At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Tuesday, January 2, 2024
Vietnam Tour Diary 2
Dec, 2023
दुचाकीची गर्दी, हिंदी गाणी आणि आदरातिथ्य ... 'या' देशात परकेपण वाटतच नाही!
किरण अग्रवाल /
आग्नेय आशियातील व्हिएतनाम हा देश शीतयुद्धाच्या जखमा बाजूस सारून 'फिनिक्स'प्रमाणे भरारी घेत पर्यटकीय नकाशावर आला आहे. भारताशी सांस्कृतिक व व्यावसायिक साम्य असलेल्या या देशात 90% वाहतूक दुचाकीवर होताना दिसते. पण हे सारे दुचाकीस्वार हेल्मेट घालून शिस्तीत वाहन चालविताना दिसतात. पर्यटक म्हणून आपण दुचाकी राईड घेतली तर चालक आपल्यासाठीही एक्स्ट्रा हेल्मेट घेऊनच येत असल्याचा अनुभव आम्ही घेतला. रात्री रस्ते सुनसान झालेले असले तरी सिग्नल टाळून कोणी गाडी दामटत नाही. विशेष म्हणजे सिग्नलवर पोलीस नसतानाही अशी शिस्त पाळली जाते.
--------------------
खाण्यात सी फूड्स अधिक वापरले जात असलेत तरी, भारतीय फळे व भाजीपालाही मुबलक प्रमाणात मिळतो. तो मीठ - मिरची न वापरता उकळून खाऊ घातला जातो इतकेच, पण उपासमार होत नाही. असे खाणे असल्यामुळेच तेथील लोक अगदी तुकतुकीत दिसतात. पोटाखाली पॅन्ट सरकलेले गुबगुबीत फक्त भारतीय पर्यटक आढळतात. तेथील तुलनेने छोट्या व स्लीक इलेक्ट्रिक बाइक्सवर बसून फिरताना मग अशांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे बघून हसू आवरत नाही. जीवन व आचार पद्धतीत बौद्ध धर्माचे अनुसरण तेथे मोठ्या प्रमाणात आहे. जागोजागी भगवान बुद्धांच्या मोठमोठ्या मूर्ती व पॅगोडाज दिसतात.
----------------------
आपल्याकडे गल्लीत भाजीपाल्याचा ठेला येतो तसे तेथे सकाळी सकाळी हॉटेलच्या बाहेर पडणाऱ्या पर्यटकांसाठी टू व्हीलरवर पर्यटन उपयोगी सामान घेऊन विक्रेते उभे असतात. पर्स, हॅट्स, खेळणी, शोभेच्या वस्तू आदी भरपूर काही असते त्यांच्याजवळ, पण खूप बार्गेनिंग करावी लागते. लाजला किंवा संकोचला तो फसला अशी स्थिती आहे. विशेषतः महिला यात मोठ्या प्रमाणात असतात. दिवसभर कॉलेज किंवा नोकरी करायची आणि सकाळी सकाळी हे फिरते दुकान घेऊन फिरायचे असा त्यांचा दिनक्रम असतो. विशेष म्हणजे या देशाला एवढा निसर्ग लाभला आहे, प्रचंड हिरवाई आहे; तरी काही इमारती वृक्षवेलींनी अच्छादिलेल्या बघावयास मिळतात. आपल्याकडे गच्चीवर परसबाग असते तसे तेथेही दिसते, त्यामुळे आपल्याला व्हिएतनाममध्ये फिरायला गेल्यावर परकेपण म्हणून जाणवतच नाही.
---------------------------
राजधानी हनोईमध्ये आम्ही इंडियन रेस्टॉरंट माशाअल्लाह मध्ये जेवायला गेलो. दिल्लीच्या नोएडातून शेफ म्हणून आलेल्या अली नामक तरुणाने येथे स्वतःच्या रेस्टॉरंटसची शृंखला सुरू केली आहे. या रेस्टॉरंटमध्येच त्याचा मित्र संदीप गायकवाड भेटला. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा येथील हा मराठी तरुण भारतीय दूतावासाच्या सिक्युरिटी विभागात सेवारत आहे. भारतीय पर्यटक आल्यावर त्यांचे अतिशय आपलेपणाने आदरातिथ्य करून गप्पा मारण्यात या तरुणांना होणारा आनंद स्पष्टपणे जाणवत होता. कोरोनापूर्वी या शहरात फक्त चार भारतीय रेस्टॉरंट्स होते, आता भारतीय पर्यटक वाढल्याने त्यांची संख्या 40 वर गेल्याचे संदीपने बोलताना सांगितले. दा नांग मध्येही भरपूर इंडियन हॉटेल्स आहेत. तेथे गेल्यावर अगदी जुन्या जमान्यातील राजेश खन्ना, राजकुमार व मधुबालाच्या चित्रपटातील जुनी गाणी ऐकायला मिळतात. एका हॉटेलमध्ये आम्ही लेडी वेटरला 'ओनियन' आणायला सांगितले, तर तिने स्माईल देत ' यु मीन कांडा' (कांदा) म्हणून विचारले. अशावेळी होणारा आनंद काही वेगळाच असतो.
----------------------
भारत व व्हिएतनामचे संबंध अगदी दुसऱ्या शतकापासूनचे जुने सांगितले जातात. भारत कायम व्हिएतनामचा पाठीराखा राहिला आहे. अगदी अलीकडेच म्हणजे जुलै 2023 मध्ये भारताने आपली आयएनएस कृपाण ही युद्धनौका व्हिएतनाम नेव्हीला दिली. भारताने आपली मिसाईल्सयुक्त युद्धनौका दुसऱ्या देशाला देण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रकार असल्याचे पाहता दोन्ही देशातील प्रगाढ द्विपक्षीय संबंध स्पष्ट व्हावेत. गेल्या वर्षी जून 2022 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्हिएतनामला भेट देऊन 2030 पर्यंतच्या दोन्ही देशांमधील संरक्षण विषयक करारावर स्वाक्षरी केली होती. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही गेल्या वर्षी व्हिएतनामला भेटी देऊन वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या होत्या. अलीकडेच मे 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर संमेलन दरम्यान हिरोशिमा येथे व्हिएतनामच्या पंतप्रधानांसोबत भेट घेतली. तत्पूर्वी 2016 मध्ये मोदी यांनी हनोई येथे भेट देऊन कुआन सु पगोडा येथे भिक्खुंसोबत चर्चा केली होती. यावरून व्हिएतनामसोबतचे आपले राजकीय मित्रत्वाचे संबंधही लक्षात यावेत.
--------------------------
व्हिएतनामी चलन डॉन्ग भारताच्या रुपयापेक्षा खूपच कमजोर असल्याने तेथे गेल्यावर आपल्याला करोडपती होण्याचा आनंद अनुभवता येतो खरा व हजार मूल्याच्याच नोटा तेथे असल्याने सर्व खरेदी त्या तुलनेनेच होते. टॅक्सीचे बिल लाखात होत असले तरी ते भारतीय रुपयात चार-पाचशेच असतात. तेव्हा एकदा व्हिएतनाम जाऊन बघायलाच हवे...
https://www.lokmat.com/travel/two-wheelers-hindi-songs-and-hospitality-indians-dont-feel-like-strangers-in-vietnam-a-a520-c573/
Labels:
Articles
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment