Thursday, July 2, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 02 Jully, 2020

परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली

किरण अग्रवाल

मनात भाव असला तर देवळाच्या दारात जाण्याची गरज नसते असे म्हणतात, तरी लाखो वारकरी विठूनामाचा गजर करीत भक्तिभावाने दरवर्षी पंढरीला जात असतात; कारण पांडुरंगाच्या भेटीची आस व ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यंदा मात्र कोरोनाच्या महामारीने प्रत्येकाला आपापल्या गावी व घरीच थांबून राहणे भाग पडले, त्यामुळे मनामनातील पांडुरंगाचे अनोखे दर्शन प्रत्येक कुटुंबात बघावयास मिळाले, अर्थात श्रद्धेने ओथंबलेली संवेदना व त्यातून आकारास आलेली विठूमाउली मनामनात अनुभवली जात असताना शासनाच्या परिवहन महामंडळाने त्यांच्यातील असंवेदनशीलतेचा प्रत्यय आणून द्यावा हे अचंबित करणारेच ठरले.



वारी हा खरे तर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा, लोकधारेचा व परंपरेचा हुंकार आहे. महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाच्या जीवनानुभवाचा, विचारधारेचा आचारधर्म या वारीत अनुभवयास मिळतो. विठ्ठलभक्तीचा असा निर्व्याज्य भावाने होणारा नाद इतरत्र कुठेही बघावयास मिळत नाही, म्हणून वारीकडे महाराष्ट्राचे जीवनदर्शन म्हणून बघितले जाते. कोरोनाच्या संकटामुळे यंदा मात्र वारीवर निर्बंध घालणे शासनाला भाग पडले, त्यामुळे लाखो वारकऱ्याचा काहीसा हिरमोड झाला खरा; पण संतांनीच घालून दिलेल्या शिकवणुकीनुसार ‘काया ही पंढरी आत्मा पांडुरंग’ मानून घराघरांत नामस्मरण करून माउलीला अनुभवले गेले. शासनाने राज्यातील मानाच्या अशा सात पालख्यांना मोजक्या मंडळींच्या साथीने पंढरीत प्रवेशाची अनुमती दिल्याने या पालख्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसेसने पंढरपूरला गेल्या, पण हे होताना यंत्रणांची असंवेदनशीलता दिसून आली ती सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली. एकीकडे यंदा पायी वारीला परवानगी देता आलेली नसली म्हणून हेलिकॉप्टरने मानाच्या पालख्या पंढरपुरात नेण्याच्या चर्चा घडवल्या गेल्या असताना साध्या बसेसने या पालख्या नेण्याची वेळ आल्यावर त्यातही असे व्हावे हे आश्चर्याचे आहे.

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब एकीकडे यंदा मानाच्या पालख्या व संतश्रेष्ठ यांना एसटीद्वारे पंढरपुरात नेण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत असताना व हा भाग्याचा क्षण असल्याचे सांगत असताना दुसरीकडे या विभागाकडून ज्या अश्रद्धतेचा अनुभव आला तो विषण्ण करणारा ठरला. दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे लोकडाऊन करावे लागले असताना मुंबई व इतरही शहरातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांचे तसेच अन्य ठिकाणच्या नागरिकांचे जे स्थलांतर मोठ्या प्रमाणात घडून आले त्यावेळी याच महामंडळाने व शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून पायी गावाकडे निघालेल्या नागरिकांना स्वखर्चाने त्यांच्या घरी पोहोचविण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी असे औदार्य दाखविणारे शासन व परिवहन महामंडळ संतांच्या पालख्या पंढरपुरात नेताना मात्र संबंधित संस्थांकडून एसटीचे भाडे आकारताना दिसून आले, याबाबत रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर सदर धनादेश परत केले गेले हा भाग वेगळा; परंतु मुळात महाराष्ट्राचे दैवत असणाºया विठूमाउलीच्या भेटीसाठी जाणाºया संतांच्या पालख्यांना व शासनानेच उपलब्ध करून दिलेल्या एसटीच्या सुविधेचेही भाडे आकारले जावे हेच अनाकलनीय होते.

त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीबाबत तर आणखीनच वेगळा अनुभव आला. देहू येथून संत तुकाराम, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर, सासवड येथून संत चांगवटेश्वर व संत सोपानदेव, नेवासा येथून संत मुक्ताई आदींच्या पालख्याही बसेस द्वारेच पंढरपुरात गेल्या; परंतु किमान त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने व संस्थांनी या बसेस पालख्या व नेहमीच्या रथाप्रमाणेच फुलांनी सजवून या बसेस पंढरपुराकडे रवाना केल्याचे दिसून आले; परंतु त्र्यंबकेश्वरात त्याही बाबतीत संवेदनशीलता दाखविली गेली नाही. सकाळी पालखीसाठी जी बस आली ती पुरेशी धुतलेली व स्वच्छही नव्हती. तमाम जनतेच्या श्रद्धेच्या सोहळ्याचा हा भाग असताना याबाबत प्रशासनाने, परिवहन महामंडळाने तसेच लोकप्रतिनिधींनीही जे भान राखणे गरजेचे होते ते राखले गेले नाही. एरव्ही वारीमध्ये पालख्यांच्या दर्शनासाठी व कपाळी गंध टिळा लावून गळ्यात टाळ-मृदुंग अडकवून आपल्या श्रद्धेचा परिचय देण्यासाठी चढाओढ करणारे लोकप्रतिनिधीही याबाबतीत दूरच राहिलेले दिसले. शासनाच्या निर्बंधाचा भाग यामध्ये असला तरी, जे अलंकापुरीत, देहूत वा अन्य ठिकाणी होऊ शकले ते त्र्यंबकेश्वरी का घडू शकले नाही, असा प्रश्न यातून उपस्थित होणारा आहे. अर्थात, जेणे सद्बुद्धी उपजेल, पाखंड भंगेल, विवेक जागेल.. या संत वचनावर विश्वास ठेवून संबंधितांचा विवेक जागेल अशी अपेक्षा ठेवूया आणि म्हणूया, जय जय रामकृष्ण हरी।। 

https://www.lokmat.com/editorial/article-issue-take-rent-nivrutinath-nath-maharaj-palkhi-st-bus-a629/

No comments:

Post a Comment