Thursday, February 24, 2022

EditorsView Published in Online Lokmat on Feb 24, 2022

वाढत्या अपेक्षांमुळे आनंदाला ठेच! किरण अग्रवाल / आनंद अगर समाधान हे मानण्यावर असते असे लाख म्हटले जात असले तरी तसे ते अभावानेच मानले जाते. आहे त्यापेक्षा किंवा गरजेपेक्षा अधिक मिळवण्याच्या नादात मनुष्य आनंदाला पारखा होतो. अपेक्षाच कमी ठेवल्या तर समस्या निर्माण होत नाहीत. अर्थात व्यक्तिपरत्वे समस्या व आनंदाचे गणित बदलणारे असते. सधन, संपन्न कुटुंबातील व्यक्तींपेक्षा निर्धन वा गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद हा अधिक चटकन नजरेत भरतो, कारण त्याचा आनंद हा खूपच लहान सहान बाबीत सामावलेला असतो. अमर्याद अपेक्षांच्या जंजाळात स्वतःला अडकवून ठेवणाऱ्यास समाधान लाभणे अशक्यच असते. म्हटले तर अतिशय साधे सोपे हे तत्त्वज्ञान किंवा अध्यात्म आहे, पण भल्याभल्यांना ते उमगत नाही, परिणामी दुःखी - कष्टी जीवांची संख्या वाढू लागली आहे.
देशातील गरीब व श्रीमंतांची दरी वाढत चालली आहे. देशात करोडपतींची संख्या वाढली, मात्र आनंद कमी झाल्याची बाब हुरून या प्रख्यात संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचा उद्योग बुडाला, अनेक जण देशोधडीला लागले; त्यांची नोकरी गेल्याने व हाताची मजुरीही गेल्याने खायचे वांधे झाले, परंतु दुसरीकडे 7 कोटींहून अधिक संपत्ती झालेल्यांची संख्या 11 टक्क्यांनी वाढून 4.58 लाखांवर गेल्याचे हा अहवाल सांगतो. अर्थात मर्यादित लोकांचेच भले झाले, बहुसंख्याकांचे काय असा प्रश्‍न यातून उपस्थित होणारा आहे. करोडपतींची संख्या वाढली असली तरी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्वतःला आनंदी मानणाऱ्या लोकांची संख्या मात्र घटली आहे. सन 2021 मध्ये ती 66 टक्क्यांवर आली असून, यापूर्वीच्या वर्षात 72 टक्के होती, असेही हा अहवाल सांगतो. म्हणजे आनंदी लोक सहा टक्क्यांनी घटले आहेत आणि ते स्वाभाविकही आहे. कोरोनाचा फटका आर्थिक व मानसिकदृष्ट्याही इतका बसला आहे की या स्थितीत सामान्य माणूस आनंदी राहूच शकत नाही. ------------------- कोरोनातून सावरून अर्थव्यवस्था आता पुन्हा उभारी घेत आहे. उद्योग धंदे पूर्ववत सुरू झाले असून, रोजगारही वाढू लागला आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (इपीएफओ) गेल्या डिसेंबर 2021 मध्ये 14.60 लाख नवे सदस्य मिळालेत. डिसेंबर 2020च्या तुलनेत ही संख्या 16.40 टक्क्यांनी अधिक असल्याचे पाहता रोजगार वाढत असल्याचे स्पष्ट व्हावे. असे असले तरी मनुष्याच्या चेहऱ्यावरील आनंद वाढत नाहीये. एक वर्ग असा आहे जो वर्ष दोन वर्षात आपल्या गाड्या बदलतो, तर दुसरा वर्ग असा आहे ज्याला दोन वेळच्या पोट भरण्याची भ्रांत असते. आर्थिक पातळीवरील वाढती असमानता ऑक्सफॅमच्या अहवालातही स्पष्ट झाली आहे. ही असमानता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे हा खरा चिंतेचा विषय ठरावा, पण याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या राजकारण्यांना परस्परांची उणीदुणी काढण्यात अधिक रस असल्याचे दिसून येते. साऱ्या समस्या सोडवून झाल्याच्या अविर्भावात ते फक्त परस्परांवरील चिखलफेकीचे राजकारण करण्यात मशगुल दिसतात हे दुर्दैवी आहे. ------------------- कोरोनामुळे अनेकांची घडी विस्कटली हे खरेच. त्यातून आलेल्या भीतीमुळे अनेकांचा आनंद हिरावला गेला, परंतु ज्या प्रमाणात जीवितहानीही झाली ते पाहता, यातून तावून सुलाखून सुखरूप बाहेर पडलेल्यांनी त्याबद्दलच्या समाधानाचा सुस्कारा टाकायला हरकत नसावी. सारे काही पूर्ववत व्हायला कदाचित काही वेळ लागेलही, परंतु आज जे आहे त्यात समाधान मानले तर जगणे आनंदी होऊ शकेल. 'घायल तो यहा हर एक परिंदा है, मगर जो उड सका वही जिंदा है..।' हे जे कुणी म्हणून ठेवले आहे ते यासंदर्भात अगदी तंतोतंत खरे ठरते. समस्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडल्याखेरीज समाधान शक्य नाही. ते मिळवायचे तर अपेक्षाच मर्यादित ठेवायला हव्या. ओसरी पाहून पाय पसरणे, ज्याला म्हणतात ते व्हायला हवे. तेच होत नाही. झटपट यशाच्या मागे धावताना मनुष्य नको इतक्या अपेक्षा वाढवून बसतो. त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी धावाधाव करताना जे आहे त्यातील आनंद तो गमावून बसतो. अपेक्षा किंवा स्वप्ने मोठी पाहायलाच हवीत, परंतु त्यांना व्यवहार्यता वा वास्तविकतेची जोडही हवी. पण तसे होत नाही. अध्यात्मिक गुरु नेहमी सांगतात, 'मनुष्य आपल्या समस्यांमुळे इतका दुःखी नाही, जितका तो शेजारच्याच्या सुखामुळे दुःखी असतो.' तेव्हा दुःखी कष्टी राहण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानून आनंदी राहायला काय हरकत आहे?

No comments:

Post a Comment