अनेक बदल स्वीकारलेही गेलेत, काल सुसंगतता म्हणून त्याकडे पाहिले गेले. या बदलांच्या प्रक्रियेत थोडेफार जे राहून गेले, त्याचा जेव्हा अपवाद म्हणून का होईना प्रत्यय येतो तेव्हा प्रागतिकतेच्या गप्पांमधील फोलपणा उघड झाल्याखेरीज राहत नाही. आयुष्यातील जोडीदाराच्या निधनाचे दुःख उराशी कवटाळून जगू पाहणाऱ्या विधवा भगिनी असोत, की स्त्रीत्वाच्या नैसर्गिक व वैज्ञानिक जाणीवेचा भाग असणाऱ्या मासिक पाळीतील भगिनी; त्यांना शुभ वा मंगल कार्यातील सहभागापासून दूर ठेवू पाहणारी मानसिकतादेखील या प्रागतीकतेच्या मार्गातील अडथळाच ठरते. नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका शाळेत मासिक पाळीतील विद्यार्थिनीला वृक्षारोपण करू न दिल्याची बाब अशीच बुरसटलेल्या विचारधारेतील व अप्रागतिकतेशी नाते सांगणारी आहे. ---------------- महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्राला तर पुरोगामीत्वाचा मोठा वारसा आहे. समाजातील चुकीच्या, मानवतेलाच धक्का लावणाऱ्या अंधश्रद्धीय प्रथा परंपरांना मोडून काढण्यासाठी येथील विविध संतांनी आपले आयुष्य वेचले. भजन किर्तनापासून ते येथल्या लोकवाङ्मयात विवेकवाद जागवणारे व विज्ञानाच्या कसोटीवर परखून घेत अनिष्ट बाबींवर आसूड ओढणारे असंख्य दाखले आढळतात. अतिशय समृद्ध व जनजागरण घडविणारे येथले साहित्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करून त्यानुसार न वागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणारे येथील सरकार राहिले आहे. राज्यातील विविध सामाजिक संघटनाही सातत्याने जनजागरणाचे काम करीत असतात, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्यांची येथे मोठी फळी आहे. संतांची शिकवणूक व अन्य साऱ्या प्रयत्नांतून मना मनाची मशागत घडून महाराष्ट्राची पुरोगामी राज्य अशी ओळख प्रस्थापित झाली आहे. असे असताना मासिक पाळीला विटाळ मानून संबंधित भगिनीला बाजूला सारणारे, मांत्रीका तांत्रिकाच्या आहारी जाऊन नरबळी देऊ पाहणारे किंवा वंशाचा दिवा मुलगाच हवा या लालसेपोटी कन्या भ्रूणहत्त्या करून सुनेचा छळ मांडणारे आढळून येतात तेव्हा मान शरमेने खाली गेल्याखेरीज राहत नाही. ---------------- दुर्दैव असे, की अशिक्षित, अज्ञानी वर्गात टिकून असलेल्या पूर्वापारच्या गैरसमजातून असे प्रकार घडून येत असतानाच उच्चशिक्षित व समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी असणाऱ्या घटकांमध्येही जेव्हा कधी असे घडून येते तेव्हा आश्चर्य वाटणे तर स्वाभाविक ठरुन जातेच, पण आधुनिकतेची कास धरून प्रगतीच्या वाटेवर कसे मार्गस्थ होता यावे असा प्रश्नही पडून जातो. मासिक पाळीतील विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून रोखण्याचा अविवेकी प्रकार शिक्षकाकडून घडून आला आहे. तेव्हा असल्या शिक्षकाकडून कसल्या विद्यादानाची व शिक्षणाची अपेक्षा करता यावी? दुसरीही मुलगीच झाली म्हणून प्राध्यापिका पत्नीला घराबाहेर काढून देण्याचा प्रकार मागे नाशकात नोंदला गेला होता. पैशांचा पाऊस पाडण्याच्या अवैज्ञानिक प्रकारात शिक्षितांनी सहभाग घेतल्याचे व त्यात त्यांची फसवणूक झाल्याचे प्रकारही बघावयास मिळाले आहेत. अशा इतरही अनेक घटना सांगता येतील, ज्यात उच्चशिक्षित वर्गात अंधश्रद्धेतून अविवेकी प्रकार घडून आल्याचे निदर्शनास येते, ते अधिक चिंतनीय आहे. अल्पावधीत व परिश्रमाखेरीज भरपूर काही मिळवण्याचा हव्यास तर यामागे असतोच असतो, पण बुद्धी गहाण ठेवण्यातूनही असे प्रकार घडतात. निसर्ग व विज्ञानाला आत्मसात करता न आल्यातून हे घडते. तेव्हा ही शिकवणूक अधिक प्रभावीपणे होणे गरजेचे आहे, हेच झाल्या प्रकारातून लक्षात घ्यायला हवे. https://www.lokmat.com/editorial/the-unprogressiveness-of-the-educated-is-more-worrying-a520-c310/?fbclid=IwAR3tp-t_Maom7HfQKXMAtwNoPbgXCceB4EQsK2XMrWET94OkF-v-XJZJ3w0

No comments:

Post a Comment