At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, February 24, 2022
आजोळच्या मातीचा गंध न्यारा...
20 Feb, 2022
आजोळच्या मातीचा गंध न्यारा...
काही आठवणी या तहहयातच्या असतात, आईचं माहेर म्हणजे आजोळच्या आठवणी या त्यातीलच.
ममत्वाच्या हळुवार व अलवार भावनांचा पदर लगडलेला असतो या आठवणींशी. आजोबा, आज्जी, मामा, मामी व गल्लीतले सारे ओळखी पाळखीचे असंख्य व्यक्ती या भावबंधाशी जोडलेल्या असतात.
जळगाव जामोद हे माझं आजोळ. माझा जन्मही तिथलाच, त्यामुळे लोकमत अकोला आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा मी आजोळात आलो अशी भावना बोलून दाखविली होती.
येथे आलो तेव्हापासून मनात उत्कंठा लागून होती जन्मगावी जायची. तेथील आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी प्रा. नानासाहेब कांडलकर यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याकडे सांत्वनपर भेटीच्या निमित्ताने युनिट हेड आलोक कुमार जी शर्मा व मार्केटींग अधिकारी संदीप दिवेकर यांच्या सोबतीने हा योग जुळून आला.
****
नीटसे आठवत नाही, परंतु सुमारे 35 ते 40 वर्षानंतर तेथे गेलो. सेठ नारायणदास लक्ष्मणदास अग्रवाल हे माझे आजोबा. त्याकाळातील मोठे नावाजलेले सराफा व्यावसायिक होते ते. तालेवार आसामी होती. माझ्या जन्माआधीच त्यांचे निधन झालेले असल्याने मी त्यांना बघण्याचा प्रश्नच नव्हता, पण माझ्या आजीने व मामा, मामींनी माझे खूप लाड पुरवले.
शिवप्रसाद व कन्हैयालाल (हरिसेठ) हे माझे दोन मामा जळगावी रहात, तर तिसरे मामा जगदीश हे बऱ्हाणपूर येथे राहतात.
माझे शालेय शिक्षण सुरू असतानाचा तो काळ होता. तेव्हा पर्यटनाची ठिकाणे तितकी विकसीत नव्हती त्यामुळे शाळांना सुट्ट्या लागल्या रे लागल्या की आईसोबत लोखंडी पेटी उचलून मामाच्या गावाला येणे हाच एक पर्याय असे.
जळगावी आलो की आई व मामांसोबतच गल्लीतले भिकारीलालसेठ, गोकुलसेठ, फकिरचंदसेठ, बिहारीसेठ, दामू सेठ, रतनमामा, बेबीताई अशा अनेकांकडे जाणे होई. तेव्हाच्या त्यांच्या मोठमोठ्या मोकळ्या वाड्यांमध्ये खेळण्यापासून ते खाण्या पिण्यापर्यंत चंगळ असे.
बऱ्याचदा सकाळी-सकाळी आजीच्या देवपूजेसाठी भिकारीलाल सेठच्या घरामागील शेतात जाऊन पारिजातकाची परडीभर फुले वेचून आणावी लागत, तो गंध अजूनही मनात दरवळतो आहे.
मोठे झाल्यावर शिक्षणासाठी गाव सुटले व मामाच्या गावी जाणेही सुटले. खूप पूर्वी नगराध्यक्ष राहिलेल्या भिकारीलाल अग्रवाल यांनी निर्मित गीता भवनच्या उद्घाटनानिमित्त हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांच्या समवेत जळगावला आलो होतो, त्यानंतर मात्र येणे झाले नव्हते.
****
कालौघात आज गाव खूपच बदलले आहे.
आमच्या मामांचा तीन मजली मोठा कौलारू वाडा होता. आता त्या जागेवर डॉ. संदीप व स्वाती वाकेकर यांचे अद्ययावत हॉस्पिटल उभे झाले आहे. त्याच जागी माझा जन्म झाला आहे हे कळल्यावर त्यांनीही मोठ्या आपुलकीने आदरातिथ्य केले.
सन्मित्र व आमच्या लोकमत परिवारातीलच डॉ. किशोर केला यांनी वरवट बकाल येथेच गाठून स्वागत केले व बुलडाणा अर्बन संचलित सहकार विद्या मंदिराची भेट घडविली.
जळगावमध्ये श्री अग्रसेन नागरी पतसंस्थेत बालपणीचे स्नेही व तेथील केंद्रीय संचालक श्री नंदकिशोर अग्रवाल यांनी घेतलेली गळाभेट डोळ्यांच्या कडा ओलावून गेली.
आजोळच्या गल्ली समोरच साकारलेल्या बुलडाणा अर्बनच्या शाखेत श्रद्धेय किसनलालजी केला व डॉ. सौ. स्वाती केला यांनी स्वागत केले. तेथे गल्लीतील आठवणींना उजाळा मिळाला.
प्रा. कांडलकर सरांकडे समाचाराला गेलो होतो, परंतु आजोळच्या नात्याने सौ. वंदनाताई व त्यांच्या स्नुषेच्याही आदरातिथ्याचा परिचय घडून आला. लोकमत सखी मंचच्या विभागीय प्रतिनिधींचे बक्षीस वितरण त्यांच्या उपस्थितीत केले.
आमचे आणखी एक सहकारी जयदेव वानखडे यांचे चि. प्रतीक याचा MBBS ला नंबर लागला, त्याचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
एकूणच, भरगच्च भेटीगाठी झाल्या.
यानिमित्ताने बालपणीच्या जुन्या आठवणींच्या झुल्यावर झुलायला मिळाले.
अनेकांच्या भेटी राहून गेल्या. पाय निघता निघत नव्हता, पण नाईलाज होता. अखेर पुढच्यावेळी मुक्कामी येण्याचा निश्चय करून जळगाव सोडले...
#KiranAgrawal #JalgaonJamod
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment