Thursday, June 18, 2020

Kolhapurchya lekich krantikari paul...

12 जुलै, 2018  ·



'कोल्हापूरच्या लेकीचं क्रांतीकारक पाऊल'..

   सध्या बेटी बचाओ,बेटी पढाओ सारख्या घोषणांचा मनमुराद पाऊस पडतो आहे.अर्थात या घोषणा उर्जा देणा-या नक्कीच आहेत.परंतु एखादी परंपरा मोडून प्रागतिक विचार कृतीत आणणं, हे नक्कीच मोठं धाडस आहे.
     हिंदू समाजाच्या रचनेत विविध जाती समुह आपापले सोपस्कार पार पाडत आपलं धार्मिक अधिष्ठान जपतांना दिसताहेत.परंतु अगरवाल समाजातील एक गृहिणी जेव्हा पित्याच्या तिरडीला खांदा देते, चितेला मुखाग्नी देते व पाण्याने भरलेल्या मडक्यासह चितेला फेरी मारून ते मडकही फोडून घेते आणि जमलेला समुह निरोप घेतांना या रणरागीणीच्या धैर्याला नमस्कारही करतो! आश्चर्य आहे ना ?
     एका रचित कथेला शोभेल असा हा दुर्मिळ प्रसंग घडलाय समता विचाराचे प्रेरक क्रांतीकारी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरात. कोल्हापूरातल्या अगरवाल समाजातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. जेव्हा कुण्या महिलेने स्मशानात पाऊल ठेवले.एकीकडे पावसामुळे नदी नाल्यांना आलेले पाणी कवेत घेऊन पंचगंगा दुथडी भरून वाहात होती, तर दुसरीकडे याच पंचगंगातीरी लेकीकडून पितृ कर्तव्यपूर्तीचा अनुपम साक्षात्कार घडून येत होता. हाच तर आहे शाहू महाराजांचा संस्कार व त्यांचा आदर्श.
सौ.निलम अग्रवाल असं या धैर्यवान भगिनीचं नांव आहे ! कोल्हापूरच्या बझार गेट येथे माहेर असलेल्या निलमताई आमच्या नाशिकवासी आहेत,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. निलमताईंनी आपले वडिल कालकथित शंकरलालजी अग्रवाल यांची अंतिम श्वासापर्यंत आपल्या घरी, नाशिकला अविरत सेवा केली व आपल्या वडिलांची अखेरचे संस्कार आपल्या आप्तेष्ट व गोतावळ्याच्या गावगराड्यात करायची इच्छाही पूर्ण करीत  कोल्हापुरात पंचगंगेच्या तिरी स्वतः त्यांचेवर अंतिम संस्कार केलेत.
अर्थातच, निलमच्या या धाडसी निर्णयात तिच्या भगिनी डॉ अर्चना आशिष अग्रवाल (पिंपरी चिंचवड) व मनीषा अनिल मोहनका (हुबळी कर्नाटक) यांची सहमती खरी मोलाची ठरली. डॉ अर्चना व मनीषा यांच्या पाठबळामुळेच निलम हे करू शकली... कोल्हापुरातील काका श्री मुरारी अग्रवाल यांनी या प्रागतिक विचाराला बळ देत खंबीरपणे निलमच्या पाठीशी उभे राहून हे सारे प्रत्यक्षात घडवून आणले.  मोठे काका श्री ओमप्रकाश अग्रवाल, बंधू किशोर, विशाल, कुणाल आदि साऱ्यांचाही होकार लाभला. हुबळीतील बहीण स्वाती प्रत्येक क्षणी सावलीसारखी सोबतीला होती...
समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांवर सारेच ताशेरे ओढतात.परंतु आचरण आणि कृतीने  समाजाच्या साक्षीने निलमताई यांनी एक क्रांतीकारक आरंभ नक्कीच केला जो समाजपुढील आदर्श ठरावा !               
निलमताई आणि अगरवाल कुटुंबियांना सलाम।
           
- मनोहर अहिरे, गीताई फौऊंडेशन,नाशिक.           
मोबा. 9850556499

No comments:

Post a Comment