At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, February 25, 2021
EditorsView published in Online Lokmat on Feb 25, 2021
ज्येष्ठांच्या सांभाळासाठी नवे पाऊल...
किरण अग्रवाल /
कुटुंब पद्धतीत दिवसेंदिवस वाढत असलेली विभक्तता व घरातील तरुणांचा शहराकडे जाण्याचा ओढा, यासारख्या अनेक कारणांतून ज्येष्ठांच्या वाट्याला एकाकीपण येऊ पाहत असून, अनेकांच्या तर उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. यातून ज्येष्ठांचा सांभाळ, हा जटिल प्रश्न बनला असून, त्यासाठी वारसाहक्काने संपत्तीत अधिकार सांगणाऱ्या
मुला-मुलींप्रमाणेच सून व जावयालादेखील पाल्याच्या व्याख्येत आणून त्यांच्याकडून ज्येष्ठांना निर्वाह भक्ता मिळवण्याची तरतूद असलेला नवा कायदा संसदेपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. यासंबंधीच्या समस्येला सामोरे जावे लागत असलेल्या ज्येष्ठांना याद्वारे हक्काचा आणखी एक कायदेशीर आधार लाभण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा आहे.
बालपण देगा देवा असे नेहमी म्हटले जाते; परंतु म्हातारपण कोणालाही नको असते; कारण त्यात यातना कठीण असतात. शारीरिकदृष्ट्या गात्रे थकलेली असतातच, शिवाय मानसिकदृष्ट्याही व्यक्ती खचलेली असते. अशावेळी आधाराचा हात हवा असतो, परंतु हल्लीची सामाजिक व कौटुंबिक स्थिती अशी काही होऊन बसली आहे की प्रत्येक घरातल्या ज्येष्ठांना असा हात मिळतोच असे नाही. आयुष्यभर स्वतःच्या मर्जीने वागलेली व जगलेली व्यक्ती जेव्हा परावलंबी बनते तेव्हा त्यातून होणारी घुसमट असह्य असते. ती सहनही होत नाही व कोणाला सांगताही येत नाही. ज्येष्ठांचे कल्याण व त्यांच्या आधारासाठी सामाजिक न्याय विभागाने अनेक योजना आणलेल्या आहेत. पाल्यांकडून ज्येष्ठांना निर्वाह खर्च मिळवण्याची कायद्यात तरतूद असली किंवा त्यांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना दंड व तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदही असली तरी त्यावाटेने कुणालाही जावेसे वाटत नाही, कारण कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठेचे दडपण यात असते. म्हातारपण नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ येते ती त्याचमुळे. वेगळ्या संदर्भाने एकीकडे जुने ते सोने म्हणायचे आणि दुसरीकडे घरातील वडीलधाऱ्या मार्गदर्शक मंडळींच्या बाबत मात्र उपेक्षेची स्थिती आढळावी, हे आश्चर्यकारक असले तरी बहुतांशी प्रमाणात खरे वा वास्तव आहे. का ओढवते घरातील ज्येष्ठावर अशी वेळ, हा चिंतनाचा विषय असून, समाज धुरिणांनीही याकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे बनले आहे.
कुटुंब पद्धतीत वाढत असलेली विभक्तता, हा या संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसतो. पूर्वी कॉमन फॅमिलीत घरातील सदस्यांची संख्या अधिक असे. त्यात ज्येष्ठांचा वेळही निघून जाई व त्यांची काळजीही घेतली जाण्याची सोय आपसूक होई; परंतु आता मुळातच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातील सदस्यांची संख्या कमी होत चालली आहे. शिवाय घरातील शिकल्या-सवरलेल्या तरुणांचा नोकरी उद्योगासाठी शहरात जाण्याचा ओढा असल्यामुळे घरातील ज्येष्ठांच्या वाट्याला एकाकीपण येते. कधीतरी हवापालटासाठी ज्येष्ठ मंडळी शहरात आली तरी त्यांचे मन तेथे रमत नाही व ते पुन्हा ‘चलो गाव की ओर’ म्हणत गावाकडे परततांना दिसून येतात. पूर्वी नातवंडांना आईबाबांपेक्षा आजी-आजोबा अधिक मैत्रीचे ठरत. ते त्यांना राजा-राणीच्या परिकथा सांगत; खेळायला नेत. आता ही स्थितीही बदलली आहे. हल्लीच्या नातवंडांना पोकेमॉन व डोरेमॉन हवा असतो. आजोबांबरोबर फिरायला जाण्यापेक्षा टीव्हीचा रिमोट घेऊन किंवा मोबाइलमध्ये डोके घालून बसणे त्यांना अधिक आवडते, तेव्हा त्याहीदृष्टीने घरातील ज्येष्ठ मंडळी एकाकी पडलेली दिसते. ना कोणी त्यांच्याशी बोलणारे, ना कोणी खेळणारे. हे एकाकीपणच ज्येष्ठांना अधिक सलणारे व बोचणारे ठरते व त्यातून त्यांची घुसमट अधिक वाढते.
महत्त्वाचे म्हणजे, अनेक कुटुंबात ज्येष्ठांचा मानसन्मान व आब राखून त्यांची सेवा केली जात असताना, भरले घर असूनही ज्यांच्या नशिबी वृद्धाश्रम येते त्यांची मानसिक अवस्था मात्र चिंतनीय ठरते. पण परिस्थिती व नशिबाला दोष देत संबंधितांकडून दिवस काढले जातात. खरे तर ही अवस्था संस्कार व संवेदनेशी निगडित आहे, परंतु धावपळीच्या झालेल्या जगरहाटीत संवेदनांना आता मोल उरले कुठे? जिथे रक्ताच्या मुलांकडूनच काहींच्या वाट्याला उपेक्षा येते तिथे इतरांकडून काय अपेक्षा करणार? पण शासनाने आता पाल्याची किंवा अपत्त्याची व्याख्या विस्तारत त्यात मुला-मुलींसोबतच सून व जावयाचा समावेश करण्याचेही ठरवले असून, त्यांना घरातील ज्येष्ठांना निर्वाह खर्च देणे जबाबदारीचे केले जाणार आहे. संसदेच्या स्थायी समितीने यासंबंधीच्या नवीन विधेयकाला मंजुरी दिली असून, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर विधेयक मांडले जाणार आहे. अर्थात ज्येष्ठांची काळजी वाहण्यासाठी कायदे अनेक असले व त्यात आणखी भर पडणार असली तरी शेवटी त्या वाटेला जातो कोण? तेव्हा या नवीन कायद्याने ज्येष्ठांना आधाराचा आणखी एक हात लाभेल अशी आशा असली तरी, तशी वेळच कोणावर येऊ नये म्हणजे झाले.
https://www.lokmat.com/editorial/new-steps-care-seniors-clear-way-get-legal-support-a309/
कोरोना वाढतोय, मास्क वापरा रे बाबांनो ..
21 फेब्रुवारी 2021
कोरोना वाढतोय, मास्क वापरा रे बाबांनो ...
#MajheArogyaMajhiJababdari
गेला गेला म्हणता, कोरोना फिरून येऊ पाहतोय.
आपल्याकडेही रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे.
त्यामुळे काळजी घ्यायला हवी.
आपली सुरक्षितता आपल्याच हाती आहे.
त्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करूया.
मास्कचा वापर अनिवार्यपणे करतानाच
सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स ठेवून वावरूया ...
लोकमतचे संपादकीय संचालक श्री करण बाबूजी दर्डा यांनी पारिवारिक काळजीतून आम्हा सर्व सहकाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारकच केला आहे. तेव्हा सर्वांसाठीच अत्यावश्यक ठरलेल्या मास्क वापराची मोहीम गतीमान करण्याकरीता आपण मास्क परिधान केलेली छायाचित्रे येथे पोस्ट करून इतरांनाही मास्क वापरण्यासाठी प्रेरित करूया...
#माझे_आरोग्य_माझी_जबाबदारी ...
#MaskMust #Lokmat_Initiative
Saraunsh published in Lokmat on Fab 21, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210221_4_19
https://www.lokmat.com/nashik/when-will-congress-nashik-be-shaken-a321/
Thursday, February 18, 2021
EditorsView published in Online Lokmat on Feb 18, 2021
निर्बंधांची सक्ती हवीच, पुन्हा लॉकडाऊन नकोच...
किरण अग्रवाल /
आपल्याकडे प्रकृतीबद्दलच्याही गांभीर्याचा अभाव इतका, की गेला गेला म्हणता कोरोना पुन्हा येऊ पाहतो आहे; त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन हवे की निर्बंध, असा निर्वाणीचा प्रश्न विचारण्याची वेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. कोरोनाच्या संकटातून जरा कुठे बाहेर पडत असताना व जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहत असताना मिळालेल्या मोकळेपणाचा असा काही अनिर्बंध वापर व वावर सुरू झाला की यामुळे कोरोनाला पुन्हा शिरकाव करण्याची संधी मिळून जात आहे व तीच धोक्याची बाब ठरू पाहते आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा धास्तावून जाणे स्वाभाविक ठरले आहे.
गेले वर्षभर घोंघावलेले व संपूर्ण जनजीवन प्रभावित करून गेलेले कोरोनाच्या संकटाचे वादळ चालू वर्षाच्या प्रारंभी बर्यापैकी नियंत्रणात आलेले दिसले; पण दुसऱ्याच महिन्यात त्याने डोके वर काढल्यामुळे पुन्हा भीतीची छाया दाटून गेली आहे. खरे तर देशात कोरोना नियंत्रणात असल्याची दिलासादायक आकडेवारी आहे. फेब्रुवारीत चौथ्यांदा असे घडले जेव्हा नव्या रुग्णांची संख्या दहा हजारांपेक्षा कमी आली. देशातील मृतांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक झाली असली तरी, दहाव्यांदा असे झाले की एका दिवसात १०० पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे, दीव, दमन व दादरा- नगर हवेलीत तर हे प्रमाण ९९.८८ टक्के इतके आहे. यावरून एकूणच देशात कोरोनाचा जोर ओसरतो आहे हेच दिलासादायक चित्र लक्षात यावे; परंतु ते अर्धसत्य म्हणता यावे. कारण गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले दिसत आहे. यापूर्वी भीती वर्तविली जात होती त्याप्रमाणे दुसरी लाट अद्याप आली नाही हे नशीब; पण तसे झाले तर सावरायलाही वेळ मिळणार नाही इतके ते धोका व नुकसानदायक असेल असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
-------------------
कोरोना नियंत्रणाबाबत महाराष्ट्र तसाही काहीसा मागेच आहे. लसीकरण सुरू झालेले असले तरी ते पूर्ण क्षमतेने होऊ शकलेले नाही, त्यामुळे उद्दिष्टपूर्तीही अडखळली आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय क्षेत्राची मदत यासाठी घेण्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशात मुंबई, पुण्यासह राज्यातील काही शहरांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे वर्तमान आहे. त्यासंबंधी गांभीर्याच्या अभावातून हे संकट ओढवून घेतले गेले असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊन हवे की निर्बंध, असा प्रश्न केला आहे. कोरोनापासून बचावासाठीचे मास्क, सॅनिटायझरच्या वापराचे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनाबाबतचे निर्बंध कडक करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. कारण कोरोनाच्या विषाणूने पुन्हा डोके वर काढण्याची कारणे यासंबंधीच्या दुर्लक्षातच दडलेली आहेत. तेव्हा निर्बंध कडक केले जाणे गरजेचेच आहे; पण लॉकडाऊन मुळीच नको; ते कोणाच्याही हिताचे ठरणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्याकरिता नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.
---------------------
लॉकडाऊनचा फटका सर्वांनीच अनुभवून झाला आहे. एकीकडे अनेक जण कोरोनाशी झुंजत असताना दुसरीकडे अनेकांची लॉकडाऊनमुळे जिवाशीच गाठ पडल्यासारखी स्थिती होती. उद्योगधंदे बंद राहिल्याने अनेकांचा रोजगार हिरावला गेला, बहुतेकांना स्थलांतर करण्याची वेळ आली. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकल्याने त्यांची त्याअर्थाने जिवाशीच गाठ पडली, पण आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, सारे काही सुरळीत होत आहे. लॉकडाऊन काळातील बंदिस्ततेचा व अर्थव्यवस्थेचे चाक रूतल्याचा अनुभव खरेच जीवघेणा होता. आता पुन्हा तो प्रवास नकोच; पण कोरोना संपलेला नसल्याने किंबहुना तो परतून येऊ पाहत असल्याने याबाबतची खबरदारी नितांत गरजेची आहे. त्यासाठी यंत्रणांकडून सक्ती गरजेची आहे. सार्वजनिक कार्यक्रम वा लग्नसमारंभ आदीप्रसंगी उपस्थितीच्या मर्यादा घालून दिल्या आहेत, पण त्याचे पालन होत नाही. कोरोना जणू संपल्याच्या आविर्भावात मास्कचा वापर तर जवळजवळ संपल्यात जमा दिसतो, फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडत आहे; तेव्हा असे करणाऱ्यांवर जरब बसेल असा दंड आकारून व कारवाई करून नियमांच्या काटेकोर पालनाची अंमलबजावणी करायला हवी. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ओळखून प्रत्येकानेच यासाठी काळजी घ्यायला हवी. ती न घेतली गेल्यास यंत्रणांनी सक्तीने निपटावे; पण लॉकडाऊन नकोच!
https://www.lokmat.com/editorial/restrictions-must-be-enforced-stop-spread-coronavirus-a584/
Monday, February 15, 2021
Pheta.. Thanks
14 Feb, 2021
यु तो लिखता रहता हू बहुत कुछ आसनी से,
भावनाओ को लफ्जो मे समेटना है मगर मुश्किल...
मला जे वाचून, जाणून व ओळखून आहेत त्यांना हे माहीत आहे की माझ्या लेखनाची मुस कोणती आहे आणि स्वभाव कोणता आहे तो.
तुम्हाला चांगलं काही दिसतच नाही का हो किंवा कुणाबद्दल काही चांगलं लिहिताच येत नाही का, अशा प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ त्यामुळेच माझ्यावर येते; अर्थात त्याबद्दल ना खेद, ना खंत.
पण म्हणतात ना, कधीकधी आपत्ती ही इष्टापत्ती ठरून जाते तसे झाले म्हणायचे. कोरोनाने सर्वांची जीवनशैली बदलून ठेवली, तशी मला त्यानिमित्ताने वेगळा विचार करायला व भावनांना मोकळी वाट करून द्यायला संधी मिळाली. त्यातूनच फेसबुकच्या या भिंतीवर प्रसंगोत्पात वेगळं काहीबाही खरडत असतो.
धर्मांतर, पक्षांतर, स्थलांतर, वेषांतर, भाषांतर होते वा असते; तसे हे माझे लेखांतर म्हणूया ...
मूळ स्वभाव व पिंडापेक्षा वेगळे. पण वेळोवेळी आपण त्यावर कौतुकाची, पसंतीची मोहोर उमटवित असता; ती प्रत्येकवेळी नवी प्रेरणा देऊन जाते.
माझ्या गेल्या फेटा / पगडी वरील पोस्टलाही आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मित्रांनो...
#MajhaPhetaMajhiJababdari #KirananandNashik #KiranAgrawalNashik
Saraunsh published in Lokmat on Feb 14, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210214_2_14
https://www.lokmat.com/nashik/while-credit-market-declining-there-lot-growth-a321/
Thursday, February 11, 2021
EditorsView published in Online Lokmat on Feb 11, 2021
सरकारकडून विकासाला साथच नव्हे, पाठबळही...
किरण अग्रवाल /
स्थानिक स्वराज्य संस्था असो, की राज्य व केंद्र सरकार; सत्तांतरे झाली की सर्वात पहिली शंका उपस्थित केली जाते ती मागच्या सरकारांकडून हाती घेतलेली विकासाची कामे पुढे चालू ठेवली जातील की नाही याची. अर्थात, जी लोकहिताची कामे असतात ती कुठेही व कोणाकडूनही थांबविली किंवा बंद केली जात नाहीत; ज्यात शंका किंवा अनागोंदीची तक्रार असते त्याच कामांना स्थगिती दिली जाते, असा अनुभव आहे. त्यामुळे त्यासंबंधीच्या अनाठायी चर्चांना अर्थ नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचीही वाटचाल त्याच वाटेने सुरू असल्याचे म्हणता यावे. समृद्धी महामार्गाच्या कामाकडे पुरविले गेलेले लक्ष असो, की नागपूर व नाशिकच्या मेट्रो प्रकल्पासाठी द्यावयाच्या राज्याच्या आर्थिक हिस्स्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली स्पष्टता; त्यातून विकासकामांना राजकारणेतर पाठबळाचीच भूमिका निदर्शनास यावी.
राज्याच्या सत्ताकारणात भाजपची पारंपरिक साथ सोडून शिवसेनेचा काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचा नवा फाॅर्म्यूला आकारास आल्यानंतर फडणवीस सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट्स पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. सत्ता पालटामुळे शिवसेना व भाजपत प्रत्ययास येणारी कटुता पाहता या शंका साधारही ठरून गेल्या होत्या. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत असतानाच शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला होता. मुंबईकरांना या ट्रेनचा किती फायदा होणार? मग गुजरातचे भले करण्यासाठीच का ही ट्रेन, असा प्रश्न यासंदर्भात केला गेला होता, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सध्या हे काम थंड बस्त्यात पडलेले दिसत आहे. फडणवीस यांच्या काळात मेट्रोचे कारशेड आरे कॉलनीत उभारणीचे काम सुरू झाले होते; परंतु ठाकरे सरकार सत्तारूढ झाल्यावर ते आरेतून कांजूरमार्गला हलविले गेले. जलयुक्त शिवार योजनेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. ही योजना बंद करून महाविकास आघाडी सरकारने अकराशे कोटींची मुख्यमंत्री जलसिंचन योजना पुढे आणून नव्याने या कामांना गती दिलेली आहे. तात्पर्य सरकार कोणाचेही असो, थेट लोकांशी संबंधित व हिताचे प्रकल्प कोणीही अडवत अगर थांबवत नाही. त्यामुळे नसत्या शंकांना अर्थ उरू नये.
महत्त्वाचे म्हणजे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा तर फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट. प्रारंभी शिवसेनेने त्यास विरोधाची भूमिका घेतली होती; परंतु फडणवीस यांनी त्याचे महत्त्व लक्षात आणून दिल्यानंतर शिवसेनेने सहकार्याची भूमिका घेतली. सरकार बदलानंतर या कामाबाबतही प्रश्न उपस्थित केले गेले असले तरी, वर्तमान आघाडी सरकारनेही समृद्धी मार्गाकडे लक्ष पुरवले असून, मे महिन्यापर्यंत नागपूर ते शिर्डी मार्ग सुरू केला जाईल, असे खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनीच सांगितले आहे. अलीकडेच अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गाच्या कामाची पाहणी करून वेगाने कामे पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले आहेत. विकासासाठीची ही राजकारणेतर सकारात्मकता महत्त्वाची ठरावी.
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाशिकच्या मेट्रो प्रकल्पासाठी 2092 कोटी, तर नागपूरच्या मेट्रोसाठी 5976 कोटी रुपयांची तरतूद घोषित केली आहे. यातील नाशिकचा टायरबेस्ड मेट्रो प्रकल्प हा देशातील पहिलाच प्रयोग असून, तोदेखील फडणवीस यांनीच सुचविलेला असल्याने या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित आर्थिक वाटा दिला जाईल का, अशीही शंका घेतली गेली होती; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच त्यासंदर्भात स्पष्टता केली असून, नागपूर व नाशिकच्या मेट्रोसाठी राज्याकडून द्यावयाचा आर्थिक हिस्सा नक्कीच दिला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे यासंबंधीच्या चर्चांना किंवा शंकांना पूर्णविराम मिळावा. विकासाच्या प्रकल्पांबाबत पक्षीय राजकारण आड न येऊ देता त्यास साथ व भरभक्कम पाठबळ देण्याचीच विद्यमान राज्य सरकारची भूमिका यातून स्पष्ट झाली आहे.
https://www.lokmat.com/editorial/not-only-support-also-financial-support-development-government-a301/
Monday, February 8, 2021
मान सन्मानाचीच नव्हे, जबाबदारीचीही पगडी ...
07 Feb, 2021 / मान सन्मानाचीच नव्हे, जबाबदारीचीही पगडी ...
#MajhaPhetaMajhiJababdari
मोबाईल म्हणजे करामतीचं केंद्रच आहे. अनेक भन्नाट गोष्टी त्याद्वारे होतात, फक्त त्याची पुरेपूर माहिती असणारा हवा.
आज धाकल्या कृतीने असेच बसल्या बसल्या स्नॅपचॅट वरील फिल्टरद्वारे माझ्या मस्तकी छानसा फेटा चढवून फोटो काढून दाखवला आणि मी तोंडात बोटच घातले.
त्यावरून स्मृतीची पाने चाळली जरा...
* * * * *
निटसं आठवत नाही खरं, पण घरातील वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या भावाच्या लग्नात पहिल्यांदा मला फेटा बांधला गेला म्हणतात.
त्यानंतर स्वतःच्याच लग्नात अपरिहार्यपणे फेटा घातला गेला, त्या फेट्याची किंमत आजपर्यंत चुकवावी लागतेय हा भाग वेगळा.
शालकाच्या व भाच्यांच्या लग्नातही मानाचे फेटे बांधले जाऊन मिरवायला मिळाले तर मित्रमंडळींकडील लग्नांमध्ये व काही समारंभांमध्ये सन्मानाचे फेटे बांधले गेले.
या मानसन्मानातून येणाऱ्या जबाबदारीचे ओझे पेलण्याइतके आपले डोके सक्षम आहे का हा खरे तर मनाला पडणारा प्रश्नच आहे.
पण प्रश्नांची उत्तरे शोधत बसण्यापेक्षा जबाबदारीची जाणीव ठेवून स्मरणात आनंद मानलेला केव्हाही बरा...
* * * * *
असाच एक प्रसंग यानिमित्ताने आठवला, मागे श्रावणानिमित्त नाशिकच्या प्रख्यात कैलास मठात शिवलिंगार्चन महोत्सवाच्या पूर्णाहुती सोहळ्यास उपस्थित होतो. यावेळी प्रमुख आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंद जी सरस्वती यांनी कार्यक्रमानंतर आपल्या मस्तकावरील पगडी काढून माझ्या मस्तकी ठेवली व चार-चौघात यापुढील आश्रमाचे उत्तराधिकारी तुम्ही असाल म्हणून सांगितले.
हे गमतीचे होते; पण माझ्या दाढीधारी व्यक्तिमत्त्वाला साजेसेच होते.
गृहस्थाश्रमाच्या प्रारंभाचा म्हणजे लग्नातील फेटा आणि हा संन्याशाने डोक्यावर ठेवलेला वानप्रस्थाश्रमाची जाणीव करून देणारा फेटा...
आरंभ ते अंताकडे घेऊन जाणारा,
आसक्तीतून विरक्ती, मुक्तीकडे नेऊ पाहणारा.
अर्थात, यानंतरही अनेकदा अनेक ठिकाणी फेटा परिधान करण्याचा योग आला, त्या सर्वच फेटयांनी मनात डोकावायला भाग पाडले.
असं डोकावण्यासाठी डोकं शाबूत हवं हे मात्र नक्की.
सर सलामत तो पगडी पचास... असे त्यामुळेच म्हणता यावे
*****
मित्रांनो, चला आपणही यानिमित्ताने आपला फेट्यातील फोटो शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये.
अनुभवा एक चेंज अन स्विकारा चॅलेंज ...
शोधा यानिमित्ताने आपला फेट्यातील फोटो अन घडवा त्याचे दर्शन ...
#MajhaPhetaMajhiJababdari
#KirananandNashik #KiranAgrawalNashik
Saraunsh published in Lokmat on Feb 07, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210207_2_11
https://www.lokmat.com/nashik/those-who-are-agitating-why-do-they-seem-disappear-it-a321/
Thursday, February 4, 2021
EditorsView published in Online Lokmat on Feb 04, 2021
कोरोनाचे संकट ओसरतेय;
पण सावधानता गरजेचीच ...
किरण अग्रवाल /
कोरोनाच्या संकटाचा जोर ओसरू लागल्याने जनजीवन व व्यवहार पूर्वपदावर येत आहे हे दिलासादायकच म्हणायला हवे; पण याचा अर्थ संकट टळले आहे असा अजिबात घेता येऊ नये. दुर्दैवाने तसे होत आहे. कोरोना टाळण्यासंबंधीची खबरदारी न घेताच तो संपल्याचा समज करून घेत किंवा तशा आविर्भावात बहुतेकांचा वावर सुरू झाला आहे. घरात, कार्यालयात वा सार्वजनिक ठिकाणी वावरताना याबाबतची कुठलीही काळजी वाहिली जात नसल्याने ही बाब संकटाला थांबवून ठेवण्यासाठी पूरक ठरू पाहते आहे. बेफिकिरी व बेजबाबदार मानसिकता यामागे असून, त्यावर कोणती लस कामात येईल हे सांगता येणे अवघड आहे.
कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घसरतो आहे. देशात गेल्या आठ महिन्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने नीचांक नोंदविला असून, कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्या बाधितांची चोवीस तासातील संख्याही गेल्या नऊ महिन्यात प्रथमच शंभराच्या खाली आली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.०५ टक्के झाला असून, मृत्युदरातही घट झाली आहे, तो १.४३ टक्क्यांवर आला आहे. सध्या देशात सुमारे दीड लाख रुग्ण उपचार घेत असून, एकूण संसर्गित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.५२ टक्के इतके असल्याचे आरोग्य खात्याची आकडेवारी सांगते. कोरोना ओसरत असल्याचे यातून लक्षात यावे. अशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणही सुरू झाले असून, पहिल्या आवर्तनात ३१ जानेवारीपर्यंत देशात ३९ लाख आरोग्यसेवकांना डोस देण्यात आले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडील ही स्थिती खूपच समाधानकारक म्हणता यावी. एकूणच कोरोना ओसरत असतानाच लसीकरणही वेगाने सुरू झाल्याने यासंबंधीची जनमानसातील भीतीची छाया दूर होत आहे.
-----------------
भीती कमी झाल्याने बेफिकिरी मात्र वाढली असून, बेजबाबदारपणाही दृष्टिपथास पडत आहे हे दुर्दैवी म्हणायला हवे. गेल्या वर्षाच्या अखेरीस रमजान व दिवाळीसारख्या सणांच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडले, त्यामुळे बाजारात चैतन्य आले; टप्प्या-टप्प्याने शासनानेही निर्बंध हटविल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ पहात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेस व रेल्वे सुरू झाल्या असून, शाळा-महाविद्यालयेही सुरू होऊ पाहात आहेत. बाजारपेठा तर पूर्वीसारख्याच गजबजल्या असून, लग्नकार्येही धूमधडाक्यात सुरू झाली आहेत. संकटावर मात करीत व त्यातून बाहेर पडत हे सर्व सुरू झाले आहे; परंतु याचा अर्थ कोरोना संपला आहे असे नाही. म्हणूनच तर संभाव्य धोका टाळण्यासाठी समस्त वारकरी बांधवांच्या श्रद्धा व आस्थेचा सोहळा असलेली पंढरपूरमधील माघी वारी रद्द करण्यात आली आहे, तर त्र्यंबकेश्वर येथे भरणारी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची यात्राही रद्द करण्यात आली आहे. ठिकठिकाणच्या गाव पातळीवरील यात्रा-जत्राही यंदा रद्द करण्यात आल्या आहेत. पण असे असताना व्यक्तिगत पातळीवर जी खबरदारी घ्यायला हवी ती घेतली जाताना दिसत नाही हे चिंताजनकच नव्हे तर संकटाला थांबून राहा असे सांगण्यासारखेच आहे.
देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका दिल्ली व केरळ सोबतच महाराष्ट्रालाही बसला आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.५८ टक्के झाले आहे ही समाधानाची बाब असली तरी सद्य:स्थितीत देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी तब्बल ७० टक्के रुग्ण महाराष्ट्र व केरळमध्येच असल्याने यासंबंधीच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या दोन्ही राज्यात विशेष पथके पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ संकट टळलेले नाही; पण उपस्थितीविषयक संख्येची मर्यादा न पाळता मोठमोठे सोहळे आयोजित होत आहेत. अशा सोहळ्यांमध्ये सहभागी होताना तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक असतानाही त्याचा व सॅनिटायझरचा वापर अभावानेच होताना दिसतो. रिक्षा, बसेस व रेल्वेमध्ये प्रवास करतानाही मास्कविना प्रवासी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. किमान सार्वजनिक ठिकाणी तरी याबाबत काळजी घेणे गरजेचे बनले आहे, पण यासंबंधात स्थानिक स्वराज्य संस्थांनी दंडाची तरतूद केली असली तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. तेव्हा कोरोनाबाबत स्वयंस्फूर्तपणे काळजी वाहिली जाणार नसेल तर यंत्रणांनी बडगा उगारून त्यासाठी संबंधिताना बाध्य करायला हवे, अन्यथा कोरोना गेला गेला म्हणता परत येण्याची भीती नाकारता येऊ नये.
https://www.lokmat.com/editorial/corona-crisis-fading-caution-needed-a629/
Monday, February 1, 2021
Saraunsh published in Lokmat on Jan 31, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210131_2_13
https://www.lokmat.com/nashik/politics-name-development-nashik-municipal-corporation-a321/
Subscribe to:
Posts (Atom)