Thursday, February 10, 2022

EditorsView published in Online Lokmat on Feb 10, 2022

पोटातल्या आगीतून घडणारे गुन्हे.. किरण अग्रवाल / भावनांशी संवेदना निगडित असतात, त्यांना हळवेपणाचा किंवा अलवारतेचा पदर लाभलेला असतो त्यामुळे त्यात तडजोडीचा विचार करता येऊ नये हे खरेच; परंतु जेव्हा परिस्थिती बिकट बनून जाते तेव्हा संवेदनांचा बाजार मांडला जातोच, शिवाय भावना काखोटीस मारून व्यवहाराचे सौदे केले जातात. असे प्रकार कारुण्य, कणव जागवणारे असतात तसेच शोचनीय व दुर्दैवी म्हणवणारेही असतात, परंतु ते रोखणे अवघड असते कारण त्यास कायद्याच्या चौकटीत मोडणाऱ्या गुन्हेगारीकरणाखेरीज दारिद्र्यातुन आकारास आलेल्या मजबुरीसारखे इतर अनेक पदर लाभलेले असतात. रुपया - पैशांसाठी पोटच्या मुलांची विक्री करण्याचे जे प्रकार अलीकडच्या काळात वाढलेले दिसत आहेत त्याकडेही याच दृष्टीकोनातून पाहता येणारे आहे. या प्रकारांचे समर्थन कुणीही करणार नाही, परंतु समाजाच्या आर्थिक व मानसिक अवनतीच्या संदर्भाने त्याचा विचार होणे गरजेचे ठरावे.
एकीकडे अपत्यप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या दाम्पत्यांची वैद्यकीय प्रगत तंत्र असणाऱ्यांच्या दारी गर्दी वाढत असताना, दुसरीकडे आहेत ती अपत्ये चक्क पैश्याच्या मोबदल्यात विकून टाकण्याचे प्रकारही वाढीस लागलेले दिसत आहेत. अलीकडेच पुण्यातील कोथरूडच्या एका मुलाला एक लाख रुपयात पनवेलच्या दांपत्यास विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबईच्या नेरुळमध्ये ही असाच प्रकार उघडकीस आला होता, तेथे तर एकाच दाम्पत्याने आपली तीन अपत्ये विक्री केल्याचे समोर आले होते. सातारा, नांदेड, डोंबिवली, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा आदी ठिकाणीही असे प्रकार घडले असून गुन्हे दाखल आहेत. मानवी तस्करीचे हे प्रकार भावना गोठवणारेच असून, पोटच्या मुलांची विक्री करणाऱ्या मात्या पित्यास त्याचे काही एक वाटत नसावे काय असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित करणारेही ठरावेत. भाव भावना किंवा संवेदनांचा संबंध या प्रकरणांतुन पणास लागून जातो तो म्हणूनच. --------------- अपत्याला पैशाच्या मोबदल्यात विकल्याबद्दल 'माता न तू वैरीणी...' म्हणून संबंधित मातांकडे पाहिले जाते, मात्र दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असलेली कुटुंबे यात जेव्हा आढळून येतात तेव्हा, गुन्हेगारीच्या चौकटी पलिकडील सामाजिक, आर्थिक विपन्नावस्थेच्या विदारकतेची वास्तविकता समोर येऊन जाते, जी संवेदनशील मनांना अस्वस्थ करून गेल्याखेरीज राहत नाही. अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेल्या वर्गाची अगतिकता यात असते तशी किमान दुसऱ्या घरात गेल्यावर पोटच्या पिलाला दोन वेळचे जेवण मिळून त्याचे आयुष्य सुधारण्याची संबंधितांची आसही असते. या दोन्ही घटकांची परस्परपूरक गरज हेरून मध्यस्थ लाभ उठवतात. वंशाला दिवा असावा म्हणून मुलगा असण्याची एक मानसिकता आपल्याकडे अजूनही आहे, त्यातूनही काही प्रकार घडून येतात. नाते संबंधातील अगर अनाथ मुले दत्तक घेण्याचा अधिकृत मार्ग आहे, परंतु शॉर्टकटच्या नादात बुद्धी गहाण पडते. --------------- महत्वाचे म्हणजे, पोटच्या मुलांची विक्री करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचलेल्या दाम्पत्यांची मानसिकता किंवा त्यामागील गरज अभ्यासणे गरजेचे आहे. यातील अनेकांची अवस्था उपासमारीशी निगडित आढळते. आपल्याकडे म्हणजे भारतात ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनामुळे तर त्यात भरच पडली आहे. यासंदर्भात जागतिक भूक निर्देशांक बघता भारताचा नंबर 116 देशांच्या यादीत 101व्या क्रमांकावर घसरला आहे. 2020 या वर्षात तो 94व्या स्थानी होता. 'भुखे पेट भजन ना होय' असे नेहमी म्हटले जाते. पोटातली आग स्वस्थ बसू देत नाही. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पोषण मिशन- 2 ची घोषणा केली, पण त्यासाठी तरतूद कमी आहे. तेव्हा दोन वेळच्या अन्नासाठी वंचित राहणारा जो घटक आहे त्याची आर्थिक व मानसिक मजबुरी टाळण्यासाठी काही करता येईल का याचाही विचार व्हायला हवा. पोटच्या गोळ्याला विकण्यासारखी निर्दयता, भावनाहीनता आकारास येण्यामागील समाजशास्त्रीय कारणांचा कायद्याच्या पलिकडे जाऊन शोध वा अभ्यास होणे यानिमित्ताने गरजेचे ठरते. https://www.lokmat.com/editorial/crimes-caused-by-stomach-fire-a310/?fbclid=IwAR2Q4gJpze0lX_YXrvZxnLP5e3cdMX4Ei5o8lZ9Egq2YCjbWZT81KHPy-Vw

No comments:

Post a Comment