Monday, January 3, 2022

वाघांच्या गुहेत जाऊन आलो...

Jan 03, 2022 वाघांच्या गुहेत जाऊन आलो... वाघ वाघच असतो. अखेर राजाच तो, त्यामुळे त्याच्या गुहेत जाणे व सहवास लाभणे म्हणजे भारीच. मी असाच शेती, मातीच्या व बोली भाषेच्या साहित्य प्रांतातील वाघ व्यक्तिमत्वाच्या भेटीस जाऊन आलो. 😃
काही भेटी व क्षण असे असतात, जे जगण्याला उभारी व आयुष्यातील समृद्धता वाढवितात. यातून झालेला हर्ष नवी उमेद देऊन जाताे. नवे वर्ष, नवा हर्ष म्हणत २०२२ या वर्षात पाऊल ठेवताना असाच हर्ष वाट्याला आला... वऱ्हाडी बाेलीने साहित्य विश्वाला भरजरी वैभव प्राप्त करून देणारे, लाेककवी प्राचार्य डाॅ. विठ्ठल वाघ यांच्या भेटीने. जन्माने अग्रवाल व पेशाने पत्रकार असलाे तरी मूळात मी शेतकरी आहे. ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालते...’ , ‘बैल दाराची श्रीमंती...’ या सारख्या कवितांचे मनावर गारुड आहे. त्यामुळेच अकाेल्यात आल्यापासून डाॅ. वाघ यांच्याकडे जाण्याची ओढ मनात हाेती. नववर्षाच्या प्रारंभ दिनी १ जानेवारीस असलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही संधी भेटली. अभिष्टचिंतन केले आणि त्यानंतर जी गप्पांची मैफल रंगली ती सरूच नये, असे वाटले.
आठ हजारांहून अधिक वऱ्हाडी म्हणींचे संकलन केलेल्या व साडेतीन हजारांहून अधिक वऱ्हाडी म्हणी स्वत: निर्मिलेल्या विठ्ठ्ल वाघांचा विचार व आचार वाघासारखाच असल्याचे प्रकर्षाने जाणवले. साहित्य संमेलनापासून, आजच्या साहित्यापर्यंत, शरद पवार यांच्या कापूस दिंडीपासून ते निवडणुकीच्या राजकारणापर्यंत अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या. प्रतिमा व प्रतिकांखेरीज कविता पूर्ण हाेऊच शकत नाही, या आपल्या मताचा पुनरुच्चार करतानाच आज साहित्यात शब्दांच्या रांगाेळ्या रेखाटल्या जातात, जीवनानुभव प्रकटताना दिसत नाही. कसदार व वास्तव साहित्याच्या निर्मितीएेवजी साेशल मिडीयावरील काैतुकाला भाळणारा वर्ग माेठा झाला आहे. याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या भेटीत त्यांच्या कविता त्यांच्याच पहाडी आवाजात एेकण्याचे भाग्य तर लाभलेच, शिवाय शब्दांशी खेळणाऱ्या या व्यक्तित्वाची चित्र व शिल्पकारीही अनुभवता आली. त्यांनी स्वत: घरभर फिरून घरातल्या भिंतीवर साकारलेल्या काेलाज कृती व काही शिल्प दाखविलीत आणि त्या मागील प्रेरणा विशद केल्या. सरांचे 'मल्टी आर्टिन्ग स्किल्स' पाहता खरेच त्यांच्या गुहेतील सफर अद्भुत ठरली. ...वर्षाची सुरुवात खरेच खुप सुंदर झाली.
धन्यवाद डाॅ. विठ्ठ्ल वाघ सर, आपली भेट समृद्धतेत भर घालणारी ठरली. नाशिकच्या संदर्भाने भगीरथ जी शिंदे, एन. एम. आव्हाढ, शंकर बोऱ्हाडे, संजय वाघ यांची त्यांनी आवर्जून आठवण काढली. माझे सहकारी साहित्यिक राजू चिमणकर यांच्यामुळे हा याेग घडून आला. #DrVitthalWagh #KiranAgrawal #LokmatAkola

No comments:

Post a Comment