Thursday, January 28, 2021

EditorsView published in Online Lokmat on Jan 28, 2021

असमानतेची दरी रुंदावली... किरण अग्रवाल / देशाच्या विकास मार्गातील अडथळ्यांची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा सामाजिक, आर्थिक असमानतेचा मुद्दा चर्चेला येऊन जातो खरा; पण ही असमानता दूर होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. अलीकडे हा मुद्दा राजकीय निवडणुकांमध्येही पुढे आणला जातो. मात्र दरी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. केवळ आपल्या देशावरच नव्हे तर संपूर्ण जगावर गेल्या वर्षभरापासून घोंगावलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे तर या संबंधाची दरी अधिक रुंदावून गेली आहे. विशेषतः अकुशल व असंघटित क्षेत्रातील लोकांच्या कामधंद्यांवर, नोकरीवर गंडांतर येऊन त्यांच्या रोटीचा म्हणजे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना व मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आल्याने त्यांच्या आर्थिक विवंचनेत भर पडली असताना दुसरीकडे देशातील अब्जाधीशांच्या प्रगतीत मात्र भर पडली आहे. ऑक्सफाॅमच्या असमानतेविषयक ताज्या अहवालातूनही हीच बाब अधोरेखित झाली आहे.
स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत ‘ऑक्सफाॅम’ने ‘द इनइक्व्यालिटी व्हायरस’ नामक अहवाल सादर केला असून, त्याद्वारे वाढत्या आर्थिक असमानतेकडे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या मार्च २०२०पासून कोरोनाच्या महामारीने सर्वांचीच आर्थिक गणिते बिघडवली असताना व त्यामुळे सुमारे २० ते ५० कोटी नागरिक गरिबीच्या खाईत लोटले गेले असताना नेमक्या याच, म्हणजे मार्च ते डिसेंबर २०२० या काळात जगभरातील श्रीमंतांच्या संपत्तीत मात्र ३.९ लाख कोटी डॉलरची वाढ झाली आहे. भारताच्या संदर्भाने विचार करता आपल्याकडील टॉप १०० श्रीमंतांची कमाई या काळात तब्बल ३५ टक्क्यांनी म्हणजे १३ लाख कोटी रुपयांनी वाढल्याचे हा अहवाल सांगतो. श्रीमंतांच्या श्रीमंतीत तर गरिबांच्या गरिबीत वाढ झाल्याचे यातून निदर्शनास यावे. श्रीमंतीत झालेल्या वाढीची रक्कम देशातील १३.८ कोटी गरिबांमध्ये वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला ९४ हजार रुपये येतील, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील पहिल्या अकरा श्रीमंतांच्या या कमाईतून आरोग्य मंत्रालयाचा तब्बल दहा वर्षांचा खर्च भागू शकतो. ही आकडेवारी विस्मयकारक तर आहेच; पण कोरोनाच्या व्हायरसने जगाला अडचणीत आणून ठेवले असताना असमानतेचा व्हायरस कसा वाढला आहे हेदेखील यातून लक्षात यावे. ................ कोरोनाच्या प्रारंभिक काळात देशात लॉकडाऊन करावे लागल्याने सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. यात सुमारे ८४ टक्के जनतेला उत्पन्न गमावण्याची वेळ आल्याचे आकडे सांगतात. मार्च ते डिसेंबर २०२० या काळात जगामध्ये अब्जाधीशांची संपत्ती २८४ लाख कोटी रुपयांनी वाढत असताना गरिबांची संख्या पन्नास कोटींनी वाढली. इतिहासात यापूर्वी कधी झाले नाही इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र स्थलांतर घडून आले. यातून अन्न, वस्र व निवारा यांसारख्या मूलभूत गरजांवरच परिणाम झालेला दिसून आला. भारतात तर सुमारे नऊ कोटी लोकांचा रोजगार गेला असून, एप्रिल २०मध्ये दर तासाला सुमारे १.७० लाख लोक नोकरी गमावून बसल्याचे हा अहवाल सांगतो. नोकरीवर गंडांतर आल्याचा हा वेग भयकारक असून, तो आर्थिक व सामाजिक असमानतेत मोठी भर घालणारा ठरला आहे. अनेक बाबतीत बहुविविधता असलेल्या भारतात ही समानता आणणे दिवसेंदिवस जटिल बनत चालले आहे, कारण केवळ आर्थिक पातळीवरच नव्हे तर सामाजिक बाबतीतही यात येणारे अपयश हे लपून राहिलेले नाही. पगारपाणी, आरोग्य, शिक्षण व संधी अशा सर्वच पातळीवर या असमानतेचा पाझर घडून येत असतो ज्यातून असमानता रुंदावत जाते. .................. श्रीमंतांच्या संपत्तीत अगर कमाईत होणाऱ्या वाढीकडे असूयेने बघण्याचेही कारण नाही. काळाच्या बरोबरीने पावले टाकत व परिश्रमपूर्वक उद्योग-व्यवसाय केल्यानेच हे यश त्यांना लाभले हे नाकारता येऊ नये; पण सामान्यांच्या जीवनातील खाच-खळगे कमी करण्याच्या दृष्टीने व्यवस्थेला म्हणून ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या का करता येत नाहीत, हा यातील खरा प्रश्न ठरावा. समानतेसाठीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यवस्थेने डोळसपणे याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांच्या उत्पन्नावरील करात कपात अगर बदल केले गेले तर त्याचा परिणाम नक्कीच होऊ शकेल; पण अर्थसंकल्प तोंडावर असताना यासंबंधाच्या चर्चा होत असल्या तरी प्रत्यक्षात तसे दिलासादायक फारसे घडून येत नाही. हा दिलासा ना आर्थिक संबंधाने मिळतो, ना सामाजिक संबंधाने. परिणामी गरीब व श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ‘‘सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?’’ असा प्रश्न विचारण्याची वेळ प्रख्यात कवी, लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्यावर आली ती त्याचमुळे. अर्थात या प्रश्नाचे उत्तर आजही मिळू शकलेले नाही व मिळण्याची लक्षणेही नाहीत हेच ऑक्सफाॅमच्या ताज्या अहवालाने निदर्शनास आणून दिले म्हणायचे. https://www.lokmat.com/editorial/editorial-widening-gap-inequality-a629/

No comments:

Post a Comment