Tuesday, November 1, 2022

महागावचा माधव...

Nov 21, 2022 महागावचा माधव...
मेहकरवरून रिसोडमार्गे वाशिमला जाताना महागावच्या पुढे शेताच्या कडेला कच्च्या विटांच्या चौथर्‍यावर मोसंबी व सफरचंद घेऊन बसलेला एक ज्यूस विक्रेता तरुण भेटला, माधव दशरथराव हुंबाड त्याचे नाव. त्याच्याशी चर्चा केली असता त्याची कहाणी मोठी प्रेरणादायी वाटली... बीकॉम झालेला हा तरुण नोकरीच्या शोधात शहरात गेला, पण अखेर मुंबईत ऍपल व पुण्यात एलजी सारख्या मोठ्या कंपन्यातील नोकरी सोडून, गड्या आपला गावच बरा म्हणत घरी परतला. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याने रस्त्यावर असलेल्या शेताच्या कडेवर मोसंबी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. रिसोडच्या एलआयसीत असलेले कुणी देशमुख त्याला एके दिवशी भेटले. मोसंबी विक्रीपेक्षा मोसंबी ज्यूस विक्री केली तर दोन पैसे जास्त मिळतील असा सल्ला त्यांनी दिला, आणि माधवने ज्यूस विक्री सुरू केली. आज प्रतिदिनी तीन ते पाच हजारापर्यंत त्याचा व्यवसाय होतो... शहरात मजा नाही, गाव ते गावच असते असे तो मोठ्या अभिमानाने सांगतो. माधव मुंबई, पुण्याची हवा खाऊन आल्याने बुजरेपण सोडून बोलका बनला. 40 वर्षांच्या आयुष्यात मोठ्या शहरात जाऊनही जे शिकायला मिळाले नाही, ते येथे ज्यूस विक्री करताना भेटलेल्या माणसांकडून शिकायला मिळाले म्हणाला. काही दिवसांपूर्वी कोणी एक दिल्लीचे अनिल भारद्वाज नावाचे गृहस्थ सायकलने चालले होते. दुपारच्या टळटळीत उन्हात घामाने लदबदलेल्या त्या गृहस्थाला पाहून माधवचे मन कळवळले. माधवने त्यांना आवाज देऊन बोलावले, खाटेवर बसवून जवळची भाजी भाकरी खाऊ घातली. थोडा वेळ आराम करून ते गृहस्थ माधवचा नंबर व पत्ता घेऊन पुढच्या मार्गाला लागले. दोनच दिवसांपूर्वी त्याचा फोन आला, की दिल्लीत गेल्यावर त्या गृहस्थाने माधवसाठी मोसंबीचा ज्यूस काढणारे ज्यूसर मशीन घेऊन पार्सलने रवाना केले आहे म्हणून... आपण कुणाचे चांगले केले तर आपलेही चांगलेच होते, यावर माधवची श्रद्धा बसली. त्रास देणारे जवळचेच असतात, बाहेरच्यांना जीव लावला तर तेही आपल्याला जीव लावतात, हे माधवला अनुभवाने शिकवले. त्यामुळे व्यवसाय करताना रस्त्याने जाणारे रंजले गांजलेले जीव तो हेरतो व त्यांना पैसे न घेता ज्यूस पाजुन जमेल ती मदत करतो. ****
आमच्या गप्पा सुरू असतानाच माधवचे वडील दशरथराव म्हशीला चारायला शेतात घेऊन आले. 1970 च्या दशकात बीकॉम झालेले व वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या दशरथरावांना आम्ही लोकमतचे लोकं आहोत हे माधवने सांगताच, 'अहो तुमच्या लोकमतच्या कार्यक्रमात नानाने शिंदे साहेबाला काय भारी प्रश्न ईचारला...' असे ते उस्फूर्तपणे बोलून गेले. लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेताना, तुम्ही राजकारणी इकडून तिकडे जाताना मतदाराच्या मताला काही किंमत आहे की नाही असा प्रश्न विचारला होता. तो संदर्भ दशरथरावांच्या बोलण्यात होता. 'लोकमत'चे तळागाळातही किती गांभीर्याने वाचन होते याचीच ही पावती होती. त्यानंतर हल्लीचे राजकारण व समाजकारण यावर छान गप्पा झाल्या. भगवान श्रीकृष्णाने घडविलेली लढाई ही कौरव व पांडवांमधली नव्हती, ती धर्म व अधर्मातील लढाई होती; तशीच लढाई आज देशात सुरू असल्याचे ते बोलून गेले. आम्ही थक्कच झालो, त्यांची ही टिपण्णी ऐकून. ग्रामीण भागातील जनतेच्या जाणीवाही किती प्रगल्भ आहेत, याचेच हे प्रत्यंतर होते. #TourDiary #KiranAgrawalTourNotes

No comments:

Post a Comment