Thursday, January 14, 2021

आस आणि अहसास मधील जिंदगी...

आस आणि अहसास मधील जिंदगी...
आमच्या एका बाल्कनीच्या व्हरांड्यावर रोज एक कबुतर कबुतरी येऊन बसतात. फार पूर्वीपासून येत असावेत ते, पण माझं लक्ष अलीकडे गेलं त्यांच्याकडे; वर्क फ्रॉम होम करताना. आजू बाजूच्या झाडांवर पक्षांचा गलका सुरू असताना ही जोडी मात्र त्यापासून बाजूला कुजबुजत असते... फार वयही नसेल, मध्यमवयीन म्हणता येईल अशी... कान देऊन ऐकण्याचा खूप प्रयत्न केला, काय कुजबुजत असतील म्हणून... शब्द कळले नाहीत, पण देह बोलीतून भाव कळला... 'तुमचं आमचं सेम असावं जणू.... ' अर्थात, असं चोरून कुणाचं काही ऐकणं बरं नाही म्हणून मीच त्यांच्या दृष्टीआड व्हायचो... पण, तरी माझं हे चौर्य त्यांच्या लक्षात आलं असावं म्हणून की काय, त्यांचं येणं अनियमित झालं होतं मला त्यांचं येणं सवयीचं होऊन गेल्यानं मी रोज वाट बघायचो त्यांची ऊन उतरायला लागलं की ते येतात, पण त्यांना उशीर झाला की माझी तगमग व्हायची. का आले नसावेत अजून ते, म्हणून ना ना शंका डोकावायच्या .. दाराआड घुटमळणारी माझी लुडबुड त्यांना आवडत नसावी का? ते निवांतपणाच्या शोधात तिथे येतात, त्यांना हवा असतो एकांत; आणि मी ठोंब्या तेथे कडमळतो, म्हणून त्यांनी जागा तर बदलली नसावी? तेच खरे म्हणता यावे, कारण आता मी ऑफिसला जायला लागल्यापासून ते पुन्हा नियमित यायला लागलेत ! * * * खरंच आपण शहाणे असूनही किती निर्बुद्ध आहोत याची जाणीव झाली यानिमित्ताने... गलक्या पासून दूर राहण्याचं, सुरक्षिततेच भान त्यांच्याठायी आहे, पण आपल्यापाशी ते का असू नये? कोरोनाची भिती असतानाही आपण गर्दीत का शिरतो? नाका तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी का वावरतो? त्याऐवजी आपण आपल्यासाठीच जरा निवांत राहायला काय हरकत आहे? सारे काही विसरून साऱ्यांपासून अलिप्त ! 'अकेलेपन से सीखी है, पर बात सच्ची है दिखावे की नजदिकीयो से तो हकीकत की दूरियां अच्छी है...' हे जे काही कुणी सांगून ठेवलेय त्याची प्रचिती घेण्यासाठी तरी हा एकांत, अलिप्तता अनुभवायला हवी. पण आपण सारे पाश लपेटून घेतो स्वतःला, अन या पाशात स्वतःलाच हरवून बसतो... गर्दीत भटकल्यासारखे.. खिन्न, उदासपणे. * * * कुणा शायराने म्हटलेले आठवून गेले यानिमित्ताने, हर पल मुस्कुराओ, बड़ी “खास” है जिंदगी…! क्या सुख क्या दुःख ,बड़ी “आस” है जिंदगी… ! ना शिकायत करो, ना कभी उदास हो जिंदा दिल से जीने का “अहसास” है जिंदगी…..!! ही आस व तो अहसास घेऊन आपण जगलो तर खरच खूबसुरत असेल जिंदगी ... #KirananandNashik #KiranAgrawalNashik

No comments:

Post a Comment