Thursday, September 9, 2021

EditorsView published in Online Lokmat on Sept 09, 2021

बाप्पा यावे, विघ्न हरावे... किरण अग्रवाल / संकटे सांगून येत नसतात हे खरेच, परंतु काही संकटे ही आपणच निमंत्रण देऊन बोलविल्यासारखी येतात, कोरोना त्यापैकीच एक. कोरोनाच्या दोन लाटांनी खूप नुकसान घडविले, मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली; परंतु रक्तबंबाळ करणारी ठेच खाऊनही त्यातून धडा घेतला गेला नाही परिणामी आता पुन्हा या संकटाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची वेळ येऊ पाहतेय. त्यामुळे सर्वत्र भयाचे वातावरण दाटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत असल्यामुळे, 'बाप्पा यावे आणि आपणच हे विघ्न हरावे' अशी आळवणी करण्याची वेळ आली आहे.
एरव्ही गणेशोत्सव म्हटला की मंतरलेला व भारलेला काळ राहात आला आहे. या दशदिनात गावोगावी, शहरोशहरी भक्तीचा पूर लोटताना दिसे. सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे व मांगल्याचे वातावरण असे; पण कोरोनाचे संकट उपटले व गेल्या वर्षापासून निर्बंध आले, त्यातून या उत्सवावरही मर्यादा आल्या. श्रींच्या मूर्तीची उंची व मंडपाचे आकार कमी झाले, मिरवणूकांवर बंदी आली; सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आलीत. अर्थात असे झाले तरी श्रद्धा तसूभरही ढळली नाही. बाप्पा हे सुखकर्ता व दुखहर्ता असल्याने कोरोनासारखे संकटही तेच हरतील या श्रद्धेने भाविक यंदाही बाप्पांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. ---------------- गणेशोत्सव हा लोकोत्सव असतो, पण कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. श्रद्धे बरोबरच सुरक्षिततेचा विचारही महत्त्वाचा आहे. केरळमध्ये ओणम सणाच्या नंतर कोरोना वाढल्याची आकडेवारी पाहता आपल्याकडे तसे होऊ नये म्हणून काळजी गरजेची आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रत्नागिरी,सातारा व अहमदनगर या पाच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संक्रमणाचा वेग चिंताजनक असल्याचे आढळून येत आहे. राज्यातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण याच जिल्ह्यातील असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच दिली आहे. नागपूरमध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याने तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असे समजून लवकरच कडक निर्बंध गरजेचे असल्याची भूमिका पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलून दाखविली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याच संदर्भाने 'माझे घर, माझे बाप्पा' अशी घोषणा करून मुंबईवासीय यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मथितार्थ इतकाच की, गणेशोत्सव साजरा करताना खबरदारीचा विचार बाजूला पडू नये. गणराय हे बुद्धिदाताही असल्याने यासंबंधी सारे सुबुद्धीने वागतील अशी अपेक्षा आहे.
कोरोना तर आहेच आहे, यंदा धुवाधार पावसानेही राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडविली आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून संसार उघड्यावर पडले आहेत. चांगली तरारून आलेली पिके पाण्यात आडवी झाली आहेत. पेरणी झाल्यावर पावसाने दडी मारली होती म्हणून डोळ्यात पाणी होते, पण आता अनेक भागात इतका मुसळधार पाऊस झाला की हाती येऊ पाहत असलेले पीक हातातून जाण्याची लक्षणे आहेत. इकडून आड, तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. या संकटांच्या पार्श्‍वभूमीवर बाप्पा श्री गणेशाचे आगमन होत आहे. सार्वजनिक उत्सवाला बंदी असली तरी पूर्वी इतक्याच श्रद्धेने, आस्थेने व उत्साहाने अबालवृद्ध बाप्पांच्या स्वागतासाठी आतुर आहेत. तेव्हा संकट लक्षात घेता आपण तर काळजी घेऊया व संक्रमण, संसर्गापासून बचावण्यासाठी निर्बंधांचे पालन करूयाच, आणि बाप्पानाही विनवूया की, बाप्पा यावे व विघ्न हरावे ... https://www.lokmat.com/editorial/bappa-should-come-defeat-obstacles-a642/

No comments:

Post a Comment