At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Friday, December 24, 2021
EditorsView published in Online Lokmat on Dec 23, 2021
मानवतेविरुद्धच्या गुन्हयाबद्दलची संवेदनशीलता...
किरण अग्रवाल /
नात्यांमधील नजाकत ही त्यातील मान-सन्मान व मर्यादांमुळे टिकून असते. यातील मर्यादांच्या अवलंबातून नाती अधिक गहिरीही होतात. काही नाती ही नाजूक व हळवी असतात, त्यांना संवेदनेची किनार असते. या संवेदनांचा ओलावाच अधिकतर नाती टिकवून ठेवण्यास कामी येतो. खळखळून वाहणाऱ्या झऱ्यातून जो नाद अनुभवयास येतो तसा तो नात्यांमध्ये असला, की त्याची वीण अधिक घट्ट होते. हा नाद विश्वासाचा असावा लागतो, आपुलकीचा व जिव्हाळ्याचा असावा लागतो, तसा तो मर्यादांचे भान ठेवणाराही असावा लागतो. हे भान सुटले की कुटुंबाचा व समाजाचाही धाक उरत नाही. सद्विवेक बुद्धी गहाण पडली की अविवेक बळावतो व त्यातून अनाचारही घडून येतो. नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना त्यातूनच घडून येतात. अशा घटना मानवतेलाही धक्का देणाऱ्या ठरतात, त्यामुळे त्याची गंभीर दखल घेणे भाग पडते; जी एका प्रकरणात उच्च न्यायालयाने घेतल्याचे दिसून आले.
अडचणीच्या काळात नात्यांची कसोटी लागते, पण कधीकधी नात्यांमधील मर्यादा ओलांडण्याचे प्रकार घडून येतात तेव्हा मानवतेलाही धक्का लागून गेल्याशिवाय राहत नाही. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे घडला होता. तेथे व्यवसायाने मजूर असणाऱ्या एका पित्याने आपल्याच अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार करून तिचा दोनदा गर्भपात करण्यात आला होता. तिसऱ्या वेळी मुलीने बाळाला जन्म दिल्यामुळे पित्याचे दुष्कृत्य उघड झाले होते. याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार हा मानवतेविरुद्धचा आणि दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले व संबंधितांचे अपील फेटाळून लावले. मुलीचे संरक्षण करणे बापाची जबाबदारी असते. बाप हा मुलीसाठी ताकद, आधार व विश्वस्त असतो, परंतु या प्रकरणात बापानेच मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले हा अत्यंत अश्लील, जघन्य व खुनापेक्षाही अधिक गंभीर गुन्हा असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. समाज भलेही संवेदनाहीन होत चालला असेल, परंतु न्यायालये किती संवेदनशील आहेत हेच यातून लक्षात घ्यायचे. अर्थात, न्यायाच्या प्रक्रियेत वस्तुस्थिती व पुराव्यांखेरीज संवेदनांना फारसा अर्थ नसतो हे खरे, परंतु म्हणून भावनांचा किंवा मानवतेचा विचार बाजूस पडतो असे अजिबात नाही.
--------------------------------
खरेतर बलात्काराच्या घटनांमध्ये सुमारे 90 टक्क्यांपेक्षा अधिक आरोपी हे नात्यातील किंवा परिचयातीलच आढळून येत असल्याचे पाहता मानवतेबरोबरच नातेसंबंधही पणास लागतात. संस्काराची शिदोरी सुटून गेली की असे प्रकार घडतात. केवळ बलात्कारच नव्हे, तर प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची अगर पत्नीची केली जाणारी हत्या असो, की अनैतिक संबंधातून होणारे कुटुंब कलह; अपवादात्मक असल्या तरी असल्या घटना समाज मनावर दूरगामी परिणाम करणार्या असतात, त्यामुळे या मागील ऱ्हासाच्या कारणांबद्दल समाजातील मान्यवरांनी चिंतन करणे गरजेचे ठरावे. विकृत मनोवृत्ती व विभक्त कुटुंब पद्धतीतून ओढवलेली अनिर्बंधता यासारखी अनेक कारणे यामागे आहेतच, परंतु कायद्यासोबतच समाजाचा व कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा धाक न उरल्याचेही यातून लक्षात यावे. सामाजिक जाणीवा व नात्यांमधील बंध सैलावत आहेत ते त्याचमुळे. माणूस माणसाविरुद्ध उठला असून मानवता लयास जात असल्याचे अशा घटनातून समोर येते. बापाचा मुलीवरील बलात्कार हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे जे मत उच्च न्यायालयाने नोंदविले आहे ते याचसंदर्भाने अतिशय महत्त्वाचे आहे.
https://www.lokmat.com/editorial/sensitivity-crimes-against-humanity-a310/?fbclid=IwAR0Qlxd7VASJ_cQxQ43Wl3blBShXc32CVLpSJOfMHhg6UTBpvgCu69GILlE
Labels:
EditorView
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment