CoronaVirus : साखळी तुटतेय हे दिलासादायी!
किरण अग्रवाल
जिवाशीच गाठ घालून देणाऱ्या कोरोनाची साखळी हळूहळू तुटू पाहते आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या बाधितांची संख्या कमी होत असून, योग्य त्या उपचाराअंती कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरवापसी होत असलेल्यांचे प्रमाणही वाढले आहे; त्यामुळेच देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होऊ घातला आहे हे दिलासादायकच असले तरी, याबाबत बाळगावयाच्या सावधानतेबद्दल दुर्लक्ष होऊ न देणेही गरजेचे आहे; पण अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहता, यासंबंधीची चिंता दूर होऊ नये.
कोरोनाबद्दल निर्माण झालेल्या भयाची स्थिती आता काहीशी निवळत आहे. शासनाने लॉकडाऊन उठविल्यानंतर गेल्या दोन आवर्तनात अटी-शर्तींवर काही व्यवहार सुरू करून जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न चालविला आहे, याच मालिकेत अनलॉक-३ची घोषणा झाली असून, त्यात जिम्स काही अटींवर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रात्रीची संचारबंदीही उठणार आहे. अर्थात काही ठिकाणची रुग्णसंख्या अजूनही वाढतीच असली तरी लॉकडाऊन हा त्यावरील उपाय व पर्याय ठरू शकत नाही हे आता सर्वांनीच समजून घेतले आहे. डॉ. मिलिंद वाटवे यांच्यासारख्या संशोधक तज्ज्ञांनी तर हे सांगितले आहेच, शिवाय लॉकडाऊनमध्ये होणारे नुकसानही सर्वांनी सोसून झाले आहे; तेव्हा तसे होऊ द्यायचे नसेल व अर्थचक्र आता रडतखडत का होईना जे सुरू झाले आहे, ते पुन्हा थांबवायचे नसेल तर सावधानता बाळगत वाटचाल करण्याचीच भूमिका घेणे इष्ट आहे. अनलॉक-३कडे त्याचदृष्टीने सकारात्मकतेने बघितले जावयास हवे. मिळालीय मान्यता म्हणून अनिर्बंधता किंवा बिनधास्तपणा अनुभवास येऊ नये हे यात महत्त्वाचे आहे. अत्यावश्यक कामाखेरीज बाहेर न पडण्याचा व बाहेर पडले तरी सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचा मनोनिग्रह यासाठी गरजेचा ठरणार आहे. पण ते होत नसल्यामुळे राज्यात लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत वाढवावा लागला आहे.
खरे तर आतापर्यंत कोरोनाबाधित व बळींची संख्या प्राधान्याने समोर येत होती; परंतु अलीकडे काही दिवसांपासून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही समोर येऊ लागल्याने मनातील भीतीचे वातावरण दूर होण्यास मदत घडून येत आहे. जगभरातील एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केल्याचे वृत्त आहे तसेच देशातील बरे होणाऱ्यांचा आकडाही दहा लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. राज्यात दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता दिवसाला दहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचाही टप्पा गाठला गेला आहे. मृत्युदर हा दिवसेंदिवस कमी होत चालला असून, रुग्ण बरे होण्याचा टक्का वाढत चालला आहे, ही सारी दिलासादायक चिन्हे आहेत. लवकरच विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचे आगमन होऊ घातले आहे, त्यामुळे बाप्पा येईपर्यंत कोरोनाचे संकट ब-यापैकी दूर झालेले असेल अशी अपेक्षा करता यावी.
महत्त्वाचे म्हणजे, चाचण्या वाढविल्यामुळेच कोरोनाची साखळी तोडणे शक्य झाले आहे. शासनाबरोबरच सामाजिक व सेवाभावी संस्था पुढे आल्याने आता सर्वत्रच मोठ्या प्रमाणात चाचण्या होऊ लागल्या आहेत. त्या करून घेण्याची निकड सामान्यांनाही जाणवू लागल्याने भय न बाळगता लोक चाचण्या करून घेत आहेत. दिल्लीत प्रतिदिनी वीस हजार चाचण्या केल्या जात आहेत. मुंबईत दिवसाला दहा हजार चाचण्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर नाशिकसारख्या ठिकाणी प्रतिदिनी हजार चाचण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यातून होणारे ट्रेसिंग हे पुढील संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी ठरत आहे. यातील लक्षवेधी बाब अशी, की आता आतापर्यंत कोरोनाच्या भयामुळे कॉरण्टाइन राहिलेले अनेक लोकप्रतिनिधी आता घराबाहेर पडलेले दिसून येत आहेत. खासदार व आमदारच नव्हे, तर महानगरपालिका व नगरपालिकांमधील नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सरपंचदेखील आपापल्या परिसरात कोरोनाच्या चाचण्या करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असून, प्राथमिक तपासणीसाठी पुढाकार घेत आहेत. कोरोना सोबतचे हे युद्ध केवळ एकटे शासन-प्रशासन तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना लढून चालणार नाही तर त्यांच्या साथीला लोकसहभाग लाभणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कोरोनाच्या चाचण्यांसाठी लोकसेवकांकडून घेतला जात असलेला पुढाकार लोकचळवळीचे स्वरूप धारण करताना दिसत आहे. जागोजागी तसे झाले तर उत्तमच, कारण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तपासणी म्हणजे ट्रेसिंग होणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment