At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, September 30, 2021
अकोल्याच्या कन्येचा अभिमानास्पद गौरव...
Sept 30, 2021
अकोल्याच्या कन्येचा अभिमानास्पद गौरव...
वाडेगाव या छोट्याशा गावातील सपना बाबर ही कन्या. वडील रेल्वेच्या पोलीस सेवेत. घरची परिस्थिती अतिशय बेताची.
अकोल्याच्या एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात शिकणारी ही कन्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून धडपड करतेय. तंबाखूमुक्ती साठी ती झटतेय. तिच्या याच कार्याची दखल घेत भारत सरकार तर्फे तिला राष्ट्रीय सेवा योजनेतील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून दोनच विद्यार्थ्यांची या सन्मानासाठी निवड झाली, त्यात कु. सपनाच्या रूपाने अकोल्याला प्रथमच हा सन्मान लाभला.
अकोल्याचे नाव देशपातळीवर उंचावणाऱ्या या कन्येचा अकोलेकरांना अभिमान आहे. म्हणूनच 'लोकमत'तर्फे प्रभात किड्स चे संचालक डॉ. गजानन नारे यांच्या हस्ते तिचा लोकमत कार्यालयात सन्मान करण्यात आला.
#LokmatAkola #SapnaBabar #DrGajananNare
EditorsView published in Online Lokmat on Sept 30, 2021
शारीरिक उंचीचे काय बघता, वैचारिक खुरगटलेपण त्यागण्याची खरी गरज।
किरण अग्रवाल /
आपल्याकडे उंची मोजण्याचे वा जोखण्याचे परिमाण म्हणून व्यक्तीच्या पद, पैसा, प्रतिष्ठेकडे पाहिले जाते; पण प्रत्यक्षात या सर्व गोष्टी असूनही वैचारिक खुरगटलेपण प्रत्ययास येणाऱ्या व्यक्ती कमी नसतात. काळ बदलला तशी काळाची आव्हानेही बदलली, मात्र त्यातुलनेत मनुष्याची वैचारिक पातळी उंचावली का हा खरे तर प्रश्नच ठरावा. यातील उंचावणे हे फक्त आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर सामाजिक जाणीवेच्यादृष्टीनेही विचारात घेतले तर फारसे समाधानकारक चित्र समोर येत नाही. संवेदनांशी सांगड तुटली की जाणीवा बोथट होतात, मग भौतिक अर्थाने कुणाचीही उंची कितीही मोठी भासत असली तरी ती थीटी पडल्याखेरीज राहात नाही. कोरोनानंतरच्या जगण्याची परिमाणे बदलताना प्रस्तुत भूमिकेतून विचार केला जाणे व मानसिक उन्नयन घडून येणे गरजेचे ठरावे.
या अघळ पघळ प्रास्ताविकामागची पार्श्वभूमी अशी, की पीएलओएस वन या ओपन ॲक्सेस सायन्स जर्नलने अलीकडेच व्यक्तीच्या शारीरिक उंचीबाबत केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष पुढे आले असून, समाजातील श्रीमंत आणि गरीबातील अंतर हे फक्त पैसा व साधनांच्याच बाबतीत नसून ते शारीरिक उंचीतही असल्याचे त्यात म्हटले आहे. गेल्या काही वर्षात श्रीमंतांच्या सरासरी शारीरिक उंचीमध्ये विशेष फरक पडलेला नसला तरी गरिबांची सरासरी उंची मात्र कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. गरीब वर्गातील महिलांची सरासरी उंची 0.05 सेंटीमीटरने वाढली तर श्रीमंत महिलांची सरासरी उंची 0.23 सेंटिमीटरने वाढल्याचेही यातून समोर आले आहे. व्यक्ती व्यक्तीमधील भेदाभेदाची अगर विषमतेची दरी कोणकोणत्या पातळीवर किंवा संदर्भाने अनुभवास येते हेच यातून लक्षात यावे. अर्थात यातुन घेता येणारा मुद्दा वेगळाच आहे, तो म्हणजे शारीरिक उंचीचे मोजमाप या निमित्ताने पुढे आले असले तरी वैचारिक उंचीचे काय? ती कशी वाढणार किंवा त्यासाठी कसले प्रयत्न होणार?
कोरोनाच्या संकटाने जगण्याचे तंत्रच बदलून ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर तर शारीरिक उंचीपेक्षा संवेदना व जाणीवेच्या कक्षा उंचावणे अत्यंतिक गरजेचे बनले आहे. दुर्दैव असे, की शिक्षण व सुविधांनी माणूस पुढारला असला तरी पूर्वापार चालत आलेल्या समाजातील अनिष्ट अगर अविवेकी विचारांचे बुरसटलेपण संपलेले दिसत नाही. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा यासाठी गर्भातच अनेक नकोशिंचा गळा घोटण्याचे पातक सुरूच असल्याचे दिसते, तर नसत्या हव्यासापोटी मांत्रिका तांत्रिकाकडून पोटच्या लेकरा बाळानाच बळी देण्याचे अघोरी प्रकारही अधून मधून घडतच असतात. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत दलित विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची भांडी वेगळी ठेऊन सदर भांडी त्या विद्यार्थ्यांनाच धुवावी लागत असल्याचा प्रकारही अलीकडेच समोर आला असून, या जातीय भेदभाव प्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेस निलंबित करण्यासह अन्य दोघांना नोकरीतून काढून टाकण्याची वेळ आली. कुठे एकीकडे चंद्रावर घर करण्याची व मंगळावर पाणी शोधण्याची प्रगतता आणि दुसरीकडे ही असली वैचारिक दळभद्रीपणाची प्रकरणे?
म्हणूनच म्हणावेसे वाटते, की शारीरिक उंचीच्या अगर पद, पैसा व प्रतिष्ठेने मोजल्या जाणाऱ्या उंचीपेक्षा मानसिक, वैचारिक व बौद्धिक उंची वाढविण्याकडे लक्ष दिले जावयास हवे, पण ते तितकेसे होत नाही. शाळांमधील मूल्यशिक्षण परीक्षेपुरता उरले असून, घरातील आजी आजोबाही टीव्ही मालिकांमध्ये रमलेले दिसतात. मुला - नातवांना बोट धरून शिकवणार कोण? घरगड्यासही काका म्हणून व घरातील साफसफाई किंवा भांडे धुण्याच्या कामास असलेल्या भगिनीस काकू किंवा मावशी म्हणणारी मुलांची पिढी राहिली कुठे आता? एकुणात, शिक्षण व संस्कारांच्या माध्यमातूनच सार्वत्रिक पातळीवरील विषमता दूर होऊ शकणारी असल्याने खरे तर याबाबतची उंची वाढविण्याकरिता गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
https://www.lokmat.com/editorial/looking-physical-height-real-need-give-ideological-ugliness-a310/
Dr. Gajanan Nare sir visit...
Sept 29, 2021
काही भेटी अशा असतात की, ज्यातुन विचारांची संपन्नता वाढण्यास मदत होते व सामाजिक संवेदनशिलतेची ओळखही घडून येते. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अकोल्यातील प्रभात किड्सचे संचालक, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय सदस्य डाॅ. गजानन नारे.
मी अकाेल्यात रुजू हाेण्यापूर्वीपासून डाॅ. नारे यांच्या कार्याबाबत जाणून हाेताे. येथे आल्यावर त्यांच्याशी फोनवर बोलणेही झाले व मध्यंतरी लोकमतच्याच एका कार्यक्रमात त्यांची भेटही झाली. आज ते वेळ काढून लोकमत कार्यालयात आल्याने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधता आला.
‘लाेकमत’चे पत्रकार राहिलेले व प्रबोधनात्मक चळवळीतील कार्यकर्ते संताेष अरसाेड यांचे ‘प्रबाेधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा’ हे पुस्तक त्यांनी भेट दिले व त्या संदर्भातील एका कार्यक्रमाचे निमंत्रणही.
यानिमित्ताने शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवर छान चर्चा झाली....
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #DrGajananNare
Sunday, September 26, 2021
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 26, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210926_9_1
https://www.lokmat.com/manthan/multiple-membership-definitely-must-a310/
एकांतातील निवांतता ...
Sept 24, 2021
एकांतातील निवांतता ...
स्वतःचा शोध घेता येणे, ही तशी अवघड प्रक्रिया. हा शोध घ्यायचा तर अगोदर हरवणे गरजेचे.
शहरी कोलाहलात मात्र मनाचे हरवणेच होत नाही. सतत कसल्या ना कसल्या व्यापात माणूस गुंतून असतो, विचारांचे चक्र अव्याहत सुरू असते; अशात एकाग्र व्हायला एकांत लाभणे कठीणच असते. गर्दीत माणूस हरवतो, पण मन हरवत नाही.
****
श्री गणरायाच्या विसर्जनानिमित्त गावाकडे रावेरला गेल्यावर मुद्दाम भल्या पहाटे उठून निसर्गाच्या सानिध्यात एकांत शोधला व निवांतता अनुभवली. मनाच्या हरवण्याची प्रक्रिया येथे आपोआप साधली. यादरम्यान 'स्व'चा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
पहाट सरून सूर्याच्या सोनेरी कणांनी चराचरात चैतन्य भरेस्तोवर हा शोध सुरूच होता. या शोधातून, म्हणजे आत्मावलोकन वा आत्मपरिक्षणातुनच उद्याच्या ऊर्जेची वाट सापडून गेली ...
#KiranAgrawal #KirananandNashik
Thursday, September 23, 2021
EditorsView published in Online Lokmat on Sept 23, 2021
गुन्हेगारीचे सार्वत्रिकीकरण अधोरेखित...
किरण अग्रवाल /
धार्मिक व अध्यात्माच्या क्षेत्रातील व्यक्तींकडे प्रेरणेचे स्रोत म्हणून आदराने पाहिले जाते, परंतु अशा व्यक्तीबद्दलही जेव्हा अनपेक्षित घटना घडून जातात तेव्हा श्रध्दांना धक्के बसून गेल्याखेरीज राहत नाही. विशेषतः या क्षेत्रातील मान्यवरांनाही गुन्हेगारीचे किटाळ लागुन जाते तेव्हा तर या धक्क्यांची तीव्रता अधिकच बोचल्याखेरीज राहात नाही. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा हरिद्वारमध्ये झालेला संशयास्पद मृत्यूही असाच धक्का देऊन जाणारा म्हणता यावा.
साधू संन्याशी संप्रदायाचे नेतृत्व करून त्र्यंबकेश्वर, प्रयागराज, हरिद्वार आदि ठिकाणचे कुंभमेळे यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्र गिरी यांच्या प्रयागराजमधील वाघम्बरी मठात संशयास्पद मृत्यूच्या घटनेने केवळ साधू समाजच नव्हे तर धर्म व अध्यात्मात श्रद्धा ठेवणारा सामान्य भाविकही हादरून गेला आहे. याप्रकरणी महंत नरेंद्र गिरी यांचेच शिष्य महंत आनंद गिरी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून अनेकविध चर्चांना आता तोंड फुटले आहे. भाविकांना मनोबल उंचावण्याचा उपदेश देणारे महंत स्वतः आत्महत्या कशी करू शकतात व भलीमोठी सुसाईड नोट कशी लिहू शकतात असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून संशयाचे मळभ दाटून आले आहे. पोलीस तपासात याबद्दलचा काय तो उलगडा यथावकाश होईलच, परंतु या घटनेमुळे सर्वसंगपरित्यागाच्या भूमिकेतून वावरणाऱ्या संन्याशांच्या जीवनाची अखेरही संशयास्पद व वादग्रस्त ठरून गेल्याचे पाहता गुन्हेगारीचे सार्वत्रिकीकरण उघड होऊन जावे.
--------------------------
तसे पाहता गुन्हेगारी सर्वत्रच वाढली आहे. राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीकरणाची चर्चा नेहमी घडून येते, तशी ती अध्यात्माच्या क्षेत्रातही वाढीस लागल्याने भाबड्या भक्तांच्या श्रद्धांना धक्का बसणे स्वाभाविक ठरले आहे. खरे तर डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम तसेच रामपाल व आसाराम बापू आदि बुवा बापूंना अटकेत जावे लागले तेव्हाही श्रध्दांना मोठ्या प्रमाणात धक्के बसून गेले होते. पूर्वी समाजात मोठ्याप्रमाणात अंधश्रद्धा व्याप्त होती, त्यामुळे समाजमनात श्रद्धेचे स्थान मिळवून असलेल्या काही जणांचे प्रताप उघड होऊनही सार्वत्रिक पातळीवर त्याबद्दलच्या निषेधाचे तितकेसे सूर उमटू शकत नव्हते. समाज जागृत झाल्यावर श्रद्धेआड चालणाऱ्या भोंदूपणाची चिकित्सा होऊ लागल्याने घडल्या वा उघड झालेल्या प्रकारांची चर्चा होऊ लागली. बरे, यात साध्या फसवणुकीपासून जमीन जुमला हडपण्यापर्यंतची व त्याहीपुढे जाऊन काही जणांकडून भक्त भगिनींच्या अब्रूशी खेळण्याचे प्रकारही पुढे आल्याने बुवाबाजी अधोरेखित होऊन गेली.
------------------------------
महंत नरेंद्र गिरी बुवाबाजीतले नव्हते, उलट अनाचारी व चुकीच्या मार्गावर असणाऱ्या बुवा बापूंबद्दल त्यांनी वेळोवेळी परखडपणे भूमिका घेतलेली दिसून आली. मुठभर चुकीच्या लोकांमुळे समस्त साधू समाजाची प्रतिमा डागाळते, याबद्दल ते नेहमी खेद व्यक्त करीत. त्यांना जाणून असणारे सारेच त्यांच्या धर्म कार्याबद्दल व सिंहस्थ कुंभमेळातील सर्व प्रवाहांना एकत्र घेऊन जाण्याच्या सामोपचारी भुमिकांबद्दल भरभरून व आदरानेच बोलताना आढळतात. अशा कुणाशीही कसलाही वैर नसलेल्या महंतांचाही अखेरचा प्रवास संशयास्पद ठरावा हे दुर्दैवी असून या घटनेमागील कारणांना लाभलेला कथित गुन्हेगारीचा दर्प श्रद्धाळूंना अस्वस्थ करून जाणे स्वाभाविक आहे.
https://www.lokmat.com/editorial/underlining-universality-crime-a310/
चलो, जी ले कुछ इस कदर...
Sept 17, 2021
चलो, जी ले कुछ इस कदर
कि लगे जैसे जिन्दगी हमे नहीं,
जिन्दगी को हम मिल गये है...!
समाजमाध्यमात हे हाती लागले, आवडले म्हणून शेअर केले..
#KiranAgrawal
Thursday, September 16, 2021
Swami Balkanand Giri ji in Akola...
आनंदपीठाधीश्वर, आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी जी महाराज यांनी अकोल्यातील श्री रामदेवबाबा व श्री श्यामबाबा मंदिर तसेच श्री सालासर बालाजी मंदिरास भेटी दिल्या. यावेळी मंदिर ट्रस्टचे रमेश टेकडीवाल जी, कमलबाबू अग्रवाल, बंटी कागलीवाल, सज्जन जी अग्रवाल, कैलाश मामाजी अग्रवाल, निरंजन जी अग्रवाल, गिरीश जी जोशी आदी मान्यवरांसमवेतची काही आठवण चित्रे...
( छायाचित्र सौजन्य : श्री विनय टोले )
#AacharyaBalkanandgiriji #Aanandpithadhishvar #KiranAgrawal #SwamiBalkanandgirijiAkolaVisit #SalasarBalajiAkola
EditorsView published in Online Lokmat on Sept 16, 2021
स्वसंरक्षणासाठी महिलांच्या स्वयंसिद्धतेची गरज ...
किरण अग्रवाल /
एकापाठोपाठ एक घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांनी समाजमन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. अशा घटना चीड वा संताप आणणाऱ्या असल्या तरी त्या राजकारणाचा विषय ठरू नये, कारण तसे झाले की उपाय अगर जबाबदारीकडे दुर्लक्ष होते; तेव्हा अशा घटना घडू नयेत व महिला भगिनीकडे बघण्याचा दृष्टिकोन दूषित राहू नये यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच आणखी काय करता येऊ शकेल याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती अलीकडेच मुंबईच्या साकीनाका येथे घडली, त्याचसोबत वसई, पुणे, नाशिक, अमरावती आदी परिसरात घडलेल्या महिला अत्याचाराच्या अन्यही काही घटना एका पाठोपाठ एक समोर आल्याने राज्यातील महिला सुरक्षेचा व कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न समोर येऊन गेला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)च्या अहवालानुसार 2019 मध्ये बलात्कार करून खून करण्याची महाराष्ट्रात 47 प्रकरणे घडलीत, हे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे यातून स्पष्ट होते हे खरे, पण म्हणून त्याकडे राजकीय चष्म्यातून बघणे तितकेसे संयुक्तिक ठरू नये. अशा घटना घडल्या की विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षाचे आरोप केले जातात, त्यावरून राजीनामेही मागितले जातात; परंतु कायदे असूनही ते उपयोगी पडू शकत नसतील वा त्याचा धाक प्रस्थापित होत नसेल तर यामागील कारणांचा शोध घेतला जात नाही. राजकीय आरोप-प्रत्यारोपात ते बाजूला पडते.
----------------
महिला अत्याचाराच्या संदर्भाने आंध्रप्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रस्तावित शक्ती कायद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी मंजुरी दिली आहे. आहे त्या कायद्यात अधिक कठोर तरतुदी व सुधारणा यात सुचविल्या गेल्या आहेत, ज्यामुळे महिलांचे सुरक्षा कवच अधिक मजबूत होणे अपेक्षित आहे. गेल्या मार्चमधील अधिवेशनात हे विधेयक रखडल्याचे बघावयास मिळाले, त्यामुळे आता यापुढील अधिवेशनात ते मांडले जाईल; परंतु ते होईपर्यंत संबंधित गुन्हेगारांना जरब बसेल अशा पद्धतीने उपाय योजनांची व पोलिसांनी भूमिका वठविण्याची गरज आहे. अशा अनेक घटना घडून जातात व वर्षोनुवर्षे केसेस सुरू असतात, त्यामुळे न्यायातील विलंब टाळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची व्यवस्था केली गेली आहे. परंतु तेथेही विलंब टळत नसल्याचेच अनुभव बघता त्याबाबत काही सुधारणा करता येतील का याकडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे सरकारकडून बाजू मांडली जाताना पोलिसांकडून पुरेसे सबळ पुरावे सादर न केल्याच्या किंवा वकिलांकडून योग्य बाजू मांडली न गेल्याच्या कारणातून आरोपी निर्दोष सुटतात. अशा प्रकरणी संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली गेल्याखेरीज गंभीरता बाळगली जाणार नाही, त्याहीदृष्टीने विचार होणे अपेक्षित आहे.
----------------
अर्थात कायदा आपले काम करेल व शक्ती कायदा अस्तित्वात आल्यावर त्यानेही जरब बसेल, पण याखेरीज महिलांनाही स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हावे लागेल. दुराचारी व अनाचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महिला भगिनींना दुर्गेचे रूप घेऊन वावरावे लागेल. कायद्याचा वापर अधिकतर घटना घडून गेल्यानंतर होईल, परंतु घटना घडूच नये म्हणून भगिनींना सक्षम व्हावे लागेल. यासंदर्भात उत्तर प्रदेशातील बहराईच येथे घडलेल्या एका घटनेकडे आदर्श म्हणून बघता यावे. येथे शाळेत जाणार्या एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला असता त्या मुलीने केसातील पीन काढून अपहरणकर्त्याला जखमी केले व आपली सोडवणूक करून घेतली. ही घटना छोटी व साधी आहे, परंतु प्रसंगावधान व धाडस शिकवून जाणारी आहे. घराघरात संस्कारासोबत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणे कसे गरजेचे बनले आहे ते यातून लक्षात यावेच, शिवाय महिला अत्याचारांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण लक्षात घेता माता भगिनींबद्दलच्या आदर सन्मानाची भावना वाढीस लावण्यासाठी निरंतर प्रयत्न होण्याची आवश्यकताही अधोरेखित व्हावी.
https://www.lokmat.com/editorial/need-women-self-determination-self-defense-pdc-a719/
स्वामी बालकानंद गिरी जी महाराज अकोल्यात ...
15 Sept, 2021
तपोनिधी श्री पंचायत आनंद आखाड्याचे प्रमुख आनंदपीठाधीश्वर, आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी जी महाराज यांचे आज अकोल्यात आगमन झाले असता श्री रामदेव बाबा व श्री श्याम बाबा मंदिर येथे श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे स्वागत करण्यात आले, यानंतर सत्संगही पार पडला.
आमदार गोवर्धन जी शर्मा, महापौर अर्चना ताई मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी, मंदिर ट्रस्टचे रमेश टेकडीवाल जी, कमलबाबू अग्रवाल, सालासर बालाजी मंदिर ट्रस्टचे शैलेंद्र कागलीवाल, कैलाश मामाजी अग्रवाल, निरंजन जी अग्रवाल, गिरीश जी जोशी, किशोर पाटील, रामावतार जी अग्रवाल आदी मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली.
याप्रसंगीची ही काही आठवण चित्रे...
#AacharyaBalkanandgiriji #Aanandpithadhishvar #KiranAgrawal #SwamiBalkanandgirijiAkolaVisit
Sunday, September 12, 2021
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 12, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210912_6_1
https://www.lokmat.com/manthan/bappa-do-exactly-wake-lost-feelings-a310/
बाप्पा आपले स्वागत आहे...
10 Sept, 2021
बाप्पा आपले स्वागत आहे...
कोरोनाच्या धास्तीने दाटलेले निराशेचे मळभ आपल्या आगमनाने दूर होवो व चैतन्याची मंगल ऊर्जा या संकटातून तरुन जाण्याचे बळ देवो, हीच आपल्याकडे प्रार्थना.
अकोला लोकमत कार्यालयात 'श्रीं'ची स्थापना..
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #Ganeshotsav2021Lokmat
Thursday, September 9, 2021
EditorsView published in Online Lokmat on Sept 09, 2021
बाप्पा यावे, विघ्न हरावे...
किरण अग्रवाल /
संकटे सांगून येत नसतात हे खरेच, परंतु काही संकटे ही आपणच निमंत्रण देऊन बोलविल्यासारखी येतात, कोरोना त्यापैकीच एक. कोरोनाच्या दोन लाटांनी खूप नुकसान घडविले, मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली; परंतु रक्तबंबाळ करणारी ठेच खाऊनही त्यातून धडा घेतला गेला नाही परिणामी आता पुन्हा या संकटाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची वेळ येऊ पाहतेय. त्यामुळे सर्वत्र भयाचे वातावरण दाटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत असल्यामुळे, 'बाप्पा यावे आणि आपणच हे विघ्न हरावे' अशी आळवणी करण्याची वेळ आली आहे.
एरव्ही गणेशोत्सव म्हटला की मंतरलेला व भारलेला काळ राहात आला आहे. या दशदिनात गावोगावी, शहरोशहरी भक्तीचा पूर लोटताना दिसे. सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे व मांगल्याचे वातावरण असे; पण कोरोनाचे संकट उपटले व गेल्या वर्षापासून निर्बंध आले, त्यातून या उत्सवावरही मर्यादा आल्या. श्रींच्या मूर्तीची उंची व मंडपाचे आकार कमी झाले, मिरवणूकांवर बंदी आली; सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आलीत. अर्थात असे झाले तरी श्रद्धा तसूभरही ढळली नाही. बाप्पा हे सुखकर्ता व दुखहर्ता असल्याने कोरोनासारखे संकटही तेच हरतील या श्रद्धेने भाविक यंदाही बाप्पांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत.
----------------
गणेशोत्सव हा लोकोत्सव असतो, पण कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. श्रद्धे बरोबरच सुरक्षिततेचा विचारही महत्त्वाचा आहे. केरळमध्ये ओणम सणाच्या नंतर कोरोना वाढल्याची आकडेवारी पाहता आपल्याकडे तसे होऊ नये म्हणून काळजी गरजेची आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रत्नागिरी,सातारा व अहमदनगर या पाच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संक्रमणाचा वेग चिंताजनक असल्याचे आढळून येत आहे. राज्यातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण याच जिल्ह्यातील असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच दिली आहे. नागपूरमध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याने तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असे समजून लवकरच कडक निर्बंध गरजेचे असल्याची भूमिका पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलून दाखविली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याच संदर्भाने 'माझे घर, माझे बाप्पा' अशी घोषणा करून मुंबईवासीय यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मथितार्थ इतकाच की, गणेशोत्सव साजरा करताना खबरदारीचा विचार बाजूला पडू नये. गणराय हे बुद्धिदाताही असल्याने यासंबंधी सारे सुबुद्धीने वागतील अशी अपेक्षा आहे.
कोरोना तर आहेच आहे, यंदा धुवाधार पावसानेही राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडविली आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून संसार उघड्यावर पडले आहेत. चांगली तरारून आलेली पिके पाण्यात आडवी झाली आहेत. पेरणी झाल्यावर पावसाने दडी मारली होती म्हणून डोळ्यात पाणी होते, पण आता अनेक भागात इतका मुसळधार पाऊस झाला की हाती येऊ पाहत असलेले पीक हातातून जाण्याची लक्षणे आहेत. इकडून आड, तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. या संकटांच्या पार्श्वभूमीवर बाप्पा श्री गणेशाचे आगमन होत आहे. सार्वजनिक उत्सवाला बंदी असली तरी पूर्वी इतक्याच श्रद्धेने, आस्थेने व उत्साहाने अबालवृद्ध बाप्पांच्या स्वागतासाठी आतुर आहेत. तेव्हा संकट लक्षात घेता आपण तर काळजी घेऊया व संक्रमण, संसर्गापासून बचावण्यासाठी निर्बंधांचे पालन करूयाच, आणि बाप्पानाही विनवूया की, बाप्पा यावे व विघ्न हरावे ...
https://www.lokmat.com/editorial/bappa-should-come-defeat-obstacles-a642/
निसर्गाच्या सानिध्यात...
Sept 08, 2021
निसर्गाच्या सानिध्यात...
खास वेळ काढून पर्यटन करणे हल्ली शक्य होत नाही. त्यामुळे काल वाशिम येथून परतताना बुलडाण्यात मुक्कामी थांबलो म्हणून आज भल्या पहाटे राजूर घाटात भटकंती केली. घाटातील श्री हनुमान मंदिराच्या व्ह्यू पॉईंट वरून दरीतील वृक्षावरील मर्कटलीला न्याहाळल्या तर संतोषी माता मंदिरालगतच्या टेकडीवर चढून निसर्ग डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. खूप दिवसांनी पहाटेची प्रसन्नता अनुभवली.
निसर्गाचं भरभरून देणं लाभलेल्या या जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणं आहेत जी पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता येणारी आहेत.
आमचे बुलडाणा हॅलो हेड निलेश जोशी, संदीप वानखडे व ब्रह्मानंद जाधव यांच्याशी कार्यालयीन संवाद खेरीजचा मनमुक्त संवाद साधण्याची, परस्परांना अधिक जवळून ओळखण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.
Thanks Nilesh, Sandeep n Bhramhanand..
#KiranAgrawal #LokmatAkola #RajuraghatBuldana
Sunday, September 5, 2021
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 05, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210905_6_1
https://www.lokmat.com/manthan/no-fear-masses-hence-tax-increases-a310/
Friday, September 3, 2021
#LokmatIdealWomenAchieversAward2021 ...
#LokmatIdealWomenAchieversAward2021 ...
अकोल्यातील सन्मान सोहळ्याप्रसंगी ...
#LokmatWomenAchieversAwards2021
#LokmatAkola #KiranAgrawal
Thursday, September 2, 2021
EditorsView published in Online Lokmat on Sept 02, 2021
सणावाराचे दिवस, गर्दी टाळणे गरजेचे...
किरण अग्रवाल /
दहीहंडी फोडून झाली, आता गणेशोत्सव येऊ घातला आहे. त्यानंतर लागोपाठ सण उत्सवाचे दिवस असल्याने बाजारात आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. कोरोनाच्या सावटातून दूर होत आकारास आलेले हे चलनवलन व चैतन्य टिकवून ठेवायचे तर कोरोना गेला असे समजून चालणार नाही. शासनाने सक्ती करण्याची वेळ येऊ न देता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंधांचे पालन केले व खबरदारी घेतली तर तिसरी लाट रोखता येऊ शकेल, पण तेच होताना दिसत नाही. सणासुदीत सभा मेळावे घेऊन गर्दी करणे टाळा असे निर्देश देत केंद्राने कोरोना विषयक निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत वाढविले आहेत. राज्यानेही मार्गदर्शक सूचना दिल्या असून सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे मुंबई उच्च न्यायालयानेही सांगितले आहे, परंतु अशी गर्दी व विशेषता राजकीय आंदोलने कमी झालेली नाहीत. केरळ मध्ये ओणम नंतर रुग्ण वाढले, तसे आपल्याकडे होऊ द्यायचे नसेल तर प्रत्येकानेच आपली जबाबदारी ओळखून सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
दुसरी लाट ओसरली असे म्हटले जाते, पण अजूनही देशात प्रतिदिनी सुमारे चाळीस हजारावर रुग्ण आढळत असून 350 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू होत आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या पावणे चार लाखाच्या घरात आहे. महाराष्ट्रात प्रतिदिनी सुमारे चार हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून, शंभरपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. पन्नास हजारापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत, त्यामुळे देशात केरळ पाठोपाठ महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक म्हटली जात आहे. तिसरी लाट येणार की नाही येणार, येणार तर कधी येणार व कितपत नुकसानदायी राहणार? याबद्दल विविध मतप्रवाह आहेत खरे; पण ती येणार याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. मुंबईच्या मानखुर्द येथील एका बालगृहातील 18 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून, औरंगाबादच्या हरसुल कारागृहातील 12 कैदीही बाधित आढळून आले आहेत. तिसरी लाट आगामी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कमाल उंची गाठेल व तेव्हा प्रतिदिनी एक लाख लोकांना बाधा होईल अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी)चा एक अहवाल आला असून, लसींचा कालांतराने प्रभाव कमी होत चालल्याचे त्यात म्हटले आहे. पण असे सारे चित्र असूनही लोक म्हणावी तशी खबरदारी घेताना दिसत नाहीत.
राज्यात कोरोनाविषयक निर्बंध आहेत, पण ते कागदावरच असल्यासारखे दिसते आहे. लोकांकडून स्वयंस्फूर्तीने त्यांचे पालन होत नाहीच, आणि सरकारी यंत्रणाही त्याबाबत गंभीर दिसत नाहीत. यातही सामान्य माणसे व संस्था थोड्याफार भीतीपोटी सावध राहताना दिसतात, परंतु राजकीय पक्ष मात्र निर्बंध न जुमानता सक्रिय झाले आहेत. मंदिरे खुली करण्यासाठी नुकताच राज्यभरात भाजपतर्फे शंखनाद करण्यात आला तर शासनाने निर्बंध घातले असतानाही मनसेतर्फे काही ठिकाणी दहीहंडी फोडली गेली. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक प्रकरणावरून भाजपा व शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसून आले. इतरही विविध कारणांवरून जागोजागी राजकीय आंदोलने जोमात असून यात कोरोना विषयक निर्बंधांचे कुठलेही पालन होताना दिसत नाही. कोरोना गेला, तो आता पुन्हा येणार नाही अशा अविर्भावात सारे सुरू आहे. पूर्ण क्षमतेने वाहतूकही सुरू झाली आहे. ग्रामीण भागात अजून एसटी सुरू झालेली नाही, परंतु ज्या मार्गावर ती सुरू आहे ती एसटी असो की खाजगी वाहने, भरभरून धावत आहेत. यात फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा तर उडतोच आहे, पण मास्कदेखील वापरले जाताना दिसत नाहीत. यापुढे गणेशोत्सव व अन्य सणवार आहेत, यातही असेच सुरू राहिले तर तिसर्या लाटेला आपसूक निमंत्रण मिळून जाणे स्वाभाविक ठरेल.
महत्वाचे म्हणजे, आपल्याकडे आपण डेल्टा प्लस या विषाणूची चिंता करतो आहोत, पण दक्षिण आफ्रिका व चीन, मॉरिशस, इंग्लंड आदी काही देशात सी 1.2 हा कोरोनाचा नवा विषाणू आढळला असून तो अधिक घातक व कोरोना लसींनाही दाद न देणारा असण्याची शक्यता नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेसच्या संशोधनातून पुढे आली आहे. हा विषाणू शरीरात अँटीबॉडीज विकसित होण्याच्या प्रक्रियेतही बाधा निर्माण करतो असेही अहवालात म्हटले आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी ही स्थिती आहे. केंद्र व राज्य सरकारही लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे खरा परंतु लस घेतली म्हणजे आपण पूर्णता सुरक्षित झालो असे समजून चालणार नाही. लॉकडाउन तर कुणालाच नको, उद्योगांनाही व नोकरदारांनाही; कारण त्यामुळे आपण खूप मागे पडलो. आता पुन्हा बंदची वेळ यायला नको. कोरोना आता नेहमीचा साथी आहे हे समजूनच सारे सुरु ठेवावे लागेल, पण ते करताना खबरदारीकडे दुर्लक्ष नको. तेव्हा कोरोनापासून व तिसऱ्या लाटेपासून बचावायचे तर स्वयंशिस्त व शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन कटाक्षाने केले जाणे गरजेचे आहे.
https://www.lokmat.com/editorial/holidays-are-full-complexity-are-neither-fun-nor-comfortable-a310/
Subscribe to:
Posts (Atom)