At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Friday, December 31, 2021
अलविदा 2021 ...
Dec 31, 2021
अलविदा 2021 ...
वर्ष सरतंय, अनेक कडू गोड आठवणी ठेऊन.
अर्थात, कडू अधिक; कारण कोरोना गेलेला नाहीये.
उलट त्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय.
भीती वाटावी असे वातावरण पुन्हा होते आहे.
तेव्हा पुन्हा लॉकडाऊन लागू द्यायचा नसेल तर
स्वतःच स्वतःची काळजी घ्या मित्रांनो!
वैद्यकीय वर्ग अगोदरच दबावात आहे, त्यांच्यावर कामाचा दबाव आणखी वाढणार नाही याची काळजी घेऊया.
सरत्या वर्षातील अडचणी, वाईट अनुभव आदी सारे विसरून हिमतीने, आत्मविश्वासाने व नव्या ऊर्जेने नवीन वर्षात पाऊल ठेऊया...
#अलविदा2021 #Gudbye2021 #KiranAgrawal
अभिनंदन मित्रा, अभिमान आहे आपला...
Dec 30, 2021
अभिनंदन मित्रा, अभिमान आहे आपला...
कधीकधी काय योग जुळून येतो बघा, लोकमत नाशिक मधील माझे सहकारी, उप वृत्तसंपादक संजय वाघ यांनी लिहिलेल्या 'गाव मामाचं हरवलं' या बाल कवितासंग्रहाच्या प्रकाशनास मी गेलो होतो, ती तीन वर्षांपूर्वीची आठवण आज फेसबुकने करून दिली म्हणून मी ती सकाळीच शेअर केली, आणि आजच काही वेळापूर्वी वार्ता आली की आमच्या संजय वाघ यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार घोषित झाला.
अतिशय आनंदाचा व अभिमानाचा हा क्षण आहे...
पत्रकारिता करताना संवेदना जपणाऱ्या व विशेषतः बाल मनाशी संवाद साधणाऱ्या माझ्या या सहकार्याच्या अलीकडील 'जोकर बनला किंगमेकर' या कृतीस हा मानाचा पुरस्कार लाभला.
खरेच मन अभिमानाने भरून आले...
आमच्या संजय ने असेच उत्तरोत्तर कीर्तीवंत व्हावे याच सदिच्छा...
EditorsView published in Online Lokmat on Dec 30, 2021
विवेक हरविल्याचीच लक्षणे...
किरण अग्रवाल /
घटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे परधर्माचा अनादर किंवा राष्ट्रपुरुषांवर चिखलफेक करण्याचा परवाना असल्याचा गैरसमज काहींनी करून घेतल्याचे दिसते, त्यातूनच बेतालपणे बरळण्याचे प्रकार वाढले असून, फुकट प्रसिद्धीचा सोस यामागे असल्याचे दिसून येते. रायपूरच्या एका कार्यक्रमात तथाकथित कालीचरण बाबाने महात्मा गांधींबद्दल जे अनुद्गार काढलेत त्याकडेही याचसंदर्भाने बघता यावे. असे प्रकार समाज मान्यतांना धक्का देणारे व भावना दुखावणारे तर आहेतच, शिवाय राष्ट्रद्रोह घडविणारेही असल्याने अशांवर केवळ गुन्हे दाखल करून न थांबता ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना अद्दल घडेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे.
राष्ट्रपुरुष मग ते कोणीही असोत, कोणत्याही जाती-धर्माचे वा वर्ग विशेषाचे नसतात; समस्त राष्ट्रासाठी ते आदर्श व प्रेरणादायी असतात. त्यामुळे अशा महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे ही तशी विकृत मानसिकताच ठरते. सन्मानजनक बोलायचे तर त्यासाठी विचार करावा लागतो, संबंधिताचे चरित्र ज्ञात असावे लागते किंवा अभ्यासावे तरी लागते; परंतु विचाराने बोलण्याऐवजी स्वतःच्या प्रचारासाठी जेव्हा कोणी बरळून गेल्याचे पहावयास मिळते तेव्हा अशांची कीव आल्याखेरीज रहात नाही. त्यांना महापुरुषाची थोरवी माहीत नसते अशातला भाग नसतो, परंतु स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी महनीय व्यक्तीवर चिखलफेकीचा मार्ग त्यांना सोयीचा व सोपा वाटतो, त्यामुळेच अशांच्या तोंडाला वेसण कशी घालता येईल याचा विचार होणे गरजेचे बनले आहे.
-----------------
अकोल्याच्या कुणी कालीचरण बाबाने नुकतेच रायपुरातील एका धर्मसंसदेच्या व्यासपीठावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने धर्म प्रांतातील बुवा बाबांच्या राजकीय लालसांचा विषय चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे. मुद्दाम येथे राजकीय लालसेचा संदर्भ घेतला कारण त्याखेरीज असा उद्दामपणा घडून येणे शक्य नाही. आपल्या पाठीशी कोणी तरी असल्याचा किंवा उभे राहण्याचा विश्वास असल्याखेरीज अशी मजल गाठली जात नाही. हरिद्वारमध्ये झालेल्या एका कथित धर्मसंसदेतही कुणाकडून धार्मिक विद्वेषाची भाषा केली गेली म्हणे. तेव्हा कालीचरण असो की अन्य कुणी, अशांचा उद्दामपणा रोखणे ही शासनाची व समाजाचीही जबाबदारी आहे; कारण केवळ उद्दामपणाच नव्हे तर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा मलीन करण्याचा व सर्वधर्मसमभावाच्या तत्वालाच नख लावण्याचा राष्ट्रद्रोह ज्यावेळी घडून येतो तेव्हा अशांना कायद्याच्या चौकटीतुन आवर घालणे गरजेचे बनते
-----------------
दुर्दैव असे, की राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्यांना समाजात बहुमान लाभताना दिसतो. कुणी ऊक्तीने तर कुणी कृतीने अधर्म करताना दिसतो. कायदा आपले काम करतो, परंतु संबंधितांना त्याचे भय वाटत नाही. धर्माच्या शाली पांघरून समाजाच्या आस्था आणि श्रद्धांशी खेळणाऱ्या काही बाबांना गंभीर गुन्ह्यांच्या आरोपामुळे गजाआड होतानाही आपण पाहतो आहोत, पण तरीही अंधभक्तांच्या त्यांच्यावरील श्रद्धा दूर होत नाहीत हे आश्चर्याचेच म्हणायला हवे. बाबा गजाआड असतांना त्यांचे भक्त अजूनही मिरवणुका काढतात व त्यांनी वापरलेल्या खडावांवर डोके ठेवताना दिसतात, इतक्या आपल्या श्रद्धा अविवेकी आहेत का? भोंदू व भामट्यांची चिकित्सा करण्याचा विवेकच आपण हरवून बसलोय की काय असा प्रश्न यातून पडावा. ही एक प्रकारची अंधश्रद्धाच म्हणावयास हवी. तेव्हा समाजातील सौहार्दाचे संबंध बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपासून अंधश्रद्धीयांना दूर ठेवण्यासाठी सुजाण व सदविवेकी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
https://www.lokmat.com/editorial/symptoms-loss-conscience-a310/?fbclid=IwAR0U0XbGPPHwtxiX0BYPQ7hRxsKsDYeFoNloH-cOXz1SpD11ulpqqq4NTjY
नव्या वाटेवरील जुना मित्र...
Dec 29, 2021
नव्या वाटेवरील जुना मित्र...
काही मित्र असे असतात ज्यांच्या धडपडीचे नेहमी कौतुक वाटत असते, त्यामुळे ते भेटले की मन अभिमानाने भरून येते.
नाशिकचे माझे सन्मित्र योगेश पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मुद्दाम भेटायला आले म्हटल्यावर तसेच झाले.
योगेश जी म्हणजे हाती घेतलेले काम प्रामाणिकपणे व निष्ठेने तडीस नेणारे अतिशय धडपडी व्यक्तित्व. आपल्या हातून काहीतरी कोणाचे तरी कल्याण व्हावे या ध्यासातून झपाटलेला हा मित्र पुण्याच्या 'एमआयटी' सारख्या नामवंत संस्थेतून नाशिकला आला आणि त्याच्याशी मैत्र जुळले. शेतीत वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील महिला बचत गटांना एकत्र करून ग्रामविकास साधण्यासाठी सुरू असलेले त्यांचे प्रयत्न मी पाहात आलो आहे.
याच मालिकेत आता 'एमआयटी'च्या सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक म्हणून ते नवीन वाटेवर मार्गस्थ झाले आहेत. यासाठीच ते विदर्भ दौऱ्यावर होते. त्यांचे अमरावती विभाग समन्वयक अभय खेडकर, नाशिक विभागाचे संजय भाबर, अकोला जिल्ह्याचे गाढवे पाटील व वाशिम जिल्ह्याचे त्यांचे समन्वयक तथा माझे सहकारी प्रफुल्ल बानगावकर यांना सोबत घेऊन ते कार्यालयात आलेत. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले व भरपूर गप्पाही झाल्या. खूप आनंद झाला त्यांच्या भेटीने.
इतरांपेक्षा वेगळा विचार करून नवनिर्माणासाठी झटणाऱ्या विश्वनाथजी कराड यांच्या पावलावर पाऊल ठेवत नवी वीट रचू पाहणारे राहुल कराड यांच्या क्रियाशील नेतृत्वातील 'एमआयटी'ची सरपंच संसद नवा मार्ग प्रस्थापित करेल असा विश्वास आहे...
त्यासाठी योगेश जी आपणास व आपल्या सर्व सहकारीना मनःपूर्वक शुभेच्छा...
#KiranAgrawal #MITSarpanchSansad
Tuesday, December 28, 2021
आणखी काय हवे? ...
Dec 28, 2021
आणखी काय हवे? ...
खुर्चीतला माणूस बदलला व त्याची जागाही बदलली, की माणसं व मित्रही दूर होतात असा अनेकांचा अनुभव आहे. पण मी अपवाद ठरलो म्हणायचे.
यंदा गाव बदलले, नव्या मित्रांची भर पडली; नव्या जुन्या अशा आपण साऱ्यांनी मिळून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांची बरसात केली.
मागे पन्नाशी गाठली तेव्हा लिहिले होते, की आता कसला वाढदिवस; आता काढदिवस. परंतु आपल्या स्नेह शुभेच्छांत कसलीही कमतरता राहात नाही. त्यातूनच तर लाभून जातो नवा उत्साह, नवी ऊर्जा.
एक दिवस आधीच सुरू झालेला अग्रिम शुभेच्छांपासूनचा सिलसिला कालचा दिवस उलटून गेला तरी आजही सुरूच आहे. हा स्नेह व या प्रेमाखेरीज आणखी काय हवे?
तेच माझे बळ व तीच माझी प्रेरणा...
हे बळ यापुढेही कायम लाभेल असा विश्वास आहे.
धन्यवाद म्हणून औपचारिकपणा कसा करू?
अनेक मित्रांचे फोन घेऊ शकलो नाही, सर्वांच्याच शुभेच्छा संदेशांना उत्तरही देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व.
स्नेह आहेच, यापुढेही तो कायम राखूया...
#KiranAgrawal #kiranAgrawalBirthDay2021
Sunday, December 26, 2021
बळीराजाची बळीराणी ....
Dec 26, 2021
बळीराजाची बळीराणी ....
आकोट मधील शिक्षिका लता बहाकर यांनी लिहिलेल्या 'बळीराणी' कादंबरीचे प्रकाशन पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवायला मिळाले.
बळीराजाच्या दुःख दैन्याची चर्चा साहित्यात दिसते, मात्र त्याचा कणा असलेल्या त्याच्या सहचारिणीची फारशी दखल घेतली गेलेली दिसत नाही. पुरुषप्रधानतेतून ओढवलेले हे दुर्लक्ष आहे. कृषी संस्कृतीत आपल्या कष्टाने, घामाने, धीराने बळीराजाची पाठराखण करणारी राणी 'बळीराणी'मधून मांडली गेली आहे.
साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, यवतमाळचे प्रख्यात गझलकार प्रा. विनय मिरासे, साहित्यिका प्रा. डॉ. अनघा सोनखासकर, युवा लेखक उमेश अलोणे, प्रा. गजानन दांदळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अकोट सारख्या तालुक्याच्या ठिकाणी पुस्तक प्रकाशन समारंभाला लाभलेली व आभार प्रदर्शनपर्यंत टिकून असलेली रसिक, श्रोत्यांची गर्दी भारावून टाकणारी होती.
उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोडकर, पत्रकार राजू चिमणकर, दिगंबर खडसे, विनोद तळोकार, निलेश कवडे, अनिल बहाकर यांच्या नीटनेटक्या संयोजन कुशलतेतून हा कार्यक्रम घडून आला.
#Balirani #Aakot #PadmashriKamble #KiranAgrawal
Saraunsh Published in Akola Lokmat on Dec 26, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211226_9_1&fbclid=IwAR3lqkfdBpEK3LldjWC7ZsO3gKLEsnB7ju2WFTwiMSzqtq17uf2D_0CqRkE
https://www.lokmat.com/manthan/akola-airport-there-viability-transaction-shoul-be-done-a310/?fbclid=IwAR3lqkfdBpEK3LldjWC7ZsO3gKLEsnB7ju2WFTwiMSzqtq17uf2D_0CqRkE
Friday, December 24, 2021
EditorsView published in Online Lokmat on Dec 23, 2021
मानवतेविरुद्धच्या गुन्हयाबद्दलची संवेदनशीलता...
किरण अग्रवाल /
नात्यांमधील नजाकत ही त्यातील मान-सन्मान व मर्यादांमुळे टिकून असते. यातील मर्यादांच्या अवलंबातून नाती अधिक गहिरीही होतात. काही नाती ही नाजूक व हळवी असतात, त्यांना संवेदनेची किनार असते. या संवेदनांचा ओलावाच अधिकतर नाती टिकवून ठेवण्यास कामी येतो. खळखळून वाहणाऱ्या झऱ्यातून जो नाद अनुभवयास येतो तसा तो नात्यांमध्ये असला, की त्याची वीण अधिक घट्ट होते. हा नाद विश्वासाचा असावा लागतो, आपुलकीचा व जिव्हाळ्याचा असावा लागतो, तसा तो मर्यादांचे भान ठेवणाराही असावा लागतो. हे भान सुटले की कुटुंबाचा व समाजाचाही धाक उरत नाही. सद्विवेक बुद्धी गहाण पडली की अविवेक बळावतो व त्यातून अनाचारही घडून येतो. नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना त्यातूनच घडून येतात. अशा घटना मानवतेलाही धक्का देणाऱ्या ठरतात, त्यामुळे त्याची गंभीर दखल घेणे भाग पडते; जी एका प्रकरणात उच्च न्यायालयाने घेतल्याचे दिसून आले.
अडचणीच्या काळात नात्यांची कसोटी लागते, पण कधीकधी नात्यांमधील मर्यादा ओलांडण्याचे प्रकार घडून येतात तेव्हा मानवतेलाही धक्का लागून गेल्याशिवाय राहत नाही. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे घडला होता. तेथे व्यवसायाने मजूर असणाऱ्या एका पित्याने आपल्याच अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार करून तिचा दोनदा गर्भपात करण्यात आला होता. तिसऱ्या वेळी मुलीने बाळाला जन्म दिल्यामुळे पित्याचे दुष्कृत्य उघड झाले होते. याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार हा मानवतेविरुद्धचा आणि दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले व संबंधितांचे अपील फेटाळून लावले. मुलीचे संरक्षण करणे बापाची जबाबदारी असते. बाप हा मुलीसाठी ताकद, आधार व विश्वस्त असतो, परंतु या प्रकरणात बापानेच मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले हा अत्यंत अश्लील, जघन्य व खुनापेक्षाही अधिक गंभीर गुन्हा असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. समाज भलेही संवेदनाहीन होत चालला असेल, परंतु न्यायालये किती संवेदनशील आहेत हेच यातून लक्षात घ्यायचे. अर्थात, न्यायाच्या प्रक्रियेत वस्तुस्थिती व पुराव्यांखेरीज संवेदनांना फारसा अर्थ नसतो हे खरे, परंतु म्हणून भावनांचा किंवा मानवतेचा विचार बाजूस पडतो असे अजिबात नाही.
--------------------------------
खरेतर बलात्काराच्या घटनांमध्ये सुमारे 90 टक्क्यांपेक्षा अधिक आरोपी हे नात्यातील किंवा परिचयातीलच आढळून येत असल्याचे पाहता मानवतेबरोबरच नातेसंबंधही पणास लागतात. संस्काराची शिदोरी सुटून गेली की असे प्रकार घडतात. केवळ बलात्कारच नव्हे, तर प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची अगर पत्नीची केली जाणारी हत्या असो, की अनैतिक संबंधातून होणारे कुटुंब कलह; अपवादात्मक असल्या तरी असल्या घटना समाज मनावर दूरगामी परिणाम करणार्या असतात, त्यामुळे या मागील ऱ्हासाच्या कारणांबद्दल समाजातील मान्यवरांनी चिंतन करणे गरजेचे ठरावे. विकृत मनोवृत्ती व विभक्त कुटुंब पद्धतीतून ओढवलेली अनिर्बंधता यासारखी अनेक कारणे यामागे आहेतच, परंतु कायद्यासोबतच समाजाचा व कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा धाक न उरल्याचेही यातून लक्षात यावे. सामाजिक जाणीवा व नात्यांमधील बंध सैलावत आहेत ते त्याचमुळे. माणूस माणसाविरुद्ध उठला असून मानवता लयास जात असल्याचे अशा घटनातून समोर येते. बापाचा मुलीवरील बलात्कार हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे जे मत उच्च न्यायालयाने नोंदविले आहे ते याचसंदर्भाने अतिशय महत्त्वाचे आहे.
https://www.lokmat.com/editorial/sensitivity-crimes-against-humanity-a310/?fbclid=IwAR0Qlxd7VASJ_cQxQ43Wl3blBShXc32CVLpSJOfMHhg6UTBpvgCu69GILlE
Sunday, December 19, 2021
Saraunsh published in Akola Lokmat on Dec 19, 2021
https://www.lokmat.com/manthan/defeat-mahavikas-aghadi-should-be-guide-a310/?fbclid=IwAR2qbZIkRNj8DZjxiA6Q7e8SCj8anl7dhYgSP84upPmGV2bgFRCLDHgf2to
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211219_8_1&fbclid=IwAR0Ikfi8jFrx-a77DxRoniSs0hALdiTSf6PLFXYbrhRwBN9I2vBZWjnhcbo
Thursday, December 16, 2021
EditorsView published in Online Lokmat on Dec 16, 2021
महाआघाडीतील 'बिघाडी' अधोरेखित...
किरण अग्रवाल /
राज्यातील सत्ताधारी त्रिपक्षीय आघाडीकडे आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्यादृष्टीने भाजपाला शह देण्यासाठीचा वेगळा प्रयोग व यशस्वी फार्मूला म्हणून पाहिले जात असताना, या आघाडीतील घटक पक्षातच किती वर्चस्ववादाचे व शह काटशहाचे राजकारण खेळले जात आहे ते विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित होऊन गेले आहे. विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत पूर्ण बहुमत असतानाही विदर्भातील आघाडीच्या दोघा उमेदवारांना मोठ्या फरकाने स्वीकारावा लागलेला पराभव या अंतर्गत बिघाडीची अधिसूचना देणाराच म्हणायला हवा. मर्यादित मतदारांमधून होणाऱ्या निवडणुकीतही स्वकीयांचीच मते फुटल्याचे पाहता राजकारणात पक्षनिष्ठेला थारा उरला नसल्याचेही या निवडणुक निकालातून पुन्हा स्पष्ट होऊन गेले आहे.
विधान परिषदेच्या विदर्भातील दोघा जागांवर आघाडीतील तीनही पक्षांचा एकच उमेदवार असतानाही भाजपाने विजय मिळविल्याने सत्ताधाऱ्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. अर्थात विजयाला दावेदार अनेक असतात, त्यामुळे विजयाचा आनंद व्यक्त होत असतानाच पराभवाची कारणमीमांसा होणेही गरजेचे ठरते. नागपुरात काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलून राजकीय हाराकिरी केली. अगोदर घोषित केलेल्या रविंद्र भोयर यांची उमेदवारी बदलून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन जाहीर केले, परंतु त्याने यशाला गवसणी घालता आली नाही; उलट नाचक्कीच वाट्याला आली. स्वबळाची भाषा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह क्षेत्रातच असे घडले हे विशेष.
------------ - ------------
अकोला, बुलडाणा, वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात तर यापूर्वी विजयाची हॅट्ट्रिक केलेल्या शिवसेनेच्या गोपीकिसन बाजोरिया यांच्यासारखा अनुभवी व मातब्बर उमेदवार आघाडीकडे होता, परंतु तेथेही दगाफटका झाला. नागपूर व अकोला या दोन्ही मतदारसंघातील आघाडीकडे असलेली मते फुटली, ती नेमकी कोणाची हे भलेही नक्की सांगता येऊ नये; परंतु आकड्यांचे गणित पाहता मते फुटलीत हे ढळढळीतपणे स्पष्ट होऊन गेले. महापालिका व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये तिकिटासाठी आपल्याला पक्षाच्याच दारात जायचे आहे हे माहीत असतानाही संबंधितांनी दगाबाजीचे धाडस केले. यावरून एक तर पक्षांतर्गत धुसफूस किंवा आघाडीतील घटक पक्षात परस्परांबद्दल असलेली नाराजी तर उघड व्हावीच, शिवाय राजकारणात उद्याचा विचार न करता तात्कालिक लाभालाच कसे महत्त्व प्राप्त झाले आहे हेदेखील लक्षात यावे.
----------------- -----------
का झाले असावे असे, हा यातील खरा आत्मचिंतनाचा विषय आहे. नागपुरात प्रारंभी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या उमेदवारीला काँग्रेसमध्ये विरोध झाला. नंतर उसने उमेदवार भोयर यांना उमेदवारी दिली तर क्रीडामंत्री सुनील केदार अडून बसले व त्याला पालकमंत्री नितीन राऊत यांनीही दुजोरा दिला त्यामुळे काँग्रेसची अडचण झाली. आपल्यापेक्षा अन्य कुणाला मोठे होऊ न देण्याची भूमिकाच काँग्रेसला मारक ठरली. अकोला जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी विरोधात एकवटलेल्या विरोधकांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यासाठी मागणी पत्र दिले होते, त्यावरील आपल्या सह्या ग्राह्य धरू नये असे भाजपच्या सदस्यांनी म्हटले तेव्हाच 'वंचित'सोबतच्या त्यांच्या अंतस्थ हातमिळवणीचे संकेत मिळून गेले होते, परंतु त्याची फिकीर न बाळगता आघाडी धर्मावर विसंबून काहीशी निर्धास्तता बाळगली गेली.
----------------------
महत्वाचे म्हणजे यापूर्वी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही विजयाचा चमत्कार घडवू शकणारे बाजोरिया यंदा पूर्ण बहुमताची आकडेवारी जमेस असतानाही पराभूत झाले, याचे कारण खुद्द शिवसेनेतर्गत गटबाजीत व महाआघाडीच्या घटक पक्षातील गांभीर्याच्या अभावात दडले आहे. या संदर्भातील संकेत व चर्चा उघडपणे होत असतानाही त्या त्या पक्षातील वरिष्ठांकडून पुरेशी नाकाबंदी केली गेली नाही, किंबहुना काही वरीष्ठांनाही हाच 'निकाल' अपेक्षित होता, अशीही चर्चा आहे. त्यामुळेही दगाबाजांचे फावले. मागे अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे आघाडीतर्फे लढले असताना त्यांना अपक्ष उमेदवाराकडून पराभूत व्हावे लागले होते, तसेच आता शेजारच्या अकोल्यात व शिवसेनेतर्फे लढणाऱ्या आघाडीच्याच उमेदवाराबाबत झाले. आघाडीतील शिवसेनेच्या सहयोगी पक्षांना सेनेचे वर्चस्व नकोय की काय, असा प्रश्न यातून उपस्थित व्हावाच शिवाय खुद्द शिवसेनेतील काहींनाही इतरांची मातब्बरी प्रस्थापित होऊ नये असे वाटतेय की काय, अशीही शंका डोकावून जावी. तसे असेल तर घरभेदयांची ही निडरता यापुढे पक्षाच्या मुळावर उठल्यास आश्चर्य वाटू नये. आघाडीच्या उमेदवारांच्या पराभवाला हलक्यात घेता येऊ नये ते त्याचमुळे.
https://www.lokmat.com/editorial/vidhan-parishad-election-result-congress-ncp-dont-want-shiv-sena-domination-a629/?fbclid=IwAR2tQVftVVyzuXsO2zVXOtrT-y9R-DN10kgMFmN1Spm70EEHXPC8xs9W4WY
'लोकमत' सुवर्ण महोत्सव ...
15 डिसेंबर 1971...
'लोकमत'ची मातृशाखा असलेल्या नागपूर आवृत्तीला प्रारंभ झाला, त्याला आज तब्बल ५० वर्षे पूर्ण झालीत! पत्रकारिता परमो धर्म निभावत सत्य वाचकांसमोर मांडण्याचा संकल्प आजही तसाच आहे.
वाचकांच्या पाठबळावरील या गौरवशाली वाटचालीच्या सुवर्ण महोत्सव दिनी आज नागपुरात लोकमतचे संस्थापक श्रद्धेय बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन करीत पारिवारिक स्नेह मेळावा झाला. लोकमत समूहाचे चेअरमन मा. श्री विजयबाबूजी दर्डा यांनी वाचक हाच लोकमतचा मालक असल्याचा पुनरुच्चार करीत सर्व सहकाऱ्यांच्या पाठीवर प्रेरणादायी आशीर्वादाची थाप दिली. कार्यकारी संचालक, तरुण नेतृत्व श्री देवेंद्र बाबूजी दर्डा यांचीही उपस्थिती व त्यांच्याकडून आस्थेवाईकपणे केली गेलेली सर्वांची विचारपूस ऊर्जा देणारी होती.
लोकमतच्या 50 वर्षाच्या या वाटचालीत गेली सुमारे 30 वर्षे मला खारीची भूमिका निभावता आली याचा मला अभिमान आहे.
नागपुरातील सुवर्ण महोत्सवी मेळाव्यानिमित्तची ही काही आनंदचित्रे ... समवेत अकोला लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार जी सिन्हा, अमरावतीचे संपादकीय प्रमुख गजानन चोपडे आदी सहकारी
#LokmatNagpur #GoldenJubileeLokmat #KiranAgrawalLokmat
Monday, December 13, 2021
Saraunsh published in Akola Lokmat on Dec 12, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211212_8_2
https://www.lokmat.com/manthan/why-vaccination-compulsory-a310/
EditorsView published in Online Lokmat on Dec 09, 2021
नरेचि केला हीन किती नर ...?
किरण अग्रवाल /
जमाना बदलला आहे असे आपण म्हणतो, ते खरेही आहे. काळ बदलला तसा कालौघात व्यवहार, वर्तन व जीवनमानाच्या पद्धतीतही बदल झाला; पण हा बदल होताना प्रागतिकतेच्या संदर्भाने मानसिकतेत कितपत बदल घडून आला याचा विचार केला तर तितकेसे समाधानकारक उत्तर हाती येत नाही. शिक्षणाने मनुष्य शिक्षित झाला, परंतु सुशिक्षित झाला का असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतो. विशेषतः जुन्या धारणा अगर विचारधारा असोत, की अंधश्रद्धांची जळमटे; अजूनही मोठ्या प्रमाणातील वर्गातून ती निघालेली दिसत नाहीत. वंशाला दिवा मुलगाच हवा म्हणून पुढे आलेला 'नकोशी'चा मुद्दा असो, अगर
जाती धर्माच्या पलीकडे जाऊन केल्या जाऊ पाहणाऱ्या सहजीवनाला काही ठिकाणी होणारा विरोध व त्यातून घडून येणारे ऑनर किलिंग; अशा काही घटना पाहता वैचारिक मागासलेपण पुरेसे दूर झालेले दिसत नाही. पुढारलेपणाचा डांगोरा पिटणाऱ्या सर्वांनीच या संदर्भात चिंता व चिंतन करणे गरजेचे आहे.
बदलत्या काळानुरूप आंतरधर्मीय विवाह सोहळे आता होऊ लागले आहेत. लपत छपत नव्हे, तर उजळ माथ्याने, धुमधडाक्यात उभय पक्षांच्या साक्षीने असे सोहळे होत आहेत ही समाधानाचीच बाब आहे, पण दुसरीकडे ग्रामीण भागात उच निचता पाळली जाऊन आंतरजातीय विवाहांना अजूनही विरोध होताना दिसून येतो तेव्हा मानसिक मागासलेपण टिकून असल्याचे अधोरेखित होऊन जाते. बरे, हा विरोध फक्त नाराजीपर्यंत न राहता तो थेट खून खराब्यापर्यंत पोहोचताना दिसतो. सैराट या मराठी चित्रपटाद्वारे तेच वास्तव दर्शकांपुढे मांडले गेले. औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात गोयगाव येथे अलीकडेच घडलेल्या अशातल्या एका घटनेतूनही तेच पुढे आले. या घटनेतील भीषणता अशी की, प्रेम विवाह केलेल्या गर्भवती बहिणीचे शीर तिच्या आईच्या मदतीने भावानेच धडावेगळे केले व ते शीर घराच्या ओट्यावर ठेवून पोलिस ठाणे गाठले. मनाची निबरता, निर्दयता किंवा निर्ममता किती टोकाची असू शकते हे तर यातून लक्षात यावेच, पण आपल्या संतापापुढे कायद्याची भीतीही बाळगली जात नसल्याचे स्पष्ट व्हावे.
---------------------------
कोणत्याही मुला-मुलींसाठी आई हीच त्यांची सर्वात जवळची मैत्रीण म्हटली जाते. मन कुणाजवळ मोकळे करावे तर त्यासाठी आई वा बहिणीखेरीज दुसरी तितक्या हक्काची जागा नसते, पण असे असताना एखादी माताच आपल्या मुलीच्या जीवावर उठते तेव्हा भावनांनाच धक्के बसून गेल्याशिवाय राहत नाही. मुलाच्या हव्यासापोटी मुलीचा गर्भातच जीव घेणाऱ्या किंवा अनिच्छेने जन्माला आलेल्या मुलीला 'नकोशी'ची वागणूक देणाऱ्या मातांबद्दलही आश्चर्य वाटून जाते ते त्याचमुळे. विशेष म्हणजे अशा मानसिकतेतूनच काही छळाच्या घटना घडून जातात, ज्या चीड आणणार्या ठरतात. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका मातेने आपल्या अल्पवयीन मुलीचा तीन वेळा विवाह लावून पुन्हा चौथ्यांदा तिच्या लग्नाची तयारी केल्याचा जो प्रकार पुढे आला तो असाच आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून तिची आई व दोन भावांसह बारा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे, त्यामुळे या प्रकरणाचा जो सोक्षमोक्ष लागायचा तो यथावकाश लागेलच, परंतु कौटुंबिक व सामाजिक मर्यादांमुळे तक्रार न करता छळ सहन करणाऱ्या मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये.
-------------------------
अशा घटनांकडे अपवाद म्हणूनच पाहता यावे, पण वैचारिक बुरसटलेपणाचा अंश टिकून असल्याचे त्यातून लक्षात घेता, दुर्लक्षही करता येऊ नये. भौतिक सुख सोयी व प्रगतीच्या मागे लागताना ग्राम पातळी व तळागाळापर्यंतच्या व्यक्तींचे पूर्णतः मानसिक उन्नयन अजून साधले गेलेले नसल्याची जी बाब यातून पुढे येते, त्यासाठी कुणाला काय करता येईल याचा विचार यानिमित्ताने होणे गरजेचे आहे. आज आधुनिक साधनांमुळे माणूस जवळ आला आहे, पण तरी माणूस माणसाला पारखा होतो आहे. संवेदना शाबूत असलेल्या माणसांकडून माणुसकीचा प्रत्यय येतोच, परंतु हीन, दिनत्व कायम असलेल्या व्यक्तींच्या मनाची मशागत करण्यासाठी सामाजिक पुढाकार घेतला जायला हवा. एकीकडे चंद्रावर वस्ती करण्याची व मंगळावर पाणी किंवा जीव शोधण्याची धडपड, आणि दुसरीकडे अविवेकी मागासलेपणा; या दोन पातळ्यामधील अंतर शक्य तितके कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत आणि असे प्रयत्न केवळ शासकीय पातळीवरून होऊन चालणार नाही तर सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही त्याला बळ लाभणे गरजेचे आहे इतकेच यानिमित्ताने.
https://www.lokmat.com/editorial/man-degrades-his-honour-a310/?fbclid=IwAR2LVtf6S-CBsD3J7TUb5HszDLuoIGhKIg_PdLE_H4ljwZLUVhJ3-brxPss
Sunday, December 5, 2021
दीपिकाचे हात पिवळे ...
Nov 28, 2021
दीपिकाचे हात पिवळे
पुतणी चि. सौ. का. दीपिकाचे हात पिवळे केले, त्या मंगल क्षणाप्रसंगीची आनंदचित्रे ...
#DeepikaWedding #ShrutiKruti #KNSK
Saraunsh published in Akola Lokmat on Dec 05, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211205_8_1
https://www.lokmat.com/manthan/will-there-be-monuments-defeated-schools-a310/
Wednesday, December 1, 2021
Saraunsh published in Akola Lokmat on Nov 28, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211128_8_1
https://www.lokmat.com/manthan/who-cares-about-akolekars-health-a310/
EditorsView published in Online Lokmat on Nov 25, 2021
हताश मने सावरायला हवीत...
किरण अग्रवाल /
कोरोनाने जे बळी घ्यायचेत ते घेतले, ते आपण एका मर्यादित प्रयत्नांखेरीज रोखू शकलो नाहीत कारण ते आपल्या सर्वांच्याच हाताबाहेरचे होते; मात्र परिस्थितीने जाणारे जीव तर नक्कीच रोखता येतील. नैसर्गिक व आर्थिक संकटाने बेजार होऊन काही मने मोडून पडत आहेत, त्यातून आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झालेले दिसत आहे. कुणीच 'वाली' नसल्याच्या भावनेतून येणारी हताश अवस्था, निराशा हीच व्यक्तीला अंताकडे घेऊन जाते. ही कोलमडून पडू पाहणारी मनेच सावरणे आता गरजेचे बनले आहे.
वाढत्या लसीकरणाच्या परिणामी कोरोनाचे संकट ओसरू पाहात असताना आर्थिक ओढाताणमुळे होणाऱ्या आत्महत्यांच्या घटना पुन्हा समोर येऊ लागल्या आहेत. मागे विशेषतः विदर्भ व वऱ्हाडात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला होता, आता पुन्हा तेच सत्र सुरू झाले आहे. वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यात गेल्या जानेवारी ते चालू नोव्हेंबरपर्यंतच्या 11 महिन्यात 121, तर बुलडाण्यात 233 शेतकरी आत्महत्यांची नोंद सरकार दरबारी आहे. राज्याच्या अन्यही भागात काही ना काही कारणांमुळे आत्महत्या होत असल्याच्या वार्ता प्रतिदिनी वाचावयास मिळत आहेत. गेल्या वर्षी, म्हणजे 2020 मध्ये संपूर्ण राज्यात दोन हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. यातून आत्महत्यांचे सत्र थांबले नसल्याचे लक्षात यावे.
-----------------
कुठल्याही संकटातून अगर अडचणीतून बाहेर पडण्याचे सारे मार्ग बंद झाल्याची भावना बळावते, तेव्हा व्यक्ती स्वतःच्या अंताकडे वळते. निसर्गाने नागवलेला व नापिकीने कंटाळलेला शेतकरी असो, की व्यक्तिगत अडचणीतून असहायता अनुभवणारा कुणीही; त्याला अशा अवस्थेत धीर देणारा हवा असतो. हल्ली ही व्यवस्थाच कोलमडलेली दिसून येते. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीत जबाबदारीचे ओझे कुणा एकाच्याच खांद्यावर येत नसे, अडी अडचणीत परस्परांचा हात धरीत वाटचाल होऊन जात असे. नाहीच काही तर मन मोकळे करायला कुणाचा खांदा वा कुणा माऊलीची कुस लाभे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नातीही दुरावली आहेत व मित्रही. प्रत्येकच जण 'मी' व 'माझ्या'त मर्यादित होऊन गेला आहे. वाढत्या सोशल मीडियामुळे माणूस टेक्निकली भलेही सोशल झाला असेल, पण प्रत्यक्ष गाठीभेटी व एकमेकाला समजून घेणे आटत आहे. मग दुःख हलके करणार कोणाकडे? धीर सुटतो, मन खचते, मार्ग दिसत नाही व आत्मघात ओढवतो तो त्यातूनच.
-----------------
वाढत्या आत्महत्यांप्रकरणी सरकारला जबाबदार धरून राजकारण करणे सोपे आहे, पण समाजशास्त्र व मानसशास्त्राच्या अंगाने विचार करता सारे काही संपल्याची मानसिकता बनलेल्या व्यक्तीला धीर किंवा उभारी देणारी कुटुंबातील व समाजातील जी साखळी तुटली आहे तिचे काय? शासनाकडून विविध पातळ्यांवर समुपदेशनाची व्यवस्था केली गेली आहे, पण ते पुरेशा प्रमाणात होत नाही हे खरेच; मात्र नातेसंबंधातील, मित्रपरिवारातील हक्काच्या समुपदेशनाचे काय? ती व्यवस्थाच संपल्यात जमा होऊ पाहते आहे. जागतिक कुटुंब दिन व मैत्री दिनाला सोशल मीडियातून शुभेच्छा संदेशांचा पूर वाहतो, परंतु मनातल्या मनात वेदनांनी विव्हळणाऱ्या आपल्या आप्तेष्ट किंवा मित्राच्या खांद्यावर हात ठेवून, 'घाबरू नकोस, तू लढ; मी आहे सोबत' असे म्हणणारे किती आहेत? थोडक्यात, एकटे पडल्याची भावना झालेली हताश व निराश मने सावरायला हवीत. त्यासाठी आपल्या अवती भोवतीच अशांचा शोध घ्यायला हवा. कुटुंब, समाज, कार्यालयात, जिथे कुठे कामावर असाल त्या त्या ठिकाणी तो घेता येणारा आहे. किंबहुना परिस्थितीवश पिचलेले तत्काळ लक्षातही येतात. तात्पर्य, संकटांवर मात करून पुढे जाण्याचे मार्ग शोधता येणारे असतात, आत्महत्या हा त्यावरील मार्ग होऊच शकत नाही, ती पळवाट ठरते. अशा स्थितीत गरज असते ती केवळ धीर देण्याची. तेवढे नक्की करूया...
https://www.lokmat.com/editorial/desperate-minds-need-recover-a310/?fbclid=IwAR2TbemHjrOT_IiXXur79ICW9KfC3z1YmsLB1Lj8QM19Pn0y9gzPG8dQrP0
नवनिर्मितीचा आरंभ व आनंद ...
Nov 24, 2021
नवनिर्मितीचा आरंभ व आनंद ...
लोकमत अकोला आवृत्तीच्या उत्सव / आरंभ दिवाळी अंकाचे वितरण मोठ्या उत्साहात सुरू आहे. लोकमतचा 'दीपोत्सव' हा मराठी मनांची जागतिक पातळीवरील स्पंदने टिपणारा व तसे विषय कवेत घेणारा कार्पोरेट अंक, तर स्थानिक विषय व्यक्ती व संस्थांना सामावून घेणारा उत्सव / आरंभ हा अंक.
अर्थात, कोरोनाच्या मोठ्या संकटातून आपण सर्व जात असल्याने कसल्या नवीन कामाचा आरंभ सोपा नव्हताच.
पण घेतली उडी, त्यामागे होते व्यवस्थापनाचे व संपादकीय संचालक करणबाबूजी दर्डा या तरुण नेतृत्वाचे भक्कम पाठबळ आणि प्रेरणादायी ऊर्जा, समूह संपादक श्री विजय बाविस्कर सर, प्रॉडक्ट् हेड श्री पुष्कर कुलकर्णीजी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन आणि जोडीला टीमवरील विश्वास.
आरंभातच तो विश्वास सर्व सहकारींनी सार्थ ठरवला याचा अभिमान आहे.
****
कोणत्याही प्रमुखासाठी महत्वाचे असते ते त्याच्या टीमचे सहकार्य व दिलेल्या उद्दिष्टांच्या पुर्तीसाठीची प्रामाणिक धडपड.
अकोल्याचे हॅलो हेड, उप वृत्तसंपादक राजेश शेगोकार, वाशिमचे नंदकिशोर नारे, बुलडाण्याचे निलेश जोशी व खामगावचे सदानंद शिरसाट यांच्या नेतृत्वात टीमने परिश्रमाने गणित जुळवून आणले.
राजरत्न शिरसाठ, संतोष येलकर, सचिन राऊत, प्रवीण खेते, संतोष वानखडे, दादाराव गायकवाड, सुनील काकडे, अनिल गवई, ब्रह्मानंद जाधव, सागर कुटे, अतुल जैस्वाल, भगवान वानखडे आदींनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.
साहित्यिक जाण असलेल्या राजू चिमणकर यांनी मजकुराच्या संपादनाची, तर संजय वाळके यांनी मुद्रितशोधनाची जबाबदारी यथार्थपणे पेलेली.
****
विशेष म्हणजे, या अंकासाठी ग्रामीण भागात जिथे जिथे दौर्यावर गेलो त्या त्या ठिकाणच्या वार्ताहरांनी भेटता क्षणी मजकूर व जाहिरातींचे देकार दिलेत.
अकोटचे विजय शिंदे यांनी तर अकोटचा खराब रस्ता पाहता तब्येतीला त्रास नको म्हणून स्वतःहून फोन करून 'दौऱ्यावर येण्याची गरज नाही, आपला शब्द खाली पडू देणार नाही' असे सुरुवातीलाच आश्वासित केले आणि खरेच अपेक्षेपेक्षा अधिकची मेहनत घेतली.
कारंजाचे प्रफुल बाणगावकार, देऊळगाव राजाचे गजानन तिडके, चिखलीचे सुधीर चेके पाटील, मंगरूळ पीरचे नंदलाल पवार, रिसोडचे निनाद देशमुख, मलकापूरचे हनुमान जगताप, सिंदखेडचे मुकुंद पाठक, खामगावचे गजानन राऊत आदीसह प्रशांत विखे, दत्ता उमाळे, शितल धांडे, माणिक डेरे, नानासाहेब कांदळकर, जयदेव वानखडे, बाजीराव वाघ, किशोर खैरे, निलेश वाघमारे, विवेकानंद ठाकरे, अनिल देशमुख, रहेमान नोरंगाबादी, राजू लांडे आदी अनेकांच्या परिश्रमाने अंक पूर्णत्वास गेला.
लोकमत समाचारचे वृत्तसंपादक अरुण कुमार सिन्हा जी, गजानन अवस्थी, खामगावचे फारुखभाईही मदतीसाठी सरसावले.
****
जाहिरात विभागाचे प्रमुख राजेश पांडे, एक्झिक्युटिव्ह संदीप दिवेकर, गंगाधर राऊत, सुरेश डहाके, कोतेगावकर, धनंजय पाटील, मिरगे, प्रताप शिरसाट यांनीही सातत्यपूर्वक पाठपुरावा करून अंकाच्या निर्मितीसाठी परिश्रम घेतले.
सचिन बाणाईत, आकाश ताकवाले, गवारे, दीक्षित आदींनी अंकाची मांडणी छान करून दिली.
अर्थातच, या साऱ्या खटाटोपाच्या मागे युनिट हेड श्री आलोक कुमार शर्मा यांच्या मधाळ व आश्वासक कार्यशैलीचे बळ महत्वाचे ठरले, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.
महत्त्वाचे म्हणजे, कोरोनातून बाहेर पडून उद्योग व्यवसायाचा नव्याने आरंभ करताना सर्व जाहिरातदार, हितचिंतकांनीही सहकार्याचा हात पुढे केला, त्यामूळेच हा रथ ओढला गेला.
****
अंक आला, आरंभ छान झाला म्हणून कौतुकही होत आहे, पण त्यामागे या साऱ्यांचे व अन्यही अनेकांचे परीश्रम, सहकार्य आहे, हे कसे विसरता यावे म्हणून ही कृतज्ञता.
Proud n Love you Team... Jai Lokmat
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #AarambhDiwali2021
Subscribe to:
Posts (Atom)