At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, January 31, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Jan 30, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220130_2_6&fbclid=IwAR2_gVUtvnyKEG8e9T-Mx9cnaBVWhik5Z2KLLfqgv-4VRFFpdEqBII7QBc8
https://www.lokmat.com/manthan/development-deprived-in-the-midst-of-appeals-petitions-a310/?fbclid=IwAR3u7TfawtTYq2PU75YXUMksIsfRvdGlVNVl_dfovT9iT6vVZAWpkI4Gn-w
Friday, January 28, 2022
EditorsView published in Online Lokmat on Jan 27, 2022
कोरोनाने वाढविली गरिबी ...
किरण अग्रवाल /
एकीकडे कोरोनाची लाट तिसरी की चौथी याबाबत मतभिन्नता व्यक्त होत असताना व या महामारीमुळे झालेल्या जीवित तसेच आरोग्याच्या हानीची चर्चा झडत असताना दुसरीकडे यातून ओढवलेल्या आर्थिक अरिष्ठाचा विचार केला तर भयावह स्थिती समोर येऊन गेल्याखेरीज राहत नाही. ऑक्सफॅम सारख्या मान्यवर संस्थेसह विविध संस्थांच्या सर्वेक्षणाचे जे अहवाल अलीकडेच सादर झाले आहेत त्यातूनही हीच बाब अधोरेखित होणारी आहे, त्यामुळे आरोग्य सेवेकडे लक्ष देतानाच घसरलेली अर्थकारणाची गाडी रुळावर आणून सामान्य तसेच बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी काय करता येईल याबाबत यापुढील काळात नियोजन होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
गेला गेला म्हटला गेलेला कोरोना फिरून आलेला आहे. काही ठिकाणी तो तिसरी लाट म्हणवतो आहे, तर काही ठिकाणी चौथ्या व पाचव्या लाटेची चर्चा होते आहे. ही लाट कितवीही असो, परंतु या कोरोनाने आरोग्याच्या समस्या उभ्या करतानाच मानसिकदृष्ट्या एक हबकलेपणही आणून ठेवले आहे ज्याचा परिणाम मनुष्याच्या संपूर्ण चलनवलनावर झालेला दिसत आहे. आताचा कोरोना किंवा ओमायक्रोन पूर्वीइतका जीवघेणा नाही. यामुळे रुग्णालयात दाखल व्हाव्या लागलेल्या गंभीर रुग्णांची संख्या खूपच मर्यादित आहे तसेच यामुळे बळी जाणाऱ्यांचे प्रमाणही खूप कमी आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही हे खरेच; पण यामुळे अर्थकारणावर जे परिणाम होताना दिसत आहेत ते काहीसे घाबरण्यासारखेच म्हणता यावेत. समाज मनातील यासंबंधीच्या अनामिक भीतीतून ग्राहकांची खरेदी रोडावली व खर्चाला आळा बसत चालला आहे त्यातून अर्थकारण डळमळीत होताना तर दिसत आहेच, शिवाय बेरोजगारीसारख्या समस्येलाही निमंत्रण मिळून गेले आहे.
-----------------
नुकत्याच पार पडलेल्या दावोस अजेंडा शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी ऑक्सफॅमने एक आर्थिक विषमतेबाबतचा अहवाल सादर केला, यात कोरोनाच्या काळात जगामध्ये पहिल्या दोन वर्षात सुमारे 99 टक्के सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात घट झाल्याचे व 16 कोटींपेक्षा अधिक लोक गरिबीच्या श्रेणीत ढकलले गेल्याचे म्हटले आहे. 2020 मध्ये महिलांचे सामूहिक स्वरूपात 800 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचेही हा अहवाल सांगतो. या अहवालाच्या बरोबरीनेच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमीचाही अहवाल जाहीर झाला असून डिसेंबर 2021 पर्यंत भारतातील बेरोजगारांची संख्या 5.3 कोटींवर गेल्याचे त्यात म्हटले आहे. यातही महिलांची संख्या 1.7 कोटी आहे. इतरही काही अहवालांची आकडेवारी पाहता त्यातही यापेक्षा फार वेगळे चित्र नाही. एकीकडे श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले असताना, गरीब मात्र अधिकच गरिबीच्या खाईत लोटले जात असल्याचे वास्तव यातून लक्षात यावे. येथे श्रीमंतांच्या वाढणाऱ्या श्रीमंतीबद्दल असूया अजिबात नाही, परंतु गरिबांना आधाराचा बोट धरायला देऊन किमान गरिब रेषेच्या वर कसे आणता येईल याचा विचार केला जाणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.
-----------------
महत्त्वाचे म्हणजे, बेरोजगारी व वाढत्या गरिबीतून अन्य समस्या पुढे येत आहेत. हाताला काम नसलेली मुले वा युवा पिढी भलत्या मार्गाला लागते हा धोका तर आहेच, शिवाय गरिबीतून होणारे शोषण वाढत आहे जे अधिक गंभीर आहे. यासंदर्भात साताऱ्यातील अलीकडचेच उदाहरण पुरेसे बोलके ठरावे. तेथील अभिषेक कुचेकर या युवकाने खाजगी कर्जदाराकडून 30 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते, त्याचे अवघ्या वर्षभरात चौपट व्याज भरूनही कर्जदाराची भूक भागली नाही म्हणून त्याने अवघ्या दीड महिन्यांच्या मुलीला तिच्या आईच्या कुशीतून ओढून नेल्याची घटना घडली आहे. उद्दामपणा, उद्दन्डगिरी व कायद्याची भीडभाड न बाळगणाऱ्या बेशरमपणाचा कळस म्हणता यावी अशी ही घटना आहे. कर्जाच्या परताव्यासाठी होणारे असे शोषणाचे प्रकार चीड व अंगावर शहारे आणणारे आहेत. गरिबीने व त्यातून ओढवलेल्या मजबुरीने दाखविलेले हे दिवस म्हणायचे. तात्पर्य एवढेच की, कोरोनाच्या महामारीला केवळ आरोग्यविषयक संकट म्हणूनच बघता येऊ नये; तर त्यातून ओढवलेले आर्थिक संकट हे कितीतरी अधिक मोठे व आर्थिक विषमतेसारख्या बाबींना जन्म देणारे आहे. तेव्हा, कोरोनाबद्दल केवळ हळहळ व्यक्त करून वा हबकून चालणार नाही तर यातून अडचणीत आलेले अर्थकारण पुन्हा सुदृढ कसे करता येईल याकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे आहे. अर्थातच ते व्यक्तीच्या नव्हे, तर व्यवस्थेच्या हाती असल्याने आगामी अर्थसंकल्पात त्यादृष्टीने कोणती पावले उचलली जातात हेच बघायचे.
https://www.lokmat.com/manthan/corona-increased-poverty-a310/?fbclid=IwAR328L7ys4oTn7VT77aE_2yNynFBS5fEL6bMAqrBe9li_OJdf3dsiIFib1Y
Thursday, January 27, 2022
अकोल्यातील कुटुंब कबिला...
Jan 26, 2022
अकोल्यातील कुटुंब कबिला...
वृत्तपत्रांचे काम 24×7 सुरूच असते. उसंत म्हणून कधी नसतेच. त्यामुळे रोजच्या कामाच्या धबडग्यात होणाऱ्या भेटी व चर्चा वगळता अवांतर गोष्टी करायला वेळच कुठे असतो?
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यालयास सुट्टी असल्याने उद्याचा अंक नसणार, त्यामुळे काहीशी निवांतता आहे.
अर्थात, आमच्या भाषेत हा अल्पविराम. कारण पत्रकाराला कधी विराम नसतोच.
त्यामुळे हीच संधी घेत ध्वजारोहणानंतर सर्व सहकारी एकत्र आलो. भाऊसाहेब तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील स्मृती केंद्रालाही भेट देऊन त्यांना वंदन केले, केंद्रातील माहिती घेतली. परिसर पाहता आला. यानिमित्ताने सहकाऱ्यांशी नेहमीच्या कामाव्यतिरिक्त बोलणे व फिरणे झाले, एकमेकांना अधिक जवळून जाणून घेता आले.
गंमत म्हणजे किती तरी वर्षानंतर झोका घेता आला.. अनेकांनी तो घेऊन बघितला. मजा आली.
हाच आमचा कुटुंबकबिला.
#LokmatAkola #kiranAgrawal
क्षण हा भाग्याचा, अभिमानाचा...
Jan 26, 2022
क्षण हा भाग्याचा, अभिमानाचा...
देशभरात 'आझादी का अमृत महोत्सव' सुरू असताना या वर्षातील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान मिळणे म्हणजे भाग्याचेच. ते भाग्य आज माझ्या वाट्यास आले याचा अतिव आनंद व अभिमानही आहे.
नाशकातून अकोल्यात आल्यावर यंदा प्रथमच येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची व ध्वजवंदनाची संधी लाभली...
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा ...
लहानपणी शाळेत असतांना हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभात फेरीमधून घोषणा देत फिरण्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
लोकमत अकोल्याच्या प्रशस्त हिरवळीवरील ध्वजारोहण तसेच लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय बाबूजी, जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन प्रसंगी युनिट हेड श्री अलोक कुमार जी शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार जी सिन्हा, जाहिरात विभागाचे राजेश पांडे, प्रशासनाचे रविंद्र येवतकर, संगणक विभागाचे शैलेश ऐंडे, उप वृत्तसंपादक राजेश शेगोकार आदि विभाग प्रमुखांसह सर्व सहकारी समवेतची ही आनंद चित्रे...
( छाया सौजन्य: प्रवीण ठाकरे )
#LokmatAkola #RepublicDay2022 #KiranAgrawal
Sunday, January 23, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Jan 23, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220123_2_3&fbclid=IwAR0smSKbNg-ROdeAnsZA4292AVnQDduT5rC3cNhwAEGFJGYfM7w0mgADygk
https://www.lokmat.com/editorial/special-article-on-different-issues-super-specialty-hospital-new-superintendent-of-police-office-and-cultural-hall-akola-a720/
Thursday, January 20, 2022
EditorsView published in Online Lokmat on Jan 20, 2022
पत्नी पीडितांच्या व्यथा जाणाव्या कुणी?
किरण अग्रवाल /
सासरचा सासुरवास किंवा छळ ही बाब समाजमनात इतकी वा अशी काही प्रस्थापित होऊन बसली आहे की त्याखेरीजच्या तेथील प्रेमाचा अगर स्नेहाचा विचारच फारसा होताना दिसत नाही. यातही सासरचा किंवा पतीकडून होणारा छळ म्हटले की सुनेची म्हणजे विवाहितेची कारुण्यमयी छबी नजरेसमोर तरळून जाते, परंतु त्याउलट म्हणजे पत्नीकडून होणाऱ्या पतीच्या छळाची प्रकरणे मात्र पुढे येताना दिसत नाहीत. याचा अर्थ तसे होतच नसावे असे समजता येऊ नये. एकेरी बाजूचे नाणे असू शकत नाही, तशातला हा प्रकार; म्हणूनच पारंपरिक किंवा रूढ समजाच्या पलीकडील दुसऱ्या बाजूचाही विचार गांभीर्याने होणे गरजेचे बनले आहे कारण आता तशा घटनाही वाढू लागलेल्या दिसत आहेत.
सासरच्या छळाला कंटाळून सुनेची आत्महत्या अगर पोलिसांकडे तक्रार या बातम्या आता नित्याच्याच होऊन गेलेल्या आहेत. या तक्रारींमध्ये तथ्यही असते, नाही असे नाही; परंतु त्या तक्रारींच्या कारणांचा यथार्थपणे शोध घेतला जाताना दिसत नाही त्यामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेली आहे. जरा जराशा कारणातून कुटुंबकलह वाढत जातात व घटस्फोटाची वेळ येऊन पोलीस स्टेशनची पायरी चढली जाते. यातून संबंधित कुटुंबाला व एकूणच नातेवाईकांना कोणत्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते याची कल्पनाच करता येऊ नये. अशा प्रकरणांमध्ये किड्या बरोबर गहू रगडले जाणे स्वाभाविक ठरते व तोच खरा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. सदर प्रकरणांमध्ये कायद्याचा होणारा गैरवापर वाढू पाहत असून, भलेही अपवादात्मक असेल परंतु पतीच्या होणाऱ्या छळाकडे दुर्लक्षच घडून येताना दिसते. अशा प्रकरणांमध्ये पुरुष एकाकी पडताना दिसून येतात व अंतिमतः मनाने कमजोर असलेले आत्महत्येकडे वळतात, म्हणून या विषयाकडे समाजशास्त्रींनी गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे बनले आहे.
------------
पत्नीच्या जाचामुळे पतीने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे नुकतीच घडून आली. ही अशी एकच घटना नव्हे. ती पोलिस दप्तरी पोहोचली म्हणून चव्हाट्यावर आली, परंतु लोकलज्जेस्तव काही सांगू न शकणारे पत्नीपीडित समाजात कमी नाहीत.अश्या पुरुषांसाठी औरंगाबाद नजिक खास पत्नीपीडित पुरुष आश्रमही काढण्यात आला आहे. त्यांच्या हित रक्षणासाठी व कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी पुरुष हक्क संरक्षण समिती सारखी अशासकीय संस्थाही अस्तित्वात आलेली आहे व स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे, पण मुळात प्रश्न असा की हे घडून कशामुळे येते? पत्नी असो की पती, परस्परांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचे टोक गाठेपर्यंत वेळ का येते? तरूण वर्गातील सामंजस्याचा व सहनशीलतेचा अभाव तर यामागे असतोच, पण संस्कार व कुटुंबातील ज्येष्ठांचा दबाव ओसरतोय; त्यातून हे घडून येतेय का हे तपासण्याची गरज आहे.
------------
खरे तर कायदा कोणताच वाईट नसतो, तो उदात्त हेतूनेच बनवला गेलेला असतो परंतु त्याचा गैरवापर करणारे करतात. छळाच्या प्रकरणांमध्ये तेच अधिकतर होतांना दिसते. विशेष म्हणजे पुरुषांसाठी वेगळे कायदे नाहीत. स्त्रियांसाठी म्हणजे त्यातही पत्नी व सुनेसाठी कायदे आहेत, परंतु स्त्रियांमधील सासू ,जाऊ, नणंद किंवा पुरुषांमधील पती, सासरे, दीर या व्यक्तिरेखांसाठी म्हणून कायद्यात वेगळ्या तरतुदी नाहीत. त्यामुळेच पुरुष आयोग हवा अशी मागणी लावून धरली जात आहे. यासाठी महाराष्ट्रातील पुण्याचे या चळवळीतील ऍड. संतोष शिंदे, नाशिकचे ऍड धर्मेंद्र चव्हाण, सांगलीचे ॲड बाळासाहेब पाटील आदीं प्रयत्नशील असून देशभरातील या मतवादी संस्थांच्या माध्यमातून यासाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलने करण्यापासून सत्तेतील निर्णयकर्त्यांपर्यंत म्हणणे मांडले जात आहे.
-------------
महत्वाचे म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असताना नवविवाहितांमधील मतभेद समजावणीतुन दूर केले जात, आता तसे अपवादाने होते. विभक्त कुटुंब पद्धती वाढल्याने घरात समजवणारे फारसे कोणी उरले नाही, शिवाय प्रत्येकाला आपले स्वतःचे स्वातंत्र्य म्हणजे गोंडस भाषेत 'स्पेस' हवी असते. पती-पत्नी दोघेही कमावते असल्याने तर या 'स्पेस'ला अधिकच महत्त्व आले आहे, परंतु त्यातूनच उभयतांमधील स्पेस वाढण्याची वाटचाल घडून येते. साऱ्यांच्याच अपेक्षा वाढल्या असुन अंथरूण पाहून पाय पसरण्याचे दिवसही सरले आहेत, त्यामुळे खटके उडू लागतात. आजकाल घरातील सासूपेक्षा सुनेच्या आईची दैनंदीन विचारपूसही वाढली आहे, त्यामुळेही ठिणग्या पडायला मदत घडून येते. प्रख्यात प्रवचनकार अपर्णाताई रामतीर्थंकर या आपल्या प्रवचनातून हाच मुद्दा प्रकर्षाने मांडत. काही स्त्रीवादी संघटना या मुद्यावर नाके मुरडत, पण ती वास्तविकता आहे हे नाकारता येणारे नाही. उभयतांचे स्वातंत्र्य जपले जायलाच हवे, त्याबद्दल दुमत असू नये; परंतु तुटेपर्यंत ताणले जाण्याच्या अगोदर समजूतदारीने मार्ग काढायला हवेत. केवळ कुटुंब व्यवस्थाच नव्हे, तर विवाह संस्थेलाही हादरे देणारे व कायद्याचा दुरुपयोग करणारे प्रकार रोखणे हे फक्त कायद्यानेच शक्य होणार नाही; तर त्यासाठी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या धुरीणांनी पुढे येणेही गरजेचे आहे इतकेच यानिमित्ताने.
https://www.lokmat.com/manthan/who-should-know-the-plight-of-wife-victims-a310/?fbclid=IwAR39j-cAv07QiJgF860rL4Cx6OGin_mo8LG02Hm5dKe7DhQBlu5MRUd6HvM
Monday, January 17, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Jan 16, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220116_2_2&fbclid=IwAR3y1Po-zh7s6bgfKoPXHDGjX18LzUGLdRWJWZBW5zwij1ZV2xwI2MrXRgw
https://www.lokmat.com/manthan/missing-files-a310/?fbclid=IwAR3Jw2Ni8frPtpm6b-jsgbj8Y0ga3omlLICfxfe2ds8rEtCoRAOZ6xeCT3w
Thursday, January 13, 2022
EditorsView published in Online Lokmat on Jan 13, 2022
रागावर नियंत्रण हवेच!
किरण अग्रवाल /
आयुष्याची गाडी हाकताना अडथळ्यांवर मात करता येणे व रागावर ताबा मिळवून पुढे जाता येणे गरजेचे असते. स्वनियमन वा नियंत्रण असा शब्द यासाठी वापरता येणारा आहे. कोणतेही वाहन हाकताना त्यावर नियंत्रण मिळवता येणे जितके गरजेचे, तितकेच स्वतःवर व स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवता येणे महत्त्वाचे. नियंत्रणाअभावी वाहनाचे अपघात होतात, तसेच आयुष्यातही घडून येते. तसे होऊ नये म्हणून वेगाला आवरा, असे म्हणतात त्याप्रमाणे रागाला आवरा; म्हणण्याची वेळ आली आहे, कारण या रागाच्या भरात होणाऱ्या हत्त्या व आत्महत्त्यांचे प्रमाण अलीकडील काळात वाढताना दिसत आहे.
सुख, शांती व समाधानाच्या शोधात असणाऱ्या मनुष्याला किमान अपेक्षा ठेवण्याचा सल्ला दिला जातो, पण या अपेक्षा कमी ठेवण्याबरोबरच राग कमी करणे अधिक महत्त्वाचे आहे. वेगातून अपघात आणि रागातून घात घडून येतो. संतत्व म्हणजे काही केवळ अंगाला राख फासून घेणे वा सर्वसंगपरित्याग किंवा भगवे कपडे परिधान करणे नव्हे, तर षडरीपुंपासून ज्याला दूर राहता येणे जमते तो संतत्वाला पोहोचू शकतो. हिंदू धर्म शास्त्रात मनुष्याचे जे सहा शत्रु सांगितले गेले आहेत त्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरापासून दूर राहून निर्मळ आयुष्य जगणार्याची वाटचालच संत मार्गाकडील वाटचाल म्हणवते. हे प्रत्येकालाच जमते असे नाही, किंबहुना खूप अपवादात्मक लोक असतात ज्यांना ते जमते. दुर्दैवाने मनुष्याच्या अशांतीचे कारक बनणाऱ्या या रिपुंची, म्हणजे घटकांची समाजात वाढ होताना दिसत आहे. यातील प्रत्येकाची वेगळी चिकित्सा करण्याची गरज नसावी, कारण त्याचे दुष्परिणाम आपण नेहमी अनुभवत असतोच; पण यातही क्रोध म्हणजे रागाच्या भरात होणाऱ्या अप्रिय घटनांचे प्रकार सध्या वाढताना दिसत आहेत म्हणून ही सविस्तर पार्श्वभूमी विशद केली.
-----------------
पती-पत्नीमध्ये होणाऱ्या सततच्या भांडणामुळे रागाच्या भरात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शिरवलीच्या एका मातेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा गळा घोटला, तर अशाच शुल्लक वादातून चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे एका मातेने रागाच्या भरात घरातून निघून जात शेतातील विहिरीत आपल्या दोन चिमुकल्या बाळांसह आत्महत्या केल्याची घटना या आठवड्यात घडली. मुलगी सासरी नांदत नाही या विषयावरून झालेल्या भांडणाचा राग धरून कल्याण मध्ये एका मातेने व मुलीने मिळून पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून त्याची हत्या केली, तर चंद्रपूर जिल्ह्याच्याच सुशी गावात एका संशयित पतीने रागातून पत्नीने आणलेल्या सरपणाचीच चिता रचुन त्यावर पत्नीला पेटवून दिल्याचीही घटना घडली. अवघ्या दोन-चार दिवसात घडलेल्या या जीवघेण्या घटना प्रातिनिधिक असून, रागाच्या भरात घडून येणार्या किरकोळ प्रकारांची तर गणनाच करता येऊ नये. रागावर नियंत्रण कसे मिळवता यावे, हा प्रश्न त्यामुळेच महत्त्वाचा ठरावा.
-----------------
रागातून बुद्धी गहाण पडते, सद्विवेक खुंटीवर टांगला जातो. रागाच्या भरात काय केले जाते आहे याचे भानच मनुष्याला उरत नाही. स्वतःच्याच पती व पित्याची हत्या करणे असो, की पोटच्या लेकरांसह आत्महत्या; असले प्रकार हे केवळ बेभानपणातूनच होऊ शकतात. समाजशास्त्राच्या अंगाने विचार करता हा बेभानपणा व्यक्तिगत विवंचनातून व आपले कोणी ऐकणारा किंवा आपल्याला समजून घेणारा, मदत करणारा नाही या भावनेतून आकारास येतो हे खरे, परंतु विवंचना कोणाला नसतात? जो कोणी जवळचा असतो, मग तो नातेवाईक किंवा मित्र असो; की शेजारचा वा कार्यालयातील आणखी कुणी, त्याच्याशी मोकळेपणे बोलून या विवंचनांवर मार्ग शोधता येणारा असतो. अडचण अशी आहे की आज कुणाजवळ विश्वासाने मन मोकळे करावे असे संबंध तितकेसे उरलेले नाहीत. मी व माझ्यातल्या गुरफटलेपणातून हे चित्र ओढवले आहे, पण त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. रागातून काही करून जाण्यापूर्वी त्या रागाची कारणे कुणाजवळ तरी व्यक्त करता यायला हवीत. त्यातून रागाचा निचरा, निर्मूलन तर घडून येऊ शकेलच; शिवाय त्यावर नियंत्रण मिळवणेही सोपे ठरू शकेल. हे फार मोठे गहन वा गंभीर अध्यात्म नाही, तर साधा सोपा जीवनानुभव आहे. तेव्हा असा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
https://www.lokmat.com/editorial/anger-must-be-controlled-a310/?fbclid=IwAR0y4pIswVuUGE7ElBRo50HftourrkEM8v5UVx6-oRV-NU0c4AArK3sNQNE
स्वराज्य प्रेरिका, माँसाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन...
Jan 12, 2022
स्वराज्य प्रेरिका, माँसाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन...
बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सिंदखेड राजा येथे राजमाता मासाहेबांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांना वंदन केले.
मातृतीर्थाच्या या मातीतच ममत्वासोबत वीर, शूरत्व जागवण्याचे सत्व आहे हे तेथे पाऊल ठेवताच अनुभवास येते.
शाहिरांचे पोवाडे इतिहासाच्या गौरवशाली व रोमांचकारी स्मृती जागवतात, तद्वतच या मातीच्या गंधात मासाहेबांच्या अद्वितीय तसेच अतुलनीय शौर्य, संस्कार व प्रेरणेचा दरवळ आहे.
लोकमतचे सहकारी मुकुंद पाठक व अन्य स्थानिक पत्रकारांसमवेत मासाहेबांचे दर्शन घेऊन त्यांच्या जन्मस्थळ विकासाची माहिती घेतली.
आज जन्मदिनी मासाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा...
#JijauJanmotsav #SindkhedRaja #KiranAgrawal
पोहरादेवीचे दर्शन...
Jan 07, 2022
पोहरादेवीचे दर्शन...
बंजारा समाजाची काशी म्हणविल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे भेट देत जगदंबादेवी मंदिरात पूजा केली तसेच संत सेवालाल महाराज व तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
संत सेवालाल महाराज मंदिरात संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराज तसेच डॉ. रामराव महाराज समाधीस्थळी महंत शेखर महाराज व संजय महाराज यांच्यासोबत चर्चा झाली.
जगदंबा माता मंदिराच्या परकोटचे काम सध्या लोकवर्गणीतून सुरू असून तांड्या तांड्यावरून त्यासाठी मदत घेतली जात आहे. यासाठी तेथे खास राजस्थानातून आणण्यात आलेले नक्षीदार खांब व साहित्य पाहता, हे मंदिर अतिशय भव्य व आकर्षक असेल असा विश्वास बळावून गेला. संत सेवालाल महाराजांच्या समाधी स्थळाचे कामही शासन निधीतून प्रस्तावित असून ते लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे किसनभाऊ राठोड यांच्या दातृत्वातुन उभ्या राहिलेल्या गोरबंजारा धर्मपीठासही भेट दिली, तेथे महंत जितेंद्र महाराज यांच्या वतीने किसन जाधव यांनी सर्व परिसर फिरून दाखविला.
शासनाच्यावतीने दिलेल्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या नगारा प्रकल्पाचीही माहिती जाणून घेतली. बंजारा समाजाच्या इतिहासाची जपणूक करतानाच तांडयांमध्ये विखुरलेल्या समाज बांधवांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम यातून घडून येईल.
या भेटी दरम्यान आमचे पत्रकार सहकारी मानोऱ्याचे माणिक डेरे व फुल उमरीचे अनिल राठोड आदि सोबत होते.
#Pohradevi #BanjaraKashi #SantSevalal #KiranAgrawal
Monday, January 10, 2022
सेवाश्रय ...
Jan 09, 2022
सेवाश्रय ...
स्व. सत्यनारायणजी रांदड यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अकोल्यातील या संस्थेतर्फे अखंड दृष्टिदान सेवायज्ञ चालवला जात आहे. याअंतर्गत समाजातील दानशूरांच्या सहकार्यातून केल्या जाणाऱ्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांची संख्या आता दहा हजारांच्या उंबरठ्यावर आहे.
'सेवाश्रय'चे विजय रांदड, एड. ईश्वर गट्टानी, विजय गोडा, मनोहर खंडेलवाल, श्यामसुंदर मालपाणी, नारायण भाला आदींचे यासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
अंधकारलेली वाट प्रकाशमान करण्याचे कार्य करणाऱ्या या संस्थेतर्फे आयोजित नेत्र चिकित्सा शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जाण्याचा योग आला. या कार्यक्रमाप्रसंगी माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेशचन्द्रजी चांडक, डॉ. मनीष हर्षे व सेवाश्रयच्या सेवार्थीसोबतची ही काही आनंद चित्रे...
#Sewashray #EyeChekup #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Jan 09, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220109_2_1&fbclid=IwAR28z2b2fRaMM-mJqchlCf1p1D0VFl6qLUkCX0_RCn7-5OcDZqOptQDCzJ4
https://www.lokmat.com/manthan/corona-crisis-door-caution-needed-a310/?fbclid=IwAR29kz_tkq2_36_ocGLPK5pT6V3lRi3HpH7S_HzD0aoAlt48mlz-rQgALZE
Saturday, January 8, 2022
वाशिम पत्रकार दिन 2022
Jan 08, 2022
वाशिम पत्रकार दिन
वाशिम येथे लोकमतमधील सहकाऱ्यांच्या बैठकीसाठी गेलो असता जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी व्हायची संधी मिळाली.
ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमास पद्मश्री नामदेवराव कांबळे, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, विश्वनाथ राऊत आदी मान्यवर व्यासपीठावर होते...
वाशिममधील लोकमतचे ज्येष्ठ सहकारी शिखरचंदजी बागरेचा यांच्यामुळे हा योग घडून आला.
धन्यवाद बागरेचाजी व हॅलो हेड नंदकिशोर नारे जी...
#washimpatrakarsangh #kiranAgrawal #Patrakarday2022
पुसद पत्रकार दिन ...
Jan 07, 2022
पुसद पत्रकार दिन ...
पत्रकार दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पत्रकार संघाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी व्हायची संधी मिळाली.
हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्यासारख्या दिग्गज व दूरदृष्टीच्या नेत्यांचा हा तालुका. पुढे सुधाकरराव नाईक यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यांची तिसरी, चौथी पिढी आता राजकारण व समाजकारणात सक्रिय आहे. इतरही नेते विकासासाठी झटत आहेत आणि म्हणूनच मागासलेपणाची ओळख पुसून हा तालुका कात टाकून झपाट्याने विकसित होताना दिसतो आहे.
स्वाभाविकच इथल्या नागरीकांची, संस्थांची सामाजिक जाण जागी आहे, जे पत्रकार संघाच्या कार्यक्रमास लाभलेल्या विविध क्षेत्रीय मान्यवरांच्या उपस्थितीवरूनही लक्षात आले.
प्रमुख अतिथी असल्याने बोलायला सर्वात शेवटी म्हणजे उशिराच नंबर लागला, पण श्रोते अखेरपर्यंत टिकून होते आणि मनसोक्त दादही देत होते हे विशेष.
माध्यम क्रांतीचा विस्फोट झाला आहे. वृत्तपत्रांपाठोपाठ दृकश्राव्य माध्यमे, चॅनल्स, डिजिटल, वेब पत्रकारितेचे युग आले आहे. मोबाईल जर्नालिझम सुरू झाले आहे.
बातमी देण्याचे काम सोशल मीडियाच करू लागला आहे. पण या सर्व धबडग्यात विश्वासार्हता पणास लागली आहे. ती टिकविण्याचे आव्हान पत्रकारितेपुढे आहे. सुदैवाने छापील शब्दावरचा वाचकांचा विश्वास अतूट आहे, त्यामुळे वृत्तपत्रांना अडचण नाही.
कोरोनासारख्या संकटांनी संवेदनांचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे.
आपला अधीनायक हा सामान्य माणूस आहे, त्याची सुखदुःखे, व्यथा-वेदना जाणून घेणे, असहाय दुर्बल, रंजले गांजले, हिन दिन, दबलेल्या पिचलेल्या वर्गाचा आवाज बनणे गरजेचे झाले आहे.
संवेदना व माणसातले माणूसपण जागवणारी, कळवळा प्रदर्शणारी पत्रकारिता गरजेची आहे ...
अशा विविध मुद्द्यांवर बोलता आले.
कवी दीपक आसेगावकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदीम जी, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद भाऊ मैंद, गोवा व महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ऍड आशिष देशमुख, पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डुब्बेवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल चेंडकाळे, राजस्थानी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गजबी, सरनाईक वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे व सत्कारमूर्ती आमच्या लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अखिलेश कुमार अग्रवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यानिमित्त देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय व हिंदी वाचनालयास भेटी दिल्या. तालुक्यासारख्या ठिकाणी वाचन चळवळ रुजविण्यासाठी या वाचनालयांनी चालवलेली धडपड खरेच कौतुकास्पद आहे.
अखिलेशजी यांच्या आग्रहामुळे जाणे झाले.. Thanks Akhileshji
#PusadPatrakarSangh #SarnaikVachnalayPusad #HindiVachnalayPusad #KiranAgrawal
Monday, January 3, 2022
वाघांच्या गुहेत जाऊन आलो...
Jan 03, 2022
वाघांच्या गुहेत जाऊन आलो...
वाघ वाघच असतो. अखेर राजाच तो, त्यामुळे त्याच्या गुहेत जाणे व सहवास लाभणे म्हणजे भारीच. मी असाच शेती, मातीच्या व बोली भाषेच्या साहित्य प्रांतातील वाघ व्यक्तिमत्वाच्या भेटीस जाऊन आलो. 😃
काही भेटी व क्षण असे असतात, जे जगण्याला उभारी व आयुष्यातील समृद्धता वाढवितात. यातून झालेला हर्ष नवी उमेद देऊन जाताे. नवे वर्ष, नवा हर्ष म्हणत २०२२ या वर्षात पाऊल ठेवताना असाच हर्ष वाट्याला आला... वऱ्हाडी बाेलीने साहित्य विश्वाला भरजरी वैभव प्राप्त करून देणारे, लाेककवी प्राचार्य डाॅ. विठ्ठल वाघ यांच्या भेटीने.
जन्माने अग्रवाल व पेशाने पत्रकार असलाे तरी मूळात मी शेतकरी आहे. ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालते...’ , ‘बैल दाराची श्रीमंती...’ या सारख्या कवितांचे मनावर गारुड आहे. त्यामुळेच अकाेल्यात आल्यापासून डाॅ. वाघ यांच्याकडे जाण्याची ओढ मनात हाेती. नववर्षाच्या प्रारंभ दिनी १ जानेवारीस असलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही संधी भेटली. अभिष्टचिंतन केले आणि त्यानंतर जी गप्पांची मैफल रंगली ती सरूच नये, असे वाटले.
आठ हजारांहून अधिक वऱ्हाडी म्हणींचे संकलन केलेल्या व साडेतीन हजारांहून अधिक वऱ्हाडी म्हणी स्वत: निर्मिलेल्या विठ्ठ्ल वाघांचा विचार व आचार वाघासारखाच असल्याचे प्रकर्षाने जाणवले. साहित्य संमेलनापासून, आजच्या साहित्यापर्यंत, शरद पवार यांच्या कापूस दिंडीपासून ते निवडणुकीच्या राजकारणापर्यंत अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या.
प्रतिमा व प्रतिकांखेरीज कविता पूर्ण हाेऊच शकत नाही, या आपल्या मताचा पुनरुच्चार करतानाच आज साहित्यात शब्दांच्या रांगाेळ्या रेखाटल्या जातात, जीवनानुभव प्रकटताना दिसत नाही. कसदार व वास्तव साहित्याच्या निर्मितीएेवजी साेशल मिडीयावरील काैतुकाला भाळणारा वर्ग माेठा झाला आहे. याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या भेटीत त्यांच्या कविता त्यांच्याच पहाडी आवाजात एेकण्याचे भाग्य तर लाभलेच, शिवाय शब्दांशी खेळणाऱ्या या व्यक्तित्वाची चित्र व शिल्पकारीही अनुभवता आली. त्यांनी स्वत: घरभर फिरून घरातल्या भिंतीवर साकारलेल्या काेलाज कृती व काही शिल्प दाखविलीत आणि त्या मागील प्रेरणा विशद केल्या. सरांचे 'मल्टी आर्टिन्ग स्किल्स' पाहता खरेच त्यांच्या गुहेतील सफर अद्भुत ठरली.
...वर्षाची सुरुवात खरेच खुप सुंदर झाली.
धन्यवाद डाॅ. विठ्ठ्ल वाघ सर, आपली भेट समृद्धतेत भर घालणारी ठरली.
नाशिकच्या संदर्भाने भगीरथ जी शिंदे, एन. एम. आव्हाढ, शंकर बोऱ्हाडे, संजय वाघ यांची त्यांनी आवर्जून आठवण काढली.
माझे सहकारी साहित्यिक राजू चिमणकर यांच्यामुळे हा याेग घडून आला.
#DrVitthalWagh #KiranAgrawal #LokmatAkola
Sunday, January 2, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Jan 02, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220102_5_1&fbclid=IwAR3LoYK4NR23L6TSQn536IGg08paEt5xEisz8OcL7guOoYGA_q11yUW-UkY
https://www.lokmat.com/manthan/lets-prove-ourselves-sake-humanity-a310/?fbclid=IwAR3L_53frFepb3ihmQdfzjkrRj-HPrTNC6rhVNsEm4Rehu9YxofICjQFyX4
नववर्षाचे स्वागत करताना...
Jan 01, 2022
नववर्षाचे स्वागत करताना...
नवे वर्ष नवा हर्ष, असे आपण नेहमी म्हणतो.
ते खरेही असते, परंतु यंदा पुन्हा एका भीतीच्या सावटात आपण नवीन वर्षात पाऊल ठेवले आहे.
अर्थात घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. स्वतःच स्वतःची व सारे मिळून एकमेकांची काळजी घेऊया, आरोग्यास जपत वाटचाल करूया...
आव्हाने अनेक असलीत तरी त्यावर मात करीत आपण नवीन व आनंददायी काही घडवूया...
श्रद्धेय बाबूजी जवाहरलाल जी दर्डा यांनी घालून दिलेल्या आदर्शानुरूप पत्रकारिता परमो धर्मास जागून कर्तव्य पूर्तीसाठी आमची टीमही आपल्या सेवेत सदैव तत्पर असेल, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत..
नववर्षाच्या आश्वासक व आरोग्यदायी शुभेच्छांसह...
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #HappyNewYear2022
Subscribe to:
Posts (Atom)