Monday, October 30, 2023

एकदा हरवून तर बघा या किलबिलाटात...

Oct. 24, 2023 एकदा हरवून तर बघा या किलबिलाटात...
'त्या' तशा रोजच येतात, खूप मस्ती करतात. त्यांचा धांगडधिंगा न्याहाळत बसणं हेच आमच्यासाठी आनंददायी असतं. बरे, त्यांना जरासा आवाज चालत नाही, दाराच्या पडद्याआड जरा सावली दिसली की त्या भुर्र उडून जातात, मग आमची घरात भांडणं होतात; की तुमच्यामुळे 'त्या' पळाल्या म्हणून.. आजही तेच झाले. मी सहज त्यांचा फोटो काढायला गेलो म्हणून त्या गेल्या उडून. सौ. आणि आमच्या धाकटीने लगेच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. म्हणाले, त्यांनाही काही प्रायव्हसी हवी की नाही?, तुम्हाला भलतीच हौस त्यांचे फोटो काढायची.. May be, त्या सर्व मैत्रिणी असतील. कधी कधी त्यांच्यासोबत 'ते' ही असतात. येतात दोन घटका, पाणी पितात अन छान पाण्यात चिंब भिजतातही, नंतर एकमेकांवर पाणी उडवतात... धमाल करतात. तुम्ही दिला त्यांचा मूड घालवून! मी म्हटले, असा किंवा इतका विचार तर मी केलाच नाही. चुकलेच माझे. खरंच काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात. त्याचा आनंद मनात साठवून ठेवायचा असतो. पत्रकारिता स्वस्थ बसू देत नाही म्हणून उगाच प्रत्येक बाबीची फोटोग्राफी करण्याची गरज नसते... हे शिकायला मिळाले यातून. ****
आमच्या एका खिडकीत असेच एक कबूतर व कबुतरीची जोडी मागे येऊन बसे. कोरोना काळात मी क्वारंटाईन असताना माझ्या नजरेने त्यांना टिपले होते. त्यांची गुटूर्र गु कळत नसे, पण वर्तनावरून अंदाज बांधता येई! त्यांची आठवण झाली यानिमित्ताने. आता ती जोडी दिसत नाही. कुठे गेले असतील, कसे असतील ते, त्यांच्या खासगी आयुष्यात आपल्या डोकावण्यातून ते नाराज होऊन परत आले नसतील का?... या विचाराने मन व्याकुळ झाले. चित्त लागेना. ... या चिमण पाखरांचेही तसे होऊ नये म्हणून मी दाराचा पडदा ओढून घेतला. काही वेळाने त्या पडद्याआड पुन्हा गलका झाला, चिवचिवाट ऐकू आला... तुम्हाला सांगतो, त्यासारखा आनंद नाही! मित्रांनो, तुम्हीही जमेल तेव्हा असा आनंद नक्की शोधा! निसर्ग जपा, पशु पक्षांच्या किलबिलाटात हरवून बसा स्वतःला.. बघा किती मजा येते व समाधान मिळते ते...
#SwamiKirnanand

No comments:

Post a Comment