At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, April 29, 2021
EditorsView published in Online Lokmat on April 29, 2021
दिस जातील, संकट सरल;
एक फोन तर करून बघा...
किरण अग्रवाल /
सद्य:स्थितीत कोरोनाची काजळ छाया चहूकडे दाटली असली तरी, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब
शिरवाडकर यांनी ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल’ हे जे काही सांगून ठेवले आहे त्याप्रमाणे उद्याच्या दिवसाचा सूर्य चांगलेच काही घेऊन उगवणार आहे याबद्दलची आश्वासकता बाळगायला हवी. संशोधकांचे संशोधन,लसीकरणाचा वाढता वेग व डॉक्टर्स, नर्सेस या वैद्यकीय क्षेत्रातील घटकांचे अविरत सुरू असलेले परिश्रम या बळावर कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणार आहोतच; तेव्हा गरज आहे ती या संकटकाळात दुःख वाटून घेण्याची व उमेद जागविण्याची. पैसा-अडका, पद-प्रतिष्ठा काही कामी येत नाहीये, अशा स्थितीत फक्त दिलाशाचे व सहवेदनेचे दोन शब्द उपयोगी पडणार असल्याने त्यासाठीचा जागर वाढविण्याची भूमिका गरजेची आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या धडकेने प्रत्येकाच्याच वाट्याला काहीना काही दुःख वा वेदना आल्या आहेत, कुणी म्हणता कुणी याला अपवाद ठरू शकलेले नाही. हे संकटच असे काही आहे की भले भले त्यात उन्मळून पडले आहेत. कोरोनाबाधितांच्या व बळींच्याही संख्येत आताआतापर्यंत रोज वाढच होत असल्याचे दिसून येत होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून हा वेग ओसरत चालल्याचे दिलासादायी वर्तमान आहे. नव्या रुग्णांच्या दैनंदिन संख्येत काही प्रमाणात घट झाली असून, दोन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात अडीच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विशेषतः संशोधकांच्या संशोधनामुळे नवनव्या लसी पुढे येत असून, लसीकरणाचा वेगही वाढला आहे. १ मेपासून १८ वर्ष वयापुढील सर्वांचेच लसीकरण होऊ घातले असल्याने यात कमालीची आघाडी प्राप्त होण्याची चिन्हे आहेत, यातून मनोधैर्य उंचावून संकटाशी मुकाबला करणे सुलभ होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे शासन व प्रशासनाच्या नियोजन व प्रयत्नांखेरीज वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस व सर्वसंबंधित घटक अविरत परिश्रम घेत आहेत. अनेक ठिकाणी अनेक जण सुट्टी व रजा न घेता समर्पित भावाने आपली सेवा बजावत आहेत. यात शंभर टक्के यश कोणत्याही क्षेत्रात व कोणत्याही बाबतीत शक्य नसते, तसे काही बाबतीत काहीसे अपयशही येत असले तरी त्याने विचलित न होता संयमाने या संकटाचा सामना करणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने काही ठिकाणी रुग्णालयांवर किंवा डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत आहेत त्या सर्वथा अयोग्य आहेत. धीर सुटण्याची ही लक्षणे आहेत, मात्र अशावेळी तो सुटू नये म्हणून जाणकारांनी संबंधितांना धीर देणे गरजेचे असते. जाण्याचे वय नसणारी तरणीबांड मंडळी गमावली जातात तेव्हा त्याचे दुःख नक्कीच मोठे असते; परंतु म्हणून त्या दुःखावेगातून अनुचित वर्तन घडून येणे समर्थनीय ठरू शकत नाही. अशावेळी सहयोगी व समाज धुरिणांनी संबंधितांकडे सांत्वना व सहवेदना व्यक्त करून हिंमत देणे गरजेचे असते. संकटातून व दुःखातून बाहेर पडण्यासाठी हे धीराचे दोन शब्दच कामी येणारे असतात व तेच स्मरणात राहणारेही; तेव्हा त्यादृष्टीने चिरपरिचितांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे.
सोशल मीडियाचा बोलबाला असलेल्या आजच्या या काळात उगाच भीतिदायक वातावरण निर्माण करणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करण्यापेक्षा कोरोनाशी झुंजत असलेल्या आप्तेष्ट, मित्रांशी संपर्क करून त्यांचे मनोबल
उंचावण्यासाठी प्रयत्न केलेले कधीही अधिक उपयोगाचे व महत्त्वाचे. अखेर हे दिवस जातील व संकटही सरेलच; पण याकाळात आपण दाखवलेली माणुसकी व सहृदयताच कामी येणार आहे. त्यासाठी फार काही परिश्रमाची गरज नाहीये. अंतःकरण भिजलेले व डोळे ओलावलेले हवेत फक्त. त्यातून भावनेवर स्वार झालेले शब्द आपोआप संप्रेषित होतात. बऱ्याचदा काही न बोलता नि:शब्दताही खूप मोठा आधार देऊन व सांगून जाणारी असते. पण अडचण अशी असते की दुसऱ्याच्या प्रगतीबद्दलची मळमळ आपल्याला दूर सारता येत नाही, परिणामी संकटकाळात हळहळ व्यक्त करणेही जमत नाही. तेव्हा सुखात किंवा आनंदात ज्याची आठवण केली नाही अशा लांबच्या का होईना नातेवाइकाला किंवा विस्मृतीत गेलेल्या एखाद्या मित्राला फोन तर करून बघा त्याची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी. तुमच्या काळजीचे, दिलाशाचे दोन शब्द दुर्लभ ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनइतकेच परिणामकारी ठरतात की नाही ते बघा तर खरं !
https://www.lokmat.com/editorial/days-will-gone-crisis-will-end-atleast-make-one-phone-call-a607/
Wednesday, April 28, 2021
Saraunsh published in Lokmat on April 25, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210425_2_17
https://www.lokmat.com/nashik/shroud-didnt-have-pocket-everyone-wants-leave-here-a321/
Friday, April 23, 2021
Anvayarth published in Lokmat on April 23, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210423_6_2
https://www.lokmat.com/editorial/claps-plates-and-tubes-oxygen-a607/
Thursday, April 22, 2021
EditorsView published in Online Lokmat on April 22, 2021
Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला....; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी
किरण अग्रवाल /
एकीकडे कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील बाधितांना रुग्णालयातील ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याची सार्वत्रिक ओरड होत असताना दुसरीकडे नाशकात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तब्बल 24 रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी तर आहेच, परंतु मरण कसे स्वस्त होऊ पाहते आहे हेदेखील यातून स्पष्ट व्हावे.
नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे, कारण ही एक दुर्घटना तर आहेच परंतु त्याच सोबत यामध्ये व्यवस्थांच्या बेपर्वाईचा पदरही लाभुन गेलेला दिसतो आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन टॉकीत वायू भरला जात असताना त्या टाकीच्या व्हालमधून गळती होतेच कशी व गळती सुरू झाल्यानंतर ती रोखण्यासाठी दीड ते दोन तासांची यातायात करण्याची वेळ का आली, असे काही प्रश्न यातून समोर येऊन गेले आहेत ज्याची उत्तरे शोधली जाणे गरजेचे ठरले आहे.
--------------
नाशकातील ज्या डॉ जाकिर हुसेन रुग्णालयात ही दुर्घटना घडली ते हॉस्पिटल पूर्णतः कोरोना बाधितांसाठी वाहिलेले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच तेथे ऑक्सिजन टाकीची उभारणी करण्यात आली आहे. या टाक्या खरेदी करून स्वतः बसविण्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या भाड्याने घेतल्या आहेत, त्यामुळे त्यासंबंधीची हाताळणी करण्याचा ठेका, त्यातील अटी शर्ती आणि ठेकेदारीची गणिते यानिमित्ताने चर्चेत येऊन गेली आहेत. व्यवस्थेची हाताळणी जर ठेकेदाराची जबाबदारी असेल तर या गळतीचा व त्यातून जीव गमावलेल्यांची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये. राज्य शासनाने व महापालिकेनेही जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत, परंतु पैशाने संबंधितांचा जीव परत येणार नाही. झालेली हानी भरून निघणे शक्य नाही, त्यामुळे या संदर्भातील बेपर्वाईची निरपेक्षपणे चौकशी होऊन यापुढे असे व्यवस्थेतील दोष टाळण्या बाबत लक्ष दिले जाणे अगत्याचे आहे.
राहिला विषय राजकारणाचा, तर ही घटना दुर्घटनाच आहे यात शंका नाही; त्यामुळे त्यावर उगाच राजकारण करणे योग्य ठरू नये. पण एकीकडे एकेक जीव वाचवणे महत्त्वाचे ठरले असताना एकाच वेळी तांत्रिक दोषातून इतक्या मोठ्या प्रमाणात जीव गमावले जात असतील तर यात होणाऱ्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करता येऊ नये. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ही दुर्घटना घडल्याने व महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने, उठसूट राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांनी यासंबंधीचे भान बाळगायला हवे. झाल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडून उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, तिचा अहवाल काय यायचा तो येईलच; परंतु वैद्यकीय तांत्रिक सज्जता व तज्ज्ञता याकडे यानिमित्ताने लक्ष देणे किती गरजेचे आहे ते लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रुग्णालये, बेड्स, ऑक्सीजन, इंजेक्शन्स याची कमतरता अधिक भासण्याची लक्षणे पाहता किमान जी व्यवस्था उपलब्ध आहे त्यातील तांत्रिक दोष कसा टाळता येईल व तज्ज्ञांच्या सेवा घेऊन नाशकात घडल्यासारखी दुर्घटना कशी टाळता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. तसे झाले व या दुर्घटनेतील हलगर्जीपणाला कारक ठरलेले घटक शोधले गेले तर यात बळी गेलेल्यांच्या जीवाला खरी श्रद्धांजली लाभेल. केवळ अश्रू ढाळून व आरोपांच्या पिचकाऱ्या मारून चालणार नाही, तर आपत्ती व्यवस्थापनाच्या सक्षमतेच्या दृष्टीनेही गांभीर्याने विचार करून निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे.
https://www.lokmat.com/editorial/nashik-oxygen-leak-accident-nashik-mind-numbing-a309/
Tuesday, April 20, 2021
ाशिक लोकमतची रौप्य वर्षपूर्ती ...
20 April, 2021
नाशिक लोकमतची रौप्य वर्षपूर्ती ...
काळ कसा भरभर निघून जातो आणि आठवणी ठेवून जातो बघा, 20 एप्रिल 1996 रोजी नाशिकमधून लोकमतचा प्रारंभ झाला त्याला आज पंचवीस वर्षे पूर्ण झालीत.
काय घेऊन आलो होतो या गोदातटी, साधी दोन ड्रेस घालून एक सुटकेस. संस्थेनेच आमचा डेरा हॉटेल कुबेराच्या एका रूममध्ये निश्चित करून दिला होता. नागपूरचे दिलीप तिखीले, मशीन विभागाचे काही सहकारी व मी, असे आम्ही प्रारंभीचे रुममेट्स होतो. सर्व सेट होईपर्यंत सुमारे दीड ते दोन महिने आम्ही त्या हॉटेलमध्ये काढले, त्यानंतर बाहेरून आलेले सारे आपापल्या गावी परतले व मी अशोक स्तंभावरील शर्मा क्वार्टर्समध्ये कॉट बेसिसवर निवारा शोधला.
****
लोकमतच्या प्रारंभाचे ते दिवस म्हणजे रोज नव्या आव्हानाचे, नाविन्याचे, सृजनतेच्या समाधानाचे व त्यासाठीच्या प्रचंड मेहनतीचे होते. आदरणीय निर्मल बाबूजी दर्डा नाशकात तळ ठोकून होते. ते हॉटेल अनुषावर मुक्कामी असायचे. भल्या पहाटे ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर वृत्तपत्र वितरक बांधवांच्या भेटीस व नियोजनासाठी निघायचे, आम्ही हॉटेलवरून शालिमार चौकातील लोकमतच्या शहर कार्यालयात जमायचो. तेथे प्रारंभीच्या काळात या आवृत्तीची धुरा सांभाळणारे मा. विजय बाविस्कर साहेब यांच्या उपस्थितीत नियोजनाच्या बैठका व्हायच्या. त्यांनी आधीपासूनच संपूर्ण जिल्हा पिंजून व अभ्यास करून ठेवलेला असल्याने खूप बारकाईने तुलनात्मक विचार करून ते सर्वांना विषय वाटून देत. तेथून निघून जिल्हा परिषद कार्यालयाच्या शेजारील वैद्य वहिणींच्या मेसवर दुपारचे जेवण घेतले की हॉटेल मार्गे तिखीले सर व मी अंबडला निघायचो. त्यावेळी आजच्या इतकी साधन सामुग्री नव्हती त्यामुळे बऱ्याचदा रात्री 12 नंतर आम्ही अंबडमधून पायी चालत सीबीएसवर यायचो, तेथे रात्री एक दीडच्या सुमारास एसटी कँटीनचा वडापाव खायचो; हेच आमचे रात्रीचे जेवण व पुन्हा हॉटेल कुबेराला येऊन झोपी जायचो...
सर्रकन तो सारा काळ आज नजरेसमोरून सरकतो आहे. अनेक सहकारी लाभले, त्यांच्या जीवापाड कष्टाच्या बळावर ही आवृत्ती उभी राहिली. या साऱ्या क्षणांचा मी साक्षीदार, त्यामुळे असंख्य प्रसंग व आठवणींनी आज मन भरून आले आहे. ( जसा वेळ मिळेल तसे सवडीने ते मी यापुढील काळात सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहेच )
****
मंतरलेला व भारलेला हा काळ होता, प्रारंभ होता. आमचे श्रद्धास्थान बाबूजी आदरणीय जवाहरलाल जी दर्डा स्वतः आमची व युनिटची खबरबात घेत असत. 20 एप्रिलच्या एक दिवस आधीच ते स्वतः नाशिक मध्ये आलेले होते. अंबडच्या कार्यालयात आलेल्या विविध मान्यवरांच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारल्या. आमचे कौतुक करून मार्गदर्शन करतानाच व्यावसायिक स्पर्धेचा तिळमात्रही विचार न करता त्यांची व आदरणीय पत्रमहर्षी दादासाहेब पोतनीस या दोघा मान्यवरांची जमलेली गप्पांची मैफल तर अविस्मरणीय अशीच होती. लोकोत्तर महापुरुषांचे मोठेपण त्यांच्या विचारांत, साधेपणात व निखळ - निकोप आपलेपणात कसे सामावलेले असते ते या भेटीच्या निमित्ताने आम्ही अनुभवत होतो.
आदरणीय विजय बाबूजी, राजेंद्र बाबूजी यांचे सातत्यपूर्वक मार्गदर्शन पाठीशी होते. परिवारातील मुलांसारखी आमची काळजी घेत अक्षरशः बोट धरून शिकवल्यासारखे ते आम्हाला प्रत्येक गोष्टी सांगून आमच्या पाठीवर प्रेरणेची थाप देत होते. निर्मल बाबूजींबरोबरच नागपूर लोकमतचे तत्कालीन कार्य. संपादक मधुकर भावे साहेब, नागपुरचेच अशोक जैन साहेब, निवृत्त विंग कमांडर रमेश बोरा अंकल आदी मान्यवरही त्या-त्या आघाडीवर आमचा मार्ग सुकर करून आम्हाला लढण्याचे बळ देत होते.
****
आवृत्ती सुरू झाली, अल्पावधीत खपाचे विक्रम गाठतीही झाली. वर्षभराच्या आतच म्हणजे 19 फेब्रु 1997 रोजी एक लाख प्रतींचा विक्रम गाठला, ती लाखावी प्रत आम्ही वंदनीय कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांना त्यांच्या घरी जाऊन अर्पण केली, तर लाखोत्तरावी प्रत प्रख्यात नाटककार प्रा. वसंत कानेटकर सर यांना भेट केली. या ग्रेट भेटींचे व वंदनीय व्यक्तींबरोबर झालेल्या संवादाच्या आनंदाला व्यक्त करण्यासाठी शब्द कुठून आणावेत? नंतरही अनेकदा त्यांच्यासोबत भेटीगाठी व चर्चा करण्याचे भाग्य लाभले, पण ही पहिली भेट म्हणजे अविस्मरणीयच!
तरुण नेतृत्व श्री देवेंद्र बाबूजी दर्डा, रिशी बाबूजी व करण बाबूजी यांनीही काळाशी सुसंगत बदल घडवीत सातत्याने नवनवीन कल्पना अमलात आणून पुढील काळात यशाची कमान अधिकाधिक उंचावत नेली. त्यामुळेच ही रौप्यमहोत्सवी वाटचाल अतिशय संपन्न झाली.
****
मा. बाविस्कर साहेबांनी मोठ्या कष्टाने जमीन नांगरून रोपटे लावून दिले, त्यानंतर मा. दत्ता सराफ सरांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून ते चांगलेच रुजविले; तर त्यानंतर मा. हेमंत कुलकर्णी साहेबांनी परखड सिंचनातून छान पैकी फुलविले. जोडीला श्री. बी. बी. चांडक यांचे व्यवस्थापन कौशल्य व लोक सहभागासाठीची प्रयोगशीलता लाभली, त्यामुळे लोकमतने उत्तरोत्तर प्रगतीचे पाऊल पुढेच टाकले.
या वाटचालीत वाचक, वितरक, स्नेही, मित्र, पाठीराखे अशा विविध भूमिकांतून लाभलेली आपली साथ अतिशय मोलाची आहे; आमचे बळ व उत्साह वाढवणारी तीच खरी प्रेरणा. त्याबद्दल धन्यवाद हा औपचारिक शब्द वापरण्याला मन धजावत नाहीये, आपल्या कृतज्ञतेत राहू इच्छितो.
आजवर जे प्रेम, स्नेह सदिच्छा लाभल्या त्या यापुढील काळातही कायम असू द्या हीच विनंती ....
#LokmatNashik25 #KiranAgrawalLokmat #NashikLokmatSilverJubilee
Monday, April 19, 2021
सुन्न, हतबल सारे ...
17 एप्रिल 2021 रोजी १:११ PM वाजता ·
सुन्न, हतबल सारे ...
लोकमतमध्ये प्रकाशित सोबतची छायाचित्रे केवळ वस्तुस्थितीदर्शकच नव्हे तर सुन्न करणारीही आहेत.
कोरोनामुळे जीवनाचा संघर्ष अशा स्थितीत येऊन पोहोचला आहे, की मन व मस्तिष्क बधिर व्हावे.
शासकीय रुग्णालयांमध्ये बेड्स नसल्याने खुर्चीवर बसवून रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर लावावे लागत आहेत, कुण्या भगिनीला अभ्यागतांसाठी असलेल्या वेटिंग रूम मधील खुर्च्यांवर जागा शोधावी लागते तर कुण्या मातेला रिक्षाच्या मागील सीटवरच पडून राहण्याची वेळ येते.
डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, मावश्या.. जीव धोक्यात घालून अहोरात्र राब राब राबत आहेत, पण वाढती रुग्णसंख्या व साधने यांचा मेळ घालणे अवघड ठरले आहे.
गरीब वा सामान्यच नव्हे, सारेच परेशान आहेत.
पद, पैसा, प्रतिष्ठा सारे असणाऱ्यानाही बेडसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. वशिले, ओळखपाळख कुचकामी ठरत आहे.
भय दाटले आहे, हतबलता वाढली आहे ...
****
अश्या स्थितीत एकच करूया,
खऱ्याअर्थाने देवदूत ठरलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांचे मनोमन आभार मानतांना त्यांना पाठबळ पुरवूया.
स्वतःच स्वतःची काळजी घेत निर्बंध कटाक्षाने पाळूया...
मास्क वापरा, डिस्टन्स ठेवा, हात धुवा ।
#विचारप्रवर्तक #BeAware_TakeCare
Saraunsh published in Lokmat on April 18, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210418_2_15
https://www.lokmat.com/nashik/time-mlas-follow-corporators-a321/
Thursday, April 15, 2021
EditorsView published in Online Lokmat on April 15, 2021
ही संचारबंदी फळास जावो...
किरण अग्रवाल /
रोजी थांबली तरी, रोटी थांबणार नाही; सरकार काळजी घेईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अखेर हो ना हो ना करीत बुधवारच्या रात्रीपासून राज्यात पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली. यामुळे अनेकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे हे खरेच; परंतु अंतिमतः जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. आता तरी जनतेने समजूतदारी दाखवत प्रशासनाला सहकार्य करून निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, तसे केले तरच कोरोनाच्या संकटाला थोपवणे शक्य होईल.
राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून, प्रतिदिनी सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान होत आहे, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 35 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.44 टक्के एवढे झाले असले तरी मृत्युदर 1.66 टक्के इतका आहे. सर्वाधिक एक लाखापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात असून, त्यापाठोपाठ मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक जिल्ह्यांचा नंबर लागतो. रुग्णसंख्या वाढत आहे तशी रुग्णालये अपुरी पडत असून, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळणेही सोडा, आता तर रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासू लागल्याने रुग्णांचे नातेवाईक हताशपणे मेडिकलवाल्यांकडे रांगा लावताना दिसत आहेत. शासन प्रशासन आपल्यापरीने उपाययोजना करताना दिसत आहेच; पण परिस्थिती अशी काही हाताबाहेर चालली आहे की भयाचे ढग दाटून यावेत.
------------------
चालू वर्षाच्या प्रारंभापर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत कोरोनाची स्थिती तशी निवळलेली दिसत होती; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाने दार ठोठावले आणि गेल्या वर्षापेक्षाही भयावह रूप धारण करीत कहर माजविला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने एकेक करून काही निर्बंध घातले खरे, परंतु त्याने कसलाही परिणाम होताना दिसून आला नाही. लोकांनीही कोरोना संपल्यात जमा झाल्याप्रमाणे आपले वर्तन ठेवले. मास्क न वापरता व फिजिकल डिस्टन्स न बाळगता सारे व्यवहार होऊ लागल्याने संसर्गाचा वेग वाढून गेला आणि अखेर नाइलाज म्हणून राज्यात कडक निर्बंध आणि पंधरा दिवसांची संचारबंदी पुकारण्याची वेळ आली. अर्थात या संचारबंदीत अत्यावश्यक वा जीवनावश्यक सेवावगळता इतर घटकांनी घरातच सुरक्षितपणे थांबणे अपेक्षित आहे, कारण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते गरजेचे बनले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ असा नारा दिला असून, नागरिकांनी सहकार्य केले तर ही साखळी निश्चितच तुटू शकेल.
-------------------
महत्त्वाचे म्हणजे राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग एकीकडे वाढत असताना व देशात महाराष्ट्र याबाबतीत अव्वल असताना दुसरीकडे पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर करतेवेळी तळातल्या घटकांसाठी विविध तरतुदीही ठाकरे सरकारने केल्या आहेत. एकूण 5 हजार 476 कोटी रुपयांचे कोरोना पॅकेज घोषित करण्यात आले असून, रोजी थांबली तरी रोटी थांबणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या पॅकेज अंतर्गत 7 कोटी लोकांना एक महिना मोफत गहू व तांदूळ देण्यात येणार असून, तब्बल 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवभोजन थाळी महिनाभर गरजूंना मोफत देण्यात येणार असून, 12 लाख परवानाधारक रिक्षाचालक व नोंदणीकृत पाच लाख फेरीवाल्यांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. ही मदत किंवा सहाय्य पुरेसे नाही व सर्वांसाठी नाही हेदेखील खरे; परंतु या संचारबंदीच्या काळात ज्यांची उदरनिर्वाहाची अडचण होऊ शकते अशा लहान घटकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. शेवटी हे संकट सर्वांवरचे आहे त्यास सर्वांनी मिळूनच सामोरे जावे लागणार आहे. त्याचा फटका बहुसंख्य घटकांना थोड्याफार प्रमाणात बसणार असला तरी जिवाची काळजी म्हणून सर्वांनीच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षितपणे थांबणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने ही संचारबंदी फळास जावो अशी अपेक्षा करूया...
https://www.lokmat.com/editorial/let-curfew-becomes-successful-a584/
Monday, April 12, 2021
Saraunsh Published in Lokmat on April 11, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210411_2_19
https://www.lokmat.com/nashik/not-time-politics-or-conciliation-a321/
Thursday, April 8, 2021
EditorsView Published in Online Lokmat on April 08, 2021
कळते; पण वळत नाही...
किरण अग्रवाल /
हा मथळाच पुरेशी स्पष्टता करणारा आहे, कोरोनाच्या वाढत्या संकटाबाबत तेच होताना दिसत आहे. डोळे उघडून किंवा फाडून बघण्याची गरजच नाही इतके कोरोनाचे दिवसेंदिवस उग्र होत चाललेले रूप सर्वांच्या समोर आहे. वैद्यकीय यंत्रणा राबराब राबत आहे, शासन व प्रशासनही आवश्यक त्या सर्व उपाययोजनांमध्ये गर्क आहे, तरी त्यासंबंधीच्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन न करता लोक वावरणार व वागणार असतील तर त्याला हाच मथळा समर्पक ठरावा.
राज्यातील कोरोनाचा ग्राफ कमी व्हायचे नाव घेताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८० हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण असून, त्याच बरोबरीने मुंबईची अवस्था आहे. ठाण्यातही साठ हजारांपेक्षा अधिक तर नागपूरमध्ये ५७ हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत, त्याखालोखाल नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, नांदेड व अन्य जिल्ह्यांची स्थिती आहे. देशाचा विचार करता फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये मृतांची संख्या पाचपट झाली आहे, यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. आकडेवारीतच बोलायचे तर राज्यात ५६ हजारांपेक्षा अधिक बळी गेले असून, देशातील एकूण कोरोनाबळींपैकी तब्बल ३४ टक्के बळी एकट्या महाराष्ट्रात गेले आहेत. भयावह अशी ही स्थिती असून, विशेषतः शहरी भागात जाणवणारा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही फैलावताना दिसत आहे. हॉस्पिटल्समधील बेड्स कमी पडू लागल्याची ओरड होऊ लागली असून, अंत्यसंस्कारासाठी नंबर लावावे लागत असल्याची स्थिती काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. अशी एकूण परिस्थिती असताना निर्बंध पाळण्याबाबत मात्र नागरिक गंभीर दिसत नाहीत, हे शोचनीय म्हणायला हवे.
--------------
कोरोनाची दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली स्थिती पाहता हळूहळू काही निर्बंध लावण्यात आलेत. तथापि, त्याने फरक न पडल्याने अखेर ‘ब्रेक द चेन’ या भूमिकेने कडक निर्बंध लागू केले गेले आहेत; परंतु या निर्बंधांचासुद्धा मुंबईसह काही शहरांत फज्जा उडाल्याचे पहिल्याच दिवशी बघावयास मिळाले. काही ठिकाणी बाजारपेठा बंद होत्या; परंतु रस्त्यावरील गर्दी कमी झालेली नव्हती व स्वाभाविकच त्या गर्दीत फिजिकल डिस्टन्सिंगचा मागमूसही आढळत नव्हता. बाजार समित्या, मंडयांमध्येदेखील गर्दी उसळलेली दिसली. संकट आपल्या आजूबाजूस घोंगावत आहे हे उघड व स्वच्छपणे दिसत असतानाही अशी गर्दी कायम राहणार असेल व यात डिस्टन्सिंग पाळले जाणार नसेल तर कोरोनाला संधी मिळणारच; पण विचारात कोण घेतो अशी स्थिती आहे. निर्बंध पाळावेत ते शेजारच्याने म्हणजे दुसर्याने, आम्ही मात्र अनिर्बंधपणेच वागणार व वावरणार म्हटल्यावर दुसरे काय होणार? कळते; पण वळत नाही, असे म्हणता यावे ते त्यामुळेच.
----------------
महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या संकटाचा संबंधित यंत्रणांवरील ताण वाढला आहे. तसे पाहता गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी निपटण्यात व्यस्त आहे. डॉक्टर, नर्सेस, वाॅर्डबाय असे सारेच जण जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांवर उपचार करीत आहेत. अनेकांनी तर या काळात रजाही घेतलेल्या नाहीत. पोलीस यंत्रणाही बंदोबस्तात अडकलेली आहे. अधिकारी व अन्य कर्मचारीवर्गही नेहमीची कामे व जबाबदाऱ्या सांभाळून कोरोनाविषयक कामावर देखरेख ठेवून आहे. या सर्वांवरच कामाचा ताण आहे हे नाकारता येणारे नाही. अशा स्थितीत जमावबंदी, संचारबंदीचा नियम मोडून उगाच भटकणाऱ्यांच्या मागे पोलिसांना दंडुका घेऊन पळत फिरावे लागणार असेल किंवा फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्यांना अंतरा-अंतराने उभे करण्याची वेळ येणार असेल तर त्यात वेळ व श्रमाचाही अपव्ययच घडून यावा. सद्य:स्थितीत आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे, म्हणूनच राज्यातील ठाकरे सरकारने ‘मी जबाबदार’ मोहीम सुरू केली आहे. कोरोनाची साखळी खंडित करायची असेल तर सर्वांना जबाबदारीने वागावे लागेल. कोरोनाचे संकट त्रासदायी आहे हे जर आपल्याला कळत आहे तर त्यासंबंधीची काळजी आपल्या वर्तनात वळलेली दिसायला हवी इतकेच यानिमित्ताने.
https://www.lokmat.com/editorial/people-understands-corona-crisis-situation-not-taking-enough-precautions-a584/
Wednesday, April 7, 2021
Saraunsh published in Lokmat on April 04, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210404_4_18
https://www.lokmat.com/nashik/ignorance-being-only-increases-severity-crisis-a321/
Thursday, April 1, 2021
EditorsView Published in Online Lokmat on April 01, 2021
बाजारातील गर्दी टाळण्यासाठीचा अनोखा प्रयोग...
किरण अग्रवाल /
कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या संकटाची चर्चा झडू लागली आहे. लॉकडाऊनचा मार्ग हा कोरोना रोखण्यासाठी उपयोगी ठरतो, असा शास्त्रीय निष्कर्ष अद्याप तरी हाती नाही, किंबहुना तो सामान्यांच्या जिवावर उठतो असाच मागचा अनुभव आहे; त्यामुळे विरोधकच काय सत्ता पक्षातीलही अनेकांचा त्यास विरोधच असून, त्याऐवजी निर्बंध कडक करण्यास किंवा गर्दी टाळण्यासाठीचे अन्य पर्यायी मार्ग शोधण्यास सर्वमान्यता आहे. बाजारातील गर्दी आटोक्यात आणून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने नाशिक महापालिका व पोलीस आयुक्तालयाने बाजारपेठांमध्ये प्रवेशासाठी निर्बंधाचा जो प्रयोग राबविला आहे त्याकडे याचदृष्टीने बघता यावे.
कोरोनाच्या बाबतीत देशांतर्गत महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक बाधित संख्या असलेल्या टॉप टेन जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड व नगर असे आठ जिल्हे आहेत. गेल्या आठवड्यातील रुग्णवाढीच्या सरासरी टक्केवारीतही महाराष्ट्र देशात सर्वात पुढे असून, ही वाढ 23 टक्के इतकी आढळून आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण व नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेत देशातील एकूण कोरोना स्थितीविषयक जी माहिती दिली त्यात महाराष्ट्राच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या राज्यात तीन लाखावर उपचाराधीन रुग्ण असून, सर्वाधिक 57 हजारपेक्षा अधिक उपचाराधीन रुग्ण पुण्यामध्ये आहेत. त्यानंतर मुंबई व नागपूरचा नंबर लागतो. हाताबाहेर जाऊ पाहणाऱ्या या स्थितीला वेळीच नियंत्रणात आणायचे तर कठोर उपाययोजनांची गरज आहे, त्यासाठी यंत्रणांनी सक्रिय होण्याची आवश्यकता आहे; परंतु त्याऐवजी लॉकडाऊनच्या उपायाची चर्चा होऊ लागल्याने त्याची झळ अनुभवून झालेल्यांच्या पोटात धस्स होणे स्वाभाविक ठरले आहे.
---------------
मुळात गेल्या लॉकडाऊनचा अनुभव किती वा कसा जीवघेणा ठरला हे नव्याने सांगण्याची गरज नाही, शिवाय काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्येही दहा दिवसांचा लॉकडाऊन केला गेला; परंतु त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याची नोंद नाही, किंबहुना लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी होत असल्याचा शास्त्रीय निष्कर्षही नाही; मग तो पुकारून सामान्यांवर वरवंटा कशाला फिरवायचा? गर्दीतून होणारा संसर्ग टाळायचा असेल तर शासन प्रशासनाने सध्या जे निर्बंध लागू केले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तरी पुरे अशी स्थिती आहे; पण तेच पूर्ण क्षमतेने होत नाही. नागरिकांनी याबाबत स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे; पण ते घेणार नसतील तर यंत्रणांनी दंडुका उगारायलाच हवा. काही लोकांच्या बेफिकीरपणाची सजा सर्वांना देणे योग्य ठरणार नाही, लॉकडाऊनला सर्वच पातळीवरून विरोध होतो आहे तो त्यामुळेच.
यासंदर्भात बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी नाशिक पोलीस व महापालिकेने जो अनोखा प्रयोग अमलात आणला आहे तो नक्कीच दखलपात्र ठरावा. आपल्याकडे बाजारासाठी जाताना सहकुटुंब जाण्याची प्रथा तर आहेच, शिवाय काही खरेदी न करणारे हौसेगवसेही केवळ फिरण्यासाठी म्हणून बाजारात भटकत असतात असेही आढळून येते. यातून बाजारात होणारी गर्दी व त्यातून होऊ शकणारा संसर्ग टाळण्यासाठी बाजारपेठात प्रवेशासाठी प्रारंभी दोन दिवस पाच रुपये प्रतिव्यक्ती तिकीट ठेवण्यात आले, त्यामुळे गर्दीला आळा बसलेला दिसून आला. त्यानंतर शुल्क हटवून केवळ टोकन देण्याची पद्धत अवलंबून पाहण्याचे आदेश दिले गेले आहेत. सदर टोकन उपलब्ध करून दिलेल्या निर्धारित वेळेच्या आत परत न करणाऱ्यास पाचशे रुपये दंड आकारण्याची योजना आहे. अर्थात ही सुरुवात आहे. नवीन प्रयोग असल्यामुळे यातही काही ठिकाणी थोडाफार गोंधळ जरूर उडतो आहे; परंतु गर्दी टाळण्याच्या दृष्टीने तो उपयोगी सिद्ध होण्याची अपेक्षा करता यावी. ग्राहक तसेच दुकानदार अशा दोन्ही घटकांचाही या योजनेस पाठिंबा मिळत असल्याचे पाहता लोकांना निर्बंधामधील बदल किंवा वेगळेपणा, सक्तपणा मान्य आहे; पण लॉकडाऊन नकोय, हेच लक्षात घ्यायचे. तेव्हा अनुभवून झालेल्या व विविध पातळ्यांवर खूप मोठे नुकसान ज्यामुळे ओढावले त्या लॉकडाऊनसारख्या मार्गाऐवजी बाजारातील गर्दीवरील निर्बंध विषयक नवनवे प्रयोग करून बघायला हरकत नसावी.
https://www.lokmat.com/editorial/coronavirus-unique-experiment-avoid-market-congestion-a629/
Subscribe to:
Posts (Atom)