Monday, February 8, 2021

मान सन्मानाचीच नव्हे, जबाबदारीचीही पगडी ...

07 Feb, 2021 / मान सन्मानाचीच नव्हे, जबाबदारीचीही पगडी ... #MajhaPhetaMajhiJababdari
मोबाईल म्हणजे करामतीचं केंद्रच आहे. अनेक भन्नाट गोष्टी त्याद्वारे होतात, फक्त त्याची पुरेपूर माहिती असणारा हवा. आज धाकल्या कृतीने असेच बसल्या बसल्या स्नॅपचॅट वरील फिल्टरद्वारे माझ्या मस्तकी छानसा फेटा चढवून फोटो काढून दाखवला आणि मी तोंडात बोटच घातले. त्यावरून स्मृतीची पाने चाळली जरा...
* * * * * निटसं आठवत नाही खरं, पण घरातील वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या भावाच्या लग्नात पहिल्यांदा मला फेटा बांधला गेला म्हणतात. त्यानंतर स्वतःच्याच लग्नात अपरिहार्यपणे फेटा घातला गेला, त्या फेट्याची किंमत आजपर्यंत चुकवावी लागतेय हा भाग वेगळा. शालकाच्या व भाच्यांच्या लग्नातही मानाचे फेटे बांधले जाऊन मिरवायला मिळाले तर मित्रमंडळींकडील लग्नांमध्ये व काही समारंभांमध्ये सन्मानाचे फेटे बांधले गेले. या मानसन्मानातून येणाऱ्या जबाबदारीचे ओझे पेलण्याइतके आपले डोके सक्षम आहे का हा खरे तर मनाला पडणारा प्रश्नच आहे. पण प्रश्नांची उत्तरे शोधत बसण्यापेक्षा जबाबदारीची जाणीव ठेवून स्मरणात आनंद मानलेला केव्हाही बरा...
* * * * * असाच एक प्रसंग यानिमित्ताने आठवला, मागे श्रावणानिमित्त नाशिकच्या प्रख्यात कैलास मठात शिवलिंगार्चन महोत्सवाच्या पूर्णाहुती सोहळ्यास उपस्थित होतो. यावेळी प्रमुख आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंद जी सरस्वती यांनी कार्यक्रमानंतर आपल्या मस्तकावरील पगडी काढून माझ्या मस्तकी ठेवली व चार-चौघात यापुढील आश्रमाचे उत्तराधिकारी तुम्ही असाल म्हणून सांगितले. हे गमतीचे होते; पण माझ्या दाढीधारी व्यक्तिमत्त्वाला साजेसेच होते. गृहस्थाश्रमाच्या प्रारंभाचा म्हणजे लग्नातील फेटा आणि हा संन्याशाने डोक्यावर ठेवलेला वानप्रस्थाश्रमाची जाणीव करून देणारा फेटा... आरंभ ते अंताकडे घेऊन जाणारा, आसक्तीतून विरक्ती, मुक्तीकडे नेऊ पाहणारा. अर्थात, यानंतरही अनेकदा अनेक ठिकाणी फेटा परिधान करण्याचा योग आला, त्या सर्वच फेटयांनी मनात डोकावायला भाग पाडले. असं डोकावण्यासाठी डोकं शाबूत हवं हे मात्र नक्की. सर सलामत तो पगडी पचास... असे त्यामुळेच म्हणता यावे
***** मित्रांनो, चला आपणही यानिमित्ताने आपला फेट्यातील फोटो शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये. अनुभवा एक चेंज अन स्विकारा चॅलेंज ... शोधा यानिमित्ताने आपला फेट्यातील फोटो अन घडवा त्याचे दर्शन ...
#MajhaPhetaMajhiJababdari #KirananandNashik #KiranAgrawalNashik

No comments:

Post a Comment