At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Wednesday, December 1, 2021
EditorsView published in Online Lokmat on Nov 25, 2021
हताश मने सावरायला हवीत...
किरण अग्रवाल /
कोरोनाने जे बळी घ्यायचेत ते घेतले, ते आपण एका मर्यादित प्रयत्नांखेरीज रोखू शकलो नाहीत कारण ते आपल्या सर्वांच्याच हाताबाहेरचे होते; मात्र परिस्थितीने जाणारे जीव तर नक्कीच रोखता येतील. नैसर्गिक व आर्थिक संकटाने बेजार होऊन काही मने मोडून पडत आहेत, त्यातून आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झालेले दिसत आहे. कुणीच 'वाली' नसल्याच्या भावनेतून येणारी हताश अवस्था, निराशा हीच व्यक्तीला अंताकडे घेऊन जाते. ही कोलमडून पडू पाहणारी मनेच सावरणे आता गरजेचे बनले आहे.
वाढत्या लसीकरणाच्या परिणामी कोरोनाचे संकट ओसरू पाहात असताना आर्थिक ओढाताणमुळे होणाऱ्या आत्महत्यांच्या घटना पुन्हा समोर येऊ लागल्या आहेत. मागे विशेषतः विदर्भ व वऱ्हाडात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला होता, आता पुन्हा तेच सत्र सुरू झाले आहे. वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यात गेल्या जानेवारी ते चालू नोव्हेंबरपर्यंतच्या 11 महिन्यात 121, तर बुलडाण्यात 233 शेतकरी आत्महत्यांची नोंद सरकार दरबारी आहे. राज्याच्या अन्यही भागात काही ना काही कारणांमुळे आत्महत्या होत असल्याच्या वार्ता प्रतिदिनी वाचावयास मिळत आहेत. गेल्या वर्षी, म्हणजे 2020 मध्ये संपूर्ण राज्यात दोन हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. यातून आत्महत्यांचे सत्र थांबले नसल्याचे लक्षात यावे.
-----------------
कुठल्याही संकटातून अगर अडचणीतून बाहेर पडण्याचे सारे मार्ग बंद झाल्याची भावना बळावते, तेव्हा व्यक्ती स्वतःच्या अंताकडे वळते. निसर्गाने नागवलेला व नापिकीने कंटाळलेला शेतकरी असो, की व्यक्तिगत अडचणीतून असहायता अनुभवणारा कुणीही; त्याला अशा अवस्थेत धीर देणारा हवा असतो. हल्ली ही व्यवस्थाच कोलमडलेली दिसून येते. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीत जबाबदारीचे ओझे कुणा एकाच्याच खांद्यावर येत नसे, अडी अडचणीत परस्परांचा हात धरीत वाटचाल होऊन जात असे. नाहीच काही तर मन मोकळे करायला कुणाचा खांदा वा कुणा माऊलीची कुस लाभे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नातीही दुरावली आहेत व मित्रही. प्रत्येकच जण 'मी' व 'माझ्या'त मर्यादित होऊन गेला आहे. वाढत्या सोशल मीडियामुळे माणूस टेक्निकली भलेही सोशल झाला असेल, पण प्रत्यक्ष गाठीभेटी व एकमेकाला समजून घेणे आटत आहे. मग दुःख हलके करणार कोणाकडे? धीर सुटतो, मन खचते, मार्ग दिसत नाही व आत्मघात ओढवतो तो त्यातूनच.
-----------------
वाढत्या आत्महत्यांप्रकरणी सरकारला जबाबदार धरून राजकारण करणे सोपे आहे, पण समाजशास्त्र व मानसशास्त्राच्या अंगाने विचार करता सारे काही संपल्याची मानसिकता बनलेल्या व्यक्तीला धीर किंवा उभारी देणारी कुटुंबातील व समाजातील जी साखळी तुटली आहे तिचे काय? शासनाकडून विविध पातळ्यांवर समुपदेशनाची व्यवस्था केली गेली आहे, पण ते पुरेशा प्रमाणात होत नाही हे खरेच; मात्र नातेसंबंधातील, मित्रपरिवारातील हक्काच्या समुपदेशनाचे काय? ती व्यवस्थाच संपल्यात जमा होऊ पाहते आहे. जागतिक कुटुंब दिन व मैत्री दिनाला सोशल मीडियातून शुभेच्छा संदेशांचा पूर वाहतो, परंतु मनातल्या मनात वेदनांनी विव्हळणाऱ्या आपल्या आप्तेष्ट किंवा मित्राच्या खांद्यावर हात ठेवून, 'घाबरू नकोस, तू लढ; मी आहे सोबत' असे म्हणणारे किती आहेत? थोडक्यात, एकटे पडल्याची भावना झालेली हताश व निराश मने सावरायला हवीत. त्यासाठी आपल्या अवती भोवतीच अशांचा शोध घ्यायला हवा. कुटुंब, समाज, कार्यालयात, जिथे कुठे कामावर असाल त्या त्या ठिकाणी तो घेता येणारा आहे. किंबहुना परिस्थितीवश पिचलेले तत्काळ लक्षातही येतात. तात्पर्य, संकटांवर मात करून पुढे जाण्याचे मार्ग शोधता येणारे असतात, आत्महत्या हा त्यावरील मार्ग होऊच शकत नाही, ती पळवाट ठरते. अशा स्थितीत गरज असते ती केवळ धीर देण्याची. तेवढे नक्की करूया...
https://www.lokmat.com/editorial/desperate-minds-need-recover-a310/?fbclid=IwAR2TbemHjrOT_IiXXur79ICW9KfC3z1YmsLB1Lj8QM19Pn0y9gzPG8dQrP0
Labels:
EditorView
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment