Thursday, June 18, 2020

Aaswe sampli.. Sanjuseth...

17 मे 2020 on Facebook




आसवे संपली, डोळेही रिते झाले ...

निर्व्याज्य स्नेहाच्या धाग्याने घट्ट विणलेली जी नाती असतात, ती रक्ताच्या नात्यापेक्षाही अतूट व अभिन्न अशी असतात. राजी- नाराजी, नफा- नुकसान आदी कसली जळमटे त्यात नसतात. असाच एक नातेवाईक मला लाभला होता, ज्याचे नाव संजय बैजनाथ अग्रवाल.
रविवार कारंजावर साधा नारळ विक्रीचा त्याचा व्यवसाय, पण संजू माझी सावली बनून गेला होता. म्हणूनच तर आम्ही दोघांनी मिळून ट्वीन होम बनवले, त्यानंतर आमचे संबंध अधिक गहिरे झाले. शर्मा क्वार्टरच्या कॉट बेसिस पासून ते आजपर्यंतच्या गेल्या 35 वर्षाहून अधिक काळाचा तो माझ्या सुख दुःखाचा केवळ साक्षीदारच नव्हे, तर साथीदारही राहिला.
तो एकाचवेळी अनेक भूमिकेत असायचा. कधी मित्र म्हणून मनातल्या गुजगोष्टी करायचा, कधी भाऊ म्हणून सल्लागाराची भूमिका निभवायचा. वडील गेल्यानंतर हक्काने मला दटावणारा कुणी राहिला नव्हता म्हटल्यावर तो वडीलकीच्या भूमिकेतून माझ्यावर रागवायचाही तर आईच्या मायेने कधी गोंजारायचाही. मला ऑफिसवरुन यायला उशीर होतो तर रात्रीच्या जेवणाचा डबा का नेत नाही म्हणून माझ्या बायको व आई, बापापेक्षा तो अधिकदा माझ्यावर संतापायचा. कधी कधी वाटे हा इतका काय हक्क गाजवतो माझ्यावर, पण त्याची सवय होऊन गेली होती आताशा. त्यामुळे एखादं दिवशी तो भेटला बोलला नाही तर चूक चुकल्यासारखे वाटे. त्याचे हास्य असे गडगडाटी होते की, तो हसल्यावर महाभारतातली पात्रे डोळ्यासमोर येई.
ऑफिसला निघताना 'शेट येतो' असा आवाज मी द्यायचा व त्याने दाराशी येऊन 'जास्त उशीर करू नका... ' म्हणून मला तंबी द्यायची, हा गेल्या कित्येक वर्षाचा परिपाठ होऊन गेलेला होता. अनेकदा अनेक मुद्द्यांवर आमचे पटत नसे, पण त्याने माझी सावली कधी सोडली नाही. आमचे मित्रत्व जाणारे अनेकजण म्हणत, एकवेळ दुनिया माझी साथ सोडेन, पण कितीही मतभिन्नता असली तरी संजू माझी पाठ सोडणार नाही.
म्हणूनच तो सर्वकाही होता माझ्यासाठी...
माझा पत्रकारितेचा पेशा व त्यातील व्यस्ततेमुळे माझे नेहमीच घराकडे दुर्लक्ष होत आले, पण किराणा भरण्यापासून भाजीपाला आणून देण्यापर्यंतही तोच लक्ष द्यायचा. माझ्या पोरींचे माझ्याहीपेक्षा अधिक लाड त्यानेच पुरविले. सख्खे म्हणवणारे व रक्ताच्या नात्याचेही हल्ली इतके कुणी करत नाही. अशात संजूसारख्याचे लाभणे खरेच भाग्याचे होते.
सध्याच्या लॉकडाऊनमूळे आज रविवारी त्याची कटिंग करून द्यायचे आमचे ठरले होते, पण तो काल शनिवारी अचानक धक्का देऊन निघून गेला अनंताच्या प्रवासाला...
मी उन्मळून पडल्यागत झालोय...
आसवांचे कुंभ रिते झालेय, पण त्या प्रत्येक अश्रूंच्या थेंबात तरळणारी संजूची प्रतिमा नजरेसमोरून हटत नाहीये...
जायचं तर प्रत्येकालाच आहे, पण इतक्याही लवकर जायचं नव्हतं हो शेठ...

#Sanjuseth #SanjayAgrawalNashik 

No comments:

Post a Comment