At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, January 14, 2021
Editors View published in Online Lokmat on Jan 14, 2021
आशाओ की पतंग उड़ी उड़ी जाये...
किरण अग्रवाल /
आशा, अपेक्षांना कसल्याही मर्यादा नसतात. शिवाय जगण्यासाठीची इच्छाशक्ती वाढविण्याचे काम त्यातून घडून येते. त्यामुळेच तर ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणे’ असे म्हटले जाते. तेव्हा त्या फलद्रूप होवोत अगर न होवोत, त्याकरिता स्वप्न बघणे मात्र टाळले जाऊ नये. विशेषतः संकटाच्या अगर आपत्तीच्या काळात, तर जिथे आसमंतात निराशेचे, काळजीचे ढग दाटलेले असतात तिथे अपेक्षांचे व स्वप्नांचे पतंग उंच उडवून उद्दिष्टपूर्तीकडे झेपावण्याचे प्रयत्न प्राधान्याने करायचे असतात. कारण त्यातून आकारास येणारी सकारात्मकताच निराशेवर मात करण्याचे बळ देणारी असते. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळातून बाहेर पडून पूर्वपदावर येत असलेल्या जनजीवनातील आशावाद उंचावण्यासाठीही हेच गरजेचे आहे.
मकरसंक्रांतीला तिळाची स्निग्धता व गुळाचा गोडवा घेऊन परस्परातील स्नेहसंबंधांना अधिक दृढ केले जाते. खगोलशास्राच्या दृष्टीने यादिवशी सूर्याचे मकर राशीत पदार्पण होऊन उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणाचा हा कालखंड सकारात्मक ऊर्जा देणारा व शुभ मानला जातो. यंदा कोरोनाच्या संकटाला सामोरे जाऊन अनेकविध नुकसानीला तोंड द्यावे लागल्याचा पूर्वार्ध पाहता, या उत्तरायणाचा नव्या संदर्भाने विचार करता येणार आहे. कोरोनापूर्व काळातील व्यवहार, वर्तन व कोरोनोत्तर झालेला त्यातील बदल लक्षणीय आहेच; परंतु यामुळे विकसित झालेली नवीन जीवनशैली हीदेखील अपरिहार्यतेचा भाग ठरून गेली आहे. अशास्थितीत एकूणच कामकाजाचे व लाइफस्टाइलचे जे उत्तरायण घडून येऊ घातले आहे त्याचा सकारात्मकतेने विचार करून पुढे झेपावणे गरजेचे आहे. मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करताना खासकरून गुजरातसह आपल्याही राज्यात अलीकडे मुंबई, पुणे, नाशिकसह काही शहरांमध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. तेव्हा नेमक्या या सणादरम्यानच देशभरात जागोजागी वितरित होऊ पाहत असलेल्या कोरोनावरील लसीच्या निमित्ताने आजवरच्या भीतीचे वातावरण दूर होण्यास जशी मदत घडून येते आहे त्याच पद्धतीने आकाशात उंच उडणाऱ्या पतंगाप्रमाणे आशा- आकांक्षांचे व प्रबळ इच्छाशक्तीचेही पतंग झेपावले तर निराशेवर मात करणे सहज सुलभ ठरू शकेल.
.................
गेल्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील सणवारानिमित्त बाजारात दिसून आलेली गर्दी आणि त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा पाहता डिसेंबर-जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांचे आकडे वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती; परंतु सुदैवाने आपल्याकडील स्थिती नियंत्रणात राहिल्याचे दिसून आले. यातच कोरोना लसीला परवानगी मिळून ती जागोजागी पोहोचल्याने मानसिक आधार लाभून गेला आहे. याच जोडीला बाजारातील स्थितीही उत्साहवर्धक असल्याचे दिसून येत आहे. भांडवली बाजारावरही याचा परिणाम झाला आहे. डिमॅट खातेदारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५० हजारांच्या दिशेने झेपावला आहे. विदेशी गुंतवणुकीचा ओघदेखील वाढल्याने निफ्टीचीदेखील १५ हजारांकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे औषध कंपन्या तसेच डिजिटल व्यवहाराशी संबंधित उद्योग व अर्थपुरवठा करणाऱ्या बँका, कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत व या उद्योगांमध्ये तेजी आलेली दिसत आहे. उद्योग-व्यवसाय
पूर्वपदावर आलेले असले तरी ‘जीडीपी’वर परिणाम करणाऱ्या औद्योगिक उत्पादन दरात मात्र नोव्हेंबरमध्ये १.९ टक्क्यांनी घसरण झाली आहे, हे खरे; परंतु दुसरीकडे महागाईच्या दरात मात्र घट झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये ६.९ टक्क्यांवर महागाईचा दर पोहोचला होता, तो डिसेंबर २०२० मध्ये ४.५९ टक्क्यांवर आला, म्हणजे महागाईच्या दरात घसरण झाली. यंदा पाऊसही समाधानकारक झाल्याने अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली. परिणामी, अन्नधान्य महागाईचा नोव्हेंबर २०२० मध्ये ९.५ टक्के असलेला दर डिसेंबर २०२०मध्ये ३.४१ टक्क्यांवर आला आहे.
..................
विशेष म्हणजे आयकर हा सामान्यांचा विषय म्हटला जात नाही; परंतु यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या पाच टक्क्यांनी वाढली आहे. या सर्व बाबी शुभ संकेताच्याच असून, अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे उत्तरायण दर्शविणाऱ्या म्हणता याव्यात. अर्थात, सर्वच बाबी सर्वांच्याच मनासारख्या होत नाहीत. एखादी बाब एका घटकासाठी लाभदायक ठरत असताना इतरांसाठी ती नुकसानदायीही ठरते, हेदेखील खरे. कोरोनाच्या काळात अनेकांच्या बाबतीत तोच अनुभव आला; परंतु तसे असले तरी निराशेचे सूर आळवण्याऐवजी आशेचे पतंग उडवायला हरकत नसावी. आता तर सारे काही रुळावर येताना दिसत आहे. तेव्हा दूर होत असलेल्या संकटाने गेल्या काळात जे काही शिकविले त्यातून संधीचा शोध घेत आशावादी राहण्याचा आणि पतंगाप्रमाणे उंचच-उंच झेपावण्याचा संकल्प मकरसंक्रांतीनिमित्त सोडूया, इतकेच यानिमित्ताने. https://www.lokmat.com/editorial/let-kite-hope-fly-after-corona-wave-a607/
Labels:
EditorView
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment