Tuesday, January 2, 2024

Vietnam Tour Diary 3

अजबच! 'येथे' आनंदाला कुलूप लावून लॉक केले जाते.. आपल्याकडे पोराबाळांसाठी नवस करतात, तेथे आनंदी राहण्यासाठी...
किरण अग्रवाल ---------------------- पर्यटन हे अनुभव देऊन जाणारे व बरेच काही शिकवून जाणारे असते हेच खरे, कारण फिरता फिरता काही ठिकाणी काही बाबी अशा आढळून येतात की त्यामुळे आश्चर्य तर होतेच; पण अंतर्मुख व्हायलाही संधी मिळून जाते. व्हिएतनामच्या दौऱ्यात एके ठिकाणी असेच बघायला मिळाले. तेथे परस्परांना आनंद मिळावा व असलेला आनंद टिकून राहावा यासाठी चक्क कुलूप लावून आनंदाला लॉक केले जाते.. आहे की नाही अजब प्रकार ! ------------ व्हिएतनाममधील 'दा नांग' शहर हे ड्रॅगन ब्रिज व स्वच्छ, सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी प्रख्यात आहे. या शहरातून हान (व्हिएतनामी नाव - सोंग हान) नदी वाहते. भारताच्या गुजरातेतील अहमदाबादच्या साबरमती किनारी जसे रिव्हर फ्रंट डेव्हलप केले आहे, तसे डेव्हलपमेंट हान किनारी करण्यात आले आहे. सकाळी भल्या पहाटे व्यायाम करण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत या नदीकिनारी पर्यटकांची गर्दी असते. या नदीवर एक ड्रॅगनच्या आकारातील पूल दहा वर्षांपूर्वी 2013 मध्ये उभारण्यात आला आहे. 666 मीटर लांबीच्या या सहा पदरी पुलावर दर शुक्रवार, शनिवार व रविवारी रात्री नऊ वाजता आतषबाजी केली जाते. यासाठी पर्यटकांना क्रुझद्वारे नदीतून पुलाजवळ नेले जाते व क्रूजवर उभे राहून या आतिषबाजीचा आनंद घेता येतो. ------------- 'हान'च्या किनारीच एक लहानसा पादचारी पुलही उभारण्यात आला असून रेड हार्ट लाईट्सने त्यावर सजावट करण्यात आली आहे. या पुलावरच लोकांकडून परस्परांच्या आनंदासाठी कुलूपे बांधली जातात असे आमचा गाईड रॅन एन युऑन (Tran Van Vuon)ने सांगितले. आपल्याकडे म्हणजे भारतात काही मंदिरांमध्ये मनोकामना पूर्तीसाठी घंटी अर्पण करण्यात येत असल्याने त्या मंदिराबाहेर हजारो घंट्या बांधलेल्या दिसतात. काही मजारवर धागे बांधले जातात, तसे ही कुलूपाची लॉकिंग ट्रॅडिशन. मुला बाळांसाठी नवस नव्हे, तर एकमेकांना आनंद लाभावा म्हणून ही कुलपे लावली जातात. या पुलावर अशी हजारो कुलपे बांधली गेलेली बघावयास मिळाली. विविध प्रकारच्या कुलपांचे प्रदर्शनच जणू. ------------- विशेष म्हणजे, आपल्याकडे गाडीच्या बोनेटवर श्री गणेशाची मूर्ती लावलेली असते तसे तेथे प्रत्येक गाडीच्या बोनेटवर, घरातल्या मंदिरात तसेच दुकानाच्या काउंटरवर 'हॅप्पी मॅन' असतात. आहे त्या स्थितीत समाधान व आनंद मानणारी लोकं येथे असल्याने वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्समध्ये 137 देशांच्या यादीत या देशाचा नंबर 65वा आहे. या हॅप्पीनेसची लॉकिंग सिस्टीम 'दा नांग'च्या या पुलावर पहावयास मिळते. भारतीय अध्यात्म व श्रद्धेला समांतर ठरणारी ही भाव व्यवस्था अंतर्मुख व्हायला भाग पाडणारीच म्हणता यावी. https://www.lokmat.com/travel/vietnam-a-country-where-people-pray-for-each-others-happiness-by-putting-a-lock-on-bridge-a-a520-c573/

No comments:

Post a Comment