Thursday, December 31, 2020

Good bye 2020

31 Dec, 2020 / अक्सर उन ठोकरों को सजदा करने का दिल करता है, जिन्होंने हौसलों को आसमां दे दिया....!
आज सरणारे वर्ष अधिकतर कटू आठवणी देऊन सरत असले तरी, त्या कटू प्रसंगांनी नवी जीवनशैली शिकविली आहे हे विसरता येऊ नये. दुःख, कष्ट, चिंता, विवंचना... सारे काही आहे म्हणून तर सुख वा आनंदाचे महत्व; अन्यथा सुखाला सुख व आनंदाला आनंद कसे म्हणता आले असते? आयुष्याच्या प्रवासातील ठेचा खूप काही शिकवून व नवीन उमेदीचे आकाश दाखवून जातात, म्हणून या ठेचकाळण्यातून होणाऱ्या वेदनांमुळे विव्हळत बसणे योग्य ठरू नये. कुण्या शायराचा आवडलेला शेर त्यामुळेच वर उद्धृत केला. तेव्हा, जे सरतेय ते शिकवून चाललेय म्हणून Good bye 2020 म्हणतांना नवीन वर्षाच्या स्वागतास सज्ज होऊया... #KirananandNashik #KiranAgrawalNashik

#EditorsView published in Lokmat Online on 31 Dec, 2020

कोरोनापासून रक्षणासाठी राजभर यांचा घोटभर उपाय! / किरण अग्रवाल : काखेला कळसा असताना गावाला वळसा मारण्याची आपली रीतच पुरानी आहे, त्यामुळे आपल्या आसपास जे आहे ते सोडून आपण भलतीकडेच धुंडाळत बसतो. आजार आपदेच्या स्थितीतही साधे सोपे उपाय करण्याचे सोडून आपण दुसरीकडे नजरा लावून बसतो. कोरोनावरील उपायाबाबतही तोच अनुभव येत असल्यामुळेच भीम राजभर यांच्यासारख्या तज्ज्ञांना पुढे येऊन हे सांगावे लागले, की काही चिंता करू नका; ताडी प्या आणि कोरोनापासून सुरक्षित राहा! म्हणजे बघा इतका सोपा उपाय; परंतु आपण उगाच वेगवेगळ्या लसींकडे डोळे लावून बसलो आहोत आणि संशोधनावर वेळ घालवत आहोत. याला आपल्याकडे घरातल्या आपल्या माणसाबद्दलची गुणग्राहकताच नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?
उत्तर प्रदेशात आमदार असलेल्या भीम राजभर यांनी नुकताच एक मोलाचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे ताडी प्यायल्याने कोरोनापासून रक्षण होऊ शकते. ताडीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते असाही दावा त्यांनी केला आहे. तेव्हा त्यांचा हा सल्ला व दावा पाहता आपण उगाच आठ-नऊ महिने कोरोनावर उपाय शोधण्याच्या भानगडीत वेळ घालवला म्हणायचे. ते रेमडीसीवर की काय म्हणतात ते इंजेक्शन घेण्यापेक्षा आपली ताडी घेतलेली केव्हाही छानच. शासनही उगाच भलती सलती औषधी रुग्णालयांना पुरवत बसले व त्यावर कोट्यवधीचा खर्च केला, त्याऐवजी ताडीचे ग्लास सर्व ठिकाणी भरून दिले असते तर किती बरे झाले असते! औषधी गुणधर्माच्या झिंकचा डोस घेण्यापेक्षा झिंग आणणारी ताडी कोरोनाग्रस्तही चवीने चाखतील की! कोरोनाचे रुग्ण वाढण्याच्या संभावनेतून जागोजागी जे मोठमोठे कोरोना केअर सेंटर उभारून ठेवले गेले आहेत व अधिकतर ठिकाणी ते रिकामेच राहिल्याचेही आढळून येते, तेथे या ताडीचे उपाय योजले गेल्यास तेही भरभरून वाहतील ! पण साध्या सोप्या उपायांवर आमचा विश्वासच नसतो.
राजभर म्हणतात त्याप्रमाणे ताडीमुळे कोरोनापासून रक्षण तर होईलच; पण एकूणच जी भीती समाजामध्ये पसरली आहे ती भीती दूर होऊन उलट रुग्ण आनंदाने चालत कोरोना केअर सेंटरमध्ये येतील, शिवाय राज्याराज्यातील पर्यावरण विभागांना ताडाच्या लागवडीची मोहीम राबवता येईल, म्हणजे औषधी इलाजाला तर ताडी कामास येईलच शिवाय पर्यावरण रक्षणालाही हातभार लागून जाईल. मात्र आपल्याकडे राजभर यांच्यासारख्या अभ्यासकांबद्दलची गुणग्राहकता नाही हेच खरे. ती त्यांच्यात बहन मायावती यांनी हेरली म्हणूनच की काय, या भीम राजभर यांना बहुजन समाज पक्षाच्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. त्यानंतर बलिया येथील सत्कार समारंभातच त्यांनी हा उपाय सुचविला. बरे, इतका सोपा उपाय सुचवणारे राजभर हे उत्तर प्रदेशातील आहेत म्हणून आपण नाराज होण्याचे अगर ईर्ष्या करण्याचे कारण नाही, आपल्या नागपुरातच त्यांचे शिक्षण झाले आहे, हे आपल्यासाठी अभिमानाचेच म्हणता यावे. ............ बरे, ताडी ही फक्त कोरोनापासून रक्षणच करते असे नाही, तर ती गंगाजलपेक्षाही शुद्ध व पवित्र असल्याचेही या राजभर महाशयांनी म्हटले आहे म्हणे. दुर्दैवाने सद्य:स्थितीत उत्तर प्रदेशात बहनजींचे म्हणजे बसपाचे शासन नाही, अन्यथा या प्रदेशाध्यक्षांना तेथील मंदिरांमध्ये भाविकांना गंगाजल देण्याऐवजी ताडी तीर्थ देण्याची शिफारस करता आली असती. यातील शुद्धतेचा मुद्दा एक वेळ ग्राह्यही धरता यावा, कारण ताडाच्या झाडापासून उपलब्ध होणारी ताडी ज्या प्रक्रियेतून बनते ती शुद्धता सिद्ध करणारी असूही शकते; परंतु ही ताडी पवित्रही असेल तर तिला तीर्थाचा दर्जा बहाल करण्याची मागणीही राजभर यांनी करायला हवी. खरेच आपण चंद्र व मंगळावर जाण्याच्या बाता करतो, विज्ञानाचे तसे प्रयत्नही चाललेले दिसून येतात; परंतु राजभर यांनी सुचविलेल्या उपाय व पवित्रतेच्या महत्तेखेरीज ताडीचे इतर गुण लक्षात घेता स्वप्नातच काय, डोळे न मिटताही चंद्र वा मंगळावर जाऊन येणे मुळात अवघड नाहीच. तेव्हा ताडीप्रेमींनी तरी राजभर यांचे समर्थन करायला काय हरकत आहे? राजभर जी आगे बढो... https://www.lokmat.com/editorial/drink-toddy-keep-coronavirus-away-says-bhim-rajbhar-a597/

Monday, December 28, 2020

Thanks..

खुद को पढ़ते है, फिर छोड़ देते है। एक पन्ना जिंदगी का, हम रोज मोड़ देते है ।।
खरे तर पन्नाशीनंतरचा वाढदिवस हा वाढदिवस न राहता काढदिवस असतो, असे म्हटले जाते. पण हा दिवस काढताना, पुढे ढकलतांना जे शिकवून जातो आणि प्रत्येक दिवसात जे मित्र भेटतात ते महत्वाचे. स्वतःला वाचत, परखत पुढे जायचे व आयुष्याचे एकेक पान पलटायचे हेच तर जीवन... या जीवन प्रवासात आपल्यासारखे स्नेही, मित्र, हितचिंतक लाभले हीच काय ती पुंजी व तेच संचित. आपण सर्वांनी भर भरून शुभेच्छा दिल्या, त्या माझे बळ वाढविणाऱ्या आहेत. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व स्नेहाची शिदोरी आयुष्यभर पुरेल अशी आहे. मनःपूर्वक धन्यवाद। स्नेहात राहूया... #KirananandNashik #KiranAgrawalNashik

#Saraunsh publiashed in Lokmat on 27 Dec, 2020

https://www.lokmat.com/nashik/will-tears-repentance-shed-tears-sympathy-a321/

Thursday, December 24, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 24 Dec, 2020

शिक्षा; पण सार्वजनिक सेवेची ! किरण अग्रवाल / हेतू स्वच्छ वा स्पष्ट असले की ते साध्य करण्याच्या प्रयत्नाला गती तर मिळतेच, शिवाय त्यात अभिनवताही आणली जाताना दिसून येते. विशेषत: सरकारी पातळीवरून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कामाबद्दलच्या प्रयत्नात लोकसहभागीता मिळवायची किंवा जनतेचा प्रतिसाद मिळवायचा तर केवळ शासकीय चाकोरीचा अवलंब करून उपयोगाचे नसते, तर प्रभावी व परिणामकारक ठरतील अशा वेगळ्या प्रयत्नांची त्यासाठी गरज असते. असा वेगळेपणा चर्चित ठरून जातो तेव्हा त्यातून उद्दिष्टपूर्तीचा मार्गही सुलभ होऊन जातो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या थुंकीबहाद्दरांना दंडाऐवजी सार्वजनिक सेवा करण्याची शिक्षा सुनावण्याचा प्रकारही असाच परिणामकारी ठरावा.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतेचा विषय अतिशय महत्त्वाचा बनला आहे. यात स्वतःचे संरक्षण करताना इतरांना त्रास अगर संसर्ग होणार नाही यादृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे; परंतु सार्वजनिक ठिकाणी वावरताना तशी काळजी अभावानेच घेतली जाताना आढळते. तोंडाला मास्क न लावता बाजारात फिरताना व खोकताना जसे अनेकजण आढळतात तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारेही मोठ्या प्रमाणात दिसतात. या थुंकीबहाद्दरांवर ठिकठिकाणी दंडात्मक कारवाया केल्या जात असतातच; पण त्या प्रभावी ठरत नसल्याचेच दिसून येते. सवयीचे गुलाम बनलेले अनेकजण टेहळणी पथकाच्या हाती लागले की दंड भरून पुन्हा पुढच्या वेळी तीच चूक करावयास मोकळे होतात. अशांकडून दंड वसूल करून सरकारी तिजोरीत भर घालणे हा यंत्रणांचा हेतू नसतो, तर त्यांना जरब बसून त्यांच्या चुकीच्या सवयी बदलणे अपेक्षित असते. सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य राखण्याचा हेतू यामागे असतो; परंतु केवळ दंडाने या सवयी बदलत नाहीत असाच अनुभव आहे. त्यामुळे मुंबई व नाशिक महापालिकेतर्फे आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडाबरोबरच एक ते तीन दिवस रस्त्यावर झाडू मारण्यापासून कचरा उचलण्यासारखी सार्वजनिक सेवेची शिक्षा ठोठावली जाऊ लागली असून, त्याचा परिणाम दिसून येणे अपेक्षित आहे. .......... दंडाबरोबरच रस्त्यावर झाडू मारायला लावण्याची सार्वजनिक सेवेची शिक्षा संबंधितांसाठी लाजिरवाणी ठरत असल्याने रस्त्यावर थुंकणाऱ्यांच्या प्रमादाला आळा बसणे अपेक्षित आहे. शिक्षेतील ही अभिनवता महत्त्वाची आहे. नाशिकचे सध्याचे महापौर सतीश कुलकर्णी मागे आरोग्य सभापती असताना त्यांनी क्लीन सिटीसाठी खासगी कंपनीला ठेका देऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्याची योजना आणली होती. यातून दंड मोठ्या प्रमाणात वसूल झाला व महापालिकेच्या तिजोरीतही भर पडली; परंतु थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊ शकले नव्हते. सार्वजनिक व सामाजिक भान नसल्याच्या परिणामी हे प्रकार घडून येत असतात. कायद्याच्या आधारे केवळ दंडाद्वारे या गोष्टी नियंत्रणात आणता येत नाहीत तर अभिनवतेने जाणीव जागृती घडवून त्याला अटकाव घालणे शक्य होते. रवींद्रकुमार सिंगल नाशिकचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी यासंदर्भात प्रयोग करून चांगला परिणाम साध्य करून दाखविला होता. दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करताना त्यांनी सर्वप्रथम आपल्या म्हणजे पोलीस विभागातील सहकाऱ्यांना तशी सक्ती केली, आणि विनाहेल्मेट आढळणाऱ्या वाहनचालकांना दंडाऐवजी हेल्मेट कसे गरजेचे आहे याविषयावर निबंध लिहायला लावले. या अभिनवतेतून जाणीव जागृती होऊन नाशिककरांना हेल्मेटशिवाय घराबाहेर न पडण्याची सवय लागलेली दिसून आली होती. आता थुंकीबहाद्दरांनाही दंडाखेरीज सार्वजनिक सेवेची शिक्षा सुनावली जात असल्याने त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे, तेव्हा या उपक्रमाचा अगर पद्धतीचा अवलंब इतर शहरातही केला गेल्यास सार्वजनिक स्वच्छता राखण्यास मदत घडून येऊ शकेल. https://www.lokmat.com/editorial/penalty-public-service-a584/

Monday, December 21, 2020

Thursday, December 17, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 17 Dec, 2020

वाढत्या तक्रारी हे जागरूकतेचेच लक्षण! किरण अग्रवाल । सरकारी कामांबद्दल शंभर टक्के समाधान कोणाचेच व कधीच होणे शक्य नाही, त्याबद्दल तक्रारी या राहणारच; पण या तक्रारींचे प्रमाण किती वा स्वरूप कसे यावर त्यासंबंधीच्या गुणवत्तेचा अगर लोकहिताचा अंदाज जरूर बांधता येतो तसेच आलेल्या तक्रारींची योग्य ती दखल घेतली जाते की नाही यावरून यंत्रणांची संवेदनशीलता स्पष्ट होते. इफेक्टिव वा गुड गव्हर्नन्सचा विचार करता तक्रारीला संधी न देता कामे व्हायला हवीत, त्यासाठी ई निविदासारख्या आधुनिक प्रणालीचा अवलंब केला जाऊ लागला आहे; कामकाजातील पारदर्शिता प्रदर्शित करण्याचेही प्रयत्न केले जात असतात; पण तरी ते शक्य होत नाही. उलट दिवसेंदिवस तक्रारींचे प्रमाण वाढतानाच दिसून येते. सरकारी कामकाजाबाबतच्या तक्रारी दहापटीने वाढल्याच्या आकडेवारीकडे त्याच संदर्भाने बघता यावे.
सरकारी काम आणि थोडे थांब, याचा अनुभव अनेकांना येतो. सरकारी कार्यालयातील काम म्हटले की, ते निर्धारित मुदतीत होईलच याची शाश्वती देता येत नाही. यंत्रणांमधील शिथिलता याला कारणीभूत असते. दगडाखाली हात असल्याची भावना बाळगणारे मोठ्या प्रमाणात असल्याने या दप्तर दिरंगाईबद्दल फारशा तक्रारीही होत नाहीत, त्यामुळे यंत्रणांमध्ये दिरंगाईचा प्रघातच पडून गेला आहे. कामाशी निगडित कागदपत्रे एकाच वेळी सांगण्याची तसदी शक्यतो घेतली जात नाही, एक कागद घेऊन गेले की दुसरा मुद्दा पुढे केला जातो असाही अनुभव बऱ्याचदा येतो. हे झाले वैयक्तिक कामांचे; परंतु सार्वजनिक कामांबद्दलही पारदर्शिता अभावानेच आढळते. त्यामुळे तक्रारींना संधी मिळून जाणे स्वाभाविक ठरते. या अशा तक्रारी गेल्या काही वर्षात वेगाने वाढल्याचे माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून समोर आले आहे. स्वतः पंतप्रधानांच्या अखत्यारित असलेल्या कार्मिक व प्रशिक्षण (डीओपीटी) विभागानेच दिलेल्या माहितीनुसार 2000 पासूनचा आढावा घेता सरकार विरुद्धच्या तक्रारी सुमारे दहा पटीने वाढल्या आहेत. सरकारी कामकाजाबद्दल केल्या गेलेल्या सार्वजनिक तक्रारींचा सन 2000 मधील आकडा 1,08,037 होता तो 2019 मध्ये 18,67,758वर पोहोचला. यातही 2014मध्ये तीन लाखांच्या दरम्यान असलेला आकडा 2015 पर्यंत अवघ्या एका वर्षात दहा लाखांवर पोहोचला. ही आकडेवारी केवळ स्तिमित करणारीच नसून सरकारी कामकाज कसे होत आहे याची स्पष्टता करणारीही म्हणता यावी. ------------------ अर्थात, तक्रारींची संख्या वाढल्याने सरकारी कामांमधील बेफिकिरी किंवा बेपर्वाई अधोरेखित होत असली तरी, दुसऱ्या बाजूने विचार करता सामान्य जनांची सजगता किंवा जागरूकता वाढली आहे हेदेखील यातून स्पष्ट व्हावे. यासंदर्भात माहिती अधिकाराचा कायदा खूप उपयोगी ठरत आहे. ग्राम स्तरापासून ते केंद्रीय स्तरापर्यंतच्या सरकारी व सार्वजनिक कामकाजाची माहिती मिळवण्याचा अधिकार या कायद्यान्वये नागरिकांना प्राप्त झाला आहे, त्यामुळे नागरिकांची सजगता वाढली आहे आणि त्याच्या परिणामी तक्रारींचा ओघ वाढला आहे. पूर्वी मुळात तक्रारीसाठी कुणी पुढे येत नसे व ज्याला तक्रार करायची त्याला ती नेमकी कुठे करावी याचा उलगडा होत नसे; परंतु आता त्याबाबत स्पष्टता झाल्याने चुकीचे काही घडले तर तक्रारीसाठी नागरिक पुढे सरसावू लागले आहेत. यात व्यक्तिगत तक्रारी असतातही, परंतु सार्वजनिक हिताच्या कामांकडेही बारकाईने लक्ष ठेवून असणाऱ्या सुजाण नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात हे विशेष. लोकशाही व्यवस्थेत प्रबळ विरोधी पक्षाचे असणे जसे महत्त्वाचे व गरजेचे मानले जाते त्याच प्रमाणे नागरी कामांबद्दल जनतेने रखवालदाराची भूमिका बजावत आक्षेपार्ह बाबींबद्दल संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याची सजगता दाखविणे अपेक्षित आहे. तसे झाले तर भलेही तक्रारी वाढल्याचे दिसून येईल, परंतु त्यातून अंतिमतः नागरी कामे संबंधितांकडून अधिक काळजीपूर्वक व गुणवत्तेची घडून येतील तसेच कामाचा निपटाराही लवकर होईल हे नक्की.­­­­ https://www.lokmat.com/editorial/growing-complaints-are-sign-awareness-a301/

Monday, December 14, 2020

#Saraunsh published in Lokmat on 13 Dec, 2020

https://www.lokmat.com/nashik/indifference-majority-nashik-municipal-corporation-a338/

Thursday, December 10, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 10 Dec, 2020

अर्धा ग्लास भरू पाहताना... किरण अग्रवाल / राजकीय मतभिन्नता कुणाची काहीही असो; परंतु देशातील चित्र सारे अंधकाराचेच आहे असे अजिबात नाही. समस्या अगर अडचणी कुठे वा कशात नसतात, पण त्यावर मात करून पुढे जाण्यातच खरा पुरुषार्थ असतो. सकारात्मकता पेरायची तर त्यासाठी नकारात्मकता दूर सारून विचार करायचा असतो. प्रत्येक वेळी प्रत्येकच बाबतीत काळे चित्र रेखाटायचे नसते; उलट अशासमयी समाधानाच्या किंवा दिलासादायक गोष्टी पुढे आणायच्या असतात, त्याने आत्मविश्वास उंचावायला मदत होते. विशेषतः नवीन पिढी, जी उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात नव्याने पाऊल टाकून स्वतःला सिद्ध करू पाहते आहे त्यांच्यासाठी तरी आशादायी वातावरण व परिस्थिती निर्माण करणे गरजेचे असते. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे ध्वस्त झालेल्या परिस्थितीत तर हे प्रकर्षाने व्हायला हवे. जगातील सर्वात श्रीमंत दहा देशांच्या यादीत भारताचा नंबर लागावा या बाबीकडेदेखील त्याच दृष्टिकोनातून बघता यावे.
गेल्या दिवाळीत कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडत लोकांनी मनसोक्त खरेदी केली त्यामुळे बाजारात चैतन्य दिसून आले होते, त्यानंतर ही स्थिती पुढे कायम राहिल्याने ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा रुळावर येऊ पाहताना दिसत आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात जमा झालेल्या वस्तू व सेवा कराची (जीएसटी) जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यावरून हे स्पष्ट व्हावे. नोव्हेंबर महिन्यात एक लाख चार हजार 963 कोटी रुपयांचा कर महसूल जमा झाला आहे, जो गेल्या वर्षातील नोव्हेंबरच्या महसुलापेक्षा अधिक आहे. महसुलातील ही वाढ अर्थव्यवस्था बाळसे धरत असल्याचे निदर्शक म्हणता यावी. अर्थात एकीकडे ही माहिती पुढे आलेली असतानाच दुसरीकडे आणखी एक समाधानाची बाब पुढे येऊन गेली आहे ती म्हणजे सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा नंबर ब्रिटन आणि फ्रान्सच्या पाठोपाठ सातव्या क्रमांकावर आहे. क्रेडिट स्वीस या मान्यवर संस्थेच्या अहवालानुसार भारताकडे 12.61 लाख कोटी डॉलर्सची म्हणजे 822.7 लाख कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. गरिबी किंवा दारिद्र्यरेषा तसेच कुपोषण, उपासमारी आदीची कितीही चर्चा होत असली तरी, त्या पार्श्वभूमीवर ‘अशी श्रीमंती’ पुढे यावी हे दिलासादायकच म्हणायला हवे.
श्रीमंतीच्या बाबतीत बोलायचे तर, या कोरोनाकाळात म्हणजे गेल्या सहा महिन्यात आपल्या देशात नवीन 15 अब्जाधीश बनल्याचे फोर्ब्जच्या अहवालातून समोर आले आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या वेगाने वाढत असून, ती 119 झाली आहे. या वार्ता निश्चितच सकारात्मकता पेरणाऱ्या आहेत. अब्जाधीशांचीच चर्चा काय करायची, सामान्यांचीही क्रयशक्ती वाढत असून, जीवनमान उंचावत असल्याचे म्हणता येणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. गेल्या तिमाहीत म्हणजे ऐन कोरोनाच्या काळात जुलै ते सप्टेंबरमध्ये देशातील डेबिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या तब्बल 12 टक्क्यांनी वाढली असून, ती 85 कोटी 53 लाखांवर पोहोचली आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून एक लाख 27 हजार कोटींची देवाण-घेवाण झाली आहे. भलेही सुरक्षिततेचा भाग म्हणून लोक डेबिट कार्ड व ई-कॉमर्सकडे वळले असतील; परंतु या माध्यमातून होणाऱ्या उलाढालीचे आकडे हे खरेच अर्थकारण गतिमान होऊ पाहात असल्याचेच दर्शविणारे आहेत. शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही विक्रमी नोंद केली आहे, या सर्वच बाबी दिलासादायक व उभारी देणाऱ्याच आहेत.
या सर्व बाबींची नोंद घेण्याचे कारण म्हणजे, कोरोनानंतर सर्वसाधारणपणे बहुतेकांशी बोलताना जो नकारात्मकतेचा सूर आढळून येत होता त्यात आता बऱ्यापैकी सुधारणा झालेली दिसत आहे. उद्योग- व्यवसाय बर्‍यापैकी गतिमान होत असून, आर्थिक चलनवलनही पूर्वपदावर येत आहे. अर्थात याकडे बघताना ज्याची जशी नजर तसे ते दिसते हेदेखील खरे. ग्लास पाण्याने अर्धा भरलेला असताना, तो अर्धा रिकामा आहे असेच अनेकांकडून सांगण्यात येते. हे नकारात्मक मानसिकतेचे द्योतक म्हणवले जाते. सद्यस्थितीत अर्थकारणाला मिळू पाहत असलेली गती लक्षात घेता असा अर्धा रिक्त ग्लासही आता भरू पहात असल्याचे म्हणता यावे. हे केवळ समाधानाचेच नसून कोरोनाच्या संकटामुळे धास्तावलेल्या मानसिकतेवर समाधानाची, दिलाशाची फुंकर मारणारेच आहे. त्या सकारात्मकतेनेच त्याकडे बघायला हवे. https://www.lokmat.com/editorial/trying-fill-half-glass-indian-economy-after-corona-a520/

Monday, December 7, 2020

Thursday, December 3, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 03 Dec, 2020

बुरसटलेल्या विचारांचे विसर्जन गरजेचे ! किरण अग्रवाल मंगळ ग्रहावर पाण्याचे सरोवर सापडल्याने तेथे जीवसृष्टीची वसाहत साकारण्याचे आडाखे एकीकडे बांधले जात असताना, म्हणजे मनुष्य चंद्रावर व मंगळावरही पोहोचला असताना त्याच्या मनातील अमंगल विचारांचे धागे काही तुटताना दिसू नये हे खरे तर समाजशास्री वा धुरिणांपुढील आव्‍हानच म्हणायला हवे. ज्ञान-विज्ञान कितीही पुढे गेले तरी पारंपरिक समज-गैरसमजांची जळमटे सुटता सुटत नाहीत. पुढारलेपणाच्या समजात स्री-पुरुष समानतेच्या गप्पा केल्या जात असल्या तरी, वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा अशी मानसिकता बाळगणाऱ्यांच्या विचारांचे जळमटही दूर होऊ शकलेले नाही हे सुजणांना खिन्न करणारे वास्तव असल्याने समाजाच्या पुढारलेपणावर शंकाच घेता यावी.
व्यक्ती अगर कुटुंबाचे असो, की एकूणच समाजाचे; पुढारलेपण हे केवळ साधन-सामुग्री वा संपन्नतेवर जोखायचे नसते तर वैचारिकदृष्ट्या तो किती उन्नत किंवा प्रगल्भ झाला यावर ते मोजायचे असते. भौतिकतेच्या पातळीवर सुखासीन होणे म्हणजे प्रगती झाली, असे आज मानले जात असले तरी ती प्रदर्शनी प्रगती असते. खरी प्रगती ही वैचारिक - मानसिक पातळीवर होणे अपेक्षित असते, कारण बदलांचे किंवा परिवर्तनाचे प्रवाह त्यातून प्रशस्त होत असतात. त्यासाठी पै पैशाची नव्हे, तर शिक्षणाची वा जागरणाची गरज असते. विद्येविना मती नसते हे जे काही म्हणतात ते या संदर्भाने लक्षात यावे; पण विद्येची रेलचेल असलेल्या आजच्या काळातही जेव्हा काही घटना अशा घडून येतात की त्यात संबंधितांची मती मारली गेल्याचे दिसून येते तेव्हा आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहात नाही. अर्थात कालौघात समाजाच्या मानसिकतेत बराच बदल झाला आहे हेदेखील खरे; परंतु अपवादात्मक स्थितीत का होईना जेव्हा काही घटना घडून जातात तेव्हा त्या बाबतीत चिंता व्यक्त होण्याबरोबरच चिंतन करण्याची गरज व्यक्त होऊन जाते. मुलाच्या हव्यासापोटी मुलींचा गर्भातच जीव घेण्याचे प्रकार व या लालसेपायी विवाहितांच्या होणाऱ्या छळाच्या घटना यातच मोडणाऱ्या आहेत. या घटनांतून समाजातील मागासलेपण टिकून असल्याचेच दिसून येते.
विवाहितांच्या छळाची अनेक कारणे आढळून येतात, त्यात मुलगा होत नसल्याने होणाऱ्या छळाचे प्रकार अजूनही आढळून यावेत हे दुर्दैवीच म्हणायला हवे. अगदी अलीकडीलच काही घटना यासंदर्भात बोलक्या ठराव्यात. पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यात माळेगाव बुद्रुक येथे एका कुटुंबात तिसरीही मुलगीच झाल्याने अवघ्या सव्वा महिन्याच्या चिमुरडीला तिच्या जन्मदात्या आईनेच पाण्यात बुडवून ठार मारल्याची घटना समोर आली असून, मातेच्या ममत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ती आहे. सासरच्याकडील अपेक्षा काहीही व कितीही असू द्या; परंतु जन्मदात्रीनेच पोटच्या गोळ्याचा गळा घोटावा हे अतर्क्यच आहे. दुसऱ्या एका घटनेत लग्नानंतर पहिला मुलगाच हवा अशी आशा बाळगणार्‍या एका कुटुंबाने चार महिन्याच्या बाळंतीण सुनेला मारहाण करून तिच्या माहेरी पाठवून दिल्याचा प्रकार नाशिक तालुक्यातील चांदशी येथे घडला आहे. हिंगोली येथेही एका विवाहितेला मुलगीच होते म्हणून मारहाण करून तिचा गर्भ पाडला गेल्याची व नंतर तिला रॉकेल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली गेली आहे. या व अशा सर्वच घटना सुन्न करणाऱ्या असून, समाजाच्या पुढारलेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत.
कन्येच्या जन्माकडे लक्ष्मीचे आगमन म्हणून पाहिले जाऊ लागले असताना व पुरोगामी विचारांची पालखी वाहणाऱ्या महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये मुलींच्या नावाच्या पाट्या दारावर लावल्या जाण्याची प्रागतिकता दिसून येत असताना अपवादात्मक का होईना, मुलासाठी विवाहितांचा छळ होण्याचे किंवा नकोशीचा जीव घेण्याचे प्रकार घडून यावेत हे शोचनीयच ठरावे. मागे केंद्र शासनानेच केलेल्या एका सर्वेक्षणातही देशातील नकोशीचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली होती. तेव्हा या संदर्भात पारंपरिक गैरसमजांची जळमटे दूर करणे गरजेचे बनले असून, केवळ शासन स्तरावरील प्रयत्नाने किंवा कायदे-कानूनमुळे हे होणार नसून सामाजिक संघटनांना व समाज धुरिणांनाही यासाठी जागरणाची भूमिका घ्यावी लागेल. वंशाच्या दिव्याबद्दलची मानसिकता बदलली तरच यासंबंधीचे यश लाभेल. ‘मुलगा मुलगी एक समान’चा नारा त्यासाठी मनामनामध्ये रुजवावा लागेल. एखाद दुसरी घटना म्हणून या प्रकारांकडे न पाहता, तसल्या बुरसट विचाराचे तंतू अजूनही समाजात आहेत यादृष्टीने त्याकडे पाहून त्या तंतूंचे, विचारांचे समूळ विसर्जन करण्यासाठी समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांकडून प्रयत्न व्हायला हवेत इतकेच यानिमित्ताने. https://www.lokmat.com/editorial/immersion-rotten-thoughts-necessary-a629/

Monday, November 30, 2020

#Saraunsh published in Lokmat on 29 Nov, 2020

https://www.lokmat.com/nashik/mns-struggles-provide-options-despite-limited-strength-a321/

Thursday, November 26, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 26 Nov, 2020

िबटे फार झाले, बालके जपून ठेवा... किरण अग्रवाल मथळा काहीसा विचित्र वाटेल खरा; परंतु बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात स्थिती खरेच तशी आहे. राज्यातील बिबट्या या प्राण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांचा हक्काचा अधिवास असलेल्या जंगल अगर वनांची संख्या कमी होत आहे त्यामुळे ते उसाच्या शेतात आश्रयास जातात आणि सध्याचा हंगाम ऊसतोडीचा असल्याने जागोजागी बिबट्यांकडून माणसांवर होणारे हल्ले वाढीस लागले आहेत; विशेषतः लहान बालके या बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडत असल्याच्या घटना वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण होणे स्वाभाविक ठरले आहे.
राज्यात नाशिक, नगर, धुळे, अमरावती, नागपूर, सोलापूर, ठाणे आदी परिसरात बिबट्यांचा वावर अधिक प्रमाणात आहे. सर्वत्रच जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने वने भकास झालीत, परिणामी त्यातील पशू, प्राणी नागरी वस्तीकडे वळत आहेत. अर्थात त्यांचे नागरी वस्तीत येणे हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्याने चिंता वाढून गेली आहे. चालू आठवड्यातच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दोन बालकांचा बळी बिबट्याने घेतला आहे तर मागील एका महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मढी, केळवंडी व करडवाडी येथील तीन चिमुरड्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील आपेगाव येथे तर पिता-पुत्र असे दोघेजण अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडले तर बीड जिल्ह्यातील एका पंचायत समिती सदस्याचा पती या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी घडली आहे. त्यामुळे या परिसरातील बिबटे आवरा अशी मागणी पुढे आली आहे. ---------------------------- मार्जार कुळातील अत्यंत चपळ वन्यप्राणी म्हणून बिबट्याची ओळख असून, कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यात हा प्राणी नैसर्गिकरीत्या पटाईत म्हटला जातो. त्यामुळे जंगलाचा अधिवास कमी होत चालल्याचे बघून त्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रात निवारा शोधल्याचे दिसून येते. नाशिक जिल्ह्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र अधिक असलेल्या निफाड, सायखेड्याच्या गंगाथडी व नाशिकच्या दारणाकाठ परिसरात तसेच नगर जिल्ह्यातील गर्भगिरी डोंगर रांगांत बिबट्यांचा वावर व तेथील नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण त्यामुळेच अधिक आहे. विदर्भाच्या काही पट्ट्यातील मका पिकातही बिबट्या आढळून येतो. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने उसात लपून राहणारा बिबट्या उघड्यावर आला व त्यातून ऊसतोड करणाऱ्या मजुरांवर, त्यांच्या लहान मुलांवर होणारे त्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. अशा घटना घडल्या की वनविभागाची धावाधाव होते, पिंजरे लावले जातात व बिबटे जेरबंदही होतात; परंतु एकूणच परिस्थिती बघितली तर यासंदर्भातील वनविभागाकडे असलेल्या मनुष्यबळाची तसेच यंत्रसामग्रीची कमतरता उघड व्हावी. साधे नाशिक जिल्ह्याचे उदाहरण घ्या, गेल्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे सुमारे 9 महिन्यात या परिक्षेत्रात 19 बिबटे जेरबंद केले गेले; पण वनविभागाकडे रॅपिड रेस्क्यू व्हॅनच नाही. साध्या कामचलाऊ मालवाहू वाहनाद्वारे या कारवाया केल्या गेल्या. पिंजरेदेखील पुरेशा प्रमाणात नाहीत. तेव्हा शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे बनले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, बिबट्याचा सुरक्षित अधिवास धोक्यात आल्याने तो मनुष्य वस्तीकडे वळाला व त्यामुळे मनुष्य जिवाला धोका निर्माण झाला हे जितके खरे तितकेच बिबट्याचा जीवही त्यामुळे धोक्यात आला हेदेखील खरे. भारतीय वन्यजीव कायदा संरक्षक सूचीमध्ये बिबट्याला स्थान देण्यात आले आहे; परंतु बिबट्याचे बळी जाण्याचे किंवा त्याची शिकार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात 2011 ते 2019 या नऊ वर्षात तब्बल 648 बिबटे मृत्युमुखी पडले असून, त्यात 221 बिबटे ‘रोड कील’ म्हणजे अपघातात बळी गेले आहेत, तर 83 बिबट्यांची शिकार झाली आहे. तेव्हा ही वेळ ओढवू नये म्हणून वन्यप्राण्यांच्या सुरक्षित अधिवासाच्या दृष्टीने पावले उचलली जाणे अपेक्षित आहे. सरकारी मालकीच्या पडीक जागांवर गवत लागवडी केली गेली तर त्यातून बिबट्यांचा अधिवास सुरक्षित होऊ शकेल तसेच बिबट्याचे हल्ले होणाऱ्या भागात ट्रॅप कॅमेराद्वारे वॉच ठेवून पिंजरे लावले गेले तर मनुष्य हानीही टाळता येऊ शकेल. पण राजकारणातच गुंतलेल्या राज्यकर्त्यांना याबाबतची गरज व प्राथमिकता जाणवेल का हा खरा प्रश्न आहे. https://www.lokmat.com/editorial/leopards-now-attacking-humans-their-houses-nashik-a597/

#Saraunsh published in Lokmat on 22 Nov, 2020

https://www.lokmat.com/nashik/bjps-uneasiness-over-sanaps-attempt-return-home-a587/

Saturday, November 21, 2020

मालेगावात कोरोनाचा कहर | Corona Virus In Malegaon | Lockdown | India News

का बनले मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ? लोकमत नाशिकचे निवासी संपादक श्री किरण अग्रवाल यांचा ग्राउंड रिपोर्ट .. (Position of April 30, 2020)


This is an old video. It has been uploaded here just for records

Diwali 2020

15 नोव्हेंबर 2020 ·
Diwali 2020.. यंदा कोरोनाचे सावट आहे, अनेक प्रिय व्यक्ती अकाली सोडून गेलेत; त्याची खंत व बोच मनात आहेच पण उत्सव नेहमीच तिमिरातून तेजाचा मार्ग प्रशस्त करतात. त्याच विश्वास व आशेने हे दीप पर्व ... #KiranAgrawalNashik #ShrutiKruti

Thursday, November 19, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 19 Nov, 2020

तेजी टिकून राहो..! किरण अग्रवाल कोरोनाच्या संकटाचे भय न बाळगता दिवाळी साजरी झाल्याने यंदा बाजारात नेहमीपेक्षाही अधिक तेजी दिसून आली, या तेजीने ढासळलेली अर्थव्यवस्था सावरायला मदत होईलच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गेल्या सात-आठ महिन्यांपासून घोंगावलेल्या संकटाने मनामनांवर जे निराशेचे मळभ दाटून आले होते ते दूर व्हावयास मोठी मदत घडून आली आहे.
यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट नक्कीच राहिले; परंतु जनतेने त्याची कसलीही तमा न बाळगता हा सण साजरा केला. लॉकडाऊनमुळे घराघरातच अडकून पडलेली जनता दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडली. जागोजागचे बाजार गर्दीने फुलून निघाले. बंद राहिलेल्या काळात जेवढा व्यवसाय झाला असता त्यापेक्षा अधिक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या आठवडाभरात झाला. मुंबईच्या बाजार समितीमध्ये दहा दिवसांमध्ये तब्बल 3600 टन सुकामेव्याची विक्री झाली, ज्यात 135 कोटींची उलाढाल झाली. मुद्रांक शुल्क कपात व कमी व्याजदरात उपलब्ध असलेले गृहकर्ज आदी कारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठी उलाढाल झाली. एकट्या नाशकात साडेचारशे ते पाचशे फ्लॅटची बुकिंग या काळात झाली, त्यामुळे येत्या दोन-अडीच महिन्यात रेडीपझेशन फ्लॅटचा तुटवडा जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाहन उद्योगातही भरभराटीचे चित्र असून, अनेक कंपन्यांच्या चारचाकी वाहनांना दीड ते दोन महिन्यांची वेटिंग आहे इतकी मागणी वाढली आहे. कमीत कमी डाऊन पेमेंट व विविध वित्तीय संस्थांनी दिलेल्या आकर्षक ऑफर्स यामुळे मध्यमवर्गीयांनी दुचाकीची खरेदीही मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजन व पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दरही काहीसे घसरल्याने सोने-चांदीला चांगली मागणी राहिली. शेअर बाजारही तेजीत राहिला. एकुणात बाजारात उत्साह व आनंदासोबतच आर्थिकदृष्ट्या तेजीही राहिली. ---------------- महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या या काळातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातील भारतीय उद्योगपतींच्या राजेशाही थाटाचा मुद्दा एकीकडे चर्चेत आला असतानाच दुसरीकडे भारतातील श्रीमंतांची संख्या वाढत असल्याचीही वार्ता आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या एका रिपोर्टनुसार सन 2000 मध्ये भारतातील अब्जाधीशांची जी संख्या अवघी नऊ होती ती आता 119 झाली आहे. कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाही गेल्या सहा महिन्यात पंधरा नवीन अब्जाधिश झाल्याचे फोर्ब्जच्या वृत्तात म्हटले आहे. गेल्या एका दशकात देशातील अब्जाधीशांची संपत्ती सुमारे दहा पटीने वाढल्याचाही एक अहवाल आहे. हा वेग इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे अधिक आहे. अलीकडे आपल्याकडील अनेक उद्योगसमूहांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील समूहांशी व मान्यवर व्यक्तींसोबत करारमदार झाल्याने त्यातूनही आर्थिक चलनवलनाला यापुढील काळात आणखी मोठा हातभार लागण्याची अपेक्षा आहे. यातून श्रीमंत व गर्भ श्रीमंतांच्या यादीत होणारी लक्षणीय वाढ पाहता लवकरच आपण इतर सक्षम अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्याही पुढे गेलेलो असू. या वर्गाबद्दल असूया बाळगण्याचे कारण नाही, उलट देशाच्या समृद्धीचा दर त्यांच्यामुळे उंचावतो आहे याचा आनंद अगर समाधान बाळगता यावे. कोणताही उद्योग व्यवसाय भरभराटीस येतो तेव्हा तो अनेकांना रोजगार देऊन जातो व अर्थकारणाला अधिक गतिमानता प्रदान करून जातो हे येथे विसरता येऊ नये. ----------------- या पार्श्‍वभूमीवर दिवाळीनिमित्त बाजारात आलेली तेजी सामान्य, छोट्या व मध्यम उद्योग व्यावसायिकांनाही दिलासा देणारी व त्यांच्यातील निराशेचे वातावरण दूर करणारीच म्हणायला हवी. आर्थिक सधन संपन्नतेत खारीचा वाटा म्हणून त्याकडे नक्कीच बघता यावे, तेव्हा बाजारातील हा तेजीचा माहौल कायम ठेवायचा असेल तर कोरोनाच्या संकटाबाबतची सावधानता दुर्लक्षून चालणार नाही; कारण विदेशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्याचे पाहता व दिल्लीतही ज्या वेगाने पुन्हा संसर्ग वाढल्याच्या वार्ता येत आहेत त्याकडे बघता देशातील सर्वाधिक बाधित आढळलेल्या महाराष्ट्रात गाफील वा बेफिकीर राहणे धोक्याचे ठरेल. दिवाळीच्या खरेदीसाठी ज्यापद्धतीने गर्दी उसळलेली व त्यात बेफिकीरपणा आढळून आला तो भीती वाढवणाराच ठरला आहे. शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांखेरीज कुटुंब व व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकानेच यासंदर्भाने खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. https://www.lokmat.com/editorial/keep-momentum-market-a301/

Deepotsav 2020

14 नोव्हेंबर 2020 ·
ज्ञानाचा व माहितीचा प्रकाश पेरणारा दीपोत्सव... लोकमतचा दीपोत्सव दिवाळी अंक म्हणजे उत्सवच असतो. विविधांगी माहितीने नटलेल्या या अंकाचे प्रकाशन नगर रचना विभागाच्या सहा संचालक प्रतिभा भदाणे, सिद्धहस्त लेखिका मृदुला बेळे व ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समवेत दीपोत्सवच्या संपादक अपर्णा वेलणकर, सहा उपाध्यक्ष बी बी चांडक अंक सर्वत्र उपलब्ध झाला असून त्यासाठी लोकमतची कार्यालये, जागोजागचे वार्ताहर, विक्रेत्या बांधवांकडेही मागणी नोंदविता येईल #LokmatNashik #LokmatDipotsav

#Saraunsh published in Lokmat on 15 Nov, 2020

https://www.lokmat.com/nashik/if-you-want-maintain-excitement-festival-you-need-be-careful-a321/

Thursday, November 12, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 12 Nov, 2020

चला, हवा स्वच्छ ठेवूया... किरण अग्रवाल -------- सामाजिक शहाणपण हे सार्वत्रिक पातळीवरून प्रदर्शित होते खरे, पण त्याची सुरुवात ही वैयक्तिक स्वरूपातच होत असते. एकाने घेतलेला शहाणपणाचा निर्णय जेव्हा अनेकांसाठी आदर्शाचा, अनुकरणाचा आणि दिशादर्शक विषय ठरून जातो तेव्हा त्यातून आपोआपच सामाजिक शहाणपण प्रस्थापित होते. कोरोना महामारीच्या अनुषंगाने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या विषयाकडे त्याचदृष्टीने बघितले जाणे गरजेचे आहे, कारण पर्यावरण संवर्धनापुरताच नव्हे तर यंदा जीवन रक्षणाशीही त्याचा संबंध अन्योन्यपणे जोडला गेलेला आहे.
कोरोना संसर्ग बाधितांची समस्या ही प्रामुख्याने श्वसन क्रियेशी निगडित असते व त्यातील जटिलता त्यामुळेच आकारास येते. रुग्णास ऑक्सिजन लावण्याची व प्रसंगी व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळही यातूनच उद‌्भवते. श्वसनाची सुलभता कायम राखायची असेल तर त्यासाठी हवेची शुद्धता गरजेची आहे. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे वायुप्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. फटाक्यांच्या धुरातून श्वसनाला हानिकारक ठरणारे वायू हवेत मिसळतात व प्रदूषण घडून येते. अस्थमासारखा श्वसनाशी संबंधित विकार असलेल्यांना तर दरवर्षी दिवाळीत या संकटाचा सामना करण्याची वेळ येते. यंदा तर सर्वांचाच कोरोनाच्या महामारीशी झगडा सुरू आहे, त्यामुळे श्वसनाला बाधा ठरणारे वायुप्रदूषण कटाक्षाने टाळणे गरजेचे बनले आहे. त्याच दृष्टीने शासन-प्रशासन, वैद्यकीय व्यावसायिक व सामाजिक संघटनांकडूनही यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे कळकळीचे आवाहन केले जात आहे. तेव्हा या आवाहनाला आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे, कारण दिवाळीचे फटाके हा आता केवळ आपला वैयक्तिक आनंदाचा भाग उरलेला नसून आपल्या आसपासच्या व आपल्याही जिवलगांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा विषय बनला आहे. -------- महत्त्वाचे म्हणजे, शासन-प्रशासन आपल्यापरीने काम करत असले तरी समाजमन जागृत होते तेव्हा खबरदारीची धुराही समाजाकडूनच वाहिली जात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. गेल्या गणेशोत्सवाच्या पर्वातच त्याचा प्रत्यय येऊन गेला आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता या उत्सवातील सार्वजनिकता टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. जनतेनेही त्याची निकड लक्षात घेऊन अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा केला. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना यंदा घराघरात मोठ्या प्रमाणावर झालीच शिवाय विसर्जनही घरच्या घरी करण्यात आले. त्यामुळे जलप्रदूषणही कमी झाले. तोच कित्ता दिवाळीत गिरविला गेल्यास वायुप्रदूषण टाळता येणे शक्य होणार आहे, जे कोरोनाबाधितांसाठी तसेच प्रत्येक घरातील वयोवृद्धांसाठीही अत्यंत आवश्यक आहे. आपला आनंद हा इतर कोणाच्या जिवावर उठणार नाही ना याची जाणीव ठेवून दिवाळी साजरी केल्यास त्यातून फटाकेमुक्ती आपोआपच घडून येईल. -------- विशेष म्हणजे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादानेही देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी लागू केली असून, त्यात महाराष्ट्रातील अठरा शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ज्या शहरांमधील हवेची गुणवत्ता घसरलेली किंवा खराब आढळून आली होती तिथे ही बंदी घालण्यात आली असून, ज्या ठिकाणी गुणवत्तेची पातळी माफक प्रमाणात घसरली आहे तिथे ग्रीन फटाक्यांना काही नियमांच्या अधीन परवानगी देण्यात आली आहे. या बंदी असलेल्या शहरांमध्ये आपल्याकडील मुंबई, पुणे, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद आदी शहरे असल्याचे पाहता येथील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे स्पष्ट व्हावे. तेव्हा या शहरांमधील नागरिकांची जबाबदारी तर अधिक वाढून गेल्याचे म्हणता यावे. मागे 2018 मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण खात्यातर्फेही स्वच्छ हवा अभियान राबविण्यात येऊन त्यात राज्यातील सहा शहरांनी चांगले प्रयत्न केल्याने त्यांना कोट्यवधींचा निधी वितरित केला गेला. यात देशात सर्वाधिक 244 कोटींचा निधी मुंबई शहराला मिळाला तर शुद्ध हवेसाठी सर्वाधिक अनुदान मिळवणारे महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरले होते. यंदा दिवाळी साजरी करताना हाच लौकिक अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने फटाकामुक्ती साधणे अपेक्षित आहे. ते पर्यावरणासाठीच नव्हे, तर कोरोनामुळे अडचणीत आलेले जीव वाचवण्यासाठीदेखील गरजेचे आहे. त्याकरिता प्रत्येक जण कटिबद्ध होऊया... https://www.lokmat.com/editorial/lets-keep-air-clean-a309/

Monday, November 9, 2020

Lokmat women achievers awards 2020

09 Nov, 2020
'ती'च्या कर्तृत्वाला लोकमतचा सलाम... स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर सर करणाऱ्या भगिनींचा लोकमततर्फे वूमेन अचिव्हर्स अवॉर्डस 2020ने गौरव करण्यात आला, तसेच त्यांच्या यशोगाथेच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व लोकमत चे सहाय्यक उपाध्यक्ष बी बी चांडक यांच्या समवेत... @MILOKMAT initiative #LokmatNashik #KiranAgrawalNashik #LokmatWomenAchieversAwards2020

#Saraunsh published in Lokmat on 08 November, 2020

https://www.lokmat.com/nashik/allegations-will-explode-after-diwali-a321/

Thursday, November 5, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 05 Nov, 2020

फील गुड स्थिती उत्साह वाढविणारी... सण कोणतेही असोत; ते आनंद, उत्साह व ऊर्जा प्रदान करणारेच असतात. त्यामुळे संकटांवर किंवा अडचणींवर मात करीत ते साजरे होताना दिसतात. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच अपेक्षेने बाजारात चैतन्य संचारलेले दिसत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे इतके दिवस तुंबलेले जनजीवन आता प्रवाही होताना दिसत आहे ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. बाजारात दिसणारा हा उत्साह गत पाच-सहा महिन्यातील निराशादायी वातावरणावर समाधानाची फुंकर मारणाराच म्हणावयास हवा. शासनानेही हळूहळू अनेक निर्बंध हटविल्याने जनजीवन पूर्वपदावर आलेले दिसत आहे. अडखळलेली अर्थव्यवस्था रुळावर येत चालल्याचे तर संकेत यातून मिळत आहेतच, शिवाय जनतेच्या मनात जी भीतीची छाया दाटून होती ती दूर होण्यासही यामुळे हातभार लागत आहे ही सर्वात मोठी जमेची बाब म्हणता यावी.
दिवाळी अवघी आठवडाभरावर आलेली असल्याने बाजार फुलला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी व्यावसायिक क्षेत्रात सीमोल्लंघन करीत नवी व्यवस्था वा प्रणालीचा अंगीकार केलेला दिसून आला. कोरोनाने एकूणच जीवनशैली बदलून ठेवल्याचे पाहता त्याचा परिणाम व्यवसायावरही होताना दिसत आहे. संकटामुळे का होईना, काळाची गरज लक्षात घेता अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यापार-उदिमात नवीनता आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्तीलाही इष्टापत्ती ठरवून पुढे जाण्याचा बाणा यातून स्पष्ट झाला. कार्पोरेट पातळीवरील रिलायन्ससारख्या मोठ्या समूहांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांचे जागतिक कंपन्यांशी झालेले करार-मदार या काळात पहावयास मिळालेत. व्यावसायिकदृष्ट्या या मोठ्या कंपन्यांच्या आपसी भागीदाऱ्या व त्यातील टक्केवारीची चर्चा करण्याचे हे ठिकाण नाही, मात्र यामुळे त्यांचा व्यवसाय व आवाका वाढल्याचा लाभ अंतिमतः ग्राहकांनाही होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. कोरोनाला लक्षात घेता आगामी काळातील गरजांनुसार उत्पादन तर पुढे येत आहेच, शिवाय जे आहे त्याच्या वितरणात सुलभता व अभिनवता आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत, जे ग्राहकांच्याच हिताचे ठरणार आहे. यामुळे एकूणच बाजारात जे उत्साहाचे वातावरण आकारास आले आहे त्यामुळे अलीकडे निर्देशांकसुद्धा उसळी घेत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हबकलेल्या मानसिकतेला यामुळे उभारी मिळून जाणे स्वाभाविक ठरले आहे. कोरोनाचा वेग मंदावल्याचे पाहता व त्यावर काहीसे नियंत्रण मिळवता आल्याने शासनानेही हळूहळू अनलॉक करीत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. धार्मिक स्थळे उघडण्याविषयीचे व अन्य काही बाबतीतले निर्बंध कायम आहेत हे खरे, त्यावरून शासनाला विविध आरोपांना व नाराजीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे; पण सुरक्षिततेच्या भूमिकेतून त्याकडे पाहता यावे. अनलॉक करून स्थिती पूर्वपदावर आणताना शासनाने आता अर्थव्यवस्था अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. उद्योजकांना तारणमुक्त पत हमी मिळावी याकरिता आत्मनिर्भर भारत योजनेत आपत्कालीन पत हमी योजना घोषित करण्यात आली होती, त्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख कोटींपेक्षा जास्त वित्त पुरवठा करणाऱ्या कर्ज प्रकरणांना मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येते. ही योजना आता 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली गेली असल्याने त्याचा लाभ कर्जदारांना होऊ शकेल. राज्यशासनाने स्टॅम्प ड्यूटीत कपात केल्यामुळे गृह विक्री वाढून गेली आहे. नाइट फ्रॅंक इंडियाने यासंदर्भात नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मुंबईत मागील आठ वर्षाच्या तुलनेत गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च गृह विक्री झाल्याचे आढळून आले आहे. एका महिन्यात 42 टक्‍क्‍यांची ही वाढ असल्याचे म्हटले गेले आहे. आयएचएस मार्किटच्या अहवालानुसार देशातील सेवा क्षेत्राचा वृद्धीदरही ऑक्टोबरमध्ये सुधारला आहे. सप्टेंबर मध्ये 49.8 अंकावर असलेला हा निर्देशांक ऑक्टोबरमध्ये 54.1 वर गेला आहे जो वृद्धी दर्शवतो.
महत्त्वाचे म्हणजे, कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली; पण गुणवत्तेवर ज्यांची नोकरी शाबूत आहे अशा नोकरदारांना 2021 मध्ये वेतनवाढ देण्याची तयारी 87 टक्के कंपन्यांनी दाखविल्याचे व्यावसायिक सेवा क्षेत्रातील ‘एओन’ने सर्वेक्षणाअंती म्हटले आहे. विविध सरकारी व सहकारी नागरी बँकांनीही गृह व वाहन कर्जाचे दर कमी केल्याने त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे. थोडक्यात सर्वच क्षेत्रांत ‘फील गूड’चे वातावरण आहे. ही सकारात्मकता व उत्साहाची स्थितीच यापुढे वेगाने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे, फक्त ती टिकवून ठेवायची असेल तर शासनाने म्हटल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ओळखून जनतेनेही सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कोरोना रोखण्यासाठी उपचाराचा भाग म्हणून जे निर्बंध लावण्यात आले होते ते हटवण्यात येत असले तरी अनिर्बंध होऊन चालणार नाही. जागोजागी बाजारात गर्दी होत असल्याचे पाहता सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज असून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे हा सवयीचा भाग बनवून घ्यावा लागेल. तसे घडून येवो व दिवाळीच्या निमित्ताने आकारास आलेली बाजारातील उत्साहाची स्थिती यापुढे कायम टिकून व वृद्धिंगत होत राहो याच अपेक्षा. https://www.lokmat.com/editorial/feel-good-status-exciting-a653/

Monday, November 2, 2020

प्रत्येक क्षणाचा उत्सव करूया ...

02 Nov, 2020
प्रत्येक क्षणाचा उत्सव करूया ... 
वर्क फ्रॉम होम संपवून कार्यालयात नियमित झाल्यामुळे कसा गेला हा काळ, असा एक कॉमन प्रश्न सध्या अनेकांकडून केला जातोय. 
खरं तर, नेहमी व्यस्त राहण्याची सवय असल्याने घरात काहीसं घुसमटल्यासारखं झालं खरं... 
खिडकी बाहेर स्वच्छन्दीपणे उडणाऱ्या पाखरांकडे पाहून कुण्या शायराने म्हटलेले माझ्याही ओठांवर आले , 
ऐ उड़ते परिंदे...
कुछ तो दुआ दे खुले आसमान की
पिंजरे का दर्द क्या है
अब समझ चुका है इंसान भी...।
अर्थात, नित्य कर्मापासून फार दूर झालोच नाही त्यामुळे फार वेगळं काही केलं नाही, पण खूप ऐकलं हे नक्की ...
हे ऐकणं घरातल्यांचं तर होतच, पण त्याखेरीज इतर जे ऐकलं ते पूर्णतः  मन प्रसन्न करणारंच होतं

सकाळी सकाळी 'उठी उठी गोपाळा..' पासून ते 'केशवा माधवा...' सारखी भक्तिगीते तल्लीनतेने ऐकली. 
पंडित भीमसेनजींच्या 'इंद्रायणी काठी ..' ऐकता ऐकता कधी टाळी लागायची ते कळायचेच नाही. 
जितेंद्र अभिषेकी यांचे 'हे सुरांनो चंद्र व्हा...' 
आंनद भाटे व राहुल देशपांडे यांचे,' टाळ बोले चिपळीला...'
सुधीर फडके, अरुण दाते, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल असे अनेकांना ऐकलं
उस्ताद बिस्मिल्ला खान यांची शहनाई कान देऊन ऐकली, तर हरिप्रसाद चौरसीया यांचे बासरी वादन व पंडित जसराजजींची 'गोकुल मे बाजत...'ची जुगलबंदी अवर्णनीयच।
पंडित रविशंकर यांची सितार व झाकीर हुसेन यांचा तबला मन भरेस्तोवर ऐकला. 

लतादीदी, आशाताई, किशोर दा, रफी साहब यांना तर ऐकलच, येसूदासही आवर्जून ऐकलेत.. 
'जी करता है, मोर के पाव मे पायलिया पहना दु
कुहू कुहू गाती कोयलिया को फुलो का गहना दु...' 
अहाहा, काय शब्द विलास आहे...
गुलजार यांच्या गीतांनी मनाची स्पंदने नव्याने ऐकायला मिळालीत जणू. 
लहानपणी वडिलांसोबत रसलपुरच्या उरुसात अजीज नाझा कडून ऐकलेली 'चढता सुरज धिरे धिरे...' ही कव्वाली किती तरी दिवसांनी पुन्हा ऐकली. 
निजामी बंधूंची, 'छाप तिलक सब छिनी रे...'
साबरी ब्रदर्सचे,' एक मुलाकात जरुरी है सनम..'
जसपिंदर नरूला यांचे,' ये जो हलका हलका सरूर है... '
राहत फतेह अली खान यांचे,' मेरे रशके कमर..'
असं खूप ऐकलं. मन हरवून जाईपर्यंत... 
गीतांचे शब्द, त्यात डोकावून, डुंबून  ऐकलेत..

सुरेंद्र शर्मा, हुल्लड मुरादाबादी, मूनव्वर राणा, राहत इंदोरी, कुमार विश्वास यांनाही ऐकलं... 
हिंदुस्तान विश्वगुरु क्यो नही होगा, यहा के जेलो मे भी अनेक संत महात्मा जो बैठे है... यासारख्या संपत सरल यांच्या रचनांनी खरेच अंतर्मुख केले.
सर्व प्रकारच्या रस साहित्याची यात्रा केली... 
झरझर वाहणाऱ्या झऱ्याकाठी पाण्यात पाय सोडून देहभान हरपून बसावे तसे बसून ऐकले सारे. 
वाटलं, रोजच्या रहाटगाडग्यात राहून गेलेलं जगणंच हाती लागलं... 
एरव्ही किती तांत्रिक जगणं असतं आपलं? सभोवताली किती आनंद आहे, निसर्ग आहे, शब्द आहेत; स्वर आहेत... आपण काय व किती घेतोय यातलं?
खरंच, प्रत्येकानं स्वतःला विचारून पाहायला हवं हे... 

जगण्याचं ओढणं ओढण्यापेक्षा ते छान मन मस्तकी धारण करून प्रत्येक क्षणाचा उत्सव करीत जगायला कुणी रोखले आहे?


#KiranAgrawal #KirananandNashik

#Saraunsh published in Lokmat on 01 Nov, 2020

https://www.lokmat.com/nashik/why-not-solution-a321/

Thursday, October 29, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 29 Oct, 2020

कोरोनाने दिली स्मार्टपणास संधी... 

किरण अग्रवाल

आपत्ती मग ती कोणतीही असो, त्रासदायक अगर नुकसानदायीच असते याबद्दल वाद नसावा; परंतु कधीकधी ती इष्टापत्तीही ठरून जाते. कोरोनाच्या बाबतीतही तेच होऊ घातले आहे. या महामारीमुळे संपूर्ण जगातील जनजीवन प्रभावित झाले, अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम घडून आला आदी सारे खरे; परंतु हे होत असतानाच दुसरीकडे भीतीतून का होईना सावधानतेचा भाग म्हणून लोक आपल्या सवयी, व्यवहार व वर्तन बदलत आहेत, नवे तंत्र स्वीकारत आहेत; तेव्हा या बदलांकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. कोरोनाच्या काळातील गेल्या तिमाहीत देशात पाच कोटींहून अधिक स्मार्टफोन विक्री झाल्याच्या वार्तेकडेही याच दृष्टिकोनातून बघता येणारे आहे.
कोरोनाबाधितांची संख्या लाखोंच्या घरात असली व अलीकडच्या काळात ती कमी कमी होत असली तरी या संकटामुळे बेजार मात्र सर्वच जण झाले आहेत. प्रत्येकालाच त्याची काही ना काही झळ बसली आहे वा बसत आहे. शेवटी जिवाची भीती ही सार्‍यांनाच वठणीवर आणते, त्यातूनच अनेक सवयी बदलल्या जात आहेत. विशेषतः ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन व सरकारचे प्रयत्न जितके कामी आले नाहीत तितका कोरोना कामी आला म्हणायचा. गेल्या सुमारे सहा महिन्यांच्या कोरोनाकाळात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेच; परंतु भविष्यातही आता हीच सवय कायम होण्याची आशा आहे. नेट बँकिंग, नेट बुकिंग आदीबाबतीत तसेच खरेदीच्याही बाबतीत लोकांनी ऑनलाइनचा पर्याय स्वीकारलेला दिसतो आहे. बाजारात, गर्दीत जाण्याऐवजी घरी बसल्या व्यवहार करण्याकडे कल वाढीस लागला आहे. शिवाय विविध क्षेत्रात नित्य नवे बदल घडून येत असून, शिक्षण व्यवस्थाही ऑनलाइन होऊ पाहते आहे. त्यामुळे निगडित साधन सुविधांची मागणी वाढून गेली आहे. स्मार्टफोन तर यात सर्वाधिक प्राधान्याचे साधन ठरून गेले आहे. संपर्कापासून शिक्षणापर्यंत, बँकिंगपासून खरेदीपर्यंत सारे मोबाइलवर होते, त्यामुळे कोरोनातील नुकत्याच संपलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाही काळात देशात आजवरची विक्रमी अशी पाच कोटी स्मार्ट फोन्सची विक्री झाली आहे. गत २०१९मधील याच तिमाही काळातील विक्रीच्या तुलनेत ही आठ टक्के वाढ असल्याचे नोंदविले गेले आहे. ‘करलो दुनिया मुठ्ठी मे’च्या दिशेनेच ही वाटचाल असल्याचे यातून स्पष्ट व्हावे.

महत्त्वाचे म्हणजे काळाशी सुसंगत व गरजेप्रमाणे डिजिटल साधनांची निर्मिती व खरेदीही वाढून गेल्याने त्यामाध्यमातून आपसूकच डिजिटल साक्षरताही घडून येणार आहे. विद्यार्थ्यांची, तरुणांची नवीन पिढी तर आता याच मार्गावर अग्रेसर होण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे साधनांद्वारे स्मार्टपणाही वाढीस लागणे अपेक्षित आहे. अर्थात कधीकधी साधने असूनही ती समाधान देऊ शकत नाहीत किंवा ती समस्यांना निमंत्रणे देणारीही ठरतात हा भाग वेगळा. स्मार्टफोनच्या बाबतीतच घ्या, फोन हाती असला तरी कनेक्टिव्हिटी नसेल तर तो उपयोगाचा ठरत नाही. ग्रामीण भागात अनेकजण याचा अनुभव घेत आहेत. शिक्षणासाठी म्हणून स्मार्ट फोन घेतला; परंतु रेंज मिळत नसल्याने विद्यार्थ्याला डोंगरावर जाऊन बसावे लागत असल्याच्या वार्ता त्यातूनच वाचावयास मिळतात. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा संगणकीकृत व डिजिटल करण्यात आल्या; परंतु त्यांना विद्युत पुरवठाच नसल्याची वास्तविकताही अनेक ठिकाणी उजेडात आलेली पहावयास मिळाली; तेव्हा केवळ साधन असून उपयोगाचे नाही तर त्यासाठीच्या आवश्यक गरजांची पूर्तता होणेही अपेक्षित असते. आपल्याकडे त्या बाबतीतच वानवा आढळून येते.
पण अडचणी अनंत असल्या तरी त्यातून मार्ग काढता आल्यास यशाचे किंवा समाधानाचे शिखर गाठता येणे अवघड नसते. कोरोनानेही अनेक अडचणींचा डोंगर समोर उभा करून ठेवला आहे; परंतु त्यातून मार्ग काढत सुरक्षितता व सावधानता बाळगत आता सारे काही पूर्वपदावर येऊ पाहात आहे. शासनानेही टप्प्याटप्प्याने अनलॉक करीत विविध सेवा व आस्थापनांना सुरळीत करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तेव्हा अशा स्थितीत फिजिकल डिस्टन्स राखून सुरक्षितता बाळगायची तर डिजिटल साधनांचा वापर व व्यवहार वाढवावेच लागतील. त्यासाठीचे महत्त्वाचे साधन ठरणाऱ्या स्मार्टफोनच्या विक्रीत त्यामुळेच वाढ झालेली दिसून आली आहे, तेव्हा कोरोनाने सर्व उत्पातकारीच घडविले असा निराशेचा सूर न लावता, त्यानिमित्त नवे काही करायला व स्मार्ट व्हायला संधीही दिली, असा विचार करीत सकारात्मकतेने भविष्यातील वाटचाल करायला हवी. https://www.lokmat.com/editorial/corona-gave-smartness-chance-we-need-move-forward-positive-way-a629/

Monday, October 26, 2020

#Saraunsh published in Lokmat on 25 Oct, 2020

https://m.lokmat.com/nashik/khadse-gone-discomfort-those-who-have-not-gone-not-less-a321/ इ पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20201025_6_10

Thursday, October 22, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 22 Oct, 2020

 भय व भूकमुक्तीची प्रतीक्षाच!


किरण अग्रवाल

भय व भूकमुक्ती हा प्रत्येकच निवडणुकीतील सर्वच राजकीय पक्षांच्या वचननाम्यात प्राधान्यक्रमावरील आश्वासनाचा मुद्दा राहत आला आहे; पण म्हणून या बाबी निकालात निघालेल्या दिसून येत नाहीत. दिल्लीतील निर्भया ते हाथरसमध्ये घडून आलेल्या एकापाठोपाठच्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता भय कमी होत नाही, की दारिद्र्यरेषा घटून भुकेची समस्या दूर होताना दिसत नाही. यासंदर्भात जागतिक भूक निर्देशांकात भारताचे नाव यंदा काहीसे वर आले असले तरी ते तळातल्या देशांतच दिसून यावे, हेच पुरेसे बोलके असून, याबाबतीत अजून मोठा पल्ला गाठावयाचा असल्याचेच त्यातून स्पष्ट व्हावे.


महिलांवरील अत्याचाराच्या घटनांसह गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने समाजमन भयभीत होणे साधार ठरून गेले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे भय असताना कोरोनाच्या महामारीने नवीनच जिवाचे भय सर्वांसमोर उभे ठाकले आहे. कोरोनामुळेच लाखो लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले व त्यांच्या नोकऱ्या गेल्या, उदरनिर्वाहाची समस्या त्यांच्यासमोर उभी राहिली; पण आता जसजसे अनलॉक होत आहे तसतशी रोजगारात वाढ होऊ लागली आहे. अर्थात, हरयाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गोवा, दिल्ली आदी १० राज्यांतील बेरोजगारीचा दर अजूनही ११.९ (बिहार) ते २२.३ (उत्तराखंड) असा दोन अंकीच असल्याने त्यातून पुढे येणारी भुकेची समस्या लक्षात यावी. अशात जागतिक भूक निर्देशांकाचा अहवाल आला असून, त्यात भारताचा क्रमांक ९४ वा आहे. गेल्या वर्षी ११७ देशांच्या यादीत हा नंबर १०७व्या स्थानावर होता म्हणजे यंदा तो वर सरकला आहे; पण तसे असले तरी हा क्रमांक यादीतील तळातल्या देशांतच असल्याचे पाहता भुकेच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजनबद्ध व प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे लक्षात यावे.




विशेष म्हणजे भारतातील १४ टक्के जनता कुपोषित असल्याचे या अहवालात म्हटले असून, पाच वर्षे वयाखालील बालकांमध्ये असलेले कुपोषणाचे प्रमाण तब्बल ३७.४ टक्के असल्याचे नमूद आहे. त्यामुळे प्रामुख्याने आदिवासी विभागात कुपोषणमुक्तीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा फेरआढावा घेतला जाणे गरजेचे बनले आहे. केंद्र सरकार व त्या त्या राज्यांतील सरकारांनीही कुपोषणमुक्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरविला आहे; परंतु एवढा खर्च करूनही ही मुक्ती पुरेशा प्रमाणात साधली जाताना दिसत नाही. महाराष्टत आदिवासी विकास विभागाकडून कुपोषण टाळण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो, त्यात आदिवासी माता व बालकांनाही पोषण आहार तसेच औषधी वगैरेच्या योजना आहेत; परंतु कुपोषणावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. एकीकडे कुपोषण रोखता येत नसताना व विकासाचा दर उणे २३ अंशांपर्यंत घसरलेला असताना दुसरीकडे केंद्र् सरकारचे ग्रामविकास मंत्रालय मात्र दारिद्र्यरेषेचे निकष सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. उत्पन्नाच्या निकषावर नव्हे, तर आता संबंधित व्यक्तीचा राहणीमानाचा दर्जा कसा आहे यावर दारिद्र्यरेषा निश्चित होणार आहे, तेव्हा तसे का असेना, परंतु दारिद्र्यातून उद्भवणारी भुकेची समस्या दूर होईल का व विकास दृष्टिपथास पडेल का, हा खरा प्रश्न आहे.


भुकेची समस्या ही अकस्मातपणे निर्माण होत नाही. रोजगार हिरावला जाऊन कमाईचे साधन संपल्यानंतर हळूहळू भुकेची पातळी गाठली जाते. आदिवासी बांधवांमध्ये साधनसंपत्तीच्या अभावातून ती अनुभवास येते; पण असे असतानाही रोजगार वाढल्याचे व कुपोषणमुक्तीसाठी कोट्यवधी खर्च केले गेल्याचे आकडे समोर येतात तेव्हा डोके गरगरल्याखेरीज राहत नाही. सद्य:स्थितीतही कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्या तुलनेत उद्योग-व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यावर नोकऱ्या मिळालेल्यांची संख्या कमी आहे; परंतु सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)च्या सर्वेक्षणात गेल्या सप्टेंबर महिन्यात रोजगार ५.१ दशलक्षांनी वाढल्याचे व बेरोजगारी ७.३ दशलक्षांनी कमी झाल्याचे म्हटले आहे. तेव्हा प्रत्यक्षात दिसून येणारी वास्तविकता व सर्वेक्षणाचे अहवाल यात तफावत अगर विसंगतीच आढळते. मात्र, संकटांवर मात करीत उद्योग सुरू होत असतील व त्यातून पुन्हा रोजगाराला चालना मिळून भुकेची समस्याही दूर होणार असेल तर आशावादी रहायला हरकत असू नये.  


https://www.lokmat.com/editorial/editorial-hunger-problem-india-a584/

Tuesday, October 20, 2020

फिरुनी पुन्हा जन्मलो मी...

 19 Oct, 2020

फिरुनी पुन्हा जन्मलो मी... 










पुनर्जन्म वगैरे मानणारा मी नाही, पण आपल्याच चुकीने मरणाच्या दारात जाऊन आल्याने, मी मात्र पुन्हा आलो; असं नक्की सांगू शकतो. 

सिटीकेअरचे माझे फॅमिली डॉक्टर समीर पेखळे, या माणसाच्या बोलण्यात, बघण्यातच काय चमत्कार आहे कोण जाणे; त्यांच्याशी एकदा बोललो व त्यांच्यावर सोपवलं की माझं काम तिथं संपत. दिवस, रात्र न पाहता त्यांनी बारकाईने लक्ष पुरविले, देवत्व लाभलेली ही अशी माणसचं समाजाचं संचित आहेत. SNBT चे डॉ दिलीप गरुड, सांगलीतील हेमॅटोअंकॉलॉजिस्ट डॉ संदीप नेमाणी, सुरतमधील अंकॉलॉजिस्ट डॉ निलेश महाले, डॉ कांचन महाले, दातार जेनेरीकच्या मंजिरी शेख, सिटीकेअर पॅथॉलॉजीचे राजन साळवे... अशी किती नाव घेऊ की जी रात्र रात्र जागलीत, धावलीत माझ्यासाठी. 

पुण्यात डॉक्टर असलेली माझी मेहुणी, डॉ अर्चना तर केवळ मी एकच पेशंट तिच्याकडे असल्यासारखे कायम संपर्कात राहिली. 

महत्वाचे म्हणजे, वृत्तपत्रांसाठी तर हा अतिशय कसोटीचा काळ, पण आमच्या लोकमत समूहाचे चेअरमन आदरणीय श्री विजय बाबूजींचे आशीर्वाद पाठीशी होते. एडिटर इन चीफ, आदरणीय श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांनीही वेळोवेळी फोन करून हिम्मत दिली. संपादकीय संचालक श्री करण बाबू, समूह संपादक श्री विजय बाविस्कर सर, सहा उपाध्यक्ष श्री चांडक सर कायम सकारात्मकता पेरत राहिले. बाविस्कर साहेब तर सातत्याने प्रकृतीचा आढावा घेत होते, धीर देत होते. मी माझे लोकमत असे नेहमी का म्हणतो, तर या माझ्या परिवारानेच अश्यावेळी माझी घट्टपणे पाठराखण केली, मला बळ दिले यातून बाहेर निघण्याचे. 

माझा प्रत्येक सहकारी अस्वस्थ होता, अबोल होता माझ्यासाठी... 

माझे सख्खे शेजारी मुन्नाशेठ, लाडकी संस्कृती, क्षीरसागर या साऱ्यांनी घरची आघाडी सावरली. कुटुंबियांना धीर दिला. 

ते तर माहितीचा फैलाव कटाक्षाने रोखून धरला म्हणून बरे, तरी शब्दशः असंख्य फोन आले 

काळजीचे, धिराचे, सल्ल्याचे, आधाराचे... 

अनेक तर मला घेताही आले नाहीत. 

हे इतके, असे शुभेच्छाचे बळ कुणाच्या नशिबात असते? 


इकडे काही मित्रांनी नवस केले, तिकडे नातेवाईकांनी राम रक्षेपासून हनुमान चालीसापर्यंत काही काही केले. 

शेकडो हात देव्हाऱ्यापुढे जोडले गेले..

दवा होतीच, पण दुवाने तारले म्हणायचे। 

फोनवर, व्हिडीओवर बोलताना अनेकांच्या निशब्द ओठांची थरथर, डोळ्यातला ओलावा, त्यांच्या भावनांचे हुंदके स्पस्टपणे जाणवत होते... 

... काय काय नाही केले माझ्यासाठी

त्याच तुमच्या बळावर फिरुनी आलोय मित्रांनो... 

एक नवीन निरामय जगणं घेऊन... 

कृतज्ञतेला खरेच शब्द अपुरे आहेत... 

ऋणात राहील बस इतकेच। 


#CoronaDiary #KiranAgrawalQuarantine

#Saraunsh published in Lokmat on 18 Oct, 2020


https://www.lokmat.com/nashik/how-come-no-one-worried-about-closure-city-buses-nashik-a321/

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20201018_6_5

 

#EditorsView published in Online Lokmat on 15 Oct, 2020

 कामातही ‘स्मार्ट’पणा दिसायला हवा...


किरण अग्रवाल

नावात गोंडस, गुलाबीपण असले म्हणजे प्रत्यक्षातही तसेच असते अगर होते असे नाही. दिसते तसे नसते म्हणून फसवणूक घडून येते असे त्यामुळेच म्हटले जाते. शासकीय कामकाजाच्या संदर्भाने विचार करता चांगल्या हेतूने योजना आखल्या जातात, त्यांची समर्पक वा आकर्षक नामाभिधाने केली जातात; पण कधीकधी काही बाबतीत नावाशी विसंगत अनुभव येतो. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांबद्दलही तसेच काहीसे होताना दिसत आहे. नावात स्मार्टपण ल्यालेल्या या योजनेतील कामांकडे वेगळेपणाच्या दृष्टीने मोठ्या आशेने पाहिले जात आहे. यात काही कामे चांगली झालीतही; पण बहुतेक ठिकाणी आता तक्रारींचा सूर निघू लागल्याने ही योजना व तिचे क्रियान्वयन याबाबत पारदर्शी आढावा घेतला जाणे गरजेचे ठरले आहे.




स्मार्ट सिटीच्या कामांबद्दलची वाढती ओरड, अनियमितता व गैरव्यवहारांच्या तक्रारी तसेच ठेकेदारावर केली गेलेली मेहरबानी आदी मुद्द्यांमुळे नाशकात थेट कंपनी बरखास्तीचीच मागणी पुढे आल्याने हा विषय चर्चेत येऊन गेला आहे. येथील या प्रकल्पांतर्गत घेतले गेलेले एकही काम समाधानकारक ठरू शकलेले नाही. नाशिकचे सांस्कृतिक वैभव म्हणविल्या जाणाºया महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणावर कोट्यवधी खर्चूनही तेथील ध्वनिव्यवस्थेबाबत रंगकर्मी समाधानी नाहीत. एकीकडे खर्च सढळ हस्ते केला जात असताना त्या कामांची गुणवत्ता राखली गेली नसल्याचेही आक्षेप आहेत. अशोकस्तंभ ते त्रंबक नाका या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे काम वर्षभरात पूर्ण करायचे असताना त्याला तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लावण्यात आला व अखेर त्या रस्त्यावरील व्यावसायिकांनी आंदोलने छेडली तेव्हा निर्धारित कामे पूर्ण न करता हा रस्ता खुला केला गेला. शिवाय विलंबापोटी ठेकेदारास आकारण्यात आलेला लाखोंचा दंडही परस्पर माफ करण्यात आला. ही मेहरबानीच आता टीकेचा विषय ठरून गेली आहे. दुसरे असे की, ‘कामे कमी आणि सोंगे फार’ या म्हणीनुसार कामात संथपणा असताना कंपनीत अधिकारी नियुक्ती जोरात असून, त्यांच्या पगारावर कोट्यवधींची उधळण होत असल्याचा आरोप होतो आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनीही कंपनीच्या कामांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, शिवाय महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी तर स्मार्ट सिटी कंपनी बरखास्तीचीच मागणी केली आहे.


नाशिकच नव्हे, तर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर आदी कुठल्याही ठिकाणची स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे वादातीत ठरू शकलेली नाहीत. पुणे ही राजकीय नेतृत्वाच्या दृष्टीने हेवीवेट सिटी म्हटली जाते, त्यामुळे तेथे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यादेखील लक्ष घालत असल्याने कामे बºयापैकी होताना दिसत आहेत; परंतु अलीकडच्या काळात कागदोपत्री योजनांचे प्रमाण वाढू लागल्याबद्दल तिथेही ओरड होऊ लागली आहे. योजनेच्या सुरुवातीला चांगला उत्साह व गती होती; परंतु आता तो उत्साह कमी झालेला दिसतो आहे. सोलापूरमध्ये या योजनेच्या सर्वेक्षणासाठी जी तांत्रिक सल्लागार समिती नेमली गेली तिला कोट्यवधी रुपये दिल्याचे प्रकरण नाराजीचा विषय ठरले आहे. शिवाय स्थानिकांना विश्वासात न घेताच कामे होत असल्याबद्दलची नाराजी आहेच, पण केंद्राच्या खात्यातून कामे होत आहेत ना, मग होऊन जाऊ द्या या विचारातून सारे स्वीकारार्ह ठरले आहे. नागपुरात समितीचे सीईओपद महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतल्यावरून झालेला वाद व थेट न्यायालयापर्यंत पोहोचलेले प्रकरण सर्वांनी बघितले आहेच. प्रारंभी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्याने हालचाल झाली. सीसीटीव्हीचे चांगले काम पूर्णत्वास आले; पण नंतर अनेक कामे प्रलंबित पडलीत. पार्डी, भरतवाडा, पुनापूर, भांडेवाडी परिसरात साकारायचे प्रोजेक्ट्स व त्यातील कामे ठप्प आहेत. मुंबई, ठाण्यातही वेगळी स्थिती नाही. ठाण्यातील गावदेवी भूमिगत पार्किंगबाबत कंपनीच्या सल्लागार सुलक्षणा महाजन यांनीच तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. विविध कामांच्या उपयुक्ततेबाबत तसेच त्यांच्या संथ गतीची ओरड गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतील बैठकीत झाली आहे. खुद्द महापौर नरेश म्हस्के यांनी विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असून, अन्य सल्लागारांनीही झालेल्या कामांची चिरफाड केलेली पहावयास मिळाले.


थोडक्यात, सर्वच ठिकाणी अपवादात्मक कामे वगळता बहुतेक बाबतीत ठणाणाच आहे. नावात स्मार्ट असून उपयोगाचे नाही, तर कामात हे स्मार्टपण दिसायला हवे असे त्यामुळेच म्हणता यावे. कारण कामांची निवड, त्यासाठीची निर्णयप्रक्रिया, त्यात स्थानिक संबंधितांना डावलले जाण्याचे प्रकार तसेच कामाचा दर्जा अगर गुणवत्ता व अंतिमत: ज्यांच्यासाठी ही कामे केली जात आहेत त्या नागरिकांचे समाधान अशा विविध पातळ्यांपैकी अनेक ठिकाणी अडचणी, मनमानी किंवा असमाधान आढळून येत आहे. त्यामुळे यातील स्मार्टपणा हा संशोधनाचा विषय ठरावा. स्थानिक महापालिकांच्या गरजा वेगळ्या, स्मार्ट सिटी कंपनीचे कामकाज वेगळे व हाती घेतलेली कामे साकारणारी यंत्रणा तिसरीच, अशा त्रांगड्यामुळेच हा घोळ आकारास आलेला दिसतो आहे. यात आता कोरोनामुळे स्थानिक संस्थांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतील अनावश्यक कामांवरील खर्चाचा हिस्सा उचलण्यापेक्षा आवश्यक स्वरूपातील रस्ते, वीज, पाणी आदी दैनंदिन कामांवर लक्ष पुरवलेले बरे अशा भूमिकेत संबंधित महापालिका आल्या नाही तर नवल!


https://www.lokmat.com/editorial/article-smart-city-irregular-works-nashik-well-all-city-state-a629/

#Saraunsh published in Lokmat on 11 Oct, 2020

 


https://www.lokmat.com/nashik/bhongal-administration-nashik-under-name-smartness-a321/

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20201011_4_4

Monday, October 19, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 08 Oct, 2020

‘स्व’चा शोध घडविणारा एकांतवास...


किरण अग्रवाल

कोरोनाच्या निमित्ताने एकांतवासातून आत्मावलोकनाकडे जाण्याची संधी मिळते हे खरे, पण हा प्रवास म्हणावा तितका सोपा खचितच नाही. स्वत:तले स्वत्व जेव्हा मनाच्या डोहात पूर्णांशाने विरघळून टाकणे शक्य होते, तेव्हा कुठे त्यासाठीचा मार्ग किलकिला होतो; प्रकाशाची किरणे विचारांच्या ताटव्यांना धडका देत सुवर्णमयी आल्हादकतेची पखरण करू पाहतात, घनगर्द काळोखाची किर्र कवने उजेडाचे गीत गायला अधीर होतात, स्वरांना शब्दांचा आकार-उकार लाभू पाहतो, तो जो काही उत्सव असतो... चेतनेचा प्रकटोत्सव म्हणूया त्याला, तोच तर असतो तिमिरातून तेजाकडे नेणारा. एकांतातला वाटाड्या. अध्यात्माची जाणीव करून देणारा व ‘स्व’चा साक्षात्कार घडविणारा...




एकदा का हा ‘स्व’चा साक्षात्कार झाला, की त्याच्या विलयाची प्रक्रिया सोपी होऊन जाते. जलाचे जलातील अर्पण जितक्या सहजपणे घडून येते, तितक्याच सहजतेने हे ‘स्व’चे तर्पण करता येणे हेच तर अध्यात्म आहे. शेवटी तर्पणदेखील काय, तर तो आहुतीचा, मुक्तीचाच मार्ग असतो. ‘मृत्योऽर्मा अमृतम्गमय’ची दिशा स्वच्छंदी करणारा. म्हणून ‘स्व’ला जाणायचे. त्या स्वमध्ये स्वत:ला समाहित, संमिलीत व संमोहितही करून घ्यायचे; कारण या तिन्ही प्रकारात मननाची प्रकिया अंतर्भूत असते. मनाने, वाचेने, कायेने विलयाचा भाव त्यात अभिभूत असतो, जो ‘स्व’च्या जाणिवेतून मुक्तीच्या राजमार्गाकडे नेतो. स्व हा मूलगामी निर्गुण, निराकार, निरवैर असाच असतो. नवजात बाळासारखा. कसलीही चिंता, भीती वा कपटाचा लवलेश नसलेला. आनंद व केवळ आनंदाचे निधान असलेला. या स्वची जितकी प्रामाणिक गळाभेट घ्याल, तितके मनाचे झरे निर्झर होतील. भवतालचे षड्रिपु यात बाधा आणण्यापूर्वी हे काम करायचे असते, कारण ते मनाची मलिनता वाढवीत असतात. काम, क्रोध, मद, मोह-मत्सराचे जाळे घट्ट असते. या जाळ्याचे तार एकमेकांत असे विणलेले असतात, की कुणा एकास सोडताच येऊ नये. भौतिक सुखासीनतेकडे नेणारी आभासी दिशाभूल तर त्यातून घडून येतेच, शिवाय विचारांची शृंखलाही या मलिनतेत अवरुद्ध होते. स्वच्या आहार, विहारात स्वत:ला झोकून देणे व स्वच्या एकारांततेकडून आत्मसिद्धीच्या उकारांततेकडे मार्गस्थ होणे हे म्हणूनच अवघड असते.




आत्म्याचे अवलोकन घडून येण्यासाठी ‘स्व’चा विलय याकरिताही गरजेचा असतो, की त्याभोवतीच तर आशा अपेक्षांचे इमले उभे होत असतात. या अपेक्षा निरंकुश असतात. समाधान ही संकल्पना तिथे थिटी पडते, संकुचित होते. आहे त्यापेक्षा अधिक प्राप्तीचा लोभ त्यात डोकावल्याखेरीज राहत नाही. लोभाला सहोदरही अनेक असतात. न बोलावता ते येतात, लाभतात व जिवाभावाचे होतात. अशात मार्ग सुटतात, रस्ते खुंटतात व वाटा तेवढ्या उरतात. चालण्याची मर्यादा यातून जोखता येते. जशी ही चाल, तसा ज्याचा त्याचा हाल. त्या चालीत संयम असला तर ठीक, घाई करायला गेले की रिपूंच्या आहारी जाणे ओघाने येते. ‘स्व’चा आहार म्हणूनच बळकट असला तर वाटेतली वावटळ निरस्त करणे अवघड ठरत नाही. या वावटळीचा क्षय घडवून आणायचा तर आशय मजबूत हवा. स्वच्या धारणा जितक्या प्रगल्भ, तितके जाणिवांचे आकाश निरभ्र. पारदर्शीता त्यात अधिक. प्रतिक्रिया ही क्रियेची उत्सर्जनावस्था असते, तसे विकारांचे विसर्जन घडवता आले तर कुविचारांचा क्षय आपोआप घडून येतो. निग्रहाचे बळ मात्र त्यासाठी असावे लागते. सद्विवेकाचा आग्रह व विचारांचा निग्रह, हेदेखील स्वला जोखण्यातून तसेच आत्म्याच्या अनुलोम विलोमातूनच साकारतात. प्राणाचा आयाम शरीराच्या नश्वर देहाचा व्यायाम घडवून आणतो तेव्हा ही ‘स्व’ची घंटी अंतरात्म्याला जागवून जाते. 


थोडक्यात वाटा वेगळ्या, पण गंतव्य एकच आहे. ‘स्व’चे म्हणजे आत्म्याचे अवलोकन. चेतनेच्या उत्सवाची तीच तर नांदी असते. तेथूनच आयुष्याचा, जगण्याच्या जीवनदर्शनाचा पडदा उघडतो. तो उघडण्यापूर्वीचे, मनाच्या विंगेतले हे कथानक ज्याला उमजले तो या रंगमंचावरचा असली हिरो. त्याला अचेतनेतील भैरवीची चिंता सतावत नाही, त्यालाच जीवन कळले असे म्हणायचे...  

https://www.lokmat.com/editorial/solitude-time-corona-crisis-helps-discover-yourself-a584/

#Saraunsh published in Lokmat on 04 Oct, 2020

 


https://www.lokmat.com/nashik/there-lot-agitation-corona-over-a321/

#EditorsView published in Online Lokmat on 01 Oct, 2020

उद्योग व्यवसायात आशेचे गीत...


किरण अग्रवाल

अंधार कितीही व्यापून असला तरी त्याची अखेर कुठेतरी उजेडातच होत असते, त्या प्रकाशाची तिरीप जेव्हा चमकून जाते तेव्हा निराशेचे ढग दूर होऊन आशेची पालवी अंकुरून जाणे स्वाभाविक ठरते. कोरोनामुळे एकूणच उद्योग जगतावर आलेले संकट, त्यातून ओढवलेली बेरोजगारी अशा साऱ्या वातावरणात आता ई-कॉमर्स क्षेत्रात सुमारे तीन लाख नोकºया उपलब्ध होऊ घातल्याच्या व अन्य मोठ्या उद्योगात गुंतवणूक वाढत असल्याच्या वृत्ताकडे असेच आशेने पाहता यावे. विशेषत: आगामी दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारातली व मनामनांमध्ये दाटून असलेली भीतीची छाया दूर होण्यास नक्कीच मदत होईल.




कोरोनाच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडले. अनेक उद्योग, व्यवसायांना घरघर लागली, तर बाजारपेठा मंदावल्या. आता अनलॉक अवस्थेत पुनश्च हरिओम करण्यात आला असला तरी बाजारातील मंदीचे सावट काही हटलेले नाही. विशेषत: कोट्यवधी लोकांच्या हाताचे काम गेले, ते बेरोजगार होऊन घरी बसल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा व एकूणच भविष्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. अजूनही अनेक उद्योग पूर्ववत सुरू होऊ शकलेले नाहीत, त्यामुळे आहे ते काम टिकून राहील याची शाश्वती नाही. अशात कुठून तरी वाºयाची एक झुळूक यावी तशी एक वार्ता आली आहे. रेड सिरच्या अहवालानुसार ई-कॉमर्स क्षेत्रातील उद्योग आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उद्योगवाढीस चालना देण्यासाठी सुमारे तीन लाख लोकांची बंपर भरती करणार असल्याची ही वार्ता आहे. अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टसारख्या तसेच लॉजिस्टिक क्षेत्रातील ई-कॉम एक्स्प्रेससारख्या नामवंत व आंतरराष्ट्रीय जाळे असलेल्या कंपन्यांकडून ही भरती केली जाणार असल्याने बेरोजगारीमुळे खचलेल्या मनांवर फुंकर घालणारी ही आशेची झुळूकच म्हणायला हवी.


खरे तर, या कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांना घरी बसल्या वस्तू पुरवठ्याची सवय लागली आहे. बाहेर मार्केटमध्ये जाऊन गर्दीत संसर्गाचा धोका स्वीकारण्याऐवजी ग्राहक ई-प्लॅटफॉर्मवरून व्यवहार करू लागला आहे, यात ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. कोरोनापूर्वी देशात हा व्यवसाय ६ टक्क्यांवर होता, तो आज २४ टक्क्यांवर गेला आहे. इतकेच नव्हे तर, सध्या ४५ बिलियन डॉलर असलेला ई-कॉमर्स बाजार २०२६पर्यंत तब्बल २०० बिलियन डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. देशात इंटरनेट व स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या मोठी असून, यापुढील काळात ती आणखी वाढणार असल्याने त्याचा परिणामही ई-कॉमर्स उद्योगवाढीवरच होण्याची चिन्हे आहेत. हीच बाब लक्षात घेता कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट)नेही ई-कॉमर्स पोर्टल भारत या ई-मार्केटला लॉन्च करण्याची तयारी केली आहे. काळाची गरज लक्षात घेता नवीन ई-कॉमर्स धोरण आखतानाच, या व्यवसायाचे संचालन सुरळीत होण्यासाठी एक ई-कॉमर्स नियंत्रण प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही कॅटने केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे नुकतीच केली आहे. एकूणच आगामी काळ हा ई-कॉमर्सचा राहणार असून, त्यात मोठ्या प्रमाणात संधी व स्पर्धा राहण्याची चिन्हे आहेत. अर्थात उद्योगांमधील स्पर्धा जेवढी मोठी तेवढी रोजगाराला संधी अधिक, हे गणित लक्षात घेता यातून सकारात्मक परिणाम घडून येण्याची अपेक्षा आहे.




ई-कॉमर्स उद्योग मोठी भरती करणार असल्याच्या वार्तेबरोबरच आणखी एक बातमी याचदरम्यान पुढे आली आहे, ती म्हणजे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपला नवीन भिडू लाभणार आहे. कोरोनाच्या गेल्या पाच-सहा महिन्यांच्या काळात या ग्रुपला फेसबुक, गुगलसारखे मोठे गुंतवणूकदार मिळालेत, आता अमेझॉन पुढे आले आहे. शिवाय प्रसिद्ध इक्विटी फर्म जनरल अटलांटिकनेही भागीदारीची तयारी दर्शविली आहे. या बलाढ्य कंपन्यांमधील गुंतवणुकीची टक्केवारी व कोट्यवधींचे आकडे पाहता, यापुढील काळात ई-कॉमर्स व रिटेल उद्योगात एक नवीन क्रांतिपर्व आकारास आलेले दिसू शकेल. भारतीय कंपन्या तर त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेतच, परकीय कंपन्याही गुंतवणुकीला व व्यवसायवाढीला चांगली संधी म्हणून भारतीय बाजारपेठेकडे पहात आहेत, त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू व सेवांसोबतच आरोग्यविषयक सेवांमध्ये नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.


महत्त्वाचे म्हणजे, प्रख्यात टाटा समूहदेखील रिटेल उद्योगात उतरण्यास सज्ज झाला असून, मिंटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या ग्रुपतर्फे एक डिजिटल सुपरअ‍ॅप्स विकसित केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. बहुराष्ट्रीय नेटवर्क असलेली वॉलमार्टसारखी मातब्बर कंपनी २० ते २५ अब्ज डॉलर्सपर्यंत यात गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जात असून, बेवरजेस, ज्वेलरी, रिसॉर्ट्स, इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट, हेल्थ केअर आदी विविध क्षेत्रात ते उतरणार असल्याचे वृत्त आहे. यासर्वच वार्ता मरगळलेल्या अवस्थेला उभारी देणाºयाच ठराव्यात. येऊ घातलेल्या नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सणाच्या निमित्ताने त्याचा बिगुल वाजून गेला असून, कोरोनानंतरच्या नकारात्मक मानसिकतेला छेद देऊन आशेचे नवे गीत गायिले गेलेले यातून दिसून येण्याची अपेक्षा आहे.  


https://www.lokmat.com/editorial/songs-hope-industry-and-business-a607/