At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, January 28, 2021
प्रजासत्ताक दिन ... 2021
26 Jan, 2021
विजयी विश्व तिरंगा प्यारा ...
माझे ज्येष्ठ सहकारी, वरिष्ठ मुख्य उपसंपादक श्री संजय पाठक यांच्या हस्ते आज लोकमत कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.
जय हिंद।।।।।
#LokmatNashik #RepublicDay2021InLokmat
EditorsView published in Online Lokmat on Jan 28, 2021
असमानतेची दरी रुंदावली...
किरण अग्रवाल /
देशाच्या विकास मार्गातील अडथळ्यांची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा सामाजिक, आर्थिक असमानतेचा मुद्दा चर्चेला येऊन जातो खरा; पण ही असमानता दूर होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. अलीकडे हा मुद्दा राजकीय निवडणुकांमध्येही पुढे आणला जातो. मात्र दरी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. केवळ आपल्या देशावरच नव्हे तर संपूर्ण जगावर गेल्या वर्षभरापासून घोंगावलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे तर या संबंधाची दरी अधिक रुंदावून गेली आहे. विशेषतः अकुशल व असंघटित क्षेत्रातील लोकांच्या कामधंद्यांवर, नोकरीवर गंडांतर येऊन त्यांच्या रोटीचा म्हणजे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना व मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आल्याने त्यांच्या आर्थिक विवंचनेत भर पडली असताना दुसरीकडे देशातील अब्जाधीशांच्या प्रगतीत मात्र भर पडली आहे. ऑक्सफाॅमच्या असमानतेविषयक ताज्या अहवालातूनही हीच बाब अधोरेखित झाली आहे.
स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत ‘ऑक्सफाॅम’ने ‘द इनइक्व्यालिटी व्हायरस’ नामक अहवाल सादर केला असून, त्याद्वारे वाढत्या आर्थिक असमानतेकडे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या मार्च २०२०पासून कोरोनाच्या महामारीने सर्वांचीच आर्थिक गणिते बिघडवली असताना व त्यामुळे सुमारे २० ते ५० कोटी नागरिक गरिबीच्या खाईत लोटले गेले असताना नेमक्या याच, म्हणजे मार्च ते डिसेंबर २०२० या काळात जगभरातील श्रीमंतांच्या संपत्तीत मात्र ३.९ लाख कोटी डॉलरची वाढ झाली आहे. भारताच्या संदर्भाने विचार करता आपल्याकडील टॉप १०० श्रीमंतांची कमाई या काळात तब्बल ३५ टक्क्यांनी म्हणजे १३ लाख कोटी रुपयांनी वाढल्याचे हा अहवाल सांगतो. श्रीमंतांच्या श्रीमंतीत तर गरिबांच्या गरिबीत वाढ झाल्याचे यातून निदर्शनास यावे. श्रीमंतीत झालेल्या वाढीची रक्कम देशातील १३.८ कोटी गरिबांमध्ये वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला ९४ हजार रुपये येतील, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील पहिल्या अकरा श्रीमंतांच्या या कमाईतून आरोग्य मंत्रालयाचा तब्बल दहा वर्षांचा खर्च भागू शकतो. ही आकडेवारी विस्मयकारक तर आहेच; पण कोरोनाच्या व्हायरसने जगाला अडचणीत आणून ठेवले असताना असमानतेचा व्हायरस कसा वाढला आहे हेदेखील यातून लक्षात यावे.
................
कोरोनाच्या प्रारंभिक काळात देशात लॉकडाऊन करावे लागल्याने सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. यात सुमारे ८४ टक्के जनतेला उत्पन्न गमावण्याची वेळ आल्याचे आकडे सांगतात. मार्च ते डिसेंबर २०२० या काळात जगामध्ये अब्जाधीशांची संपत्ती २८४ लाख कोटी रुपयांनी वाढत असताना गरिबांची संख्या पन्नास कोटींनी वाढली. इतिहासात यापूर्वी कधी झाले नाही इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र स्थलांतर घडून आले. यातून अन्न, वस्र व निवारा यांसारख्या मूलभूत गरजांवरच परिणाम झालेला दिसून आला. भारतात तर सुमारे नऊ कोटी लोकांचा रोजगार गेला असून, एप्रिल २०मध्ये दर तासाला सुमारे १.७० लाख लोक नोकरी गमावून बसल्याचे हा अहवाल सांगतो. नोकरीवर गंडांतर आल्याचा हा वेग भयकारक असून, तो आर्थिक व सामाजिक असमानतेत मोठी भर घालणारा ठरला आहे. अनेक बाबतीत बहुविविधता असलेल्या भारतात ही समानता आणणे दिवसेंदिवस जटिल बनत चालले आहे, कारण केवळ आर्थिक पातळीवरच नव्हे तर सामाजिक बाबतीतही यात येणारे अपयश हे लपून राहिलेले नाही. पगारपाणी, आरोग्य, शिक्षण व संधी अशा सर्वच पातळीवर या असमानतेचा पाझर घडून येत असतो ज्यातून असमानता रुंदावत जाते.
..................
श्रीमंतांच्या संपत्तीत अगर कमाईत होणाऱ्या वाढीकडे असूयेने बघण्याचेही कारण नाही. काळाच्या बरोबरीने पावले टाकत व परिश्रमपूर्वक उद्योग-व्यवसाय केल्यानेच हे यश त्यांना लाभले हे नाकारता येऊ नये; पण सामान्यांच्या जीवनातील खाच-खळगे कमी करण्याच्या दृष्टीने व्यवस्थेला म्हणून ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या का करता येत नाहीत, हा यातील खरा प्रश्न ठरावा. समानतेसाठीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यवस्थेने डोळसपणे याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांच्या उत्पन्नावरील करात कपात अगर बदल केले गेले तर त्याचा परिणाम नक्कीच होऊ शकेल; पण अर्थसंकल्प तोंडावर असताना यासंबंधाच्या चर्चा होत असल्या तरी प्रत्यक्षात तसे दिलासादायक फारसे घडून येत नाही. हा दिलासा ना आर्थिक संबंधाने मिळतो, ना सामाजिक संबंधाने. परिणामी गरीब व श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
‘‘सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?’’
असा प्रश्न विचारण्याची वेळ प्रख्यात कवी, लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्यावर आली ती त्याचमुळे. अर्थात या प्रश्नाचे उत्तर आजही मिळू शकलेले नाही व मिळण्याची लक्षणेही नाहीत हेच ऑक्सफाॅमच्या ताज्या अहवालाने निदर्शनास आणून दिले म्हणायचे.
https://www.lokmat.com/editorial/editorial-widening-gap-inequality-a629/
Monday, January 25, 2021
ओस के बूंद सी होती है बेटिया ...
24 Jan, 2021
ओस के बूंद सी होती है बेटिया ,
स्पर्श खुरदरा हो तो रोती है बेटिया...
किती भावगर्भ लिहिले आहे हे कुणी. खरेच शब्दशः दवबिंदू सारख्याच असतात मुली. तनाने व मनानेही नाजूक, हळव्या. कमालीच्या संवेदनशील तसेच खट्याळही.
जगण्याच्या पुस्तकातील कवितेसारख्या.
आईचे वात्सल्य, मावशीची माया, बहिणीचा जिव्हाळा असे सारे काही एकीतच लाभते ती म्हणजे कन्या.
आमच्या लोकमतचे एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांनी खरेच म्हटलेय,
जरूरी नहीं रौशनी चिरागों से ही हो,
बेटियाँ भी घर में उजाला करती हैं..!
माझ्याही घरात असा उजेड व आनंद पेरणाऱ्या
#माझ्या_लेकी_माझा_अभिमान आणि स्वाभिमानही...
आज राष्ट्रीय बालिका दिन, सर्व लेकींना मनःपूर्वक शुभेच्छा...
#KirananandNashik #ShrutiKruti #NationalGirlChildDay
Saraunsh published in Lokmat on Jan 24, 2021
http://epaperlokmat.in/eNewspaper/News/LOK/NSLK/2021/01/24/ArticleImages/1CA95BA.jpg
https://www.lokmat.com/nashik/anxiety-increased-indifference-a321/
Thursday, January 21, 2021
EditorsView published in Online Lokmat on Jan 21, 2021
राजकीय कूस बदलतेय...
किरण अग्रवाल /
ग्रामविकासाचा खऱ्या अर्थाने पाया म्हणवणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाने मतदारांची बदलती मानसिकताच अधोरेखित करून दिली आहे. गावकीचे राजकारण व तेथील भाऊबंदकीचे फॅक्टर्स प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात, त्यात राजकीय पक्ष व भूमिकांचा तितकासा संबंध नसतो हे खरेच; पण तसे असले तरी ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या नवोदितांवरील विश्वासाचे जे एक कॉमन सूत्र यात आढळून येते ते आशा उंचावणारेच म्हणता यावे. कोरोनासारख्या महामारीचे संकट असतानाही मतदानासाठी दिसून आलेला उत्साह व त्यानंतर लागलेले निकाल बारकाईने बघितले तर त्यातून बदलाचे संकेत घेता यावेत. पारंपरिकपणे मळलेल्या वाटेवरून न जाता राजकीय बड्यांना धक्के देत विकासाच्या स्वप्नांना मूर्त रूप देऊ शकणाऱ्या शिकल्या-सवरल्या होतकरू तरुणांना अनेक ठिकाणी मतदारांनी संधी दिल्याचे व परिवर्तन घडविल्याचे पाहता राजकारणातील स्वच्छताकरणाचा प्रारंभ ग्रामपालिकांपासून होऊन गेल्याचे म्हणता यावे.
निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत, की विधानसभा व लोकसभेच्या, त्यात अनेक ठिकाणी घटणाऱ्या मतदानाचा टक्का हा अलीकडे चिंतेचा विषय बनला आहे. कोणीही निवडून येवो, सारे एकाच माळेचे मणी असतात असाच अनुभव अधिकतर येऊ लागल्याने लोक मतदानासाठी न जाता त्यादिवशी पर्यटनास निघून जातात असेही पहावयास मिळते. राजकारणावरील विश्वास डळमळत चालल्याचे हे चित्र आहे. निवडणूक लढणारे राजकीय पक्ष व उमेदवारांकडून त्या-त्यावेळी राजकीय मशागत केली जात असताना प्रशासनाला व समाजसेवी संस्थांना मात्र जनजागरणाच्या मोहिमा राबवून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते म्हणूनच. पण याच स्थितीत अलीकडेच झालेल्या राज्यातील सुमारे बाराशेवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जागोजागी मतदारांनी रांगा लावून मतदानास गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. विशेषत: कोरोनाच्या महामारीचे संकट असताना त्यासंबंधीची भीती दूर सारून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव म्हणवणार्या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदान केले, परिणामी यंदा बहुसंख्य ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. शहरीमतदारांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांची ही सजगता खरेच कौतुकास्पद अशीच आहे. मतदारांच्या जागरूकतेचीच ही निशाणी असून, तीच बदलाची नांदी म्हणता यावी.
.....................
महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतींच्या निवडणुका राजकीय पक्षांतर्फे किंवा पक्ष चिन्हांवर लढल्या जात नाहीत. व्यक्ती वा नेत्यांचे राजकीय लागेबांधे बघता पक्षांना यातील विजयात आपले समाधान शोधता येते, त्या दृष्टीने या निवडणुकीतही आपल्यालाच सर्वाधिक जागांवर विजय मिळाल्याचे दावे बहुतेक सर्वच पक्षांनी केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व शिवसेनेच्या नेत्यांप्रमाणेच भाजपचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटीलदेखील म्हणतात की, सर्वाधिक जागा आम्हालाच मिळाल्या आहेत म्हणून. तेव्हा आकडे घटकाभर बाजूस ठेवूया; पण यंदा अनेक ठिकाणी वीस-वीस, पंचवीस -पंचवीस वर्षांपासूनच्या सत्ता उलथवून परिवर्तन घडल्याचे व तरुणांच्या हाती सत्ता सोपविली गेल्याचे दिसून आले हे कुणासही नाकारता येऊ नये. ज्यांचे काम चांगले आहे व जे मतदारांच्या पसंतीस खरे ठरले आहेत त्यांना पुन्हा संधी मिळाली, मात्र अनेक ठिकाणी भल्याभल्यांना धोबीपछाड देत तरुणांकडे सूत्रे सोपविली गेलीत. नावेच घ्यायची तर भाजपचे चंद्रकांत पाटील,
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, मातब्बर नेते पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील आदींच्या प्रभावक्षेत्रात त्यांच्या समर्थकांना अपेक्षित यश लाभू शकले नाही. हेच नेते नव्हेत, तर त्या त्या ठिकाणच्या अन्य मातब्बरांनाही धक्के पचवावे लागलेत. ही धक्का देण्यामागील मानसिकता व भूमिका महत्त्वाची ठरावी.
.....................
मतदारांना गृहीत धरून राजकारण करण्याचे दिवस संपलेत तसेच मतदारांना प्रलोभने देऊन आपल्याकडे वळवण्याचा फंडाही आता कामी येत नाही, इतके मतदार सजग होऊ लागले आहेत. विकासाची क्षमता कुणात आहे हे त्यांना समजू लागले आहे व त्यासाठी नवोदितांवर त्यांचा विश्वास दिसून येत आहे ही परिवर्तनाची लक्षणे ठरावीत. राजकीयदृष्ट्या विचार करता महाआघाडीचा फार्म्यूला तर कामी येताना दिसतोच; पण ग्रामीण भागात आजवर वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या बरोबरीने भाजपही आता तेथे पाय रोवू लागल्याचे या निकालात दिसून आले आहे. त्याखेरीज आतापर्यंत शहरी पक्षांची ओळख असलेल्या मनसे व आम आदमी पक्षालाही या निवडणुकीत यश लाभल्याने त्यांचा पाया विस्तारत असल्याचे स्पष्ट व्हावे. राजकारणाची कूस बदलू पहात असल्याचीच ही लक्षणे म्हणायला हवीत. मतदारराजा जसजसा सजग होईल व ऊर्जा तसेच नवी उमेद घेऊन काम करू पाहणाऱ्या तरुणांचे सत्तेतील प्रतिनिधित्व वाढत जाईल, तसतसे राजकारणातील स्वच्छताकरणाच्या प्रक्रियेला गतिमानता लाभून जाईल हाच संकेत यातून घ्यायचा. https://www.lokmat.com/nashik/political-cousins-are-changing-gram-panchayat-election-a607/
Monday, January 18, 2021
Saraunsh published in Lokmat on Jan 17, 2021
https://www.lokmat.com/nashik/bjp-queue-means-loyalists-should-build-curve-again-a321/
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210117_2_19&fbclid=IwAR368or5iJGGoEQw8qJslhVWc3W6QpKELA7HLfxq7X4D09RcsM8WNNmc1Do
Saturday, January 16, 2021
लोकमत मधील पतंगोत्सव...
14 जानेवारी 2021
लोकमत मधील पतंगोत्सव...
कोरोना काळातील व्यथा वेदनांना दूर सारून आशा अपेक्षांचे पतंग उंच उडवण्याचे उत्तरायण.
प्रतिवर्षाप्रमाणे लोकमतच्या हिरवळीवर मकर संक्रांतीनिमित्त सहकाऱ्यांसमवेतची आनंद चित्रे...
#LokmatNashik #KiranAgrawalLokmat
Thursday, January 14, 2021
आस आणि अहसास मधील जिंदगी...
आस आणि अहसास मधील जिंदगी...
आमच्या एका बाल्कनीच्या व्हरांड्यावर रोज एक कबुतर कबुतरी येऊन बसतात.
फार पूर्वीपासून येत असावेत ते, पण माझं लक्ष अलीकडे गेलं त्यांच्याकडे; वर्क फ्रॉम होम करताना.
आजू बाजूच्या झाडांवर पक्षांचा गलका सुरू असताना ही जोडी मात्र त्यापासून बाजूला कुजबुजत असते...
फार वयही नसेल, मध्यमवयीन म्हणता येईल अशी...
कान देऊन ऐकण्याचा खूप प्रयत्न केला, काय कुजबुजत असतील म्हणून...
शब्द कळले नाहीत, पण देह बोलीतून भाव कळला...
'तुमचं आमचं सेम असावं जणू.... '
अर्थात, असं चोरून कुणाचं काही ऐकणं बरं नाही म्हणून मीच त्यांच्या दृष्टीआड व्हायचो...
पण, तरी माझं हे चौर्य त्यांच्या लक्षात आलं असावं म्हणून की काय, त्यांचं येणं अनियमित झालं होतं
मला त्यांचं येणं सवयीचं होऊन गेल्यानं मी रोज वाट बघायचो त्यांची
ऊन उतरायला लागलं की ते येतात,
पण त्यांना उशीर झाला की माझी तगमग व्हायची.
का आले नसावेत अजून ते, म्हणून ना ना शंका डोकावायच्या ..
दाराआड घुटमळणारी माझी लुडबुड त्यांना आवडत नसावी का?
ते निवांतपणाच्या शोधात तिथे येतात, त्यांना हवा असतो एकांत; आणि मी ठोंब्या तेथे कडमळतो, म्हणून त्यांनी जागा तर बदलली नसावी?
तेच खरे म्हणता यावे, कारण आता मी ऑफिसला जायला लागल्यापासून ते पुन्हा नियमित यायला लागलेत !
* * *
खरंच आपण शहाणे असूनही किती निर्बुद्ध आहोत याची जाणीव झाली यानिमित्ताने...
गलक्या पासून दूर राहण्याचं, सुरक्षिततेच भान त्यांच्याठायी आहे, पण आपल्यापाशी ते का असू नये?
कोरोनाची भिती असतानाही आपण गर्दीत का शिरतो?
नाका तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी का वावरतो?
त्याऐवजी आपण आपल्यासाठीच जरा निवांत राहायला काय हरकत आहे?
सारे काही विसरून साऱ्यांपासून अलिप्त !
'अकेलेपन से सीखी है, पर बात सच्ची है
दिखावे की नजदिकीयो से तो
हकीकत की दूरियां अच्छी है...'
हे जे काही कुणी सांगून ठेवलेय त्याची प्रचिती घेण्यासाठी तरी हा एकांत, अलिप्तता अनुभवायला हवी.
पण आपण सारे पाश लपेटून घेतो स्वतःला,
अन या पाशात स्वतःलाच हरवून बसतो...
गर्दीत भटकल्यासारखे.. खिन्न, उदासपणे.
* * *
कुणा शायराने म्हटलेले आठवून गेले यानिमित्ताने,
हर पल मुस्कुराओ, बड़ी “खास” है जिंदगी…!
क्या सुख क्या दुःख ,बड़ी “आस” है जिंदगी… !
ना शिकायत करो, ना कभी उदास हो
जिंदा दिल से जीने का “अहसास” है जिंदगी…..!!
ही आस व तो अहसास घेऊन आपण जगलो तर खरच खूबसुरत असेल जिंदगी ...
#KirananandNashik #KiranAgrawalNashik
Editors View published in Online Lokmat on Jan 14, 2021
आशाओ की पतंग उड़ी उड़ी जाये...
किरण अग्रवाल /
आशा, अपेक्षांना कसल्याही मर्यादा नसतात. शिवाय जगण्यासाठीची इच्छाशक्ती वाढविण्याचे काम त्यातून घडून येते. त्यामुळेच तर ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणे’ असे म्हटले जाते. तेव्हा त्या फलद्रूप होवोत अगर न होवोत, त्याकरिता स्वप्न बघणे मात्र टाळले जाऊ नये. विशेषतः संकटाच्या अगर आपत्तीच्या काळात, तर जिथे आसमंतात निराशेचे, काळजीचे ढग दाटलेले असतात तिथे अपेक्षांचे व स्वप्नांचे पतंग उंच उडवून उद्दिष्टपूर्तीकडे झेपावण्याचे प्रयत्न प्राधान्याने करायचे असतात. कारण त्यातून आकारास येणारी सकारात्मकताच निराशेवर मात करण्याचे बळ देणारी असते. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळातून बाहेर पडून पूर्वपदावर येत असलेल्या जनजीवनातील आशावाद उंचावण्यासाठीही हेच गरजेचे आहे.
मकरसंक्रांतीला तिळाची स्निग्धता व गुळाचा गोडवा घेऊन परस्परातील स्नेहसंबंधांना अधिक दृढ केले जाते. खगोलशास्राच्या दृष्टीने यादिवशी सूर्याचे मकर राशीत पदार्पण होऊन उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणाचा हा कालखंड सकारात्मक ऊर्जा देणारा व शुभ मानला जातो. यंदा कोरोनाच्या संकटाला सामोरे जाऊन अनेकविध नुकसानीला तोंड द्यावे लागल्याचा पूर्वार्ध पाहता, या उत्तरायणाचा नव्या संदर्भाने विचार करता येणार आहे. कोरोनापूर्व काळातील व्यवहार, वर्तन व कोरोनोत्तर झालेला त्यातील बदल लक्षणीय आहेच; परंतु यामुळे विकसित झालेली नवीन जीवनशैली हीदेखील अपरिहार्यतेचा भाग ठरून गेली आहे. अशास्थितीत एकूणच कामकाजाचे व लाइफस्टाइलचे जे उत्तरायण घडून येऊ घातले आहे त्याचा सकारात्मकतेने विचार करून पुढे झेपावणे गरजेचे आहे. मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करताना खासकरून गुजरातसह आपल्याही राज्यात अलीकडे मुंबई, पुणे, नाशिकसह काही शहरांमध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. तेव्हा नेमक्या या सणादरम्यानच देशभरात जागोजागी वितरित होऊ पाहत असलेल्या कोरोनावरील लसीच्या निमित्ताने आजवरच्या भीतीचे वातावरण दूर होण्यास जशी मदत घडून येते आहे त्याच पद्धतीने आकाशात उंच उडणाऱ्या पतंगाप्रमाणे आशा- आकांक्षांचे व प्रबळ इच्छाशक्तीचेही पतंग झेपावले तर निराशेवर मात करणे सहज सुलभ ठरू शकेल.
.................
गेल्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील सणवारानिमित्त बाजारात दिसून आलेली गर्दी आणि त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा पाहता डिसेंबर-जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांचे आकडे वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती; परंतु सुदैवाने आपल्याकडील स्थिती नियंत्रणात राहिल्याचे दिसून आले. यातच कोरोना लसीला परवानगी मिळून ती जागोजागी पोहोचल्याने मानसिक आधार लाभून गेला आहे. याच जोडीला बाजारातील स्थितीही उत्साहवर्धक असल्याचे दिसून येत आहे. भांडवली बाजारावरही याचा परिणाम झाला आहे. डिमॅट खातेदारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५० हजारांच्या दिशेने झेपावला आहे. विदेशी गुंतवणुकीचा ओघदेखील वाढल्याने निफ्टीचीदेखील १५ हजारांकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे औषध कंपन्या तसेच डिजिटल व्यवहाराशी संबंधित उद्योग व अर्थपुरवठा करणाऱ्या बँका, कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत व या उद्योगांमध्ये तेजी आलेली दिसत आहे. उद्योग-व्यवसाय
पूर्वपदावर आलेले असले तरी ‘जीडीपी’वर परिणाम करणाऱ्या औद्योगिक उत्पादन दरात मात्र नोव्हेंबरमध्ये १.९ टक्क्यांनी घसरण झाली आहे, हे खरे; परंतु दुसरीकडे महागाईच्या दरात मात्र घट झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये ६.९ टक्क्यांवर महागाईचा दर पोहोचला होता, तो डिसेंबर २०२० मध्ये ४.५९ टक्क्यांवर आला, म्हणजे महागाईच्या दरात घसरण झाली. यंदा पाऊसही समाधानकारक झाल्याने अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली. परिणामी, अन्नधान्य महागाईचा नोव्हेंबर २०२० मध्ये ९.५ टक्के असलेला दर डिसेंबर २०२०मध्ये ३.४१ टक्क्यांवर आला आहे.
..................
विशेष म्हणजे आयकर हा सामान्यांचा विषय म्हटला जात नाही; परंतु यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या पाच टक्क्यांनी वाढली आहे. या सर्व बाबी शुभ संकेताच्याच असून, अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे उत्तरायण दर्शविणाऱ्या म्हणता याव्यात. अर्थात, सर्वच बाबी सर्वांच्याच मनासारख्या होत नाहीत. एखादी बाब एका घटकासाठी लाभदायक ठरत असताना इतरांसाठी ती नुकसानदायीही ठरते, हेदेखील खरे. कोरोनाच्या काळात अनेकांच्या बाबतीत तोच अनुभव आला; परंतु तसे असले तरी निराशेचे सूर आळवण्याऐवजी आशेचे पतंग उडवायला हरकत नसावी. आता तर सारे काही रुळावर येताना दिसत आहे. तेव्हा दूर होत असलेल्या संकटाने गेल्या काळात जे काही शिकविले त्यातून संधीचा शोध घेत आशावादी राहण्याचा आणि पतंगाप्रमाणे उंचच-उंच झेपावण्याचा संकल्प मकरसंक्रांतीनिमित्त सोडूया, इतकेच यानिमित्ताने. https://www.lokmat.com/editorial/let-kite-hope-fly-after-corona-wave-a607/
Monday, January 11, 2021
IBN Lokmat Special Show on Nashik Kumbh Mela "Katha mahakumbhachi"
नाशिक त्रंबकेश्वर येथे 2015 - 16 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यावर IBN लोकमत ने तयार केलेला विशेष कार्यक्रम... कथा कुंभमेळ्याची
Saraunsh published in Lokmat on Jan 10, 2021
https://www.lokmat.com/nashik/return-gite-and-bagul-shiv-sena-will-bjp-leave-political-circles-full-fun-and-find-out-reasons-leak-a360/
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210110_4_21&fbclid=IwAR0fSokjz2vSpTaUrEHuSrLQR09aVbE04lHD0_hY7SYz2dIOehSQ7y_2rmI
Friday, January 8, 2021
वसंत गिते आणि सुनिल बागूल यांचा शिवसेनेत प्रवेश | Vasant Gite & Sunil Bagul Enter Shivsena | Nashik
नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे दोन महत्वाचे नेते वसंत गिते आणि सुनिल बागूल यांनी शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या दोन महत्वाच्या नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकप्रकारे धक्काच बसला आहे.
Thursday, January 7, 2021
मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार जांभेकर यांचे चित्र भेट
06 Jan, 2021 / पत्रकार दिनाची अशीही भेट...
सिन्नरच्या एस. जी. पब्लिक स्कूलचे शिक्षक विनायक काकुळते म्हणजे अतिशय उत्साही व हरहुन्नरी व्यक्ती. थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंती - पुण्यतिथी निमित्त त्यांचे चित्र व संदेशांचे फलक रेखाटन करून विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देणे हा त्यांचा आवडीचा नित्यपाठ.
आज मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अतिशय सुरेख चित्र चितारून त्यांनी लोकमतला भेट दिले.
धन्यवाद काकुळते सर....
#KiranAgrawalLokmat
Marathi Patrakar din 2021
06 Jan, 2021
सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादनप्रसंगी टाइपोग्राफर सुनील धोपावकर, साहित्यिक बी.जी. वाघ, सावानाच्या बालभवनचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, देवदत्त जोशी, वसंतराव खैरनार, ऍड अभिजित बगदे यांच्या समवेत...
#SaWaNa #Darpan #KiranAgrawalNashik
Editors View published in Online Lokmat on Jan 07, 2021
कोरोनाच्या आपत्तिकाळात महिलांवरील अत्याचाराची भर :
किरण अग्रवाल /
कोरोनापासून संरक्षणासाठी अनेकविध लसी समोर आल्या असल्या तरी, अजूनही कोरोनामुक्ती दृष्टिपथात नाही, कारण काळजी व खबरदारी हा यातील महत्त्वाचा भाग आहे जो जनतेकडून तितक्याशा गांभीर्याने घेतला जाताना दिसत नाही. कोरोनाच्या महामारीने व्यवहार व वर्तनात अनेक बदल घडवून आणले आहेत, नवी जीवनशैली विकसित केली आहे हे खरे; पण यातील वर्तनात सुधारणावादी प्रयत्न अपेक्षित असताना काही कटू अनुभवही समोर येत आहेत हे दुर्दैवी म्हणायला हवे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव राहिलेल्या गत वर्षात सक्तीच्या सुट्ट्या व लॉकडाऊनमुळे बहुतेकांना कुटुंबीयांसोबत वेळ घालवावयास मिळाला याकडे कोरोनाची इष्टापत्ती म्हणून एकीकडे पाहिले जात असताना, दुसरीकडे याच काळात महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराच्या घटना वाढल्याचा राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल पुढे आल्याचे पाहता आपत्तीमधील भर म्हणून त्याकडे पाहिले जाणे स्वाभाविक ठरावे.
कोरोना लसीच्या चाचणीबद्दलची चर्चा सध्या जोरात असून, यात निव्वळ वावड्यांचे किंवा गैरसमजाचेच प्रमाण अधिकतर दिसून येत आहे. अर्थात ही लस घेतल्यानंतरच्या परिणामांवरील चर्चांना वैद्यकीय आधाराने अगर संशोधनाच्या संदर्भाने जी काही उत्तरे द्यावयाची ती दिली जात आहेत व खुलासे होत आहेतही; परंतु कोरोनामुळे झालेल्या भल्याबुऱ्या परिणामांची जी चर्चा होत आहे व त्यात कौटुंबिक हिंसाचार वाढल्याची जी बाब पुढे आली आहे, ती अधिक चिंतेची म्हणावयास हवी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका अहवालानुसार गेल्या २०२० या वर्षात महिलांच्या तक्रारींचे प्रमाण कमालीचे वाढले असून, ते त्यापूर्वीच्या सहा वर्षांचा आढावा घेता त्यात सर्वाधिक आहे. यातही कुटुंबातच झालेल्या छळवणुकीच्या तक्रारींचे म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण मोठे आहे. उत्तर प्रदेश यात आघाडीवर असून, पुरोगामित्वाचा झेंडा मिरवणारा महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. अर्थात, कुणाचा नंबर कितवा हा यातील मुद्दाच असू नये, तर कोरोना कालावधी हा वैद्यकीयदृष्ट्या अनेकांसाठी अडचणींचा ठरलेला असताना अनेक माता-भगिनींसाठीही तो वेगळ्या अर्थाने त्रासदायी ठरला हे वेदनादायी आहे. हिंदीत ‘सोच बदलो, समस्या हल हो जायेगी’ असे म्हटले जाते; परंतु येथे तर समस्या कायम असतानाही सोच बदलताना दिसत नाही. समाजात वाढीस लागलेले वैचारिक अध:पतन यातून निदर्शनास यावे, कारण संकटाच्या काळातही काहींची उपद्रवी मानसिकता बदलताना दिसत नाही.
कोरोनाकाळात शासनातर्फे केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना सक्तीची सुटी मिळाली, त्यामुळे तो काळ कुटुंबाबरोबर घालवायला मिळाला म्हणून आपत्तीतही इष्टापत्ती घडल्याची भावना अनेक जण बोलून दाखवत आहेत. कामाच्या व्यापात मुलांकडे लक्ष देऊ न शकलेल्या पालकांनी या काळात मुलांबरोबर खेळण्याचा आनंद घेतला, तर काहींनी वृद्ध माता-पित्यांसोबत वेळ घालवून समाधान अनुभवले. बहुतेकांनी मोबाइलद्वारे आपापल्या नातेवाईक व इष्ट मित्रांच्या ख्यालीखुशालीची विचारपूस केली, त्यातून कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ व्हावयास मदत झाली; पण दुसरीकडे ज्या माता-भगिनींना घरात कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत होते त्यांच्या त्रासात मात्र भर पडली. कोरोनामुळे उद्योग-व्यवसाय व बाजार बंद राहिल्याने पुरुष व शाळाही बंद असल्याने मुले घरातच होती, त्यामुळे तसाही गृहिणींवर कामाचा ताण वाढला होताच, त्यात त्यांच्या छळातही भर पडली म्हणायचे. आपल्याकडील पुरुषप्रधानकी अशी की, काम वाढले म्हणून पुरुषांनी महिलांना घरकामात मदत केल्याचे प्रकार कमीच घडले असावेत; पण तरी अनेक भगिनींनी हा वाढीव ताण आनंदाने व सहर्ष स्वीकारला. पण याच अनुषंगाने काही भगिनींच्या वाट्याला मात्र छळवणुकीचा ताण आला, जो अन्याय, अत्याचाराचा होता हे दुर्दैवी. कोरोनाकाळात महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी वाढल्याची जी आकडेवारी पुढे आली ती म्हणूनच समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने कोरोनाच्या भीतीपेक्षाही अधिक चिंतेत भर घालणारी म्हणायला हवी. कोरोनावरील लसी विकसित झाल्याने या विषाणूचा नि:पात घडून येईलच; परंतु समाजातील काही जणांच्या कुजक्या व सडक्या विचारांचा किंवा मानसिकतेतील बदल कसा घडून यावा, हाच खरा प्रश्न आहे.
https://www.lokmat.com/editorial/emphasis-atrocities-against-women-during-corona-disaster-a642/
Monday, January 4, 2021
Chhatrapati Sambhaji Raje visit..
Jan 03, 2021
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय व अतुलनीय शौर्याची व स्वराज्य प्रेरणेची साक्ष असलेले गड कोट किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच. या गड कोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणारे खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणजे समस्त मावळ्यांचे आशास्थान व प्रेरणास्थानही. त्यांचे नेतृत्व व मार्गदर्शनात रायगडाचा अल्पावधीत कायापालट होताना दिसत आहे.
राजे यांनी आज लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता यासंबंधीच्या त्यांच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. दांडगी इच्छाशक्ती व त्यासाठीचा सखोल अभ्यास त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित होत होता.
राजे, आपल्या संकल्पाच्या सिद्धीसाठी आम्हीही सहर्षपणे आपल्या सोबत आहोत...
#SambhajiRajeKolhapur #KiranAgrawalLokmat
Saraunsh Published in Lokmat on Jan 03, 2021
https://www.lokmat.com/nashik/municipal-and-zilla-parishad-authorities-will-have-do-same-year-a360/
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210103_2_27&fbclid=IwAR2jA4-wzAF4YL5j7_RlxvEmACiB8huckoyO1qAZXYym2POHtCG4T7246Vc
Subscribe to:
Posts (Atom)