At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, July 3, 2023
माणुसकी धर्माची पूजा बांधलेले महापुरुष !
02 July 2023
माणुसकी धर्माची पूजा बांधलेले महापुरुष !
सामाजिकच नव्हे तर कौटुंबिक जबाबदारीच्याही जाणीवा आज क्षीण होत चालल्या असून, दुसऱ्याच्या मतांचा आदर तर दूर; परंतु ते ऐकूनच न घेण्याची प्रवृत्तीही बळावत चालली आहे. अशात 'वसुधैव कुटुम्बकम'चा मंत्र आचरून पीड पराई जाणणाऱ्या व लोक'मता'चा आदर करण्याचा आदर्श प्रस्थापित करून गेलेल्या ज्या थोर व्यक्तित्वांचे स्मरण होणे स्वाभाविक ठरून जाते त्यातील एक नाव म्हणजे आमचे श्रद्धेय बाबूजी स्व. जवाहरलालजी दर्डा. स्वातंत्र्य सेनानी, राज्याच्या मंत्रिमंडळात दीर्घकाळ अनेकविध खात्यांची जबाबदारी सांभाळलेले मंत्री व 'लोकमत'सारख्या क्रमांक एकच्या वृत्तपत्राचे संस्थापक एवढीच बाबूजींची ओळख नसून, अखिल विश्वासाठी अनुकरणीय ठरलेला गांधीवाद जगलेले व आजच्याही काळात गरजेच्या ठरलेल्या माणुसकी धर्माची पूजा बांधलेले महापुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहता येणारे आहे. बाबूजींचे मोठेपण सामावलेले आहे ते त्यांच्या याच गुणधर्मात.
व्यक्तीचे व्यक्तित्व हे त्याच्या विचारासोबतच आचाराशी निगडित असते. बऱ्याचदा काही जणांबाबत विचाराप्रमाणे आचरण घडत नसल्याचे दिसून येते. उक्ती व कृतीत, म्हणजे 'कथनी व करनी'त फरक असला की अशी व्यक्ती लोकादरास पात्र ठरू शकत नाही. बाबूजी मात्र 'बोले तैसा चाले' या पंथातले होते. राजकारणाच्या मर्यादा त्यांना कधीच आड आल्या नाहीत. साधेपणा व असामान्यातही सामान्यपणा, हा त्यांचा दागिना होता. मंत्रिपदी असतानाही मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत व तेदेखील सायकलीवर पाठवण्याची भूमिका ही त्यांच्या याच सामान्यपणातून आलेली दिसते. यासंदर्भातले त्यांचे हे एवढे एकच उदाहरण नाही, तर मी स्वतः अनुभवलेल्या एका प्रसंगाचाही दाखला देता येणारा आहे. नाशकात लोकमतच्या स्वतंत्र आवृत्तीचा प्रारंभ झाला त्यावेळी बाबूजी जवाहरलालजी दर्डा आलेले होते. गावातील विविध मान्यवरांच्या शुभेच्छा स्विकारून झाल्यावर रात्री सर्व सहकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. यावेळी आम्ही वाढून आणून देऊ पाहिलेले ताट विनम्रपणे नाकारून ते स्वतः सर्व कर्मचाऱ्यांबरोबर रांगेत उभे राहिले व आपला नंबर आल्यावर त्यांनी जेवण घेतले. साधेपणासोबतच विनम्रतेचा संस्कार त्यांनी अशापद्धतीने आमच्या तरुण मनांवर आपल्या कृतीतून रुजवला.
---------------
लोकोत्तर महापुरुषांचे मोठेपण त्यांच्या विचारांत व निखळ - निकोप आपलेपणात कसे सामावलेले असते तेही या निमित्ताने आम्हास अनुभवयास मिळाले. नाशकात लोकमतने पाऊल ठेवले त्यावेळी तेथे 'गावकरी'चा बोलबाला होता. पण व्यावसायिक स्पर्धेचा तिळमात्रही विचार न करता त्यांची व दै. गावकरीचे संस्थापक, संपादक पत्रमहर्षी दादासाहेब पोतनीस या दोघा मान्यवरांमध्ये उशिरापर्यंत दिलखुलास गप्पांची मैफल रंगलेली आम्ही बघितली. विचारांची, भूमिकांची स्पष्टता असली की स्पर्धेची भीती बाळगण्याची गरज नसते हेच यातून दिसून आले. महत्वाचे म्हणजे, 'वाचक हाच आपला मालक आहे ही जाण मनात ठेवून वाचककेंद्री पत्रकारिता करा. लोकांच्या अडीअडचणी, दुःख, दैन्यावर विशेष भर द्या..', असे मोलाचे मार्गदर्शन बाबूजींनी यावेळी आम्हास केले. राजकारणात राहूनही आपल्या राजकारणासाठी वृत्तपत्राचा वापर न करता सामान्यांबद्दलच्या तळमळीतून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचा बाबूजींचा सल्ला म्हणजे 'पत्रकारिता परमो धर्मा'ची आमची जाण जागवणाराच होता.
----------------
'लोकमत'च्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवतानाही त्यांनी नेहमी लोक- मताचा आदरच केला. मंत्री म्हणून आपली जबाबदारी निभावताना वृत्तपत्रातील संपादक, सहकाऱ्यांच्या मतांना अव्हेरण्याची भूमिका त्यांनी कधी घेतली नाही. यासंदर्भात बुलडाण्यातील एक प्रसंग उद्धृत करता येणारा आहे. बाबूजी बुलडाण्याचे पालकमंत्री असताना शासनाच्या एका परिपत्रकानुसार जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत पत्रकारांना बसू न देण्याचा निर्णय घेतला गेला होता. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पत्रकारांनी समितीची बैठक आटोपल्यावर पालकमंत्री म्हणून बाबूजींना घेराव घातला, यात लोकमतचे पत्रकार सुभाष गादिया आघाडीवर होते, पण घेरावमधून बाहेर पडून परतीला निघताना बाबूजींनी गादिया यांना जवळ बोलावून घेतले व पत्रकार म्हणून बजावलेल्या कर्तव्याबद्दल 'गुड जॉब' म्हणत जणू प्रशस्तीपत्र दिले. सहकाऱ्यांना आपल्या मत प्रदर्शनासाठी अशी व इतकी मोकळीक देण्याच्या बाबुजींच्या या दिलदारपणातुन पर- मताचा आदर करण्याची शिकवण मिळून गेली. लोकमतमध्ये प्रकाशित अनेक बातम्यांबद्दल विधिमंडळात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना मंत्री म्हणून त्यांना उत्तरे देण्याची वेळ आली, पण राजकारण व पत्रकारिता यात त्यांनी कधी गल्लत केली नाही. लोकमत मधील आपल्या संपादकांचे व सहकाऱ्यांचे स्वातंत्र्य त्यांनी नेहमीच जपले.
मंत्रिपदाचा बडेजाव न मिरवता आपल्या साध्या राहणीतुन व कार्यातून जीवनाच्या अंतापर्यंत बाबूजींनी गांधीवाद जपला. आमच्यासारख्या अनेक मुलांमध्ये पत्रकारितेला केवळ चरितार्थाचे व नोकरीचे साधन न समजता समाज ऋण फेडण्याचे माध्यम असल्याचा संस्कार रुजवला. त्यांनीच घालून दिलेल्या आदर्शाच्या वाटेवरुन आज लोकमतची व आमच्यासारख्या असंख्य पत्रकारांची वाटचाल सुरू आहे.
----------------
आज त्यांच्या जन्म शताब्दी वर्षाची सांगता होते आहे.
बाबूजींना विनम्र अभिवादन...
- किरण अग्रवाल
कार्यकारी संपादक, लोकमत अकोला
Labels:
Articles
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment