Thursday, April 30, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 30 April, 2020

Coronavirus: मालेगावची हालत का बिघडली?

किरण अग्रवाल

स्वस्थता व सुस्तता ही व्यक्तिगत पातळीवर असो, की यंत्रणेच्या; कुठल्याही पातळीवर असली की ती नुकसानीस कशी निमंत्रण देणारी ठरते याचा आदर्श वस्तुपाठ कोरोनामुळे उद्भवलेल्या मालेगावमधील परिस्थितीवरून घेता यावा. कोरोनाच्या विळख्यात अडकून हॉटस्पॉट ठरलेली महाराष्ट्रातील जी विविध शहरे आहेत, त्यापैकी पहिल्या पाचात नाशिक जिल्ह्यातील मालेगावने स्थान मिळविल्याने तेथे ही परिस्थिती का ओढविली, कुणाची स्वस्थता त्यास कारणीभूत ठरली, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये. स्थानिक यंत्रणा व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष यास जबाबदार आहे, की केवळ सरकारी सूचनांचे पालन न करणाऱ्या मालेगावकरांचा दोष; याचा यानिमित्ताने आढावा घेतला जाणे गरजेचे आहे, कारण यापुढील काळात तेथे होणारा कोरोनाचा प्रसार किंवा संक्रमण रोखण्यासाठी ते गरजेचे ठरणार आहे.



कोरोनाच्या संदर्भाने राज्याचा विचार करायचा तर मुंबई, पुणे व ठाणे येथे बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या तीन शहरांच्या पाठोपाठ मालेगावचा नंबर लागतो. मालेगाव सध्या दोनशे बाधित संख्येच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या मृत्यूच्या संदर्भाने विचार करायचा झाल्यास मुंबई व पुण्यानंतर मालेगावचा नंबर लागतो. तेथे आतापर्यंत १२ जणांचे मृत्यू कोरोनामुळे ओढविले आहेत. शिवाय दिवसागणिक बाधितांच्या संख्येत पडत चाललेली भर पाहता, यापुढील काळात हे संकट अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत; म्हणूनच मालेगावमध्ये अशी स्थिती साकारण्यामागील कारणांचा शोध घेतला जाऊन उपाययोजना केल्या जाणे अत्यंतिक गरजेचे बनले आहे. मालेगाव हे तसे तालुक्याचे शहर. यंत्रमागाचा प्रामुख्याने व्यवसाय असलेल्या या मालेगावची ओळख म्हणजे हातावर पोट असणाऱ्यांचे गाव. कधीकाळी जातीय दंगली या मालेगावची ओळख बनून राहिल्या होत्या. या दंगलींनी शहराला खूप मागे नेले याची जाणीव मालेगावकरांना झाली. जसा जसा काळ पुढे सरकत गेला, नवीन पिढी आली; तिने या दंगलीत होणा-या आपल्याच स्वत:च्या नुकसानीला लक्षात घेऊन दंगलीच्या आठवणींना तिलांजली देत विकासाचा मार्ग पत्करला. राजकीयदृष्ट्याही तेथील मोसमपुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पालिकेची महापालिका झाली, त्यातून बकालपणाची ओळख पुसून मालेगाव नवा चेहरा घेऊन उभे राहू पाहत असल्याचे गेल्या काही काळात प्रकर्षाने दिसून येत होते. अशातच कोरोनाचे संकट ओढवले व म्हणता म्हणता राज्यातील मुंबई-पुण्यापाठोपाठ मालेगावदेखील हॉटस्पॉट बनले. त्यामुळे पुन्हा एकदा मालेगावचे नाव चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे.

मालेगाव आणि कोरोनाचा संबंध तपासता प्रारंभीच्या म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस त्या काळात तेथे यासंदर्भातला मागमूसही आढळत नाही. कागदी घोडे नाचवणे यापलीकडे वास्तवात कसलीही उपाययोजना अगर जनजागृती तेथे होताना दिसली नाही. माध्यमांमधून यासंदर्भात लक्ष वेधले जाऊनदेखील स्थानिक यंत्रणा जागची हलत नव्हती हे विशेष. दरम्यानच्या काळात नाशिक शहरात एक बाधित आढळला व सर्व यंत्रणेचे लक्ष त्याच रुग्णाकडे व नाशिककडे केंद्रित झाले, त्यामुळे मालेगाव आणखीनच बाजूला पडल्यासारखे झाले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालेगावमध्ये पहिला रुग्ण दगावला व त्याच दिवशी पाच कोरोनाबाधित आढळले आणि नंतर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. कोरोनाचा कहर माजल्यावर व थेट मुंबईमधून मुख्यमंत्र्यांनी मालेगावमधील एका डॉक्टरशी संपर्क साधून माहिती घेईपर्यंतही जुजबी कामकाज चालल्याचे दिसून आले, त्यामुळे कोरोनाचे संक्रमण या काळात वाढून गेले आणि आता तर परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे दिसून येत आहे. यास स्थानिक यंत्रणा नक्कीच जबाबदार आहे. त्यामुळेच तेथे अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांची उचलबांगडी करून धनंजय निकम यांना नेमण्यात आले, तर अवघ्या महिनाभरात सेवानिवृत्त होणारे महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनाही बाजूस करून नवे आयुक्त म्हणून त्र्यंबक कासार यांच्याकडे जबाबदारी सोपविली गेली. पण तोपर्यंत संकट थेट घरात शिरून गेले.



महत्त्वाचे म्हणजे एकीकडे असे प्रशासकीय दुर्लक्ष होताना दिसून आले असतानाच, दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेट पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर संपूर्ण राज्यात त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना मालेगावमधील दळणवळण व चलनवलन जणू काही कशाची भीती नसल्यासारखेच सुरू असलेले दिसले. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत मालेगावमधील व्यवहार, वर्तन आढळून येत होते. कोरोनाच्या संदर्भाने महापालिकेतर्फे केल्या जात असलेल्या सर्वेक्षणालाही तेथील काही मोहल्ल्यांमध्ये विरोध झाला. इतकेच नव्हे तर सर्वेक्षण करणा-यांवर हल्ले केले गेले, याहीपुढे जाऊन डॉक्टरांवर व रुग्णालयातदेखील हल्ल्याचे प्रकार घडून आले. हे सर्व होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत जाणीव - जागृती करून नागरिकांना त्यांच्या हिताचे काय ते लक्षात आणून द्यायचे, तर तेदेखील पूर्ण क्षमतेने होऊ शकले नाही. मालेगावमधील लोकप्रतिनिधी वैयक्तिक राजकीय प्रतिमा उजळून घेण्यात व्यस्त राहिले. प्रशासनावर वचक ठेवून प्रशासनाला कामास लावण्याचे त्यांच्याकडून राहूनच गेले, त्यामुळे कोरोनाचा विषाणू हा शहरात बिनदिक्कतपणे शिरला व त्याने हाहाकार माजविला. आता दिवसेंदिवस हे संकट अधिक तीव्र होताना दिसत आहे, त्यामुळे झालेल्या चुका सुधारून सर्वांनीच धडा घेणे व स्वत: सोबतच मालेगाव शहराची सुरक्षितता जपणे प्राधान्याचे झाले आहे. मालेगावकरांनी आतापर्यंत जे सोसले आहे व ज्या वेदनेतून त्यांची वाटचाल सुरू आहे ते पाहता यात आगामी काळात नक्कीच सुधारणा होईल व कोरोनावर मात करण्यात यश लाभेल, अशी अपेक्षा आहे.

https://www.lokmat.com/editorial/coronavirus-why-did-malegaon-get-worse/

No comments:

Post a Comment