Thursday, January 13, 2022

पोहरादेवीचे दर्शन...

Jan 07, 2022 पोहरादेवीचे दर्शन...
बंजारा समाजाची काशी म्हणविल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे भेट देत जगदंबादेवी मंदिरात पूजा केली तसेच संत सेवालाल महाराज व तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. संत सेवालाल महाराज मंदिरात संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराज तसेच डॉ. रामराव महाराज समाधीस्थळी महंत शेखर महाराज व संजय महाराज यांच्यासोबत चर्चा झाली. जगदंबा माता मंदिराच्या परकोटचे काम सध्या लोकवर्गणीतून सुरू असून तांड्या तांड्यावरून त्यासाठी मदत घेतली जात आहे. यासाठी तेथे खास राजस्थानातून आणण्यात आलेले नक्षीदार खांब व साहित्य पाहता, हे मंदिर अतिशय भव्य व आकर्षक असेल असा विश्वास बळावून गेला. संत सेवालाल महाराजांच्या समाधी स्थळाचे कामही शासन निधीतून प्रस्तावित असून ते लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे किसनभाऊ राठोड यांच्या दातृत्वातुन उभ्या राहिलेल्या गोरबंजारा धर्मपीठासही भेट दिली, तेथे महंत जितेंद्र महाराज यांच्या वतीने किसन जाधव यांनी सर्व परिसर फिरून दाखविला. शासनाच्यावतीने दिलेल्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या नगारा प्रकल्पाचीही माहिती जाणून घेतली. बंजारा समाजाच्या इतिहासाची जपणूक करतानाच तांडयांमध्ये विखुरलेल्या समाज बांधवांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम यातून घडून येईल. या भेटी दरम्यान आमचे पत्रकार सहकारी मानोऱ्याचे माणिक डेरे व फुल उमरीचे अनिल राठोड आदि सोबत होते. #Pohradevi #BanjaraKashi #SantSevalal #KiranAgrawal

No comments:

Post a Comment